'आधी लोक म्हणायचे, या सोंग करतात, आता सलाम ठोकतात' ; राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मिळालेल्या गावाची गोष्ट

द्रौपदी मुर्मू
फोटो कॅप्शन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना शारदा गायधने शेंडे
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, नागपूर

"ग्रामपंचायतीच्या या महिला सोंग करतात. उठलं सुटलं झाडूच लावतात, उठलं-सुटलं कचरा साफ करतात, असं म्हणत लोक आम्हाला हसायचे. पण, मी कोणालाही उलट उत्तर दिलं नाही. मी माझ्या सदस्यांनाही सांगितलं कोणालाही काहीही उत्तर द्यायचं नाही. लोकांनी सुरुवातीला मुर्खात काढलं, ते हसले त्यांना हसू दिलं. पण, जेव्हा त्यांना चांगला परिणाम दिसला तेव्हा हीच लोक म्हणतात बेला ग्रामपंचायतीला सलाम म्हणतात."

महिला सरपंच शारदा गायधने शेंडे आपल्या ग्रामपंचायतीची यशोगाथा सांगत होत्या. या ग्रामपंचायतीत महिला सरपंचासोबत तब्बल 8 महिला सदस्य आणि 6 पुरुष सदस्य आहेत. त्या सगळ्या महिला मिळून आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं गाव पुढे नेण्यासाठी झटत आहेत.

महिला सरपंच शारदा गायधने शेंडे
फोटो कॅप्शन, महिला सरपंच शारदा गायधने शेंडे

नुकताच 11 डिसेंबरला त्यांच्या बेला ग्रामपंचायतीला कार्बन न्युट्रल थीममध्ये देशातला पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळाला आहे. पण, या सरपंच महिलेनं गाव कार्बन न्युट्रल करण्यासाठी काय मेहनत घेतली? गावात कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या की त्याची दखल थेट राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी घेतली गेली? हे जाणून घेण्यासाठी आम्ही गावात पोहोचलो.

नागपूरहून भंडाऱ्याला जाताना भंडारा शहराच्या अलीकडेच 3 किलोमीटरवर अगदी महामार्गावर हे गाव वसलंय. गावाचा विस्तार इतका झाला की भंडारा शहर आणि गावातला फरक ओळखायला येत नाही. सध्या गावाची लोकसंख्या ही साडेदहा हजार आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

गावात प्रवेश करताच रस्त्याच्या कडेला लागलेली हिरवी झाडं नजरेस पडतात. शहराशेजारी गाव असल्यानं अगदी बोटावर मोजण्याइतकी घरं कौलारू दिसतात.

घरासमोरही झाडं दिसतात आणि कोणाला त्या झाडाचं पालकत्व दिलं त्याचं नाव त्या झाडावर लिहिलेलं दिसतं. आम्ही ग्रामपंचायतीसमोर पोहोचलो तर ग्रामपंचायत चहूबाजूंनी झाडांनी वेढलेली दिसली. याच ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत शारदा गायधने.

महिला सरपंच शारदा गायधने शेंडे
फोटो कॅप्शन, महिला सरपंच शारदा गायधने शेंडे

अपक्ष पॅनल निवडून आणलं आणि कुठल्याही पक्षाच्या पाठिंब्याशिवाय करतात काम

शारदा या 2012-17 या काळातही सरपंच होत्या. त्या काळात त्यांनी वृक्षारोपण केलेली झाडं मोठी झाली. त्या काळात त्यांना स्मार्ट ग्राम आणि संत गाडगेबाबा असे 60 लाख रुपयांचे दोन पुरस्कार मिळाल्याचं त्या सांगतात.

महिला सरपंच शारदा गायधने शेंडे
फोटो कॅप्शन, महिला सरपंच शारदा गायधने शेंडे

पण, 2017 ला अनुसूचित जातीसाठी जागा राखीव असल्यानं त्यांना निवडणूक लढता आली नाही. पण, 2022 ला सर्वसाधारण जागा असताना त्या निवडणूक लढल्या आणि ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला.

त्या एकट्याच नाहीतर त्यांचं महिलांचं पॅनल घेऊनच निवडून आल्या. महत्त्वाचं म्हणजे त्यांना या निवडणुकीत कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नव्हता.

त्यांच्या स्वतःच्या महिला बचत गटाच्या अपक्ष पॅनलनं निवडणूक लढवली. निवडून आल्यानंतरही त्या कुठल्याही राजकीय पक्षाकडे गेल्या नाहीत. त्या त्यांचं पॅनल घेऊन अपक्षच काम करत आहेत.

लाल रेष
लाल रेष

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार का मिळाला?

एक महिन्यांपूर्वीच त्यांना राज्यातील 'माझी वसुंधरा'चे सव्वा कोटी रुपयांचं पारितोषिक मिळालं आहे. आता त्यांनी थेट राष्ट्रीय पुरस्कारावर मजल मारली. पण, हे कसं शक्य झालं? त्यांनी गावात नेमकं काय केलं?

शारदा सांगतात, "सरकारकडून मिळणारा निधी, ग्रामपंचायतीचा स्वनिधी यावर गावाचा विकास होऊ शकणार नाही हे माहिती आहे. मग गावाचा विकास करायचा असेल तर निधी कुठून मिळेल? तर त्यासाठी एकमेवर पर्याय होता तो म्हणजे स्पर्धा."

"मग गावासाठी कोणकोणत्या स्पर्धा आहेत त्याचा आम्ही अभ्यास केला. माझी वसुंधरा अभियानात सहभागी झालो. त्याचे निकष वाचले. त्या निकषानुसार काम केलं. पण, गेल्या वेळी आम्हाला हा पुरस्कार मिळू शकला नव्हता."

गावात जिथं मोकळी जागा आहे तिथं झाडं लावलेली दिसतात.
फोटो कॅप्शन, गावात जिथं मोकळी जागा आहे तिथं झाडं लावलेली दिसतात.

"ज्या बोराडे गावाला हे पारितोषिक मिळवलं तिथं माझी टीम आणि मी पोहोचले. आम्ही कुठं कमी पडलो हे समजून घेतलं आणि त्यानुसार काम केलं. त्यानंतर एक महिन्यापूर्वीच आम्हाला माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सव्वा कोटी रुपयांचं पारितोषिक मिळालं."

याच पारितोषिकाच्या पैशांच्या माध्यमातून त्यांनी गावात काही योजना राबवल्या ज्यामधून गावातील प्रदूषण कमी होण्यास मदत झाल्याचं त्या सांगतात. त्यामुळे कार्बन न्युट्रल गाव या कॅटेगरीत त्यांना पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय.

गाव शहरालगत आणि महामार्गावर असल्यानं हवेत प्रदूषण होतं. हे कमी करण्यासाठी त्यांनी कार्बन न्युट्रल समिती तयार केली. त्यामाध्यमातून जनजागृती केली. त्यांनी पाच घटकांवर काम केलं.

1) वृक्षारोपण

शारदा या 2012-17 या काळात सरपंच होत्या त्यावेळीही त्यांनी झाडांची लागवड केली होती. त्यानंतर त्यांना 2022 मध्ये पुन्हा एकदा संधी मिळाली तेव्हापासून त्यांनी वृक्षारोपणाला महत्व दिलं. गावात जिथं मोकळी जागा आहे तिथं झाडं लावलेली दिसतात.

गावात जिथं मोकळी जागा आहे तिथं झाडं लावलेली दिसतात.
फोटो कॅप्शन, गावात जिथं मोकळी जागा आहे तिथं झाडं लावलेली दिसतात.

तलावाच्या रस्त्यावर, पाणीपुरवठा योजना असलेल्या मोकळ्या जागेत, शाळा, ग्रामपंचायत, तसेच खासगी पडीत असलेल्या भूखंडावर देखील संबंधित मालकासोबत ठराव करून त्यांनी तिथंही वृक्षलागवड केलेली आहे. तसेच लोकांच्या घरासमोर झाडं लावून त्या झाडाचं पालकत्व त्यांनाच देण्यात आलं आहे.

शारदा सांगतात, आतापर्यंत जवळपास 90 हजार झाडं लावली. देशी जाती, विदेशी जाती, नर्सरी, अधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड केली. प्रदूषण कमी व्हायला मदत झाली.

2) प्लास्टिक बंदीचा ठराव

हवेतलं प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीनं प्लास्टीक बंदीचा ठराव घेतला. प्लास्टिक बंदी कशी घातक आहे यासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. प्लास्टिकऐवजी कापडाची पिशवी वापरण्याचं आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केलं.

ग्रामपंचायतने प्लास्टिकऐवजी कापडाची पिशवी वापरण्याचं आवाहन ग्रामस्थांना केलं.
फोटो कॅप्शन, ग्रामपंचायतने प्लास्टिकऐवजी कापडाची पिशवी वापरण्याचं आवाहन ग्रामस्थांना केलं.

यात कापडी पिशव्या शिवण्याचं काम गावातीलच बचत गटाला दिलं आणि त्या पिशव्या लोकांना तसेच सुपर मार्केटमध्ये देण्यात आल्या. शारदा म्हणतात, प्लास्टिकचा वापर खूप कमी झाला. त्यामुळे प्लास्टिक जाळल्यानं जे प्रदूषण होत होतं ते कमी झालं.

याच गावातील अलका बोरकर सांगतात, "आमच्या गावात प्लास्टिक बंदी आहे. आम्ही कुठलंही सामान, भाजीपाला आणायचा असेल तर घरातून कापडी पिशवी घेऊन जातो."

पण शंभरटक्के प्लास्टिक अजूनही बंद झालेली नसल्याचं आम्हाला दिसलं. काही म्हातारी लोक लहान वस्तू प्लास्टीकमधून आणताना आम्हाला दिसल्या. पण, कापडी पिशव्यांची सवय लागायला आणखी थोडा वेळ लागेल असं शारदा यांना वाटतं.

3) ई-व्हेईकल वापरण्यावर भर

बेला गाव शहराला लागून असल्यानं या गावात प्रत्येक घरी दूचाकी असल्यासारखी आहे. गावात वाहनांचं प्रमाण जास्त आहे. पण, ही सगळी वाहनं पेट्रोलवर चालणारी आहेत. त्यामधून निघणाऱ्या धुरामुळेही हवेचं प्रदूषण होत असल्याचं लक्षात आलं.

हे कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे असं वाटलं. पण, लोकांना सांगितलं आणि त्यांना पटलं इतकं सोप्प नव्हतं. मग आम्ही सुरुवात आमच्यापासूनच केली.

ग्रामपंचायतीने सगळ्या घंटागाड्या बाजूला सारून ईलेक्ट्रीक व्हेईकल आणल्या.
फोटो कॅप्शन, ग्रामपंचायतीने सगळ्या घंटागाड्या बाजूला सारून ईलेक्ट्रीक व्हेईकल आणल्या.

आमच्या ग्रामपंचायतीकडे असलेल्या सगळ्या घंटागाड्या बाजूला सारून आम्ही ईलेक्ट्रीक व्हेईकल आणल्या. त्यासाठी ग्रामपंचायतीत चार्जिंग स्टेशनही तयार केलं.

लोकांना पेट्रोलची किती बचत होते, ईलेक्ट्रिक वाहन किती परवडते हे आम्ही प्रात्यक्षिक करून दाखवून दिलं. त्यामुळे काही लोकांना पटलं आणि ती लोक ईलेक्ट्रीक व्हेईकलकडे वळली. आता गावात जवळपास 200 लोक ईलेक्ट्रिक व्हेईकल वापरतात, असं शारदा सांगतात.

हळूहळू ही संख्या वाढेल, असा विश्वास शारदा यांना आहे.

4) घनकचरा व्यवस्थापन

गावात 8 वर्षांपासूनच घनकचरा व्यवस्थापनावर काम सुरू आहे. त्यावेळीही गावात घंटागाडी येत होती. पण, ओला कचरा-सुखा कचरा याबद्दल लोकांमध्ये अधिक जनजागृती करण्याची गरज होती.

त्यामुळे दोन वर्षांपूर्वी संक्रातीत वाण म्हणून ग्रामपंचायतीकडून डस्टबीन वाटप करण्यात आले. ओला कचरा आणि सुखा कचरा संकलनाबद्दल त्यांना समजावून सांगण्यात आलं.

गावात 8 वर्षांपासूनच घनकचरा व्यवस्थापनावर काम सुरू आहे.
फोटो कॅप्शन, गावात 8 वर्षांपासूनच घनकचरा व्यवस्थापनावर काम सुरू आहे.

आता गावात दररोज न चुकता घंटागाडी येते आणि नियमाप्रमाणे कचरा संकलन करतेय, असं याच गावातल्या रहिवासी ममता सांगतात.

शारदा बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाल्या, "आधी गावात कुठंही अन्न, ओला कचरा फेकलेला असायचा. पण, तो कचरा संकलित याच कचऱ्यापासून आम्ही खत तयार करतो आणि ते खत आम्ही लावलेल्या झाडांना देतो. ओल्या कचऱ्याची दुर्गंधीही दूर झाली आणि गावातली हवा शुद्ध होण्यास मदत झाली."

5) पारंपरिक वीजेची बचत

या गावात सर्व शासकीय इमारतींवर सोलरचे पॅनल लागलेले आहेत. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, अभ्यासिका अशा सगळ्या इमरती या सोलरवर चालतात. शारदा म्हणतात, "आम्ही प्रायोगिक तत्त्वावर आधी सरकारी इमारतीवर सोलरचं पॅनल लावलं."

महिला सरपंच शारदा गायधने शेंडे आणि इतर ग्रामपंचायत सदस्य
फोटो कॅप्शन, महिला सरपंच शारदा गायधने शेंडे आणि इतर ग्रामपंचायत सदस्य

त्याचा आम्हाला फायदा झाला. महावितरणचे विजेचे दर बघता ग्रामस्थांनाही सोलरची कल्पना पटली. त्यामुळे आमच्या गावातील अनेक लोक सोलर वापरायला लागले. आता आम्ही पाणी पुरवठा योजना आणि स्ट्रीट लाईटसाठी सुद्धा सोलर लावणार आहोत. त्याचं कामही सुरू झालं आहे.

या पाच घटकांवर काम करून गावातलं प्रदूषण कमी केलं असून पुरस्काराच्या रकमेतून मिळालेल्या पैशांतून गावाचा विकास आणि सौंदर्यीकरण करता आलं.

आता राष्ट्रीय पुरस्काराच्या रकमेतून देखील ग्रामस्थांना सोलरसाठी योजना देऊन पूर्ण गावानं सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शारद म्हणाल्या.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

"रात्री 2 वाजेपर्यंत काम करत असलो तरी घरातले विचारत नाहीत की इतका वेळ कुठं होतीस?"

बेला ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील आठही महिला या कुठे ना कुठे काम करून आपलं पोट भरतात. कोणी खासगी शाळेत शिक्षिका आहे, तर कोणी खासगी बँकेत काम करतात.

दिवसभर पोटासाठी काम करायचं आणि रात्री ग्रामपंचायतीद्वारे गावासाठी काम करायचं असा त्यांचा दिनक्रम असतो.

ग्रामपंचायतीच्या सदस्य रंजना बाबरे सांगतात, "आम्ही गाव झाडणं, कचरा उचलणं, पेंटिंग करणं, स्वच्छता करणं ही सगळी काम सायंकाळी 6 वाजतापासून करतो. आमच्यासोबत आमचे ग्रामपंचायतीचे कर्मचारीही थांबतात. आम्हाला आमच्या घरच्यांचाही तितकाच पाठिंबा आहे."

"आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत काम करत असलो तरी घरातून आम्हाला विचारलं जात नाही की इतका वेळ कुठं होतीस. आमच्या कामामध्ये आमचे नवरेसुद्धा ढवळाढवळ करत नाहीत. आम्ही स्वतंत्र्यपणे इथं काम करतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)