'त्यांनी मला मारलं, 'प्रायव्हेट पार्ट'ला स्पर्श केला', पृथ्वी शॉवर सपना गिलचे आरोप

फोटो स्रोत, Getty Images
पृथ्वी शॉने माझ्या खासगी भागांना स्पर्श केला, मला मारहाण केली असा आरोप इन्फ्लुएन्सर सपना गिल हिने केला आहे. काही दिवसांपूर्वी सपना गिल, तिचे काही मित्र आणि पृथ्वी शॉ यांच्यात वाद झाला होता.
सेल्फी काढण्यावरुन गिल, तिचे मित्र आणि पृथ्वी शॉ यांच्यात धक्काबुक्की झाली. संबंधितांनी पृथ्वीच्या गाडीची मोडतोड करण्याचाही प्रयत्न केल्याचाही आरोप झाला आणि पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता.
हे नवे आरोप करताना सपना गिलने म्हटलं, ‘मी जेव्हा पाहिलं माझ्या मित्राला ते मारतायत तेव्हा मी त्याला वाचवायला गेले. मी त्यांना हात जोडत होते आणि माझ्या मित्राला मागे आणत होते. ते लोक इतके आक्रमकपणे येत होते, एका दोघांनी मला धक्का मारला. त्यांनी माझ्या खासगी भागांनाही स्पर्श केला. मला थप्पड मारली. माझ्या शरीरावर खुणाही उमटल्या. मी माझ्या मित्राचा हात पकडून तिथून निघून गेले. आम्हाला कुणी तिथून बाहेर काढलं नाही किंवा असं काहीही झालं नाही कारण क्लब बंद झालेला होता.’
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 16 फेब्रुवारीला पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र जेवणासाठी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी सपना तसंच तिच्या मित्राने पृथ्वीला सेल्फीची विनंती केली तो सेल्फी घेतला गेल्यानंतरही संबंधित माणून पुन्हा पुन्हा पृथ्वीकडे येत राहिला.
हॉटेल मॅनेजरला विनंती करून त्याला तिथून दूर केलं गेलं. पण पृथ्वी आणि त्याचा मित्र आशिष यादव जेव्हा हॉटेलमधून बाहेर आले तेव्हा सपना गिल आणि तिचे काही मित्र बेसबॉल बॅट घेऊन तिथे थांबले होते. त्यांनी पृथ्वीच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्नही केला.
पृथ्वीला दुसऱ्या गाडीत बसवून तिथून पाठवून दिलं गेलं आणि आपण पोलिसांत गेलो. संबंधितांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणीही केलं असंही आशिष यादवने पोलिसांना दिलेल्या आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.
ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणात 8 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आणि सपना गिलला अटकही केली होती. पण तिच्या पोलिसांनी हे आरोप फेटाळले होते.
त्यांनी असंही म्हटलं की सेल्फी घेण्याची विनंती पृथ्वी शॉने नाकारली होती, इतकंच नाही तर तिच्याशी गैरवर्तणूकही केली होती.
या घटनेच्या 5 ते 6 दिवसांनंतर आता सपना गिलने पोलिसांकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. पण इतके दिवस ती याबद्दल का बोलली नाही यावर सपना गिल म्हणते.
‘मी तेव्हाही ही तक्रार दाखल करू शकले असते पण मी केली नाही कारण मी काम करते. मी विचार केला की मला कामावर जास्त लक्ष दिलं पाहिजे.
माझ्या कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मला या सगळ्यात पडायचं नव्हतं, यापासून दूर राहायचं होतं. पण त्यांनी ‘गेम खेळला’ असं करायला नको होतं.
पाठीमागून वार करण्यासारखं आहे हे. इतकीच हिंमत होती तर तेव्हाच केस दाखल करायची ना.
ते दारूच्या नशेत होते, त्यांना आपली चूक कबूल करायची नाहीय, घरी जाऊन झोपले, दारू उतरल्यानंतर तक्रार दाखल केली याला काय अर्थ आहे?’
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कमी वयात मिळालं होतं यश
अतिशय कमी वयात यश मिळवलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत पृथ्वी शॉचं नावही घेता येईल.
वयाच्या 14 व्या वर्षी जेव्हा पृथ्वी शॉने हॅरिस शिल्ड स्पर्धेत आपल्या शाळेकडून खेळताना 330 चेंडूमध्ये 546 धावा केल्या, तेव्हा त्याचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलं.
2016 मध्ये पृथ्वी शॉ भारताच्या अंडर-19 टीमचा भाग होता. या संघाने आशिया कप स्पर्धा जिंकली होती.
त्याचवर्षी पृथ्वी शॉ मुंबईकडून रणजी ट्रॉफीमधला त्याचा पहिला सामना खेळला. हा रणजी ट्रॉफीचा उपांत्य सामना होता आणि मुंबई विरूद्ध तामिळनाडूची टीम होती.
या सामन्याच्या दुसऱ्या डावात पृथ्वी श़ॉ ने शतक केलं. या शतकामुळे मुंबईच्या टीमला विजय मिळाला.
2017मध्ये दलीप ट्रॉफीमधल्या आपल्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं. दलीप ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा तो सर्वांत तरुण खेळाडू ठरला. आधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.
वर्ष 2017 मध्ये भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला. त्या टीमचा कर्णधार होता पृथ्वी शॉ.
2018 मध्ये आयपीएल ऑक्शनमध्ये दिल्लीच्या टीमने पृथ्वी शॉला 1.2 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.
आयपीएलमध्ये पृथ्वी शॉच्या बेडधक खेळामुळे रिकी पॉन्टिंगही त्याचा चाहता बनला होता.
मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या त्याच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतारही आले.
2018 मध्ये त्याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात शतक झळकावलं.
पृथ्वी शॉला भारताकडून एकदिवसीय सामन्यांसाठी खेळण्याची संधी पहिल्यांदा 2020 मध्ये मिळाली.
पृथ्वी शॉने आतापर्यंत भारताकडून पाच कसोटी सामने, सहा एकदिवसीय सामने आणि एक टी-20 सामना खेळला आहे. कसोटी सामन्यात त्याच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतकं आहेत.
पण पृथ्वी शॉला भारतीय संघात कायमस्वरूपी जागा मिळवता आली नाही.
पृथ्वी श़ॉ मैदानाबाहेरील गोष्टींमुळे जास्त वादात राहिला.
उत्तेजक चाचणीत दोषी
2019 साली पृथ्वी शॉ उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळला होता आणि त्याच्यावर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.
पायाला झालेल्या दुखापतीमुळे पृथ्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशी परतला होता. या दुखापतीतून सावरणाऱ्या पृथ्वीला लवकरात लवकर टीम इंडियात पुनरागमन करायचं होतं. मात्र खोकल्याने तो त्रस्त होता.
IPLपूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन करण्याचा पृथ्वीचा निर्धार होता. मात्र इंदूरला पोहोचल्यानंतर पृथ्वीला कफाचा त्रास जाणवू लागला. थंडी वाजत असल्याचं स्पष्ट झालं होतं.
मेडिकलमध्ये पृथ्वीला कफ सिरप दिलं. याने तात्काळ बरं वाटेल असं मेडिकलवाल्याने पृथ्वीला सांगितलं. पण BCCIला हे बरं वाटलं नाही.

फोटो स्रोत, PTI
BCCIचे अँटी डोपिंग मॅनेजर साळवी यांच्या अहवालानुसार, पृथ्वीने खोकला आणि थंडीसाठी वडिलांचा सल्ला घेतला. बरं होण्यासाठी त्यांनी जवळच्या मेडिकलमधून खोकल्यासाठी सिरप घेण्याचा सल्ला दिला.
काही दिवस कफ सिरप घेतल्याचं पृथ्वीने स्पष्ट केलं. BCCIला सांगितलं की त्याला कफ सिरपचं नाव आठवत नाही, कफ सिरपची बाटली आणि त्याचं कव्हरही त्याने काम झाल्यावर फेकून दिलं. त्यानंतर 21 फेब्रुवारीला तो मॅचही खेळला. त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या लघवीचा नमुना घेण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ICC तसंच BCCIच्या कोड ऑफ कंडक्टचं पालन करणं अनिवार्य असतं. उत्तेजकविरोधी पथकाकडून कोणते घटक प्रतिबंधित आहेत आणि कोणते नाहीत, याची माहिती खेळाडूंना देण्यात येते. कोणती औषधं घेतल्याने बंदीची कारवाई होऊ शकते, याची कल्पनाही त्यांना देण्यात येते.
यो-यो टेस्ट
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने क्रिकेटपटूंच्या फिटनेसला प्राथमिकता दिली आहे आणि याचं कसोशीने पालनही केलं आहे.
प्रत्येक खेळाडूला निवडीच्या आधी यो-यो टेस्ट द्यावी लागायची आणि त्याच आधारे टीम निवडली जायची.
2022 साली पृथ्वी शॉ यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरला होता. ही चाचणी बेंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकेडमीमध्ये झाली होती. त्याच वेळी पृथ्वी आयपीएलमध्ये खेळला होता.
त्यावेळी पृथ्वी शॉने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने लिहिलं होतं- तुम्हाला माझी आताची परिस्थिती माहीत नसेल, तर मला जज करू नका.
आता पुन्हा एकदा पृथ्वी शॉ वादात अडकलाय आणि त्याच्यावर आरोपही होत आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








