You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जयंत पाटील यांचे निलंबन, विधानसभेत गदारोळ
विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना या अधिवेशनाच्या काळापुरते निलंबित करण्यात आले आहे. यानंतर विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.
विधानसभा अध्यक्षांना उद्देशून बोलताना असा 'निर्लज्जपणा करू नका' असं संबोधल्यामुळे जयंत पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दिशा सालियन प्रकरण सत्ताधारी आमदारांनी सकाळपासून लावून धरल्यामुळे सभागृह वारंवार तहकूब होते.
दुपारी एका तहकुबीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, भास्कर जाधवांना बोलण्याची संधी द्यावी. तेव्हा अध्यक्ष म्हणाले आता आपण पुढे निघून गेलो आहोत. तेव्हा जयंत पाटील यांनी असा निर्लज्जपणा करू नका असे विधान केल्यामुळे सत्ताधारी गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
त्यांना तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
यानंतर झालेल्या गदारोळामुळे सबागृह तहकूब करावे लागले. त्यानंतर अध्यक्षांकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची बैठक घेण्यात आली.
यानंतर सभागृह सुरू झाल्यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याबद्दल निषेध केला.
ते म्हणाले, “अध्यक्षांबद्दल असा शब्दप्रयोग करणं म्हणजे या सभागृहाचा अपमान आहे. असं वक्तव्य करून हा प्रश्न सुटणार नाही. दिलगिरी व्यक्त केली तरी हा प्रश्न सुटणार नाही. जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. त्यांना निलंबित करण्यात यावं.” यानंतर ठराव मांडून जयंत पाटील यांना अधिवेशनाच्या काळापुरते निलंबित करण्यात आलं.
फोन टॅपिंग प्रकरणाचाही उल्लेख
विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनामध्ये चौथ्या दिवशी विधानसभेत वेगळ्याच विषयांवरील मुद्दे गाजल्यामुळे सभागृह वारंवार तहकूब करावे लागले.
रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग प्रकरण आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी एकमेकांना अडचणीत आणायचा प्रयत्न केला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग मुद्द्यावर सरकारवर टीका केली. या मुद्द्यावर विरोधकांनी सभात्यागही केला.
याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, “रश्मी शुक्ला यांनी सभागृहाच्या काही सदस्यांचं फोन टॅपिंग केलं होतं. इतक्या महत्वाच्या विषयावर 57 अन्वये चर्चा केली पाहिजे. पण अध्यक्ष जर सरकारला पाठीशी घालत असतील तर आम्ही सभात्याग करतो.”
त्यानंतर दिशा सालियान प्रकरणाचा उल्लेख भरत गोगावले यांच्यासह भाजपाच्या नितेश राणे यांनी केला.
भरत गोगावले म्हणाले, हे प्रकरण काय आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहीजे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे.
दिशा सालियान या प्रकरणाचा तपास अद्याप तपास केला नाही. दिशा सालियानच्या मृत्यूमध्ये काहीतरी गूढ आहे याचा तपास झाला पाहीजे. दिशा सलियानच्या फोनवर 40 मिसकॉल कोणाचे होते हे समोर आले पाहिजे.
तर नितेश राणे म्हणाले, “ही केस कोणाच्या राजकीय दबावामुळे दाबली गेली हे समोर आले पाहीजे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात दिशा सालियानच्या मृत्यूची चौकशी व्हावी यावर सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. विधानसभेत त्यांनी गोंधळ केला” यावेळेस आदित्य ठाकरेही सभागृहात उपस्थित होते.
दिशा सालियान प्रकरणावर अजित पवार काय म्हणाले?
याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, “दिशा सालियान प्रकरणी राजकीय दृष्टिकोनातून बघू नये. ही चौकशी सीबीआयकडे होती. सीबीआयने यावर नोव्हेंबर 2022 ला खुलासा केला आहे. त्यामध्ये दिशा सालियान 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे. तिच्या आई वडिलांनी हात जोडून विनंती केली की, राजकारणामुळे आम्हाला त्रास दिला जातोय असं त्यांनी सांगितलं आहे. बदनामी झाली तर आम्ही जगणार नाही असं तिच्या आईवडिलांनी सांगितलं आहे. पूजा चव्हाणच्या बाबतीतही मग चौकशी करा. तेव्हा हेच मान्यवर विरोधी पक्षात होते. सभागृह बंद पाडत होते. तिच्या आईवडिलांचीही विनंती म्हणून आपण हा विषय काढू नये.”
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दिशा सालियान प्रकरणी कोणालाही टार्गेट करण्याचा प्रयत्न यात होणार नाही. दिशा सालियान प्रकरण हे कधीच सीबीआयकडे नव्हतं. सुशांत सिंग राजपूत केस सीबीआयकडे होती. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता या प्रकरणाचे पुरावे द्यावे. आपण निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करू”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)