ट्रम्प-पुतिन चर्चेत निघाला नाही तोडगा, मात्र भारतासाठी मिळाले 'हे' संकेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

फोटो स्रोत, Andrew Harnik/Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनयांनी शुक्रवारी (15 ऑगस्ट) अलास्कामध्ये भेट घेतली आहे.

भारतीय वेळेनुसार ही भेट रात्री बारा वाजेनंतर झाली आहे. दोघांचीही सुमारे तीन तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर दोघेही माध्यमांसमोर आले.

त्यांच्या मागे 'पर्स्यूइंग पीस' अर्थात 'शांततेच्या प्राप्तीसाठी' असं लिहिलेलं होतं. रशियन आणि अमेरिकन ध्वज शेजारी शेजारी लावलेले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

ट्रम्प आणि पुतिन यांनी स्टेजवर जवळपास 10 मिनिटे शेजारी शेजारी उभं राहून माध्यमांना संबोधित केलं.

दोघांमधली ही खासगी चर्चा सकारात्मक झाल्याचे संकेत त्यांनी दिले. मात्र, कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलो नसल्याचंही सांगितलं.

बैठकीनंतर पुतिन काय म्हणाले?

पुतिन यांनी या बैठकीचं वर्णन संघर्षाच्या "निराकरणासाठीची सुरुवात" असं केलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, "गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये कोणतीही शिखर परिषद झाली नाही. तसेच, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध 'शीतयुद्धानंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत," असंही ते म्हणाले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

दोन्ही देशांमधील चर्चेचा मुख्य मुद्दा 'युक्रेन संघर्ष' हा होता, असं पुतिन यांनी स्पष्ट केलं.

ते म्हणाले की, "टिकाऊ आणि दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी आपल्याला संघर्षाची प्राथमिक कारणं दूर करणं आवश्यक आहे."

पण, नेमकी कारणं कोणती आणि कशास्वरुपाचा तोडगा, याचा अर्थ त्यांनी तपशीलवारपणे स्पष्ट केला नाही.

"ट्रम्प यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो," असंही पुतिन म्हणाले.

ट्रम्प काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की त्यांची आणि पुतिन यांची चर्चा फलदायी झाली. या बैठकीमुळे निश्चितच 'काही गोष्टींमध्ये प्रगती' झाली.

पुढे ते म्हणाले की ते 'नाटो'मधील सहकारी आणि युक्रेनचे प्रमुख झेलेन्स्की यांच्यासह इतरांना एकत्र बोलावतील.

पुढे ते म्हणाले की, करार "अंतिमतः" त्यांच्यावर अवलंबून आहे आणि त्यांना तो मान्य करावा लागेल.

पुढे ते म्हणाले की, जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत कोणताही करार अस्तित्वात येत नाही. यासंदर्भात चर्चेत "मोठी प्रगती" झाली असली तरीही "आम्ही अद्याप तिथंपर्यंत पोहोचलो नाही".

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

"अनेक मुद्द्यांवर सहमती झाली" पण "काही" अजूनही बाकी आहेत, असं ते म्हणाले. "त्यातील एक मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे" असंही ते म्हणाले. परंतु तो मुद्दा काय आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.

"माझे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी नेहमीच एक उत्तम संबंध राहिले आहेत," असंही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी त्यांच्यातील बैठक "अत्यंत फलदायी" झाल्याचं सांगितलं, परंतु काही गोष्टींवर अद्याप निर्णय व्हायचा आहे, असेही ते म्हणाले

ट्रम्प यांनी भाषण संपवताना म्हटलं की ते "कदाचित" लवकरच पुतिन यांना पुन्हा भेटतील. यावर पुतिन यांनी तातडीनं म्हटलं की, "पुढच्या वेळी मॉस्कोमध्ये..."

भेटीमधून काय संकेत मिळाले?

या पत्रकार परिषदेनंतर दोघांनीही पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरं दिलेली नाहीत.

बीबीसी रशियनचे संपादक स्टीव्ह रोझेनबर्ग यांनी या भेटीबाबतचं विश्लेषण करताना म्हटलंय की, ""पत्रकार परिषद" कधी पत्रकार परिषद नसते? जेव्हा कोणतेही प्रश्न घेतलेले नसतात.

युक्रेनमधील युद्धाच्या बाबतीत, व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अजूनही मोठे मतभेद असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प रशियाकडून युद्धबंदीसाठी आग्रह धरत आहेत. व्लादिमीर पुतिन यांनी त्यांना ते मान्य केले नाही."

या पत्रकार परिषदेनंतर दोघांनीही पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरं दिलेली नाहीत.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, या पत्रकार परिषदेनंतर दोघांनीही पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरं दिलेली नाहीत.

बीबीसी रशियनचे संपादक स्टीव्ह रोझेनबर्ग पुढे म्हणतात की, "बैठकीआधी खूपच वेगळं वातावरण होतं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरलं होतं आणि त्यांना सन्माननीय पाहुणा म्हणून वागणूक दिली होती.

पण, युक्रेनमधील रशियाचं युद्ध संपवण्यासाठी ते पुतिन यांना अजूनही राजी करू शकलेले नाहीत."

स्टीव्ह रोझेनबर्ग म्हणतात की, "यापूर्वी त्यांनी रशियाला कठोर भूमिका घेऊ, अशी धमकी दिली होती. त्यामध्ये त्यांनी अल्टिमेटम, डेडलाइनची भाषा वापरली होती आणि रशियाने युद्धबंदीच्या आवाहनांकडे दुर्लक्ष केल्यास अधिक निर्बंध घालण्याचा इशारा दिला होता.

मात्र, अद्याप तरी त्यांनी असं काहीही केलेलं नाहीये. ते असं काही करतील का? हा प्रश्न आहे, असं ते म्हणतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

'झेलेन्स्कीं'च्या सहभागाशिवाय चर्चा

या बैठकीच्या आधी, युरोपियन कमिशनच्या प्रमुख नेत्यांनी या बैठकीवर आक्षेप घेत एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं.

त्यामध्ये, यूके, फ्रान्स, इटली, जर्मनी, पोलंड, फिनलंड आणि युरोपियन कमिशनच्या इतर प्रमुख नेत्यांचा समावेश होता.

"युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग युक्रेनच्या सहभागाशिवाय ठरवता येणार नाही," असं त्यांनी या निवेदनात म्हटलं होतं.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की

युक्रेनला त्यांच्या स्वतःच्या देशाशी संबंधित शांतता चर्चेसाठी आमंत्रितच केलं जाणार नाही, अशी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी चिंता व्यक्त केली होती.

ते म्हणाले होते की, या चर्चेमध्ये युक्रेनच्या सहभागाशिवाय केलेला कोणताही करार हा एक प्रकारे 'मृत निर्णयासमानच' असेल.

दुसऱ्या बाजूला, या बैठकीनंतर, 'नाटो'मधील अमेरिकेचे माजी राजदूत डग्लस लुटे यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, ट्रम्प यांना पुतीन यांच्यासोबतच्या शिखर परिषदेतून काहीही मिळालेलं नाहीये.

"पुतीन यांनी आपला आंतरराष्ट्रीय एकाकीपणाचा अंत करून ते निघून गेले," लुटे म्हणाले.

पण, "त्या बदल्यात ट्रम्प यांना काय मिळालं? शून्य... आम्ही खूप कमी साध्य केलं," असं लुटे म्हणतात.

ट्रम्प-पुतिन भेटीवर भारताचेही लक्ष

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यातील या बैठकीपूर्वी अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट म्हणाले होते की, जर ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील चर्चा अनिर्णीत राहिली तर भारतावरील कर आणखी वाढवले जातील.

ट्रम्प यांचा युक्तिवाद असा आहे की, भारतावर जितकं जास्त टॅरिफ लादले जाईल तितका रशियावर दबाव आणता येईल.

अमेरिका म्हणते की भारत रशियाकडून तेल खरेदी करून त्याच्या अर्थव्यवस्थेला आधार देत आहे, म्हणून ट्रम्प नाराज आहेत.

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन

फोटो स्रोत, Andrew Harnik/Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डोनाल्ड ट्रम्प यांचं मत असं आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो आणि म्हणूनच रशियन अर्थव्यवस्थेला मिळालेल्या या मदतीमुळे पुतिन युक्रेनविरुद्धची लढाई थांबवत नाहीयेत.

7 ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी भारताविरुद्धचे टॅरिफ 25 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वांच्या नजरा अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील बैठकीकडे लागल्या.

ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील बैठक निश्चित झाल्यानंतर, 9 ऑगस्ट रोजी, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या बैठकीचं स्वागत करणारं निवेदन जारी केलं होतं.

या निवेदनात म्हटलं होतं की, "15 ऑगस्ट 2025 रोजी अलास्कामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यात बैठक घेण्याच्या निर्णयाचे भारत स्वागत करतो. या बैठकीमुळे युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष संपवण्याचा आणि शांततेच्या शक्यतांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा म्हटल्याप्रमाणे, 'ही युद्धाची वेळ नाही.' म्हणूनच, भारत आगामी शिखर परिषदेला पाठिंबा देतो. तसेच, या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यास तयार आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.