ओडिशा: पोलीस ठाण्यात सैन्य अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीवर लैंगिक छळ झाल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, संदीप साहू
- Role, बीबीसी हिंदीसाठी, भुवनेश्वरहून
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील एका पोलीस ठाण्यात भारतीय सैन्य दलातील अधिकारी आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीला पोलिसांनी कथितरित्या मारहाण आणि त्यांच्यावर बळजबरी केली.
14 सप्टेंबरला घडलेल्या या घटनेबाबत 20 सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला.
(सूचना : या बातमीतील काही भाग वाचकांना विचलित करू शकतो.)
ओडिशा पोलिसांच्या गुन्हे शाखेने भरतपूर पोलीस ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या आरोपांचं खंडन केलं असून, त्यांनी आपल्या बाजूने एक वेगळाच घटनाक्रम कथन केला आहे.
ज्या पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात पोलीस ठाण्याचे प्रमुख दीनकृष्ण मिश्र, पोलीस उपनिरीक्षक वैशालिनी पंडा, सहायक पोलीस उपनिरीक्षक शैलमयी साहू, सागरिका रथ आणि हवालदार बलराम हांसदा यांचा समावेश असून त्यांना यापूर्वीच निलंबित केलं आहे.
या संपूर्ण प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.


या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं आहे. ओडिशाचे विरोधी पक्ष आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली, तर काँग्रेसनेही मोहन चरण मांझी सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी सर्व दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.
पोलिसांवर काय आरोप आहेत?
14 सप्टेंबरला रात्री उशिरा (रविवारी पहाटे) हा लष्करी अधिकारी आणि त्याची होणारी पत्नी भरतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला आले होते. काही मुलांनी त्यांची छेड काढली आणि त्यांच्याबरोबर गैरवर्तन केल्याचा त्यांचा आरोप होता.
या प्रकरणात पोलिसांवर आरोप आहे की, त्यांनी तक्रार दाखल करण्याऐवजी आणि लष्करी अधिकारी आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीची मदत करण्याऐवजी त्यांना बेदम मारहाण केली, तसंच या महिलेवर लैंगिक अत्याचारही केला.
या संपूर्ण घटनेचं महिलेने केलेलं वर्णन अंगावर काटा आणणारं आहे.
19 सप्टेंबरला पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी आपली बाजू मांडली. त्या म्हणाल्या की, त्यांना पोलीस ठाण्यात मारहाण झाली आणि त्यांच्याबरोबर लैंगिक अत्याचारही झाला.
या अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली, असाही दावा करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तर दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की, जेव्हा हा अधिकारी आणि त्याची पत्नी भरतपूर पोलीस ठाण्यात आले तेव्हा दोघंही नशेत होते. त्यांनी तिथे प्रचंड गोंधळ घातला आणि तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांबरोबर गैरवर्तन केलं.
या प्रकरणी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यावर 10 तासांनी त्या लष्करी अधिकाऱ्याला सोडून देण्यात आलं. मात्र, त्यांच्या होणाऱ्या पत्नीला पोलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवलं आणि त्यांना एका स्थानिक न्यायालयात हजर केलं. तिथे त्यांच्या जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आला.
ओडिशा उच्च न्यायालयाने 18 सप्टेंबरला स्थानिक न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढले आणि त्यांना तात्काळ जामीन मंजूर केला. तसंच, भुवनेश्वर येथील 'एम्स'मध्ये त्यांच्यावर उपचार करण्याचा आदेश दिला.
पीडित महिलेने काय सांगितलं?
या घटनेतील पीडित महिलेने सांगितले की, 14 सप्टेंबरच्या रात्री एक वाजता त्या रेस्टॉरंट बंद करून आपल्या होणार्या नवऱ्याबरोबर घरी परत येत होत्या. तेव्हा रस्त्यावरच्या काही मुलांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्याबरोबर गैरवर्तन केलं.
त्यांनी असाही आरोप केला की, जेव्हा त्या या प्रकरणी भरतपूर पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेले, तेव्हा तिथे उपस्थित असलेले पोलीस अधिकारी तक्रार दाखल करण्याऐवजी त्यांच्यावरच तुटून पडले.
या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “त्यांनी सगळ्यात आधी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला तुरुंगात डांबलं. त्यानंतर मी जेव्हा याला विरोध केला, तेव्हा एक महिला अधिकाऱ्याने मला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी माझे केस पकडून मला फरपटत नेलं. मी स्वत:चा बचाव करण्यासाठी त्या अधिकाऱ्याच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर तिथे असलेले सर्व अधिकारी आणखी संतापले आणि तीन महिला अधिकाऱ्यांनी मला मारायला सुरुवात केली.
“दोन पुरुष अधिकाऱ्यांनी माझ्या दोन्ही दंडावर पाय ठेवले, तर एका महिला अधिकाऱ्याने माझे हात पकडून ठेवले हेते. आणखी एक महिला अधिकारी माझ्या छातीवर आणि पोटावर लाथा घालत होती. एकीने माझा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर एका पुरुष अधिकाऱ्याने माझ्या जॅकेटने माझे हात बांधले आणि एका महिला अधिकाऱ्याच्या स्कार्फने माझे पाय बांधले. मग मला फरपटत नेलं आणि एका खोलीत कोंडून ठेवलं. तिथे माझ्याबरोबर लैंगिक अत्याचार झाला. मी सतत किंचाळत होते म्हणून त्यांनी मला विचारलं, कधी चूप बसणार आहेस?”
एम्सच्या वैद्यकीय अहवालानुसार या महिलेच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यांचा एक दात तुटला आहे आणि जबड्यालाही जखमा झाल्या आहेत. एका हाताचं हाडही तुटलं आहे.
या महिलेने पुढे सांगितलं की, “सकाळी पोलीस ठाण्याचे प्रमुख तिथे आले, तेव्हा मला जरा आशा होती. मात्र, त्यांनी माझी बाजू ऐकण्याऐवजी माझ्या तोंडावर लाथ मारली आणि लैंगिक अत्याचार केला. मी किंचाळत राहिले, पण कोणीही माझं ऐकलं नाही.”
पोलिसांचं काय म्हणणं आहे?
17 सप्टेंबरला भुवनेश्वरचे पोलीस उपायुक्त प्रतीक सिंह यांनी दावा केला की, रविवारी पहाटे जेव्हा लष्करी अधिकारी आणि त्यांची होणारी पत्नी भरतपूर पोलीस ठाण्यात आले तेव्हा दोघंही नशेत होते.
त्यांचा दावा आहे, “त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. तिथे उपस्थित अधिकाऱ्यांबरोबर गैरवर्तन केलं. जेव्हा एका महिला अधिकाऱ्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या महिलेने तिच्या हाताचा चावा घेतला. त्याचबरोबर पोलीस ठाण्यात तोडफोड केली, एका कॉम्प्युटरचं नुकसानही केलं. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांना ताब्यात घेतलं."

फोटो स्रोत, BISWRANJAN MISHRA
पोलिसांनी सैन्यातील अधिकाऱ्याच्या कारमधून दारुच्या दोन बाटल्या जप्त केल्याचा दावा केला.
"दारुचा अंमल किती आहे हे तपासण्यासाठी करण्यात येणारी ‘ब्रेथ ॲनालायझर टेस्ट’ करायला दोघांनीही नकार दिला," अशीही माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा व्हीडिओ आला समोर
दरम्यान, त्या रात्री पोलीस ठाण्यात झालेल्या घटनाक्रमाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
या व्हीडिओत सैन्यातील अधिकारी कागदावर तक्रार लिहिताना आणि त्यांची होणारी बायको त्यांच्या बाजूला असलेली दिसत आहे.
आणखी एका व्हीडिओत ही महिला, “तुम्ही लष्करी अधिकाऱ्याला अशा प्रकारे तुरुंगात टाकू शकत नाही" असं सांगताना दिसत आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली असून ओडिशाचे पोलीस महासंचालक वाय. बी. खुरानिया यांना एक पत्र लिहून तीन दिवसाच्या आत ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ दाखल करायला सांगितला आहे.
लष्कराचा हस्तक्षेप
या प्रकरणी लष्कराने आणि काही निवृत्त अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला आहे.
या घटनेनंतर लष्कराच्या सेंट्रल कमांडने त्यांच्या एक्स हँडल सूर्य कमान वरून एक निवेदन जारी केलं आहे. या घटनेचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत आणि योग्य कारवाईसाठी आम्ही राज्यातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत असं या निवेदनात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, BISWRANJAN MISHRA
या घटनेनंतर सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी करत पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं.
त्यानंतर या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आणि पाच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लष्कराच्या सेंट्रल कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल पी.एस. शेखावत यांनी ओडिशा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश न्या. सी.एस.सिंह यांना एक पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आणि पीडित लष्करी अधिकारी आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीला न्याय देण्याची मागणी केली आहे.
याआधीही झालेत आरोप
या प्रकरणी निलंबित झालेल्या पोलीस ठाण्याचे प्रमुख दीनकृष्ण मिश्र यांच्याविरोधात आधीही तक्रारी झाल्या आहेत.
गेल्या वर्षी कटकमध्ये झालेल्या बाली यात्रेदरम्यान एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात मिश्र हे एका सायकल स्टँडवाल्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप झाला.
मात्र, त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. त्यांना भरतपूर पोलीस ठाण्याचं प्रमुख केलं गेलं.
‘आदर्श पोलीस ठाण्यातून’ सीसीटीव्ही गायब
भरतपूरच्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन करताना पोलीस आयुक्त संजीव पंडा म्हणाले होते की, हे एक ‘आदर्श पोलीस स्टेशन’ आहे. इथे सीसीटीव्हीसह अत्याधुनिक सोयी आहेत.
मात्र, 17 सप्टेंबरला जेव्हा प्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेची टीम तिथे गेली, तेव्हा तिथे कोणताही सीसीटीव्ही दिसला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
आता प्रश्न असा पडतोय की सीसीटीव्ही लावलेच नव्हते की, आरोपींना पाठीशी घालण्यासाठी मुद्दाम सीसीटीव्ही गायब केले आहेत?
या प्रकरणावरुन राजकारण
या प्रकरणावरुन आता राजकारण तापू लागलं आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री मोहन चरण मांझी म्हणाले, “हे प्रकरण समोर येताच या प्रकरणाचा तपास आम्ही गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. गुन्हे शाखेला वेळेच्या आत अहवाल सादर करायला सांगितला आहे. अहवाल प्राप्त होताच दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.
"महिलांच्या शोषणासंबंधी आमच्या सरकारने ‘झिरो टॉलरन्स’चं धोरण आजमावलं आहे. महिलांविरुद्ध हिंसाचार करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई होईल.”

फोटो स्रोत, ANI
दरम्यान, शुक्रवारी (20 सप्टेंबर) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, “भाजप सरकारच्या काळात महिलांवर अनिर्बंध अत्याचार होत आहे. कोणाचाही वचक राहिलेला नाही. जर सरकारी व्यवस्थाच अन्यायकारी असेल तर सामान्य नागरिकाने न्याय कुठे मागायचा?”











