You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
समुद्रात बुडालेलं जहाज, जिवंतपणीच जलसमाधी, 60 तासांचा थरार
जहाज खोल समुद्रात बुडालं तो क्षण हॅरिसन ओकेन आयुष्यभरात कधीच विसरणार नाहीत.
ही घटना घडली तेव्हा ते 29 वर्षांचे होते. नायजेरियन असलेले हॅरिसन, जॅसकॉन-4 नावाच्या जहाजावर आचारी म्हणून काम करत होते.
नायजेरियन किनाऱ्यापासून अवघ्या 32 किमी अंतरावर असताना या जॅसकॉन-4 मध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि जहाज उलटलं.
बीबीसी रेडिओच्या आउटलुक कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत ते सांगत होते की, "जहाज जसं डावीकडे वळलं तसा मी तडक उठलो, बाथरुममध्ये गेलो आणि दार बंद करून बसलो."
जहाज खूप वेगाने बुडत होतं. परिणामी, जहाजावरील 13 क्रू मेंबर्सपैकी कोणीही जहाजाच्या डेकवर पोहोचू शकलं नाही. काही क्षणातच संपूर्ण जहाज पाण्याने भरलं.
"दिवे गेले. सर्वजण आरडाओरडा करत होते, त्यांचा आवाज मला ऐकू येत होता. मी कसा तरी बाथरुमचा दरवाजा उघडून बाहेर पडण्यात यशस्वी झालो.
पण मला तिथे कोणीच दिसलं नाही. पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता की मी जहाजातील एका केबिनमध्ये जाऊन अडकलो."
पण हा पाण्याचा वेग त्यांच्यासाठी नशीबवान ठरला. पाण्यामुळे ते जहाजातील एअर बबल मध्ये अडकले. अशा शक्यतेची कोणी कल्पनाही करू शकत नाही. यामुळे ते समुद्राच्या तळाशी सुमारे 3 दिवस जिवंत राहिले.
26 मे 2013 रोजी झालेल्या या अपघातात जहाजातील इतर सर्व क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता.
गाठीशी अनुभव नव्हता
जॅसकॉन-4 वरील त्यांच्या सहकारी क्रू सदस्यांप्रमाणे हॅरिसनला देखील जहाजावरील कामाचा अनुभव कमी होता.
हॅरिसन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, जॅसकॉनवर नोकरी मिळेपर्यंत त्यांनी कधीच जहाजाची सफर केली नव्हती.
हॅरिसन पूर्वी हॉटेलमध्ये मुख्य आचारी म्हणून काम करायचे. यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता.
जहाजावर आचारी म्हणून काम केल्यास जास्त पगार मिळेल या हेतूने त्यांनी नोकरी बदलली.
हॅरिसन सांगतात, "मला पाणी आवडत असलं तरी जहाजावर गेल्यानंतर मला चक्कर येऊ लागली, उलट्या झाल्या. तीन दिवस त्रास होत असताना देखील मी स्वयंपाक केला.
तीन दिवसांनी बरं वाटू लागलं. त्यानंतर मात्र मला कधीच सागरी प्रवासाचा त्रास झाला नाही."
ते पुढे सांगतात, हॉटेलमध्ये काम करत असताना त्यांना शेकडो लोकांसाठी अन्न तयार करावं लागायचं. पण जहाजावर त्यांना केवळ 12 लोकांचा स्वयंपाक करावा लागणार होता, त्यामुळे ते खूश होते.
अनुभव नसतानाही हॅरिसनला समुद्रात जहाजावर राहण्याची भीती वाटत नव्हती.
ते सांगतात, " खूप शांतता होती त्यामुळे मला तिथलं वातावरण आवडलं."
पाण्यात जहाज पुढे-मागे करत असताना भांडी खाली पडू नयेत यासाठी ते सर्व वाट्या आणि भांडी दोरीने बांधत.
बुडत्या जहाजाचं स्वप्न देखील त्यांना घाबरवू शकलं नाही.
हॅरिसन सांगतात, "जेव्हा मला जाग आली, तेव्हा मी त्या स्वप्नावर हसलो. कारण त्या जहाजाच्या दुर्घटनेत मी मरण पावलो नव्हतो."
जॅसकॉन -4
मे 2013 मध्ये, हॅरिसन जॅसकॉनवर कामासाठी रुजू झाले. त्यांना जहाजविषयी जास्त माहिती नसली तरी जहाजावरील क्रू मेंबर्सशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले.
हॅरिसन सांगतात, "आम्ही मित्र होतो, खूप जवळचे मित्र. त्या सर्वांनी मला आईसारखा मान दिला. ते त्यांच्या वेदना, त्यांचं मन माझ्याजवळ मोकळं करायचे. त्यांना मदत व्हावी या हेतूने मी त्यांना सल्ले द्यायचो."
25 मे रोजी वादळामुळे समुद्र खवळला होता. त्यानंतर तेलाचा टँकर जहाजावर चढवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली.
हॅरिसन नेहमीप्रमाणे सकाळी उठले आणि सर्वांसाठी स्वयंपाक करण्यासाठी जहाजाच्या स्वयंपाकघरात गेले. इकडे मात्र सगळं काही बदललं होतं.
जहाज बुडत असल्याची घटना आजही त्यांना आठवते.
''ते खूप वेगाने खाली जात होतं. मी खूप घाबरलो. जहाजातील प्रत्येकजण ओरडत - रडत होता. ती पहाटेची वेळ असावी, कदाचित 4 वाजून 50 मिनिटं झाली असावीत.
माझे काही सहकारी अजूनही झोपेत होते. काही जण मदतीसाठी ओरडत होते. जहाजाच्या नवीन भागात पाणी शिरलं तेव्हा मला हवेच्या बुडबुड्यांचा आवाज ऐकू आला आणि नंतर सगळं शांत झालं."
जेव्हा जहाज जमिनीपासून 30 मीटर खाली समुद्राच्या तळाशी गेलं होतं आणि यात केवळ हॅरिसन एकमेव होते जे बचावले होते. जहाजातील एका छोट्या जागेत ते अडकले.
तिथे त्यांच्या कमरेपर्यंत पाणी होतं. त्या ठिकाणी खूप थंडी आणि अंधार देखील होता.
त्यांना वाटलं खाली येऊन त्यांना कोणीतरी वाचवेल. पण दोन दिवस झाले तरी कोणी तिकडे फिरकलं नव्हतं.
तिथे त्यांना लाईफ जॅकेटला जोडलेला टॉर्च दिसला. त्यांनी तो घेतला आणि पाण्यातून बाहेर पाडण्यासाठी मार्ग शोधू लागले. पण टॉर्च मध्येच बंद पडला आणि ते तिथेच अंधारात चाचपडत राहिले.
जहाज बुडाल्यावर तीन दिवस पाण्यात असताना शरीरावर जखमा झाल्या. पाण्यातील माशांनी त्यांची त्वचा खाल्ली. त्यावेळी त्यांनी केवळ अंतर्वस्त्र घातलं होतं.
हॅरिसन सांगतात, "त्यावेळी मला माझी पत्नी आणि आई आठवली. मी माझा सगळा वेळ प्रार्थना करण्यात घालवला."
अन्न-पाण्याशिवाय मी 60 तास पाण्यात घालवले. एअर बबल मधील ऑक्सिजनवर मी तग धरला.
दुसरीकडे, जहाजातील सर्व क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. जहाजाच्या मालकीची कंपनी 'वेस्ट आफ्रिकन व्हेंचर्स' ने मृतदेह बाहेर काढण्यासाठी पाणबुड्यांची नियुक्ती केली.
डच डायव्हिंग कंपनी 'डीसीएन ग्लोबल'ने ही जबाबदारी एका व्यक्तीवर सोपवली.
डीसीएसएन ग्लोबल कंपनीने बुडालेल्या जहाजावर तीन पाणबुडे पाठवले. हे पाणबुडे समुद्राच्या तळात जिथे जायचे ते दृश्य कॅमेराद्वारे टिपून समुद्राच्या पृष्ठभागावर पाठवलं जायचं.
हॅरिसनने जहाजात कसलीशी हालचाल जाणवली. लगेचच त्यांनी त्यांच्या केबिनच्या भिंतींवर हात मारायला सुरुवात केली जेणेकरून त्यांचा आवाज ऐकू जाईल.
हॅरिसन सांगतात, "तरीही मी खूप असहाय्य होतो. त्या एअर बबलमधील ऑक्सिजन जवळजवळ संपला होता. मला श्वास घेणं अवघड झालं होतं."
हॅरिसनला पाण्यात टॉर्चची सावली दिसली. हा प्रकाश कुठून येत आहे हे शोधण्यासाठी ते तिथवर गेले. तिथे त्यांना पाण्याचे बुडबुडे दिसले. त्यांना अंदाज आला होता की, इथे पाणबुडे आले असावेत.
मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या पाणबुड्यांपैकी एक निकोलस वॉस हेर्डन होते.
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, त्यांना जाणवलं की जहाजावर आपल्याला कोणीतरी पकडून ठेवतंय. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक क्षण होता.
निकोलस सांगतात की, जेव्हा त्यांनी हॅरिसनला जिवंत पाहिलं तेव्हा भयाण क्षण आनंदाच्या क्षणात बदलला.
बचाव मोहिम पथकाला हॅरिसन जिवंत सापडल्याचे निकोलस यांनी सांगितलं.
हॅरिसनला ताबडतोब पाणबुड्यांचा सूट घालण्यात आला. तो कसा वापरायचा याचे निर्देश दिले आणि हळूहळू बुडणाऱ्या जहाजातून बाहेर काढले.
हॅरिसन सांगतात, "सगळीकडे चिखल साचला होता तिथे काहीच शिल्लक नव्हतं."
चेंबरमधून बाहेर आल्यावर हॅरिसन रडू लागले कारण ते एकटेच बचावले होते. त्यांचे बाकीचे सहकारी मरण पावल्याचं आता त्यांना समजलं होतं.
समुद्राच्या तळाशी तीन दिवस राहिल्यानंतर, हॅरिसन यांना त्यांच्या शरीरातील नायट्रोजनची पातळी पुन्हा सामान्य करण्यासाठी जहाजाच्या डीकंप्रेशन चेंबरमध्ये आणखी तीन दिवस घालवावे लागले.
दरम्यान, हॅरिसन जिवंत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली.
तीन दिवसांनी त्यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आलं. सर्व चाचण्या झाल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
जवळपास 3 दिवस ते समुद्रात जिवंत होते ही माहिती कळताच त्यांचे शेजारी पाजारी त्यांना भेटण्यासाठी आले होते.
पुढे त्यांच्या या जिवंत राहण्याची विलक्षण कथा जगभर पसरली.
अपघातानंतर, हॅरिसन यांनी शपथ घेतली की ते पुन्हा कधीही पाण्यात जाणार नाहीत. मात्र, पुढच्याच काही दिवसात त्यांची कार पुलावरून तलावात पडली. हॅरिसन केवळ जिवंतच बाहेर पडले नाहीत तर त्यांनी इतरांना देखील वाचवलं. पुढे त्यांनी व्यावसायिक पाणबुड्याचं प्रशिक्षण घेतलं.
हॅरिसन म्हणतात, "हेच माझं नशीब होतं आणि देवाने माझ्यासाठी कदाचित हेच योजलं होतं."
हेही नक्की वाचा
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)