You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उल्कावर्षाव, वॉटर परेड ते बुडलेली जहाजं, पाहा 2025 मधील 18 सर्वात लक्षवेधी फोटो
- Author, केली ग्रोव्हियर
हवेत उडणारी कबुतरं आणि बुडलेल्या जहाजांपासून ते सूर्याच्या पार्श्वभूमीवर स्कायडायव्हिंग करणाऱ्या "इकारस" पर्यंत, कला इतिहास तज्ज्ञांनी निवडलेली या वर्षातील काही सर्वात लक्षवेधी छायाचित्रे येथे दिली आहेत.
(सूचना : या लेखात काही अशी चित्रे आहेत जी कदाचित काही वाचकांना अस्वस्थ करू शकतात.)
1. स्कायडायव्हर, ॲरिझोना
ॲस्ट्रोफोटोग्राफर अँड्र्यू मॅककार्थी यांनी 8 नोव्हेंबर रोजी ॲरिझोनामध्ये आपल्या मित्राचा स्कायडायव्हिंग करतानाचा एक अद्भूत फोटो टिपला. जो सकाळी सूर्याच्या तीव्र पोत असलेल्या प्रतिमेसमोर काळ्या सावलीसारखा (silhouette) दिसत होता.
या फोटो ने जगाचे लक्ष वेधून घेतले. यात चुकीला अजिबात वाव नव्हता, कारण या काळजीपूर्वक आखलेल्या स्टंटचा प्रत्येक पैलू सूर्याची उंची, वेळ आणि उडी मारण्याची कला तंतोतंत नियोजनानुसार पार पडणे आवश्यक होते.
या फोटोला लगेच "द फॉल ऑफ इकारस" असे नाव देण्यात आले, जे ग्रीक पौराणिक कथेतील त्या मुलावर आधारित आहे ज्याचे मेणाचे पंख सूर्याच्या खूप जवळ उडाल्यामुळे वितळले होते.
हे छायाचित्र 16 व्या शतकातील पीटर ब्रुगेल द एल्डर पासून 20 व्या शतकातील हेन्री मॅटिसपर्यंतच्या कला इतिहासातील त्या परंपरेला जिवंत करते, ज्यामध्ये त्या तरुणाच्या शोकांतिकेचे चित्रण केले आहे. कोसळताना त्या मुलाची जी मानसिक अवस्था झाली असेल तिचे पीटर पॉल रुबेन्सने रेखाटलेले इकारसचे चित्रण काळजाला भिडणारे आहे.
2. गिर्यारोहक, नेपाळ
ऑक्टोबरमध्ये एका फ्रेंच गिर्यारोहकाचा फोटो, जो नेपाळमधील 7,468 मीटर (24,501 फूट) उंचीच्या अत्यंत आव्हानात्मक 'जान्नू ईस्ट' शिखराच्या दिशेने कठीण मार्ग काढत होता, तो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर झाला. वाढत्या प्रमाणात, उत्साही गिर्यारोहक नेपाळच्या डोंगरांमध्ये त्यांच्या मोहक शिखरांपर्यंत जाण्यासाठी अजूनही न शोधलेले मार्ग शोधत आहेत.
बर्फ आणि खडकांच्या नैसर्गिक घड्यांमध्ये तो गिर्यारोहक खूपच बुटका आणि लहान दिसत आहे, ज्यामुळे त्याच्या आजूबाजूचे वातावरण जितके भीतीदायक वाटते तितकेच ते भव्यही दिसते.
निसर्गाच्या या रौद्र भव्यतेसमोर मानवी आकृतीचे हे भयानक क्षुद्रपण जेएमडब्ल्यू टर्नर यांच्या एका पाणीरंगातील चित्राची (watercolour) आठवण करून देते. त्यांचे 1831 मधील आयल ऑफ स्कायवरील 'कुलिन हिल्स'चे चित्रण निसर्गाची भव्यता आणि मानवाचा अत्यंत दुबळेपणा या दृष्टीकोनातून असेच प्रभावी वाटते.
3. उद्ध्वस्त पॅगोडा, म्यानमार
28 मार्च रोजी म्यानमारच्या मंडालेमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला, ज्यामध्ये 3,000 हून अधिक लोकांचा बळी गेला. तेथील एका अंशतः उद्ध्वस्त झालेल्या पॅगोडाचा (बौद्ध मंदिर) फोटो मनाला चटका लावून जातो, ज्यामध्ये एका महाकाय बौद्ध मूर्तीचे मस्तक जमिनीवर पडलेले दिसत आहे.
या भूकंपाचे धक्के चीन, भारत, व्हिएतनाम आणि थायलंडपर्यंत जाणवले होते. आपल्या नजरेला खिळवून ठेवणारी कोसळलेली वास्तुकला आणि मागील बाजूने बाहेर पडण्याचा मार्ग बंद करणारी ती पडलेली विशाल मूर्ती, यांमधील आकाराचा विरोधाभास अत्यंत शक्तिशाली आहे. या घटनेने झालेला विनाश जे लोक वाचले आहेत ते लवकर विसरणार नाहीत.
पोर्तुगीज चित्रकार जोआओ ग्लामा स्ट्रॉबरले हे स्वतः 1755 च्या लिस्बन भूकंपातून एका चर्चमधून बचावले होते, परंतु एका अर्थाने ते त्या विनाशातून कधीच बाहेर पडले नाहीत. त्यांनी पुढील तीन दशके (1756-1792) त्या भूकंपाने झालेल्या वेदना आणि नुकसानीचे सविस्तर चित्र तयार करण्यात घालवली.
4. उडणारी कबुतरं, सर्बिया
1 नोव्हेंबर रोजी सर्बियामध्ये एका कार्यक्रमादरम्यान पांढरी शुभ्र उडणारी कबुतरं लोकांच्या हातावर वजनहीन असल्यासारखी तरंगताना दिसली, जेव्हा लोकांनी त्यांना हवेत सोडले.
हा कार्यक्रम नोवी साद रेल्वे स्थानकावर छत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केला होता. या दुर्घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला होता. या आपत्तीच्या हाताळणीत सरकारी भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या तरुणांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये बळींच्या स्मरणार्थ 16 मिनिटांचे मौन पाळण्यात आले.
कबूतराची साधी पण शक्तिशाली प्रतिमा, जी पारंपारिकपणे प्रेम, निरागसता आणि आशेचे प्रतीक आहे, या हृदयस्पर्शी छायाचित्राला प्रागैतिहासिक आणि लोहयुगीन कलेपासून चालत आलेल्या कला इतिहासातील कबुतरांच्या असंख्य चित्रणांशी जोडते.
पिकासो यांनी काढलेले कबूतराचे एक मोहक रेखाचित्र, ज्याभोवती एकमेकांत गुंफलेल्या हातांचे वर्तुळ आहे, ते सर्बियातील या फोटोच्या भावनेशी मिळतेजुळते आहे.
5. आंदोलक, इस्तंबूल
मार्च महिन्यात इस्तंबूलमध्ये पारंपारिक 'दर्विश' पोशाख (जो सुफी गूढवादाशी संबंधित आहे) घातलेला एक आंदोलक, पेप्पर स्प्रे मारणाऱ्या सशस्त्र पोलिसांच्या तुकडीसमोर उभा असलेला फोटो व्हायरल झाला.
तुर्कीमधील ही राजकीय अस्वस्थता इस्तंबूलच्या महापौरांच्या अटकेमुळे आणि तुरुंगवासामुळे भडकली होती ज्यांना राष्ट्रपती एर्दोगान यांचे प्रतिस्पर्धी मानले जाते.
सुफी संतांच्या शांत आध्यात्मिक साधनेशी संबंधित असलेला एक स्थिर व्यक्ती आणि दुसरीकडे सशस्त्र कायदा अंमलबजावणी करणारी यंत्रणा, हा दृश्य विरोधाभास खूप शक्तिशाली आहे. ती उंच दर्विश टोपी आणि लांब झगे, जे मृत्यू आणि पुनर्जन्माच्या प्रतीकांनी समृद्ध आहेत, त्यांनी या प्रतिमेला एका सामान्य रस्त्यावरील आंदोलनाऐवजी पौराणिक स्वरूप प्राप्त करून दिले. कला इतिहासातील दर्विश नृत्याच्या आठवणी या दृश्याला अधिकच अस्वस्थ करतात.
6. बेवारस क्रूझ जहाज, एलिफसिना आखात
2003 मध्ये अथेन्सच्या पश्चिमेला एलिफसिना आखातात 'एमएस मेडिटेरेनियन स्काय' हे क्रूझ जहाज उलटले होते. ऑगस्टमध्ये टिपलेल्या या फोटोमध्ये हे गंजलेले जहाज गेल्या 20 वर्षांपासून अर्धे पाण्यात बुडलेल्या अवस्थेत कायमस्वरूपी दिसत आहे.
हे जहाज जणू दोन जगांच्या सीमेवर उभे असल्याचे वाटते. त्याचा हा स्थिर प्रवास एका प्राचीन फिनिशियन जहाजाच्या कोरीव कामाची आठवण करून देतो जे दुसऱ्या शतकातील एका शवपेटीवर (sarcophagus) कोरलेले होते जे प्रवाशांना एका जगातून दुसऱ्या जगात कायमचे घेऊन जात असल्याचे वाटते.
7. प्रार्थना करणारे बौद्ध भिक्खू, थायलंड
फेब्रुवारी महिन्यात 'माखा बुचा' या वार्षिक सोहळ्यादरम्यान थायलंडच्या वट फ्रा धम्मकाया येथील विशाल सोनेरी घुमटाखाली प्रार्थना करणाऱ्या भिक्खूंचा फोटो त्याच्या अलौकिक तेजामुळे श्वास रोखून धरायला लावतो.
बुद्धाच्या पहिल्या महान शिकवणुकीच्या स्मरणार्थ हजारो भिक्खू आणि भाविक दिवे घेऊन एकत्र जमले होते. याचा दिव्य प्रकाश 19 व्या शतकातील एका बर्मी हस्तलिखिताची आठवण करून देतो ज्यामध्ये बुद्धाचा सारनाथ येथील मृगदाव वनातील पहिला उपदेश चित्रित केला आहे. दोन्ही प्रतिमांमध्ये स्वतःला पूर्णपणे समर्पित करणाऱ्या समुदायाची श्रद्धा टिपली आहे.
8. वॉटर परेड, व्हेनिस
फेब्रुवारीमध्ये व्हेनिस कार्निव्हलच्या सुरुवातीला होणाऱ्या वॉटर परेडमध्ये ग्रँड कॅनॉलमधून जाणारा एक महाकाय, कन्फेटी-स्फोट करणारा कागदी उंदीर रंगांच्या उधळणीत कॅमेऱ्यात टिपला गेला. उंदराचे हे भव्य रूप व्हेनिसच्या मजेशीर आणि उपरोधिक बाजूचे प्रतीक म्हणून समोर येते.
रंगांच्या फवाऱ्यांसह हा उंदीर पॉल सिग्नॅक यांच्या 1905 मधील 'एन्ट्रन्स टू द ग्रँड कॅनॉल' सारख्या निओ-इम्प्रेशनिस्ट चित्रांमधील व्हेनिसच्या मोहक रूपाला एक चकचकीत जोड देतो. दोन्ही फोटोंमध्ये व्हेनिस प्रकाशाच्या एका मोहक चित्रात विरघळताना दिसते.
9. पोप फ्रान्सिस यांची कबर, रोम
एप्रिल महिन्यात रोममध्ये घेतलेला पोप फ्रान्सिस यांच्या कबरीचा फोटो व्हॅटिकनच्या बाहेर एका पोपांचे शंभर वर्षांहून अधिक काळानंतर झालेले हे पहिले दफन आहे ज्यावर एक पांढरे गुलाब ठेवलेले आहे, ते अत्यंत सुंदर आणि अस्वस्थ करणारे होते. दगडाची ती साधी लादी जमिनीखालील प्रकाशात थरथरत असल्यासारखी वाटते.
या फोटोतील उदासपणा 1798 मधील जेएमडब्ल्यू टर्नर यांनी काढलेल्या कँटरबरी कॅथेड्रल मधील कार्डिनल मॉर्टन यांच्या थडग्याच्या रेखाचित्राची आठवण करून देतो. दोन्ही प्रतिमांमध्ये दगड आणि मृत्यू हे काहीतरी गूढ आणि अपूर्ण असल्याचे भासवतात.
10. स्थलांतरित मजूर, चंदीगढ, भारत
एप्रिलमध्ये चंदीगढच्या बाहेर गव्हाची कापणी करताना पाणी पिण्यासाठी थांबलेल्या एका स्थलांतरित मजुराच्या फोटोमध्ये काहीतरी अत्यंत मूलभूत आणि शाश्वत आहे. त्या मजुराचा उंचावलेला कप आणि हातातील विळा हे सोनेरी प्रकाशात चमकताना विन्सलो होमर यांच्या 1865 मधील 'द व्हेटरन इन अ न्यू फील्ड' या चित्रातील एकाकी कापणी करणाऱ्या व्यक्तीची आठवण करून देतात.
होमरच्या कामात एक माजी सैनिक गव्हाच्या शेतात विळा चालवत आहे, जे अमेरिकन यादवी युद्धानंतरच्या पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. दोन्ही प्रतिमा त्यांच्या पात्रांना केवळ मजूर म्हणून नाही तर नूतनीकरणाच्या आश्वासनाचे प्रतीक म्हणून मांडतात.
11. रोबोटचा हात, बीजिंग
एप्रिलमध्ये बीजिंगमधील 'वर्ल्ड ऑफ रोबोट्स'च्या पत्रकार दौऱ्यादरम्यान एका तरुण मुलीने एका मोठ्या रोबोटच्या हळूहळू उघडणाऱ्या बोटाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हाचा हा फोटो आहे.
या फोटोतील प्रकाशयोजना आणि मुलीचे काळे कपडे यामुळे मानवी उपस्थिती केवळ अंधारात चमकणाऱ्या त्वचेसारखी वाटते.
पहिल्या नजरेत हे दृश्य मायकेल एंजेलोच्या 'क्रिएशन ऑफ ॲडम'ची किंवा एमसी एशरच्या 'हँड्स ड्रॉइंग हँड्स' (1948) या रेखाचित्राची आठवण करून देते. खरंतर एआय (AI) च्या या युगात निर्माता आणि निर्मिती यांमधील नेमका फरक समजून घेणे दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.
12. ट्रान्झिट सेंटर, बुगांडा
मे महिन्यात बुगांडा जवळील ट्रान्झिट सेंटरमध्ये पाळण्यावर बसलेल्या एका काँगोच्या निर्वासित महिलेचा फोटो अशा आनंदाने भरलेला आहे जो भौतिक गैरसोयींच्या पलीकडे जातो. पाऊस, गंजलेला पाळणा आणि तुटलेली सीट यांमध्येही ती हसताना दिसते.
जानेवारीपासून बुरुंडीत प्रवेश करणाऱ्या 70,000 हून अधिक लोकांपैकी ती एक आहे, पण तिचा आत्मा परिस्थितीवर मात करतो. हा फोटो फ्रेंच कलाकार जीन-होनोरे फ्रॅगोनार्ड यांच्या 'द स्विंग' (1767) या चित्राच्या शेजारी ठेवा, आणि तो त्या चित्रातील राजेशाही थाट काढून टाकून पाळण्याला खेळकरपणा आणि मनःशांतीचे एक शाश्वत साधन म्हणून समोर आणतो.
13. उल्कावर्षाव, कॅलिफोर्निया
6 मे रोजी पहाटे कॅलिफोर्नियाच्या इनव्हरनेसमध्ये रात्रीच्या आकाशातून जाणारा 'एटा अक्वेरिड' उल्कावर्षाव टिपणारा फोटो प्रेरणादायी आणि मानवाला नम्र करणारा आहे. विशाल आकाशगंगेसमोर एक लहान गाव केवळ एका ठिपक्यासारखे दिसते.
मानवी आणि वैश्विक स्तरांमधील हा विरोधाभास ॲडम एल्शेइमर यांच्या 'द फ्लाईट इन टू इजिप्त' (1609) या चित्राची आठवण करून देतो, जे त्याच्या खगोलीय अचूकतेसाठी ओळखले जाते. दोन्ही प्रतिमा शतकांचे अंतर असूनही केवळ विज्ञानातील प्रगतीच नाही तर मानवाच्या मनातील विस्मयाची शाश्वत भावना दर्शवतात.
14. डोळ्यांवर तेल, लंडन
मे महिन्यात लंडनमध्ये 'फॉसिल फ्री लंडन'च्या एका कार्यकर्तीने आपल्या डोळ्यांवर तेलासारखा पदार्थ लावून शेल (Shell) कंपनीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. नायजेरियातील तेल प्रकल्पांच्या विक्रीवरून कंपनीने आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले होते.
डोळ्यांवर पट्टी बांधलेली ही स्थिती जॉर्ज फ्रेडरिक वॅट्स यांच्या 'होप' (1886) या चित्राची आठवण करून देते, ज्यामध्ये एक स्त्री डोळ्यांवर पट्टी बांधून जगावर बसलेली आहे.
15. पाण्यात झेप मारणारा जलतरणपटू, सिंगापूर
20 जुलै रोजी सिंगापूरमध्ये वर्ल्ड ॲक्वेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान चिनी पोहणारा तियानचेन लॅन सूर मारतानाचा फोटो अचूक टिपला आहे.
आकाश, पाणी आणि प्लॅटफॉर्म यांमधील निळ्या रंगाची गडद छटा आणि खेळाडूचे हवेत अधांतरी असणे, फ्रेंच कलाकार यवेस क्लेन यांच्या कल्पनेची आठवण करून देते. विशेषतः त्यांचा 'इंटरनॅशनल क्लेन ब्लू' रंग आणि 1960 मधील 'लीप इनटू द वॉइड' हा फोटो.
16. बॅले विद्यार्थी, टेंबिसा, दक्षिण आफ्रिका
जुलैमध्ये दक्षिण आफ्रिकेतील टेंबिसा येथील डान्स अकॅडमीबाहेर उभ्या असलेल्या फिलासांडे एनकोबो आणि यामिहले ग्वाबाडा या दोन 5 वर्षांच्या बॅले विद्यार्थ्यांचा फोटो खूपच प्रभावी आणि काळजाला भिडणारे आहे.
कोरडी पडलेली जमीन, रेखीव गडद सावल्या आणि त्यांनी घातलेले नाजूक कपडे यांमधील विरोधाभास, एडगर देगास यांनी सराव करणाऱ्या नर्तकींच्या असंख्य चित्रांमध्ये वापरलेल्या शिस्तबद्ध सौंदर्याची आठवण करून देतो.
हा फोटो देगास आपल्या नर्तकींच्या हालचालींमधील गांभीर्यावर आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेकदा डान्स स्टुडिओची पार्श्वभूमी साध्या रंगांच्या पट्ट्यांमध्ये अमूर्त ठेवत असत. यामुळेच त्यांच्या चित्रांना जोहान्सबर्गच्या या फोटोप्रमाणेच वेळेच्या पलीकडे जाणारे एक विशेष रूप मिळाले आहे.
17. कुपोषित मूल, गाझा शहर
जुलै महिन्यात गाझा शहरात आपल्या आईच्या कुशीत असलेल्या कुपोषित मुलांच्या फोटोंनी जगाला हादरवून सोडले. युएनच्या (Unwra) अहवालानुसार गाझामधील पाचपैकी एक मूल कुपोषणाच्या विळख्यात आहे. या छायाचित्रावरून वादही निर्माण झाला, कारण त्या मुलाला आधीपासूनच काही आजार असल्याचे सांगण्यात आले होते.
कलेच्या इतिहासात आई आणि आजारी मुलाची गॅब्रिएल मेट्सूपासून पाब्लो पिकासोपर्यंत अनेक चित्रे असली तरी, गाझामधील या वास्तवाशी कशाचीही तुलना होऊ शकत नाही. एक मात्र खरे कोणत्याही महान कलाकाराची कल्पनाशक्ती या फोटोंमध्ये दिसणाऱ्या अगाध अशा मानवी यातनांचे स्वरूप पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही.
18. मेंढीचा बचाव, पात्रास, ग्रीस
ऑगस्टमध्ये पेट्रास (Patras) येथे लागलेल्या वणव्याच्या धुराचे दाट लोट आकाशात पसरले असताना, एक माणूस आपल्या मोटारसायकलवरून एका मेंढीला वाचवून नेताना दिसत आहे; ती मेंढी आपला जीव वाचवण्यासाठी त्या माणसाला घट्ट बिलगली आहे.
ही कृती इसवी सनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकातील रोमन कॅटाकॉम्ब्समधील 'द गुड शेफर्ड'च्या (The Good Shepherd) सुरुवातीच्या चित्रणाची आठवण करून देते, ज्यात येशू ख्रिस्त एका असहाय प्राण्याला खांद्यावर घेताना दिसतात.
युगायुगांचा प्रवास असो किंवा भिंतीवरील चित्र (fresco) असो किंवा कॅमेऱ्यात टिपलेले छायाचित्र हे सर्व दाखवून देतात की संकटात दुसऱ्याला वाचवण्याचे शौर्य अधोरेखित करतो.
गाझामधील कुपोषित मुलाच्या संदर्भात अतिरिक्त माहिती देण्यासाठी हा लेख अपडेट करण्यात आला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.