You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विधानभवनात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांसमोर आले आणि...
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, नागपूर
चीनमध्ये कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन झाल्याची बातमी आलीय. कोरोनासंदर्भातली आढावा बैठक केंद्र सरकारकडून आयोजित करण्यात आली होती.
केंद्र सरकारने ही बैठक का बोलावली? कोरोनाचा नवा व्हेरिएंट आलाय का? कोरोना वाढला की अधिवेशन याच आठवड्यात गुंडाळणार का? ही चर्चा अधिवेशनात रंगू लागलीय.
अधिवेशन लवकर संपवतील का? आमदार, पत्रकार, कार्यकर्ते प्रत्येकजण एकच प्रश्न विचारत होता. उत्तर मात्र कोणाकडेही नव्हतं. सत्ताधारी आणि विरोधकांचं पायर्यांवरचं आंदोलन संपलं होतं.
अहवाल सभागृहासमोर ठेवतो म्हणताय, पण अहवाल कुठेय?
बुधवारी विधानसभा सुरू झाली होती. वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा होत होती. मंत्र्यांचं अहवाल सभागृहासमोर ठेवण्याचं काम सुरू होतं. सहकार मंत्री अतुल सावेंनी उठून हा अहवाल सभागृहासमोर ठेवतो ही नोट वाचली.
ते खाली बसणार इतक्यात अजितदादा उठले आणि म्हणाले, "अहवाल सभागृहासमोर ठेवतो हे वाचलं पण अहवाल कुठेय?"
विरोधी पक्षाचे आमदार हसू लागले. अजितदादा हसत म्हणाले, “हा कागद अहवालाच्यावर ठेवून आपण वाचत असतो. पण तुमच्याकडे तर अहवालच नाही.”
तितक्यात देवेंद्र फडणवीसांनी मागच्या टेबलवरचा अहवाल अतुल सावेंच्यासमोर ठेवला. अजितदादा हसत फडणवीसांना म्हणाले, "सगळ्यांचं तुम्हीच बघता का?"
अजित पवार हसत फिरकी घेत होते. सत्ताधारी आमदार त्यांना साथ देत होते. अतुल सावेंनी अखेर तो अहवाल अजितदादांच्या म्हणण्यानुसार सभागृहासमोर ठेवला.
आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकमेकांकडे बघणं टाळलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूखंड घोटाळ्याचा मुद्दा अधिवेशनात गाजत होता. दुसर्याच दिवशी विधानपरिषदेत गोंधळ घालून सभागृहाचं कामकाज विरोधकांनी बंद पाडलं होतं.
उपसभापती निलम गोऱ्हे यांची सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये समतोल साधताना दमछाक होत होती.
तिसर्या दिवशीही हा मुद्दा घेऊन विरोधक आंदोलन करत होते. उध्दव ठाकरेंनीही राजीनाम्याची मागणी केल्यामुळे या विषयाचं महत्त्व अधिक वाढलं होतं.
विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा तितकासा गाजला नसला तरी विधानपरिषदेत ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते असल्यामुळे ते हा मुद्दा लावून धरत होते.
दुपारी साधारण दीड दोनची वेळ होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या दालनात गेले. उपसभापतींच्या दालनात या भूखंड घोटाळ्याच्या मुद्यावर परिषदेत होणार्या गोंधळाची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आल्याचं काही लोक खासगीत बोलत होते.
उपसभापती हे कोणत्याही सभागृहात निष्पक्षपणे काम करत असतात. ते कोणत्याही पक्षासाठी काम करत नाहीत. पण तरीही मूळच्या ठाकरे गटाच्या आमदार असलेल्या उपसभापती निलम गोऱ्हेंशी साधारण 20-25 मिनिटं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली.
ही चर्चा याच मुद्यासाठी असेल असा अंदाज बाहेर बसलेले लोक लावत होते. 25 मिनिटांनंतर ही बैठक संपवून एकनाथ शिंदे त्यांच्या दालनाबाहेर आले. तितक्यात उपसभापतींच्या दालनात जाण्यासाठीच समोरून आदित्य ठाकरे आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे दालनाच्या प्रवेशद्वाराजवळ आमनेसामने आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी हातात असलेल्या कागदावर आपली नजर वळवली. तर आदित्य ठाकरे बाजूने मानही न वळवता आत निघून गेले. दोघांच्याही नजरेत असलेला 'राजकीय द्वेष' त्या घटनेतून दिसून आला.
मंत्री स्वत:च्या दालनाचा रस्ता विसरतात तेव्हा...
नागपूर विधीमंडळात विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन स्वतंत्र इमारती आहे. त्या दोन्ही गोल इमारती मधून एकमेकांना जोडणाऱ्या आहेत.
काही मंत्र्यांची दालनं या दोन्ही इमारतीत आहेत. या इमारतीत रस्ते शोधण्यासाठी अनेकांची दमछाक होते. एक मंत्री आपल्या सुरक्षारक्षक आणि अधिकार्यांसह आमच्यासमोर आले. काही विषयांची चर्चा झाली. मग ते दालनात बैठकीसाठी पुढे निघून गेले.
काही मिनिटांनी गोल फिरून पुन्हा आमच्या समोर आले. मग आपला दालनाचा रस्ता चुकलाय हे त्यांच्या लक्षात आलं.
सुरक्षारक्षकांना ते बोलू लागले, "तुम्हाला आपल्या दालनाचा रस्ता माहिती नाही. काय करता तुम्ही?" हे बोलताना त्यांना स्वत:लाही हसू आवरलं नाही. "सगळा स्टाफ मुंबईचा आहे ना म्हणून अडचण होते असं ते सांगू लागले." तितक्यात त्यांच्या स्विय सहाय्यकाने साहेब इथे डावीकडेच आपलं दालन आहे असं सांगत रस्ता दाखवला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)