पृथ्वी शॉची रणजी ट्रॉफीत धडाकेबाज खेळी, आता टीम इंडियात दिसेल का?

पृथ्वी शॉने भारतीय संघाकडून पाच कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 339 धावा केल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पृथ्वी शॉने भारतीय संघाकडून पाच कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 339 धावा केल्या आहेत.
    • Author, जसविंदर सिद्धू
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

ही गोष्ट अगदी एखाद्या चित्रपटासारखी वाटते. यातील मुख्य पात्र हे हिरोसारखं आहे, पण त्याच्या आयुष्यात वाद, संकटं आणि चिंता देखील आहेत.

मुंबईच्या मैदानावर पृथ्वी शॉने जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांनी म्हटलं होतं, हा फलंदाज एकेदिवशी आभाळाला स्पर्श करेल.

पण पाहा ना, नुकतंच पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीत महाराष्ट्राकडून चंदीगडविरुद्ध सेक्टर-16 च्या मैदानावर तब्बल 222 धावांची खेळी केली, तेव्हाही त्याला 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला नाही.

हा पुरस्कार महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला देण्यात आला. पण नंतर 'खिलाडूवृत्ती' दाखवत ऋतुराजने तो पुरस्कार पृथ्वी शॉसोबत शेअर केला.

रणजी ट्रॉफीतील तिसरं वेगवान शतक

मुंबईचा संघ सोडून महाराष्ट्राकडून खेळायचा निर्णय घेतल्यानंतरचं हे पृथ्वी शॉचं पहिलंच शतक होतं. विशेष म्हणजे, त्याने या हंगामातील पहिलं शतक फक्त 72 चेंडूत झळकावलं, ज्यात तब्बल 14 चौकारांचा समावेश होता.

तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने पहिल्या डावात 116 धावा तर दुसऱ्या डावात 36 धावा केल्या.

पृथ्वी शॉची आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या 134 धावा आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पृथ्वी शॉची आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या 134 धावा आहे.

25 ते 28 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात पृथ्वी शॉला फक्त 8 धावा करता आल्या होत्या. पण दुसऱ्या डावात त्याने 156 चेंडूत 222 धावा केल्या.

त्याने 141 चेंडूत आपलं द्विशतक ठोकलं. जे रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील तिसरं सर्वात वेगवान द्विशतक ठरलं.

सर्वात जलद द्विशतकाच्या यादीत पृथ्वी शॉच्या पुढे फक्त दोनच खेळाडू आहेत, हैदराबादचा तन्मय अग्रवाल (119 चेंडू) आणि मुंबईचा रवी शास्त्री (123 चेंडू).

'चुका सगळ्यांकडून होतात'

पृथ्वी शॉला लहानपणापासून प्रशिक्षण देत असलेले प्रशांत शेट्टी यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो की चुका सगळ्यांकडून होतात. काही महिन्यांपूर्वी त्याने एका पॉडकास्टमध्ये स्वतः मान्य केलं होतं की, त्याच्याकडून कोणत्या चुका झाल्या आणि त्या सुधारण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे."

पृथ्वी शॉने 2020 मध्येच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पृथ्वी शॉने 2020 मध्येच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

प्रशांत शेट्टी सांगतात की, पृथ्वीने मान्य केलं आहे की मित्र निवडताना त्याच्याकडून चुका झाल्या आणि त्याची जबाबदारी तो आजही स्वतः घेतो. पण त्या चुकांमधून तो खूप काही शिकला आहे.

ते सांगतात की, पृथ्वीने आपल्या खेळात आणि वागण्यात खूप बदल केले आहेत आणि हा फलंदाज अजून संपलेला नाही.

त्यांच्या मते, पृथ्वी सातव्या वर्षी त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी आला होता. तेव्हापासून ते दोघं एकत्र काम करत आहेत. शेट्टींच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीला कोणत्याही परिस्थितीत कमी लेखता येणार नाही.

'ओपनरची जबाबदारी सांभाळण्याची ताकद'

पृथ्वी शॉचं वजन जास्त असल्याचं म्हटलं जातं. पण त्याला जवळून ओळखणाऱ्यांच्या मते त्याने फिटनेससाठी खूप मेहनत घेतली आहे.

महाराष्ट्रासाठी विक्रमी खेळी केल्यानंतर पृथ्वी म्हणाला की, या हंगामाच्या दोन-तीन महिने आधीपासूनच त्याचे ट्रेनर त्याच्यासोबत काम करत आहेत. याशिवाय एक डायटिशियनही (आहारतज्ज्ञ) त्याला मार्गदर्शन करत आहे.

एकूण सहा एकदिवसीय सामन्यांत पृथ्वीने 189 धावा केल्या आहेत. 49 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकूण सहा एकदिवसीय सामन्यांत पृथ्वीने 189 धावा केल्या आहेत. 49 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

गेल्या तीन-चार महिन्यांत त्याच्या शरीरात झालेले बदल त्याच्या खेळात सुधारणा करण्यासाठी खूप फायदेशीर ठरले आहेत.

"माझ्या मते, पृथ्वी आजही टीम इंडियासाठी ओपनरची जबाबदारी सहज सांभाळू शकतो," असं मुंबईतील नामांकित क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड पृथ्वी शॉबद्दल म्हणतात.

ते म्हणाले, "पृथ्वीच्या वागण्याबद्दल तुम्ही मीडियात अनेक बातम्या ऐकल्या असतील, पण त्याऐवजी त्याचा खेळ बघा. त्याची फलंदाजी खूपच उत्कृष्ट आहे." दिनेश लाड हे टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माचे प्रशिक्षक होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)