गिफ्टची दोरी ओढताच स्फोट, हस्ताक्षरामुळे कसं उलगडलं ओडिशातील 'वेडिंग बॉम्ब'चं रहस्य

- Author, संदीप साहू आणि सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी हिंदी
बुधवारी (28 मे) ओडिशातील बहुचर्चित पाटनागड पार्सल बॉम्ब प्रकरणात आरोपी पुंजीलाल मेहेर याला स्थानिक न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
23 फेब्रुवारी 2018 रोजी ही घटना घडली होती. लग्नाचं गिफ्ट म्हणून आलेल्या पार्सलमध्ये बाँब निघाल्यानं नवरदेवाचा आणि त्याच्या आजीचा मृत्यू झाला होता.
ओडिशाच्या बलांगीर जिल्ह्यातील पटनागड शहरातील या घटनेत 26 वर्षांच्या सौम्य शेखर आणि त्यांची आजी जेमामनी मेहेर यांचा मृत्यू झाला होता. सौम्य शेखर साहू यांच्या पत्नी रिमा या घटनेत गंभीर जखमी झाल्या होत्या.
घटनेच्या पाच दिवसांपूर्वीच सौम्य शेखर आणि रीमा यांचं लग्न झालं होतं.
लग्नाच्या काही दिवसांनी सौम्य शेखरच्या घरी एक भेटवस्तू पाठवण्यात आली. जोडप्याने भेटवस्तूचे पॅकेट उघडले तेव्हा त्यात स्फोट झाला. हे प्रकरण 'वेडिंग बॉम्ब' म्हणून प्रसिद्ध झालं होतं.
निकालानंतर सरकारी वकील चित्तरंजन कानुंगो म्हणाले की, न्यायालयाने मेहेरला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खून), 307 (खूनाचा प्रयत्न), 201 (पुरावे लपवणे) आणि भारतीय स्फोटक कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत दोषी ठरवले.
त्याला जन्मठेपेच्या दोन शिक्षा (प्रत्येकी दहा वर्ष) आणि सात वर्षांची एका शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा एकाच वेळी लागू होतील. न्यायालयाने मेहरला विविध कलमांखाली एक लाख सत्तर हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
"न्यायालयाने हा एक अक्षम्य गुन्हा असल्याचे मान्य केले, परंतु हा 'दुर्मिळातील दुर्मिळ' खटला असल्याचा सरकारचा युक्तिवाद मान्य करण्यास नकार दिला. न्यायालयाने मेहरच्या मृत्युदंडाची मागणी फेटाळून लावली आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली," असंही कानुंगो म्हणाले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सौम्य शेखर साहू आणि रीमा यांच्या लग्नाला पाच दिवस झाले होते. दुपारच्या जेवणाचा विचार करत होते त्याचवेळी सौम्यला घराच्या दारावर थाप ऐकू आली.
घराबाहेर एक व्यक्ती हातात सौम्यच्या नावानं आलेलं पार्सल हातात घेऊन ऊभी होतीजवळपास 230 किलोमीटर अंतरावरून म्हणजेच छत्तीसगढची राजधानी रायपूरहून ते पार्सल आलं होतं.

सौम्य ते पार्सल किचनमध्ये घेऊन आला आणि त्यामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी ते उघडू लागला. पार्सल हिरव्या रंगाच्या कापडात गुंडाळलेलं होतं आणि त्यातून पांढऱ्या रंगाची दोरी बाहेर आलेली होती.
पार्सलमध्ये नेमकं काय आहे? हे पाहण्यासाठी सौम्यच्या 85 वर्षांच्या आजी जेमामनी त्याच्याजवळ येऊन उभ्या राहिल्या.
सौम्यने भेटवस्तूवर बांधलेली दोरी ओढताच एक मोठा स्फोट झाला. त्यानंतर तिघंही खाली कोसळले आणि त्यांच्या शरीरातून रक्तस्राव सुरू झाला.
स्फोट एवढा जबरदस्त होता की, त्यामुळे छताचं प्लास्टर खाली कोसळळं. किचनमधली खिडकी उडून शेजारच्या मोकळ्या जागेत पडली. तर भिंतींना तडे गेले.
या स्फोटात सौम्य आणि त्याच्या आजीचा मृत्यू झाला तर पत्नी रीमा गंभीर जखमी झाली होती.
आरोपीचा शोध कसा लावला?
प्रदीर्घ तपासानंतर, पोलिसांनी स्थानिक महाविद्यालयाचे शिक्षक आणि माजी प्राचार्य पुंजीलाल मेहेरला अटक केली. सौम्यची आई ज्या ठिकाणी शिकवायची तिथे मेहेरने काम केलं होतं.
या प्रकारांचा तपास करणाऱ्यांनी बीबीसी प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांना सांगितलं होतं की, मेहेर सौम्यच्या कुटुंबाचा हेवा करत होता. त्यानं स्फोटाची योजना अतिशय काळजीपूर्वक आखली होती.
त्यानं हे पार्सल रायपूरहून बनावट नावाने कुरिअर सेवेद्वारे पाठवले होते. हे पार्सल 650 किलोमीटरचा प्रवास करून बलांगीरला पोहोचलं होतं.

फोटो स्रोत, FACEBOOK/PUNJI LAL MEHER
प्रवासात हे पार्सल अनेकांच्या हातातून गेलं. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा एक देशी बनावटीचा बॉम्ब होता. ज्यूटच्या धाग्यात तो बांधण्यात आला होता. त्यामुळं तो उघडताच मोठा स्फोट झाला.
ज्या पॅकेटमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता त्यावर पाठवणाऱ्याचे नाव एस. के. शर्मा असं लिहिण्यात आलं होतं.
हे पार्सल रायपूरहून पाठवण्यात आलं होतं. पोलिसांना या प्रकरणाचा कसलाही सुगावा लागत नव्हता. शेवटी त्यांनी हजारो फोन रेकॉर्ड तपासले आणि सुमारे 100 हून अधिक लोकांची चौकशी केली.
यामध्ये एक व्यक्ती असाही होता ज्याने रीमाला साखरपुड्यानंतर धमकी दिली होती. पण तिथेही पोलिसांना अपयशच आलं.
निनावी पत्राने उलगडला कट
त्याच वर्षी एप्रिलमध्ये, एक निनावी पत्र पोलिस प्रमुखांना पोहोचलं.
त्यात दावा करण्यात आला होता की, बॉम्ब एका पार्सलमध्ये पाठवण्यात आला होता ज्यावर पाठवणाऱ्याचे नाव एस.के. शर्मा नाही तर एस.के. सिन्हा असं लिहिलेलं होतं.
त्यात असं सांगण्यात आलं होतं की, 'विश्वासघाताची' शिक्षा देण्यासाठी आणि पैशासाठी ही हत्या करण्यात आली होती. या पत्रात दावा करण्यात आला होता की, 'तीन जणांनी या हत्येची योजना आखली होती' आणि ते आता फरार आहेत.
त्या पत्रात सौम्यने विश्वासघात केल्याचा आणि पैसे मिळवण्याचा हेतू असल्याचा उल्लेख होता. (यामध्ये गुन्हेगार रेखाला अपमान झालेला प्रियकर किंवा संपत्तीच्या वादातून हा खून झाला असल्याचा इशारा करण्यात आला होता. त्यात असं म्हटलं होतं की पोलिसांनी निष्पाप लोकांना त्रास देणे थांबवावे.
या पत्राने तपासाची दिशाच बदलली.
त्यावेळी अरुण बोथरा हे ओडिशाच्या गुन्हे शाखेचे प्रमुख होते. त्यांच्या लक्षात आले की पार्सल पावतीवर लिहिलेले नाव योग्यरित्या वाचले गेले नव्हते. ते शर्मासारखे नाही तर सिन्हासारखे दिसत होते.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्र लिहिणाऱ्याला याची माहिती होती याचा अर्थ ते पार्सल पाठवणाऱ्याला देखील याची कल्पना असावी.
आता पोलिसांना हे पत्र संशयित व्यक्तीनेच पाठवल्याची खात्री झाली होती.
बोथरा यांनी त्यावेळी बीबीसीला सांगितलं होतं की, "पार्सल पाठवणाऱ्या व्यक्तीला त्याच्या गुन्ह्याबद्दल अधिक माहिती होती हे स्पष्ट होते. तो आम्हाला सांगू इच्छित होता की हा गुन्हा एखाद्या स्थानिक व्यक्तीने केलेला नाही.
त्याने हेही सांगण्याचा प्रयत्न केला की हा कट तीन लोकांनी रचला होता. हे पत्र गांभीर्याने घेतलं जावं असं त्याला वाटत होतं त्यामुळे आमची चूक दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न तो करत होता."
पण, सौम्य शेखरच्या आई महाविद्यालयात शिकवत होत्या. आईने त्यांचे सहकारी असणाऱ्या मेहेरचं हस्ताक्षर आणि लेखन शैली ओळखली होती. सौम्यच्या आईमुळे मेहेरला त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
पोलिसांनी आधी व्यावसायिक शत्रुत्वामुळे हा खून झाला असण्याची शक्यता नाकारली होती. पण अखेर त्यांना हीच गोष्ट स्वीकारावी लागली. यामुळे पोलिसांचा मेहेरवरील संशय बळावला होता.
मेहेरने पोलिसांना कसा गुंगारा दिला?
पोलिसांनी पकडल्यानंतर मेहेरने असं म्हटलं की, त्याच्यावर जबरदस्ती करून त्याच्याकडून हे पत्र लिहून घेतलं गेलं. मात्र नंतर त्याने त्याचा गुन्हा कबूल केला.
पुंजीलाल मेहेरने पोलिसांना सांगितलं की, तो दिवाळीत फटाके गोळा करत असे आणि त्यातून गन पावडर काढून नंतर बॉम्ब बनवत असे. त्याने रायपूरहून कुरिअरद्वारे सौम्यच्या घराच्या पत्त्यावर हा बॉम्ब पाठवला होता.
फसवणूक करण्यासाठी त्याने त्याचा फोन घरीच ठेवला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड होऊ नये म्हणून त्याने ट्रेनचं तिकीटही काढलं नव्हतं. मेहेरने सौम्यच्या लग्न समारंभाला आणि नंतर अंत्यसंस्कारालाही हजेरी लावली होती.

सौम्य शेखरच्या पालकांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं. पण, त्यांनी या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याबाबत काहीही भाष्य केलेलं नाही.
सौम्य शेखरचे वडील रवींद्र कुमार साहू म्हणाले की ते या संदर्भात वकिलाशी चर्चा करून निर्णय घेतील. सौम्यची आई संयुक्ता म्हणाल्या, "जर पुंजीलाल कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात गेला तर आम्हीही जाऊ."
या प्रकरणाचा संपूर्ण तपास ओडिशा गुन्हे शाखेचे तत्कालीन प्रमुख अरुण बोथरा यांच्या देखरेखीखाली करण्यात आला. अरुण बोथरा यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे.
ते म्हणाले, "या प्रकरणात कोणताही साक्षीदार नव्हता किंवा कोणताही ठोस पुरावा नव्हता. संपूर्ण खटला परिस्थितीजन्य आणि न्यायवैद्यक पुराव्यांवर आधारित होता. त्यामुळे, हे आमच्यासाठी एक मोठं यश आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











