डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिसॉर्टची राखण करतोय हा रोबो कुत्रा, हे आहे वैशिष्ट्य

फोटो स्रोत, Reuters
- Author, लीली जमाली
- Role, बीबीसी न्यूज
बोस्टन डायनॅमिक्सने बनवलेला ‘स्पॉट’ नावाचा रोबो कुत्रा हे अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
अलीकडेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार-ए-लॅगो या रिसॉर्टची राखण करताना हा कुत्रा दिसला.
या कुत्र्यांकडे शस्त्र नसतात. लांबून त्याला नियंत्रित करता येतं. किंवा त्याने राखण करायचा आहे तो मार्ग त्यात प्रोग्राम करून ठेवला असेल तर कुत्रा स्वयंचलित होतो.
'स्पॉट'च्या प्रत्येक पायावर एक पाटी लिहिली आहे : “लाड करू नका.”
“या कुत्र्याचे लाड करावेसे कुणाला वाटतात तेच मला कळत नाही. तो तसा कुरवाळण्यासारखा दिसतही नाही,” मेलिसा मिकेलसॉन, मेनलो कॉलेजमधल्या राजकीय जाणकार म्हणतात.
रिसॉर्टच्या परिसरात ऐटीत चालत असलेल्या 'स्पॉट'चे व्हीडिओ टिकटॉकवर व्हायरल झालेत. काही जण त्याला ‘कूल’ आणि ‘गोंडस’ म्हणतायत तर काही त्याला क्रीपी म्हणजे दुसऱ्याला घाबरवून सोडणारा असं म्हणतायत.
अमेरिकेतील टीव्ही शोमध्ये देखील या रोबोची म्हणजेच कुत्र्याची खिल्ली देखील उडवली जात आहे.
पण 'स्पॉट' करतोय ते खायचं काम नाही!
“नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचे रक्षण करणे हे या रोबोचे प्रमुख काम आहे," असं अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसचे संपर्कप्रमुख ॲंथनी गुगलीमी यांनी बीबीसीला म्हटले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच्या महिन्यांमध्ये ट्रम्प यांचा जीव घेण्याचे दोन वेळा प्रयत्न झाले. पहिला पेन्सिल्वेनियामधल्या बटलरमध्ये जुलै महिन्यात झालेल्या रॅलीत आणि दुसरा मार-ए-लॅगो रिसॉर्टच्या गोल्फ मैदानावर सप्टेंबरमध्ये.
हा रोबो नेमका कसा काम करतो याबद्दल बीबीसीने विचारलेल्या काही नेमक्या प्रश्नांची सुरक्षेच्या कारणास्तव उत्तरे देण्याचे सिक्रेट सर्व्हिसने टाळले. संस्थेनं हा रोबो कधी बनवला हाही प्रश्न त्यात होता.
बोस्टन डायनॅमिक्सनेही ही उत्तरं द्यायला नकार दिला. मात्र, सिक्रेट सर्व्हिस त्यांचा स्वतःचा 'स्पॉट' रोबो बनवते आहे असं त्यांनी सांगितलं.
मग सिक्रेट सर्व्हिस आत्ता दुसऱ्याचा रोबो का वापरत असेल?
माजी सिक्रेट सर्व्हिस एजंट रॉन विलियम्स आता टॅलोन कंपनीज या सुरक्षा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे मालक आहेत.
ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यांमुळे सिक्रेट सर्व्हिसला हे तंत्रज्ञान तातडीने विकसित करायची गरज वाटत असल्याचा त्यांचा अंदाज आहे. आसपासचे धोके चांगल्या पद्धतीने ओळखता आणि टाळता यावेत हे या सुधारणांमागचं ध्येय असेल.


मार-ए-लॅगो यासारख्या मोठ्या मालमत्तेवर खूप दिवसांपासून असा रोबो कुत्रा घ्यायचा होता. माणसांच्या तुलनेत जास्त मोठ्या भागाचं रक्षण हा कुत्रा सहजपणे करू शकतो असं विलियम्स सांगत होते. आता असा कुत्रा नेहमीच दिसेल असंही ते पुढे म्हणाले.
फक्त सिक्रेट सर्व्हिसच नाही तर जगभरातल्या सैन्य दलाकडून आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडूनही रोबोट कुत्रा वापरला जाईल असं विलियम्स सांगतात.
पेन्सिल्वेनियामधल्या मॉन्टगोमेरी भागातल्या बॉम्ब पथकानेही 'स्पॉट' विकत घेतलाय. स्फोट होऊ शकतो अशा जागांची तपासणी करण्यासाठी या कुत्र्यांचा वापर केला जातो, असं बोस्टन डायनॅमिक्सच्या जाहिरातीत सांगण्यात आलंय.
हे पोलीस दलाची हुकूमशाही वाढवणारं आहे अशी टीकाही त्यावर होत असल्याचं वायर्ड या अमेरिकन मासिकात सांगितलं आहे.
तर दुसरीकडे रशियाने आक्रमण केल्यानंतर सुरू झालेल्या युद्धातही युक्रेन अशी कुत्री वापरत असल्याची पोस्ट या युक्रेनच्याच वृत्तपत्राने दिली होती.
'स्पॉट'ची चपळाई
'स्पॉट' फार चपळ आहे. तो भराभर पायऱ्या चढतो आणि उतरतो आणि लहान लहान जागांमध्येही पटकन घुसतो. त्याला दारही उघडता येतं.
पण येणाऱ्या धोक्याची सूचना द्यायच्या त्याच्या क्षमतेचं सगळ्यांकडूनच कौतुक होत असतं. त्याच्या या गुणामुळेच अनेक संस्था या तंत्रज्ञानासाठी 75,000 डॉलर इतकी किंमत मोजायलाही तयार आहेत.
हा रोबो राखण करू शकेल असं तंत्रज्ञान यात विकसित करण्यात आलं आहे, त्या दृष्टीने त्यात सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. त्यामुळे आमच्या संरक्षण कामात त्याची खूप मदत होते, असं सिक्रेट सर्व्हिसमधले संपर्कप्रमुख ॲंथनी गुगलीमी म्हणतात.
या रोबोच्या अंगावर अनेक ठिकाणी कॅमेरे बसवलेत. त्यामुळे परिसराचा एक थ्रीडी मॅपच मिळतो हेही बोस्टन डायनॅमिकच्या जाहिरातीत सांगितलंय. शिवाय, तापमानातला बदल मोजण्यासाठी थर्मल सेन्सरही आहेत.
पण हा रोबो माणसाच्या सहकार्याशिवाय काही करू शकत नाही.
“रोबोवर नियंत्रण करण्यासाठी रिमोट वापरला जातो,” असं जॉर्जी मॅसन युनिवर्सिटीतल्या मिसी कमिन्ग्स सांगतात. त्या विद्यापीठाचं ऑटोनॉमी आणि रोबोटीक्स केंद्र चालवलतात.
शिवाय, आधीच ठरवून दिलेल्या मार्गावर 'स्पॉट' स्वयंचलितपणेही हालचाल करू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
हे रोबो माणसांसारखे किंवा खऱ्या कुत्र्यांसारखे आवाज, वास किंवा इतर गोष्टींना विचलित होत नाहीत.
त्यात एवढ्या खास गोष्टी असतानाही या रोबोवर बंदी घालण्याची वेळ येऊ शकते.
“या रोबोच्या तोंडावर ॲक्वा नेट हेअरस्प्रे मारला तरी ते त्याचे कॅमेरे बंद पाडायला पुरेसं असतं,” कमिन्ग्स सांगतात.
मार-ए-लॅगोमधल्या रोबो कुत्र्याकडे हत्यारं नसली स्पर्धेत असलेल्या इतर कंपन्या हत्यारं असलेलं कुत्र बनवण्याच्या मागे लागल्या आहेत.
याचं उदाहरण देताना कमिन्ग्स नुकत्याच एका बैठकीत समोर आलेल्या रायफल असलेल्या चिनी मॉडेलबद्दल सांगतात.
ते माणसांची जागा घेणारे नाहीत असं मेलिसा मिकेलसॉन यांना वाटतं. गाडीत वापरलं जातं तसंच तंत्रज्ञान याही कुत्र्यांमध्येही वापरलं असल्याचं त्या सांगतात.
“गाड्या स्वतःच स्वतःला चालवू शकतील या गोष्टीवर आपण अजूनही फार विश्वास ठेवत नाही,” त्या म्हणतात.
तसंच, 'स्पॉट'सोबत सिक्रेट सर्व्हिसचे इतर एजंटही मार-ए-लॅगोचं रक्षण करत असतात.
“मानवी निर्णयक्षमता वापरण्यासाठी आणि तंत्रज्ञान मोडल्यावर गरज पडल्यास प्रत्यक्ष काम करण्यासाठी आपल्याला अजूनही माणसं लागतात, ” मिकेलसॉन म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











