संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंशी केलेला 'सामना' भोवला?

माजी खासदार संजय निरुपम यांची काँग्रेसने हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी आणि महाविकास आघाडीविरोधात वक्तव्यं केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांच्या पक्षानं स्पष्ट केलं आहे.

महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात घोषित केलेल्या उमेदवारामुळे निरुपम यांनी जोरदार टीका केली होती.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गजानन कीर्तिकर हे सध्या शिंदे गटात आहेत. तेव्हा थेट पिता-पुत्रामध्येच निवडणुकीचा संघर्ष पाहायला मिळणार का याबाबत आता चर्चा रंगली आहे.

बिहार ते मुंबई व्हाया दिल्ली

संजय निरुपम राजकारणात कसे आले आणि बाळासाहेबांचे विश्वासू कसे बनले याबाबत बीबीसी मराठीने 2017मध्ये एक लेख लिहिला होता.

निरुपम मूळचे बिहारमधल्या रोहतास जिल्ह्यातले. तिथून पाटणा आणि नंतर दिल्लीत ते कामाच्या निमित्ताने गेले. 1988 साली ते मुंबईत जनसत्ता या वृत्तपत्रात काम करण्यासाठी आले.

त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती 'दोपहर का सामना' या शिवसेनेच्या हिंदी मुखपत्रात काम सुरू केल्यानंतर. हिंदी सामनाचे संपादक झाल्यानंतर आपसूकच त्यांचं मुंबईच्या राजकारणात पदार्पण झालं.

"निरुपम मूळचे संघाच्या विचारांचे. ते संघाच्या 'पांचजन्य' या मुखपत्रासाठी बिहारमधून काम करायचे. एस.पी.सिंग यांनी त्यांना मुख्य प्रवाहात आणलं. 'दोपहर का सामना'चे संपादक झाल्यानंतर निरुपम एक सदर लिहायचे आणि त्यात हिंदी लेखक, साहित्यिक, पत्रकार यांच्यावर सडकून टीका करायचे.

"चिखलफेकच असायची ती. आजच्या हिंदी भाषकांच्या त्यांच्या कळवळ्याच्या अगदी विरुद्ध. 90 च्या दशकात ठाकरेंचा हिंदुत्ववाद आणि उत्तर भारतीयांचे मुद्दे यांना एकत्र आणत त्यांनी शिवसेनेतलं आपलं वजन वाढवलं," असं मुंबईचे पत्रकार अनुराग चतुर्वेदी सांगतात.

राजकारणात प्रवेश

'दोपहर का सामना' पासूनच त्यांच्या राजकीय आकांक्षा वाढीस लागल्या.

"शिवसेनेची प्रतिमा तेव्हा उत्तर भारतीय विरोधी अशी झाली होती. त्यांनाही ती बदलण्यासाठी कोणी व्यक्ती हवीच होती. निरुपम ठाकरेंच्या जवळ गेले," ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात.

शिवसेनेनंच निरुपमांना पहिल्यांदा खासदार केलं. राज्यसभेत पाठवलं. पण लवकरच चित्र बदलत गेलं.

"सेंटॉर निर्गुंतवणूक प्रकरणात त्यांनी केंद्रातील तत्कालीन भाजप सरकारवर आरोप केले आणि तिथूनच परिस्थिती बदलायला सुरूवात झाली. नंतर उद्धव ठाकरेंच्या काळात कोअर टीममध्ये निरुपम नव्हते. पुढे 2005 मध्ये निरुपम यांनी शिवसेना सोडली," प्रकाश अकोलकर सांगतात.

काँग्रेसमध्ये कोलांटउडी

शिवसेनेतून संजय निरुपम काँग्रेसमध्ये दाखल झाले. तिथेही राज्यसभेतील जागा मिळवली आणि 2009 मध्ये उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेतही पोहोचले.

"पण काँग्रेसमध्ये आल्यावर त्यांच्यासमोर अनेक आव्हानं होती. त्यांना निष्ठा सिद्ध करायची होती. शिवाय मुरली देवरा, गुरूदास कामत, कृपाशंकर सिंग अशी बस्तानं अगोदरच बसलेली होती. पण तरीही निरूपम सोनिया गांधींच्या निकटवर्तीयांमध्ये पोहोचले. राहुल गांधींच्याही विश्वासातले बनले," अनुराग चतुर्वेदी सांगतात.

काँग्रेसमध्ये त्यांना उत्तर भारतीय अस्मितेचं राजकारण मोठं करत गेलं, ज्याची सुरुवात वास्तविक त्यांनी शिवसेनेत असतांनाच केली होती. त्यांनी उत्तर भारतीय, त्यातही बिहारी भावनांसाठी छठ पूजेचा कार्यक्रम मुंबईत मोठा करत नेला.

छठचं राजकारण

"उत्तर भारतीयांची मतं एकगठ्ठा मिळतात. ती ज्यांच्याकडे जातात त्या पक्षाकडे पारडं झुकतं, हा मुंबईच्या निवडणुकांच्या इतिहास आहे. छठपूजेच्या निमित्तानं हे अस्मितेचं राजकारण सुरू झालं. संजय निरूपम यांनी जुहू चौपाटीवर तो कार्यक्रम सुरू केला. तो मोठा होत गेला. इतर ठिकाणीही असे कार्यक्रम होत गेले," राजकीय विश्लेषक प्रताप आसबे म्हणतात.

जसं गणेशोत्सवाचं होतं तसंच इथंही झालं. उत्सव, त्याचं अर्थकारण, त्याचा विस्तार, त्यातून कार्यकर्ते मिळतात. सगळ्याच पक्षांना ते नंतर करावं लागलं. पण छठच्या निमित्तानं मुंबईच्या राजकारणात उत्तर भारतीयांना नवी ओळख संजय निरुपम यांनी मिळवून दिली हे नाकारता येणार नाही."

काँग्रेसमध्ये याच वाढलेल्या वजनामुळे 2014 च्या पराभवानंतर निरुपम यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष केलं गेलं. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत सगळ्यांनी त्यांच्या विरोधात जाहीर बंड करूनही ते टिकले. त्यावेळी गुरुदास कामत आणि नारायण राणेंनी निरुपम यांच्याविरोधात दंड थोपटले होते. तरीही ते पदावर कायम राहिले आणि तिकीट वाटपावरही त्यांनी पकड ठेवली.

त्या निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतरही ते पदावर कायम राहू शकले होते.