PUBG च्या वेडात मुलानेच घेतला आईचा जीव, जाणून घ्या नेमकं प्रकरण

फोटो स्रोत, PUBG CORP.
- Author, नीतू सिंह
- Role, बीबीसी हिंदीसाठी, लखनौमधून
नवीन कुमार सिंह पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये लष्करात ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर पदावर आहेत. गेल्या 2 मे रोजी ते सुट्टीवरून परतले होते. त्यावेळी त्यांना कल्पनाही नसेल की अवघ्या महिनाभरातच पत्नीच्या मृत्यूची बातमी येईल.
नवीन कुमार, त्यांची पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असं हे छोटेखानी चौकोनी कुटुंब. त्यांच्या पत्नी मुलांसोबत लखनौच्या पीजीआय क्षेत्रातील पंचमखेडामध्ये असलेल्या यमुनापूरम कॉलनीत रहायच्या.
4 जूनच्या रात्री जवळपास 2-3 च्या दरम्यान त्यांच्या 17 वर्षांच्या मुलाने वडिलांच्या पिस्तुलाने आईची गोळ्या झाडून हत्या केली. 7 जूनला त्याने स्वतः वडिलांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. तीन दिवस तो आपल्या 10 वर्षांच्या बहिणीसोबत त्याच घरात होता. तीन दिवसांनंतर कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी पसरली तेव्हा त्याने वडिलांना फोन केला.
एडीसीपी कासीम आब्दी यांनी फोनवरून बीबीसीशी बोलताना सांगितलं, "मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे."
मुलाला गेम खेळण्याची आणि मुलींशी चॅट करण्याची सवय होती, असं नवीन कुमार यांनी पोलिसांना सांगितलं. यावरून आई कायम मुलाला ओरडायची. मोबाईल हातात दिसल्यावरही ओरडायची. मोबाईलवर अशी बंदी घालण्याचा त्याला राग यायचा.
तर, "माझी चूक असो किंवा नसो, घरात सगळे मलाच दोष लावायचे. मी खेळायला गेलो तरी आई संशय घ्यायची", असं आरोपी मुलाने पोलिसांना सांगितलं.
कासीम आब्दी सांगतात, "मुलगा याआधी अनेकदा घरून पळून गेला होता. त्याचा स्वभाव इतर मुलांपेक्षा जरा वेगळा होता. घटनेनंतर मुलगा सध्या नॉर्मल आहे. आपण जे केलं ते अगदी योग्यच होतं, असं त्याला वाटतं.
कोव्हिड काळात मोबाईल व्यसनाच्या अनेक केसेस बघितल्या. पण, अशा प्रकारची ही पहिलीच केस मी बघतोय."

फोटो स्रोत, Getty Images
या प्रकरणी लखनौच्या किंग्ज जॉर्ज मेडिकल विद्यापीठातले माजी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कृष्ण दत्त बीबीसीशी बोलताना म्हणाले, "काही मुलांचा स्वभाव असा असतो की त्यांचं त्यांच्या भावनांवर नियंत्रण नसतं. याला पुअर इम्पल्स कंट्रोल म्हणतात. अशी मुलं फारसं नियोजन करून एखादं पाऊल उचलत नाहीत. भावनेच्या भरात त्यांच्याकडून एखादी कृती होत असते. बरेचदा अशी मुलं आपल्या लहान भावा-बहिणींनाही इजा पोहोचवतात."
ते म्हणतात, "आजकाल अशा प्रकारच्या घटनांचं मुख्य कारण विभक्त कुटुंबपद्धती असल्याचं जाणवतं. पूर्वी एकत्र कुटुंबात मुलं सर्वांशी बोलायची आणि त्याचवेळी आपापल्या कामांमध्ये व्यग्र असायची. मात्र, आजकाल मोबाईल आणि टीव्ही एवढंच यांचं जग राहिलं आहे. विभक्त कुटुंबात आई आणि वडील दोघेही नोकरी करत असतील तर मुलं अधिकच एकटी पडतात. अशा मुलांना त्यांचं म्हणणं मांडायची संधीच मिळत नाही. अशा सगळ्या वातावरणात त्यांना मोबाईलच व्यसन लागतं. अशावेळी मुलांचं काय होतं, त्याचा परिणाम तुमच्या समोर आहे."
मोबाईलच्या व्यसनाचा परिणाम
आशा ज्योती केंद्र 181, या केंद्रात काम करणाऱ्या अर्चना सिंह सांगतात, "आमच्याकडे जेवढी प्रकरणं येतात त्यापैकी 40 टक्के प्रकरणं ही मोबाईलच्या व्यसनाची असतात. कोव्हिड काळात गेममुळे अनेक गुन्हे घडले आहेत. संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावणं, हे मोबाईल अॅडिक्शनचं एक मोठं कारण आहे. कोव्हिड काळात ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अनेक मुली सायबर क्राईमला बळी पडल्या."
एडीसीपी कासीम आब्दी म्हणतात, "कोव्हिड काळात लोकांचं सार्वजनिक आयुष्य बऱ्यापैकी संपुष्टात आलं होतं. लोक दीर्घकाळ घरातच होते. कुटुंबीय आणि नातलगांचं येणं-जाणंही कमी झालं. त्याचा परिणाम असा झाला की मुलं पूर्वीच्या तुलनेत जास्त वेळ मोबाईलवर घालवू लागले. या प्रकरणात मोबाईलचा डेटा आणि टॉक टाईम आईने रिचार्ज केला नव्हता. त्यामुळे हा मुलगा आईचा फोन वापरत होता. घटनेनंतरही तो आईच्या मोबाईलवरून गेम खेळत होता. मुलाच्या आजीच्या तक्रारीवरून ज्युवेनाईल जस्टीसच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे."
पब्जीची सवय कशी मोडायची?
कधीकाळी दिवसभरातून 8 ते 10 तास मोबाईल पब्जी खेळणारे 20 वर्षीय करन बीबीसीशी बोलताना सांगतात, "या गेमची सवय झाली की ती मोडणं खूप अवघड आहे. मी दोन वर्षांपूर्वीपर्यंत दररोज 8 ते 10 तास पब्जी खेळायचो. खेळताना कुणी जेवायला बोलावलं किंवा एखादं काम सांगितलं तर खूप राग यायचा. संताप व्हायचा. कारण या गेममध्ये क्वीट करणं फार अवघड असतं."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे सांगतात, "आता मी दिवसातून दीड-दोन तासच पब्जी खेळतो. ऑनलाईन गेमचे तास कमी करण्यासाठी मला जवळपास दोन वर्षं लागली. आता मला पूर्वीपेक्षा रागही कमी येतो. माझे अनेक मित्र आजही दिवसातून 8-10 तास हा गेम खेळतात. अशी मुलं खूप चिडचिड करणारे, हट्टी आणि रागीट असतात."
बुधवारी संध्याकाळी 4 वाजता पोस्ट मॉर्टम हाऊसच्या बाहेर 40 वर्षांच्या मृतक साधना सिंह यांची 10 वर्षांची मुलगी आईच्या मृतदेहाजवळ वडिलांना बिलगून रडत होती. अवघ्या 10 वर्षांची ही मुलगी तीन दिवस आपल्या आईच्या मृतदेहासोबत घरातच होती. मृतदेह कुजल्यावर वास असह्य होऊ लागला तेव्हा आरोपी मुलाने वडिलांना फोन केला.
पोस्ट मॉर्टम हाऊसच्या बाहेर पत्नीच्या मृतदेहाजवळ उभे नवीन कुमार सिंह यांचेही अश्रू थांबत नव्हते. मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत ते तिला सांत्वना देण्याचा प्रयत्न करत होते. आरोपीचे काका-काकू, आजी-आजोबा आणि आजोळची मंडळीही तिथेच होती. संध्याकाळी उशिरा वैकुंठ धाममध्ये पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माध्यमिक शाळेत नापास झाला होता आरोपी
पोस्ट मॉर्टम हाऊसच्या बाहेर उभे असलेले आरोपीचे मामा संत सिंह यांनी सांगितलं, "गेल्या महिन्यातच 2 मे रोजी आमचे भाऊजी (नवीन कुमार) सुट्टीवरून परत गेले होते. हा मुलगा (आरोपी) आजोळी नेहमीच यायचा. क्रिकेट आवडता खेळ आहे त्याचा. पण, कधी-कधी खूप पॅनिक होतो. एखादं काम करत असेल आणि आपण करू नको म्हटलं तर त्याला खूप राग येतो. पण, ही लक्षणं तर बऱ्याच मुलांमध्ये असतात. त्यामुळे त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावं, असं आम्हाला कधी वाटलं नाही. आता त्याने एवढं मोठं पाऊल कसं उचललं, कळत नाही?"
संत सिंह पुढे सांगतात, "फोनवर गेम खेळण्याची सवय होती त्याला. गेल्यावर्षी हायस्कूलमध्ये असताना नापास झाला होता. त्याचंही त्याला टेंशन होतं. त्याला कमी मार्क पडू लागले तेव्हापासून ताई अभ्यासासाठी त्याच्या मागे लागायची. फारवेळ फोन खेळू द्यायची नाही. बरेचदा तर त्याच्या हातातून फोन हिसकावूनही घेतला. कदाचित यामुळे रागाच्या भारात त्याने हे पाऊल उचललं असावं."
आरोपीची आजी मिर्झा देवी यांनी सुनेच्या हत्येची तक्रार नोंदवली. पोलिसांनी आजीच्या तक्रारीवरून अल्पवयीन नातवावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली. मिर्झा देवी आपल्या धाकट्या मुलासोबत लखनौच्याच इंदिरापूरममध्ये राहतात. पोस्ट मॉर्टम हाऊसच्या बाहेर उभ्या मिर्झा देवी रडू आवरत सांगत होत्या, "आमचं तर सगळंच संपलं. आता जे काही करायचं ते पोलीस करतील." घटनेनंतर कुटुंबीय फारसे बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.
डॉ. कृष्ण दत्त यांचं म्हणणं आहे, "मोबाईलमध्ये एका क्लिकवर बरंच काही ओपन होतं. मुलं गेम व्यतिरिक्तही इतर अनेक वेगवेगळ्या साईट्सवर जातात आणि हळूहळू एका काल्पनिक विश्वात जगू लागतात. 5 ते 12 हे वय मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. या वयात त्याचं म्हणणं ऐकण्याची, त्यांना समजून घेण्याची खूप गरज असते."

फोटो स्रोत, Getty Images
मृतक साधना सिंह दोन भावांची एकुलती एक बहीण होती. पदवीधर असलेल्या साधना सिंह गृहिणी होत्या आणि गेल्या 5-6 वर्षांपासून मुलांसोबत यमुनापूरम कॉलनीत रहायच्या. 2002 साली त्यांचं लग्न झालं होतं. 2005 मध्ये आरोपी मुलाचा जन्म झाला.
बुधवारी दुपारी अडीच ते संध्याकाळी साडे चार वाजेपर्यंत आम्ही यमुनापुरम कॉलनीत आरोपीच्या शेजाऱ्यांशी बोलण्याचा बराच प्रयत्न केला. पण, बहुतेकांनी बोलायला नकार दिला.
नवीन सिंह यांचं तीन मजली घर गल्लीत कॉर्नरलाच आहे. मीडियाच्या दोन-तीन गाड्या सोडल्या तर संपूर्ण गल्ली शांत होती. नवीन सिंह यांच्या घराजवळ काही लहान मुलं खेळत होती. पण, कुणी बोलत नव्हतं.
गोळीचा आवाज कुणीच ऐकला नाही
नवीन सिंह यांच्या घराच्या अगदी समोर राहणाऱ्या एका 70 वर्षांच्या आजींनी सांगितलं, "गोळीचा आवाज आम्हाला ऐकू आला नाही. कदाचित आम्हला गाढ झोप लागली असावी."
त्या पुढे म्हणाल्या, "दोन-तीन दिवस इथेच माती (मृतदेह) ठेवली होती. म्हणूनच वास जावा यासाठी पंखा सुरू ठेवला आहे. आम्ही घरासमोरच राहतो. पण, इथे गर्दी दिसली तेव्हा आम्हाला कळलं. आजकालची मुलं मोबाईलपुढे कुणाचं ऐकतात थोडीच."
आजींच्या शेजारी बसलेली स्त्री म्हणाली, "आई-वडील नोकरीवर जातात. मुलांवर कुणाच लक्षच नसतं. मुलं इतके हट्टी झालेत की मोबाईल नसेल तर जेवतच नाहीत. आधी आई-वडील मुलांनी जेवावं म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देतात आणि मग काढून घ्यायचं म्हटलं तरी तोवर खूप उशीर झालेला असतो. आता हेच बघा ना आईने तर त्या मुलाच्या भल्यासाठीच मोबाईल बघू नको सांगितलं होतं. तिला थोडीच माहिती होतं की रागाच्या भरात तो तिलाच गोळी घालून ठार करेल."
मुलांना एकटेपणा जाणवू देऊ नका
राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या सदस्या डॉ. सुचिता चतुर्वेदी यांच्या मते जवळपास दोन-अडीच वर्षांपूर्वीही अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी एका 7-8 वर्षांच्या मुलीनेही अशाच प्रकारचा गुन्हा केला होता.
डॉ. सुचिता चतुर्वेदी बीबीसीला सांगतात, "मुलांचं मन ओळखता आलं पाहिजे. मुलांना जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हाच ते अशा आर्टिफिशल गोष्टींच्या मागे पळतात. मुलांना एकटं का रहावं वाटतं, याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. हल्ली संयुक्त कुटुंब पद्धती बरीच रुळली आहे. पैशांच्या मागे धावताना मुलांकडे लक्ष देण्यात ते कमी पडतात."
आयोगाने कोव्हिड काळात एक पत्रक काढून मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष देण्याची सूचना केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
या घटनेनंतर आम्ही तात्काळ आणखी एक पत्रक काढून मुलांच्या वापरासाठी वेगळाच फोन ठेवावा, अशी सूचना करणार असल्याचं डॉ. सुचिता चतुर्वेदी यांनी सांगितलं. त्या फोनमध्ये फक्त मुलांच्या वापराचे अॅप्स असावे. मुलं वाचू शकतील, असं उत्तम साहित्य असावं. आजचं युग हे मशीनयुग आहे. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर अशा घटना पुढेही घडतील. संयुक्त कुटुंब लोप पावली आहेत. त्यामुळे मुलांना गोष्टी सांगायला कुणी उरलेलंच नाही.
नकार पचवणं मुलांसाठी अवघड
गाझियाबादमध्ये राहणाऱ्या 19 वर्षांच्या आकाश यांचं म्हणणं आहे, "पब्जी गेम खेळणाऱ्यांमध्ये 10-12 ते 17-18 वर्षांपर्यंतची मुलं सर्वात जास्त आहेत. मी पण खेळतो. गेम खेळताना मध्येच कुणी अडवलं तर खूप राग येतो, हाच या गेमचा सर्वात मोठा दोष आहे."
यूपी ज्युवेनाईल जस्टिसच्या असेसमेंट पॅनलच्या सदस्या आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नेहा आनंद सांगतात, "गेल्या दोन आठवड्यात मी 11 ते 17 वयोगटातल्या 20 ते 25 मुलांचं काउंसलिंग केलं आहे. या सर्वांना कुठलं ना कुठलं अॅडिक्शन होतं. कुणाला मोबाईलचं, कुणाला कॅफेमध्ये जाण्याचं तर कुणाला गाड्या चालवण्याचं. एखाद्या मुलाने दुसऱ्या मुलाकडे एखादी वस्तू बघितली तर त्यालाही ती वस्तू हवी असते आणि तो त्यासाठी हट्ट करतो."

त्या पुढे सांगतात, "पूर्वी मुलं नम्र होती. पण, आता परिस्थिती खूप बदलली आहे. मुलं फार व्हायलंट (हिंसक) स्वभावाची झाली आहेत. मारणं, कापणं, बंदुक वापरणं हे सर्व त्यांच्य सवयीचं बनतंय."
डॉ. नेहा आनंद यांच्या मते, "या वयात कुणी अडवलं, हटकलं तर भावनिक पातळीवर मुलांना ते मॅनेज करता येत नाही. तीन प्रमुख डायमेंशन्स आहेत - बायो, सायको आणि सोशल. बायोलॉजिकल म्हणजे एखाद्या मुलाची एखादी इच्छा पूर्ण झाली तर प्लेजर रिलीफ मिळतो. जे पालक आपल्या मुलांशी चांगला संवाद साधू शकत नाही त्या मुलांना इमोशनल रिलीफ मिळत नाही."
मुलांमध्ये ओडीडी म्हणजेच अपोशिझनल डिफाईन डिसॉर्डरची लक्षणं साधारणं आठव्या वर्षीपासून दिसू लागतात. उदाहरणार्थ तुम्ही काही बोलत असताना मुल त्याला विरोध करतं, एखाद्या गोष्टीवरून खूप वाद घालतं. अशा स्वभावाची मुलं खूप अॅग्रेसिव्ह असतात. अशी मुलं सोशल नॉर्म्स म्हणजेच सामान्य सामाजिक नियमांना फारसं महत्त्व देत नाही. ते पाळत नाहीत. तुम्ही जे म्हणाला त्याचा अगदी विरुद्ध वागतात. हा अत्यंत कॉमन डिसॉर्डर आहे. या लक्षणांच्या सुरुवातीलाच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली तर मुलांच्या लक्षणांमध्ये बरीच सुधारणा दिसून येते.
मुलांचं मन समजून घेण्यासाठी काय कराल?
डॉ. नेहा आनंद यांच्या मते 8 वर्षांचं झाल्यावर मुलांकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते. या वयात हार्मोनल बदल होतात. त्यामुळे या वयातल्या मुलांच्या मनात बरीच उलथा-पालथ सुरू असते. या वयात मुलांना अॅडजस्टमेंटचा सामना करावा लागतो. या वयात मुलांना स्वातंत्र्य हवं असतं. वेळेत मुलांचं काउंसलिंग झालं नाही तर पुढे अडचणी येऊ शकतात.
दिवसभरात मुलांशी अर्धा तास, तास भर गप्पा मारणं गरजेचं आहे. कुठल्या गोष्टीवर मुलं कसं रिअॅक्ट करतात, याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. दिवसभरातून दीड ते दोन तासांपेक्षा जास्त मोबाईल बघता कामा नये.

फोटो स्रोत, NATASHA BADHWAR
एका संशोधनानुसार सामान्यपणे मुलं 24 तासातून 8 तास मोबाईल बघतात आणि हे फार नुकसानदायक आहे, असं डॉ. नेहा आनंद सांगतात. या वयातल्या मुलांना सगळंच करून पहायचं असतं.
डॉ. नेहा आनंद म्हणतात, "या प्रकरणात माझ्या आकलनानुसार मुलाला आईला मारायचं नव्हतं तर स्वतःचा राग काढायचा होता. त्यामुळेच त्याने आईवर 6 गोळ्या झाडल्या. हा मुलगा बऱ्याच काळापासून नैराश्यात आणि काळजीत होता, असंही मला वाटतं. निराश होता. हताश होता. मुलांचं आचरण, वर्तन समजून घेणं, त्याचा अर्थ लावणंही फार गरजेचं आहे."
आपले अनुभव सांगताना डॉ. नेहा आनंद म्हणाल्या, "आजवर आम्ही जे समुपदेशन केलंय त्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की 95% पालक आपल्या मुलांचं म्हणणंच ऐकून घेत नाही. यामुळे मुलांना स्वतःचं म्हणणं मांडण्याची संधीच मिळत नाही. हे मुलांसाठी खूप घातक असतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








