कामासाठी परराज्यात गेले अन् 20 वर्षे वेठबिगार म्हणून राहण्याची आली वेळ; गाव-भाषा सारं काही विसरले

कोनेरू अप्पाराव यांनी बीबीसीला सांगितलं की वीस वर्षांपासून त्यांनी पैसे पाहिलेले नाहीत
फोटो कॅप्शन, कोनेरू अप्पाराव यांनी बीबीसीला सांगितलं की वीस वर्षांपासून त्यांनी पैसे पाहिलेले नाहीत
    • Author, एल. श्रीनिवास
    • Role, बीबीसी तेलगू

कामाच्या शोधात दुसऱ्या राज्यात निघालेल्या एका गरीब माणसावर दुर्दैवानं वेठबिगार म्हणून आयुष्याची वीस वर्षे जगण्याची वेळ आली. या वीस वर्षांमध्ये त्यांना कधी एक रुपयाही मजुरी मिळाली नाही. ते आपली मातृभाषादेखील विसरले आहेत.

आता बीबीसी तेलुगु, सरकारी अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांनी त्याच्या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांना मूळगावी पाठवलं जाणार आहे.

जवळपास 20 वर्षांपूर्वी, कोनेरू अप्पाराव कामाच्या शोधात निघाले होते. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवरील भागातून पुदुच्चेरीला जाण्यासाठी ते ट्रेनमध्ये बसले होते.

त्यावेळेस त्यांचं वय साधारण 40 वर्षांच्या आसपास होतं. ही ट्रेन तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील एका स्टेशनवर थांबली. तेव्हा चहा पिण्यासाठी अप्पाराव खाली उतरले.

मात्र अप्पाराव पुन्हा ट्रेनकडे परतेपर्यंत ट्रेन स्टेशनवरून निघून गेली होती. दरम्यान एका व्यक्तीनं अप्पाराव यांना मदत देऊ केली.

याच व्यक्तीनं नंतर अप्पाराव यांना एकप्रकारचं बंधक मजूर म्हणजे वेठबिगार बनवलं. म्हणजेच त्या माणसाचं कर्ज फेडण्यासाठी अप्पाराव त्याच्यासाठी मजुरी काम करू लागले. त्या व्यक्तीनं तब्बल वीस वर्षे अप्पाराव यांना बकऱ्या चारण्याचं काम करण्यास भाग पाडलं.

त्या व्यक्तीचं नाव अन्नादुराई आहे. पोलिसांनी अन्नादुराईला अप्पाराव यांना कोणताही पगार किंवा मजुरी न देता काम करवून घेण्यासाठी आणि त्यांचं शोषण करण्यासाठी अटक केली आहे.

अप्पारावांना आता त्यांची मातृभाषा म्हणजे तेलुगु नीट बोलता येत नाही. त्यांच्याशी बोलल्यानंतर बीबीसीनं त्यांच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा निर्धार केला.

अन्नादुराईनं अप्पाराव यांच्याकडून कोणतीही मजुरी न देता वीस वर्षे काम करवून घेतलं. ते एकप्रकारे वेठबिगार बनून राहिले.

अचानक एक दिवस तामिळनाडूच्या कामगार विभागानं वेठबिगारीविरोधात कारवाई करत छापा मारला होता. त्यातून अप्पाराव यांची सुटका करण्यात आली.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

आता अप्पाराव 60 वर्षांचे झाले आहेत. ते त्यांची मातृभाषा असलेली तेलुगु जवळपास विसरले आहेत. ते आता तामिळशी मिळती जुळती भाषा बोलतात.

जवळपास दोन दशकांहून अधिक काळ बकऱ्या चारण्याचं काम केल्यामुळे आता अप्पाराव यांना नीट बोलण्यास देखील अडचण येते.

अप्पाराव बीबीसीला म्हणाले, "मालकानं मला दिवसातून तीन वेळा जेवायला दिलं. मात्र मजुरी म्हणून कधीही एक रुपयादेखील दिला नाही."

सध्या कोनेरू अप्पाराव तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील एका वृद्धाश्रमात राहत आहेत. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचे अधिकारी अप्पाराव यांच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.

कोनेरू अप्पाराव यांच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी बीबीसी आदी पार्वतीपुरममधील जम्मीडिवालसा गावात गेलं
फोटो कॅप्शन, कोनेरू अप्पाराव यांच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी बीबीसी आदी पार्वतीपुरममधील जम्मीडिवालसा गावात गेलं

ज्यावेळेस अप्पाराव यांच्या जन्मस्थानाचा शोध घेतला जात होता, तेव्हा त्यांनी जवळपास वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल सांगितलं. ती अशी होती,

  • आंध्र प्रदेशातील पार्वतीपुरम जिल्ह्यातील जम्मीडिवालसा गाव
  • ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील अलमोंडा विभागातील जम्मडवलसा गाव
  • याच भागातील जंगीडिवालसा

अप्पाराव यांच्या कुटुंबाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात बीबीसीनं या सर्वच ठिकाणी भेट दिली.

तिथे गेल्यावर बीबीसीला काय माहिती मिळाली ते जाणून घेऊया. सर्वात आधी आम्ही आंध्र प्रदेशातील पार्वतीपुरम जिल्ह्यातील जम्मीडिवालसा गावात पोहोचलो.

पार्वतीपुरममधील जम्मीडिवालसा गाव

अप्पाराव यांच्या कुटुंबाचा शोध लावण्यासाठी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील अधिकारी, पब्लिक असोसिएशन, आदिवासी संघटना, स्वयंसेवी संस्था, सोशल मीडिया ग्रुप देखील प्रयत्न करत आहेत.

सर्वात आधी बीबीसी पार्वतीपुरम जिल्ह्यातील जम्मीडिवालसा गावात पोहोचलं.

तिथे आम्ही लोकांना अप्पाराव यांचा फोटो दाखवला आणि ते अप्पाराव यांना ओळखतात का हे विचारलं.

मात्र एका व्यक्तीनं बीबीसीला सांगितलं की, "आम्ही या माणसाला आमच्या गावातच पाहिलेलं नाही. मात्र इथून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर, ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यात आणखी एक गाव आहे. त्या गावाचं नाव जम्माडवलसा आहे. तुम्ही तिथे चौकशी करू शकता."

ओडिशातील जम्मडवलसा गाव

पार्वतीपुरम मधील जम्मीडिवालसा गावातील गावकऱ्यांनी कोनेरू अप्पाराव यांना ओळखत नसल्याचं सांगितलं, तेव्हा त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही कच्च्या रस्त्यानं कोरापुट जिल्ह्यातील जम्मडवलसा गावात पोहोचलो.

ओडिशातील जम्मडवलसा गावातील गावकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या गावात कोनेरू उपनावाची कोणतीही व्यक्ती नव्हती
फोटो कॅप्शन, ओडिशातील जम्मडवलसा गावातील गावकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या गावात कोनेरू उपनावाची कोणतीही व्यक्ती नव्हती

तिथे पोहोचल्यावर गावकऱ्यांना अप्पाराव यांचा फोटो दाखवून त्यांच्याबद्दल चौकशी केली.

एका गावकऱ्यानं सांगितलं, "आमचा संबंध ताडिनोल्ला, नासिकोल्ला आणि बिडिकोल्ला कुटुंबांशी आहे. इथे कोनेरू उपनावाचं कोणीही नाही. कदाचित ही व्यक्ती जम्मडवलसाची नाही तर जंगीडिवालसाची असू शकते."

त्यानंतर आम्ही जंगीडिवालसाचा मार्ग धरला. आम्ही जंगीडिवालसा गावात पोहोचलो, मात्र...तिथून आम्ही 18 किलोमीटर चालून जंगीडिवालसा गावात पोहोचलो. तिथेदेखील कोनेरू अप्पाराव यांना कोणीही ओळखलं नाही. तिथे त्यांच्याबद्दल कोणालाही माहित नव्हतं.

वीस वर्षे घरापासून दूर राहिलेल्या अप्पाराव यांना त्यांचं जन्मस्थान आणि कुटुंब नीट आठवत नाही.

कोनेरू अप्पाराव यांच्याबद्दल चौकशी करताना बीबीसीचे प्रतिनिधी एल. श्रीनिवास
फोटो कॅप्शन, कोनेरू अप्पाराव यांच्याबद्दल चौकशी करताना बीबीसीचे प्रतिनिधी एल. श्रीनिवास

शिवगंगा जिल्ह्यातील कदंबनकुलम भागातील कामगार कल्याण विभागाचे अधिकारी नेहमीच्या तपासणीसाठी तिथे पोहोचले तेव्हा त्यांना अप्पाराव बकऱ्या चारताना दिसले.

चौकशी केल्यावर अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की अप्पाराव मूळचे आंध्र प्रदेशातील आहेत. ते वीस वर्षांहून अधिक काळापासून इथे काम करत आहेत. त्यांना घरी परत जाऊ दिलेलं नाही.

त्यावेळेस अप्पाराव यांची परिस्थिती पाहून कामगार कल्याण विभागानं त्यांना एका वृद्धाश्रमात पाठवलं.

अप्पाराव यांनी बीबीसीला सांगितलं की मालक त्यांना त्यांच्या घरी जाऊ देत नव्हता.

ते म्हणाले, "त्यांनी मला दिवसातून तीन वेळा जेवण दिलं, कपडे दिले. मात्र मला कोणतीही मजुरी दिली नाही. इथून बाहेर कसं पडायचं, कुठे जायचं हे मला माहीत नव्हतं. त्यावेळेस माझी मदत करणारं देखील कोणीही नव्हतं. त्यामुळे मी इथेच राहिलो."

अप्पाराव कुटुंबाचा शोध घेण्याचा अनेकांचा प्रयत्न

पीएस अजय कुमार आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते आहेत.

अय कुमार यांनी बीबीसीला सांगितलं, "अप्पाराव जेव्हा काही आठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना स्पष्ट बोलण्यात अडचण येते. असंही वाटतं की ते तेलुगु भाषा पूर्णपणे विसरले आहेत. ते तामिळमध्ये बोलतात, मात्र ती देखील स्पष्ट नाही."

अजय कुमार देखील विजयवाडामधील एका स्वयंसेवी संस्थेबरोबर अप्पाराव यांच्या कुटुंबाचा शोध घेत होते.

अप्पाराव जी माहिती देत आहेत ती अस्पष्ट आहे. ते म्हणतात की त्यांच्याकडे रेशन कार्ड आणि मतदान ओळखपत्र आहे. ते अलमोंडामधील आहे. मात्र अलमोंडा तर ओडिशातील कोरापुट जिल्ह्यात आहे.

अप्पाराव म्हणाले की वीस वर्षांपासून त्यांना एक रुपयादेखील मजूरी मिळालेली नाही
फोटो कॅप्शन, अप्पाराव म्हणाले की वीस वर्षांपासून त्यांना एक रुपयादेखील मजूरी मिळालेली नाही

त्यांनी हे देखील सांगितलं की जेव्हा त्यांना कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असायची, तेव्हा ते पार्वतीपुरमला जायचे. ते ओडिशाच्या सीमेजवळचं एक शहर आहे.

कोनेरू अप्पाराव यांनी जितक्याही गाव, वाड्या आणि शहरांची नाव सांगितली, ती सर्व आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेजवळ आहेत.

त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक ठिकाणी बीबीसीनं शोध घेतला, मात्र त्यांच्या कुटुंबाची माहिती मिळाली नाही.

अप्पाराव ज्या जागी वीस वर्षांपासून राहत होते, ती जागा तामिळनाडूत आहे. तर ज्या गावांबद्दल सांगत होते, ती तिथून खूप दूर अंतरावर होती.

आशा निर्माण झाली पण..

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कोनेरू अप्पाराव यांच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी, तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि आंध्र प्रदेशातील पार्वतीपुरम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रयत्न करत होते.

आता पार्वतीपुरमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की कोनेरू अप्पाराव यांच्या कुटुंबाला शोध लागला आहे.

ते म्हणाले की बीबीसी तेलुगुमध्ये अप्पाराव यांच्याबद्दल आलेली बातमी पाहून एका व्यक्तीनं त्यांच्याशी संपर्क केला. त्या व्यक्तीनं दावा केला की तो अप्पाराव यांचा छोटा भाऊ आहे.

जिल्हाधिकारी श्याम प्रसाद यांनी बीबीसी प्रतिनिधीला सांगितलं की एका व्यक्तीनं त्यांना फोन केला आणि सांगितलं की कोनेरू अप्पाराव त्याचे भाऊ आहेत.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कृष्णा नावाच्या व्यक्तीनं बीबीसीची बातमी पाहून फोनवरून त्यांना संपर्क केला. त्यानं सांगितलं की तो कोनेरू अप्पाराव यांचा भाऊ आहे."

"मात्र कृष्णानं सांगितलं की त्याच्या भावाचं नाव कोनेरू अप्पाराव नाही तर कोंडागोरी सुख्खा आहे आणि तो कोरापुट जिल्ह्यातील जुबू गावचा रहिवासी आहे."

जिल्हाधिकारी श्याम प्रसाद यांनी बीबीसीला सांगितलं की ते तामिळनाडूतून कोनेरू अप्पाराव यांना ओडिशाला घेऊन जातील.

कोनेरू अप्पाराव यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आणि नातेवाईकांचा शोध लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी आणि इतर संस्थांनी खूप प्रयत्न केले होते.

आदिवासींच्या समस्यांचे जाणकार असलेले अजय कुमार यांनी अप्पाराव यांची कहाणी स्थानिक सोशल मीडिया ग्रुपवर पोस्ट केली होती.

अजय कुमार म्हणतात, "ते एक, दोन वर्षे नाही तर 20 वर्षे कोणत्याही मजुरीशिवाय बकऱ्या चारत होते. या दरम्यान ज्या घटना घडल्या, त्या खूपच दुर्दैवी होत्या."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)