बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी झिशान अख्तरला अटक, आतापर्यंत काय काय घडलं?

बाबा सिद्दिकी

फोटो स्रोत, Facebook

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी झिशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल उर्फ मोहम्मद यासीन अख्तर याला कॅनडातील सरे पोलिसांनी अटक केली आहे.

आंतरराष्ट्रीय नियमांच्या अधीन राहून आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे.

12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दिकी यांची हत्या मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर रात्रीच्या वेळी गोळीबार करत करण्यात आली होती.

लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. अभिनेता सलमान खानचे निकटवर्तीय असल्यानं त्यांच्यावर गोळीबार केल्याचा दावा बिश्नोई टोळीकडून करण्यात आला होता.

सिद्दिकी हत्या प्रकरणात आतापर्यंत 26 जणांना अटक करण्यात आली आहे. यात आरोपी झिशान अख्तर याचे देखील नाव समोर आले होते. तो बनावट पासपोर्ट आधारे कॅनडात फरार झाला होता.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील फरार असलेला झिशान अख्तर हा जालंधरचा रहिवासी आहे. बाबा सिद्दिकींवर गोळीबार झाला तेव्हा तो घटनास्थळी होता. त्यानंतर तो भारत सोडून पळून गेल्याचं समोर आलं.

यासाठी झिशान अख्तरनं पाकिस्तानातील अंडरवर्ल्डमधील शहझाद भट्टीची मदत घेतल्याची माहिती आहे.

झिशान अख्तरनं 2025 च्या सुरुवातीला एक व्हीडिओ जारी केला होता. त्यामध्ये त्यानं बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आणि भारतातील इतर गुन्हेगारी घटनांमध्ये सहभागी असल्याचं म्हटलं होतं.

त्यानुसार मुंबई पोलीस त्याचा शोध घेत, तो जिथे गेलाय तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्कात होते.

झिशान हा जालंधरमधील नकोदर येथील शंकर गावचा रहिवासी आहे. टार्गेट किलिंग, खून, दरोडा अशा 9 गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड आहे. 7 जून 2024 रोजी तो तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगातच त्याची लॉरेन्स गँगचा मुख्य गुंड आणि शूटर विक्रम ब्रारशी भेट झाली. त्याच्या माध्यमातून तो लॉरेन्स गँगशी जोडला गेला होता.

या प्रकरणात आतापर्यंत काय माहिती समोर आली?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सोमवारी (6 जानेवारी) विशेष मकोका न्यायालयात 4,590 पानी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रातून पोलिसांनी बाबा सिद्दिकी हत्येच्या कटामागचा गुन्हेगारांचा हेतू सांगितला होता.

पोलिसांनी मकोका कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, 'आपल्या गँगचा दबदबा, दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल याने अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे आदेश दिले.'

गेल्या वर्षी मुंबईतील वांद्रे पूर्व भागात 13 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी काही अज्ञात तीन लोकांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात सिद्दिकी जखमी झाले. यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मुंबईच्या चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. सिद्दिकी यांचे बॉलीवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांशी जवळचे संबंध होते.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर राजकीय वर्तुळातून आणि कलाक्षेत्रातून त्यांच्या हत्येचा कसून तपास व्हावा अशी मागणी करण्यात आली होती.

या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी अनेक पथकांमार्फत तपास करत अनेक पुरावे गोळा करत आरोपींना पकडले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी 6 जानेवारी 2025 रोजी मकोका न्यायालयात आतापर्यंत झालेला तपास याबाबत आरोपपत्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोर्टात सादर केले. यात आतापर्यंत 26 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात शिवकुमार गौतम याचा समावेश आहे.

सिद्दिकी हत्या प्रकरणातील अन्य आरोपी अनमोल बिश्नोई, झिशान अख्तर उर्फ मोहम्मद यासीन अख्तर आणि शुभम लोणकर अद्याप फरार होते. यापैकी आता झिशान अख्तरला अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात पोलिसांनी मकोका न्यायालयात 4 हजार 590 पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात 29 आरोपींविरोधात सबळ पुरावे असल्याचे पोलिसांनी आरोप पत्रात म्हटले आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पोलिसांनी आरोपपत्रात काय म्हटलंय?

बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गंत (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 88 जणांचे जबाब नोंदवले आहेत, तर माजी आमदार आणि बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्यासह 180 साक्षीदारांची यादी आरोपपत्रात जोडण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त पाच बंदुका, सहा मॅगझिन आणि 35 भ्रमणध्वनी हस्तगत केल्याचेही पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे.

गुन्ह्यात लॉरेन्स बिश्नोई याचीही प्रमुख भूमिका असल्याचे पोलिसांनी याआधीच न्यायालयाला सांगितले आहे ते ते पुन्हा अधोरेखित करण्यात आले आहे.

बाबा सिद्दिकी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाबा सिद्दिकी

"आपल्या गँगचा दबदबा, दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल याने अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे आदेश दिले," असे आरोपपत्रात म्हटले आहे.

बाबा सिद्दिकींच्या हत्येसाठी 17 लाख रुपये हवालामार्फत बिश्नोई गँगकडून आरोपींना देण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अनमोल याचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचे व त्याच्याविरोधात एप्रिलमध्ये लुकआउट नोटीस काढण्यात आल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

बाबा सिद्दिकी यांची राजकीय कारकीर्द

झियाउद्दीन सिद्दिकी उर्फ बाबा सिद्दिकी जन्म 13 सप्टेंबर 1958 रोजी बिहार येथे झाला होता. ते वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र राज्यातील विधानसभेचे सदस्य (आमदार) होते.

1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा आमदार होते आणि 2004 ते 2008 दरम्यान मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अंतर्गत अन्न व नागरी पुरवठा आणि कामगार राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले होते.

बाबा सिद्दिकी मुलगा झीशान सिद्दिकीसह

फोटो स्रोत, Baba Siddique/X

फोटो कॅप्शन, बाबा सिद्दिकी मुलगा झीशान सिद्दिकीसह

सिद्दिकी यांनी यापूर्वी 1992 ते 1997 या कालावधीत सलग दोन वेळा नगरसेवक म्हणूनही काम केले होते. त्यांनी मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व वरिष्ठ उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळाचे काम पाहिले होते.

8 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नंतर 12 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 1

2 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री सिद्दिकी यांचा मुलगा झीशानच्या कार्यालयासमोर बाबांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

बाबा सिद्दिकी आणि सलमानचे जिव्हाळ्याचे संबंध

या बिश्नोई टोळीची उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांत दहशत आहे. यापूर्वी देखील सलमान खान घराबाहेर गोळीबार प्रकरणी आणि धमकी प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला होता. याच टोळीचा बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत सहभाग आहे हे समोर आले आहे.

लॉरेन मागील सहा वर्षांपासून सलमान खानला धमकवण्याचा प्रयत्न करत आहे. काळवीटचा शिकार केल्याप्रकरणी तो सलमान खानचा बदला घेणार आहे, असं 2018 मध्ये लॉरेन्सने म्हटलं होतं. त्याने त्यामुळे आपली दहशत आणि धबधबा निर्माण होईल अशी प्रकरण सलमान बाबत घडवून आणली आहेत.

त्यातच गेल्या वर्षी मुंबईच्या वांद्रे परिसरात बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली, ते सलमानचे खूप जवळचे मित्र आणि घरचे संबंध ठेवून होते.

बाबा सिद्दिकी आणि सलमान खान

फोटो स्रोत, Baba Siddique/X

फोटो कॅप्शन, बाबा सिद्दिकी आणि सलमान खान

सलमान खानच्या वाईट काळातही बाबा सिद्दिकी त्याला साथ दिली. सलमान खान हिट रन प्रकरण आणि काळवीट शिकार प्रकरणात अडचणीत सापडला होता, तेव्हा बाबा सिद्दिकी सलमानच्या मागे उभे राहिलेले दिसले.

जेव्हा जेव्हा सलमान खानची सुनावणी असायची तेव्हा बाबा सिद्दिकी एकतर सलमानसोबत कोर्टात हजर असायचे किंवा सलमानच्या कुटुंबासोबत उभे राहायचे.

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगने जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हाही बाबा सिद्दिकी यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच सलमानला धमकी देणाऱ्यांना पकडण्याची मागणी केली होती. यानंतर काही महिन्यातच त्यांची हत्या करण्यात आली.

सलमान खान आणि बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र यांनी अनेक उपक्रमात एकत्र मिळून काम केले. सलमान खान आणि बाबा सिद्दिकी यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते.

बाबा सिद्दिकी आणि इफ्तार पार्टी

बाबा सिद्दिकी यांची संपूर्ण वर्षभरात काही बातमी मिळो अथवा नाही, मात्र रमजानच्या महिन्यात त्यांची चर्चा कायमच असायची.

बॉलीवूड कलाकारांना ज्याप्रमाणे फिल्म फेअर पुरस्कार जसे महत्त्वाचे वाटायचे, तसेच बाबा सिद्दिकी यांची इफ्तार पार्टी महत्त्वाची वाटायची. बाबा सिद्दिकी देशभरातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित इफ्तार पार्टी प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत करायचे. सिद्दिकींच्या इफ्तार पार्टीत सहभागी होणं अनेकांसाठी प्रतिष्ठेचं प्रतीक होतं.

या पार्टीत प्रत्येक मोठ्यातील मोठा कलाकारही सहभागी व्हायचा. केवळ चित्रपट कलाकारच नाही, तर मोठे व्यापारी, मंत्री सगळेच या इफ्तार पार्टीत यायचे.

बाबा सिद्दिकी यांचे बॉलिवूडशी खास नाते होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाबा सिद्दिकी यांचे बॉलिवूडशी खास नाते होते

बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीची जोरदार चर्चा होत आली आहे. बॉलीवूडपासून टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलाकारांची यावेळी चर्चा होत असे.

राजकीय मंडळी, व्यापारी यांच्यासह दरवर्षी आवर्जून इफ्तार पार्टीला सलमान खान, संजय दत्त, शाहरुख खान, आमिर खान, शहनाज गिल, गौहर खान, प्रीति जिंटा, रितेश - जेनिलिया देशमुख, शाहिद कपूर, अनिल कपूर, कटरीना कैफ असे अनेक दिग्गज कलाकार सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीत सहभागी व्हायचे. जया बच्चन यांनीही या पार्टीत हजेरी लावली आहेत.

बाबा सिद्दिकी यांचे राजकीय क्षेत्र, सिनेमासृष्टीत आणि व्यापार शेत्र यामध्ये असलेले संबंध पाहता. त्यांची हत्या करून दहशत धबधबा निर्माण करण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आल्याचं सुरुवातीपासून चर्चा आहे

त्यातच आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी सहा जानेवारी रोजी न्यायालयात सादर केलेल्या आरोप पत्रांमध्ये दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी बाबा सिद्दिकींची हत्या करण्यात आल्याचं आरोप पत्रात म्हटले आहे.

या हत्येमागे तीन कारणांबाबत पोलिसांना माहिती

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना तपास करताना आतापर्यंत अनेक पुरावे हाती लागले आहेत. यात या हत्येमागं कारणांविषयी तपास करताना काही माहिती कोर्टात सादर केली आहे त्यानुसार, सिद्दिकी हे बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांचे जवळचे मानले जात होते.

तर दुसरं कारण म्हणजे मुंबई सहित बिश्नोई गँगने अनेक ठिकाणी आपलं वर्चस्व आणि दबदबा निर्माण करण्यासाठी ही हत्या घडवल्याचं पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आलय.

सलमान खान घराबाहेर फायरिंग प्रकरणी बिश्नोई टोळीचा सदस्य आरोपी अनुज थापन याने आत्महत्या केली. ही कथित हत्या म्हणून बाबा सिद्दिकी यांची हत्या घडवून आणल्याचा संशय ही पोलीस तपास दरम्यान समोर आला आहे.

बिल्डर वादात तथ्य नसल्याची पोलिसांची माहिती

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात एस आर ए वाद असल्याची सुरुवातीला चर्चा होती. मात्र आरोपात तथ्य नसल्याची माहिती सोमवारी कोर्टात देण्यात आली आहे.

पोलिसांनी काही बिल्डर्सचे स्टेटमेंट घेतले आहेत.मात्र बिल्डरचा सहभाग किंवा एस आर ए वाद हत्येच कारण असल्याच काहीच संबंध मिळून आला नसल्याच आरोप पत्रात उल्लेख आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.