डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचं पद दिलेल्या तुलसी गबार्ड कोण आहेत?

2024 मध्ये तुलसी अधिकृतपणे रिपब्लिकन पक्षामध्ये सामील झाल्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2024 मध्ये तुलसी अधिकृतपणे रिपब्लिकन पक्षामध्ये सामील झाल्या.
    • Author, अंशुल सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आता त्यांची टीम तयार करत आहेत.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या एका माजी नेत्याची निवड एका महत्त्वाच्या पदासाठी केली आहे. या नेत्यानं अमेरिकेत हिंदूंचे मुद्दे प्रखरपणे मांडले आहेत.

हा नेता म्हणजे तुलसी गबार्ड. डोनाल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबार्ड यांना नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकपदी नियुक्त करून त्यांचा समावेश स्वत:च्या टीममध्ये केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबार्ड यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं, "माजी खासदार लेफ्टनंट कर्नल तुलसी गबार्ड यांची नियुक्ती नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकपदी झाल्याचं सांगताना मला आनंद होतो आहे."

"डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या नामांकनासाठीच्या माजी उमेदवार असल्यामुळे त्यांना दोन्ही पक्षांचं (डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन) व्यापक समर्थन आहे. आता त्या एक प्राउड रिपब्लिकन आहेत."

तुलसी यांनी या नियुक्तीबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. तसंच अमेरिकन नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आणि सुरक्षेसाठी काम करणार असल्याचं सांगितलं.

तुलसी गबार्ड कोण आहेत?

तुलसी यांचा जन्म 1981 मध्ये अमेरिकन समोआ (पॅसिफिक महासागरातील द्वीपसमूह) मध्ये माइक गबार्ड आणि कॅरल गबार्ड यांच्या पोटी झाला. गबार्ड दांपत्याच्या पाच अपत्यांपैकी तुलसी या एक आहेत.

1983 मध्ये जेव्हा तुलसी गबार्ड दोन वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचं कुटुंब अमेरिकेच्या हवाई प्रांतात स्थलांतरित झालं होतं. हवाईमध्ये आल्यानंतर तुलसी यांच्या आई कॅरल यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला.

तर तुलसी यांचे वडील रोमन कॅथलिक ख्रिश्चन होते. हिंदू धर्माच्या प्रभावामुळे कॅरल यांनी त्यांच्या मुलांची नावं हिंदू परंपरेतील ठेवली आहेत.

तुलसी गबार्ड स्वत:ला हिंदू मानतात, मात्र त्या भारतीय वंशाच्या नाहीत.

तुलसी यांचे वडील आधी रिपब्लिकन पार्टी (2004-2007) मध्ये होते आणि नंतर 2007 पासून ते डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये आहेत.

2013 मध्ये तुलसी यांची पहिल्यांदा हवाई प्रांतातून खासदार म्हणून निवड झाली. 2021 पर्यंत त्या या पदावर होत्या.

सप्टेंबर 2014 मध्ये तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

फोटो स्रोत, X/@TulsiGabbard

फोटो कॅप्शन, सप्टेंबर 2014 मध्ये तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

राजकारणाशिवाय तुलसी गबार्ड दोन दशकांहून अधिक काळ आर्मी नॅशनल गार्डशी जोडलेल्या आहेत. या कालावधीत त्यांनी इराक आणि कुवेत मध्ये काम केलं आहे.

2016 च्या निवडणुकीआधी त्यांनी बर्नी सॅंडर्स यांच्यासाठी प्रचार केला होता. जो बायडन यांना पाठिंबा देण्याआधी त्यांनी 2020 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून शर्यतीत होत्या.

गबार्ड यांचं वैशिष्ट्यं म्हणजे त्या अमेरिकेच्या संसदेतील पहिल्या हिंदू खासदार होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी सरकारद्वारे संचालित आरोग्य सेवा, मोफत महाविद्यालयीन शुल्क आणि गन कंट्रोलसारख्या उदारवादी मुद्द्यांना समर्थन दिलं होतं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

2021 मध्ये खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी काही मुद्द्यांवर डेमोक्रॅटिक पार्टी विरोधात भूमिका घेतली होती. त्या अप्रत्यक्षपणे ट्रम्प यांना पाठिंबा देताना देत होत्या.

डेमोक्रॅटिक पार्टीच्या माजी सदस्य असल्यामुळे तुलसी गबार्ड यांनी कमला हॅरिस यांच्या विरोधात तयारी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना बरीच मदत देखील केली.

ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांनी परराष्ट्र धोरण आणि सामाजिक मुद्द्यांबाबत मतभेदाचं कारण देत डेमोक्रॅटिक पार्टी सोडली. त्यानंतर त्या उघडपणे ट्रम्प यांच्या समर्थनात उतरल्या. 2024 मध्ये त्या रिपब्लिकन पार्टीत आल्या.

भाजपाशी संबंध

2015 च्या एप्रिल महिन्यात तुलसी गबार्ड यांचं अमेरिकेत लग्न झालं तेव्हा त्या गोष्टीची चर्चा भारतात देखील झाली होती.

तेव्हा तुलसी गबार्ड यांनी हवाईमध्ये सिनेमॅटोग्राफर अब्राहम विलियम्स यांच्याशी वैदिक पद्धतीनं लग्न केलं होतं.

द कारवा मध्ये आलेल्या बातमीनुसार, अमेरिकेत झालेल्या या लग्नाला भारताचे तत्कालीन कार्यवाहक राजदूत तरनजीत संधू आणि राम माधव देखील उपस्थित होते.

तेव्हा राम माधव भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते होते. याआधी राम माधव दहा वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) राष्ट्रीय प्रवक्ते देखील होते.

या लग्नात राम माधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचून दाखवला आणि श्रीगणेशाची मुर्ती देखील तुलसी यांना भेट म्हणून दिली.

या लग्नाच्या काही महिने आधी तुलसी यांनी त्यांचा पहिला भारत दौरा केला होता. हा तीन आठवड्यांचा दौरा होता. यात त्यांनी पंतप्रधान मोदी, कॅबिनेट मंत्री आणि लष्कर प्रमुखांची भेट घेतली होती.

आपल्या भारत दौऱ्यात तुलसी यांनी पंतप्रधान मोदींचं खूप कौतुक केलं होतं.

2020 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी, तुलसी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या शर्यतीत सामील झाल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2020 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी, तुलसी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या शर्यतीत सामील झाल्या होत्या.

त्या म्हणाल्या होत्या, "मोदी खूप कणखर नेते आहेत आणि भारताला कोणत्या दिशेनं न्यायचं याबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. भारतासाठी कृतीशील योजना असणारे ते नेते आहेत."

इतकंच नाही तर तुलसी यांनी एका शाळेत झाडू मारून मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेला देखील पाठिंबा दिला होता.

पंतप्रधान मोदी जेव्हा योगासनांना जागतिक स्तरावर आणण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा तुलसी यांनी त्यांच्या या मोहिमेला जोरदार पाठिंबा दिला होता.

सप्टेंबर 2014 मध्ये पंतप्रधान मोदींशी त्यांची पहिली भेट झाली होती. त्यावेळेस त्यांनी पंतप्रधान मोदी यांना भेट म्हणून भगवत गीता दिली होती.

2014 च्या आधीपासूनच तुलसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत आल्या आहेत.

2002 च्या गुजरात दंगलींमधील कथित भूमिकेबद्दल जेव्हा अमेरिकन सरकारनं तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा देण्यास नकार दिला होता, तेव्हा अमेरिकन सरकारच्या या निर्णयावर टीका करणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये तुलसी यांचा समावेश होता.

हिंदू अस्मितेच्या समर्थक

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

2019 मध्ये तुलसी गबार्ड यांनी रिलीजन न्यूज सर्व्हिससाठी त्यांच्या हिंदू असण्याबाबत एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी लिहिलं होतं की हिंदू असल्याचा त्यांना अभिमान आहे. मात्र त्या 'हिंदू राष्ट्रवादी' नाहीत.

तुलसी लिहितात, "माझ्यावर देखील 'हिंदू राष्ट्रवादी' असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतातील लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या नेत्याबरोबरच्या माझ्या भेटींना या आरोपांसाठीचे पुरावे म्हणून दाखवण्यात आलं."

"राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, हिलरी क्लिंटन आणि संसदेतील माझ्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आहे, तसंच त्यांच्यासोबत काम केलं आहे. मात्र माझ्यावर आरोप करण्यात आले."

तुलसी गबार्ड यांचं म्हणणं होतं की ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू, बौद्ध यासारख्या वेगवेगळे धर्मांकडून त्यांना मिळणारा पाठिंबा हा त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनाचा पुरावा आहे.

2020 मध्ये त्यांनी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं होतं, "दुर्दैवानं, हिंदूफोबिया हे एक वास्तव आहे. मी खासदारकीसाठीच्या माझ्या प्रत्येक मोहिमेत आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे."

"आपल्या देशात हिंदूंना कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं याचं हे फक्त एक उदाहरण आहे. आमचे राजकारणी आणि प्रसारमाध्यमं हे फक्त सहनच करत नाहीत तर याला प्रोत्साहन देखील देतात ही दुर्दैवी बाब आहे."

कमला हॅरिस यांच्याविरोधातील प्रेसिडेन्शियल डिबेट्ससाठी तुलसी यांनीच ट्रम्प यांना मदत केली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कमला हॅरिस यांच्याविरोधातील प्रेसिडेन्शियल डिबेट्ससाठी तुलसी यांनीच ट्रम्प यांना मदत केली होती.

तुलसी गबार्ड अनेक प्रसंगी भगवत गीतेबद्दल बोलताना आणि भजन गाताना दिसल्या. तुलसी जेव्हा पहिल्यांदा संसदेत आल्या होत्या तेव्हा त्यांनी गीतेची शपथ घेतली होती.

शपथविधीनंतर तुलसी म्हणाल्या होत्या की मला भगवत गीतेतून प्रेरणा मिळते. मी माझं आयुष्य माझा देश आणि इतरांसाठी कसं वाहून घेऊ याची प्रेरणा मला तिथून मिळते.

2020 मध्ये कोरोनाच्या संकटकाळात सर्व जग अभूतपूर्व संकटाला तोंड देत होतं. त्यावेळेस डेमोक्रॅटिक पार्टी कडून राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या शर्यतीत असणाऱ्या उमेदवारांमध्ये तुलसी यांचा समावेश होता.

त्यावेळेस तुलसी यांनी गीतेसंदर्भात एक व्हिडिओ जारी केला होता आणि म्हणाल्या होत्या, "सद्यपरिस्थितीनं मला मी मध्य पूर्वेत असतानाच्या काळाची आठवण करून दिली. त्यावेळेस देखील प्रत्येक क्षणी माझ्या आयुष्याला धोका असायचा."

"आजच्या प्रमाणेच तेव्हा अनेकांचा जीव गेला होता. त्या काळात आणि आज देखील भगवत गीतेमुळे मला धीर मिळाला आहे."

काश्मीर, पाकिस्तान आणि बांगलादेश संदर्भातील भूमिका

2021 मध्ये बांगलादेशात दुर्गा पूजेच्या काळात हिंसाचार झाला होता आणि त्यात 100 हून अधिक हिंदू कुटुंबावर हल्ले झाले होते. त्यावेळेस अनेक हिंदू मंदिरं, घरं आणि दुकानांची तोडफोड झाली होती.

त्यावेळेस तुलसी यांनी एक्सवरून एका व्हिडिओ संदेशाद्वारे या हल्ल्यांवर टीका केली होती.

त्या म्हणाल्या होत्या, "बांगलादेशातील मंदिरांमध्ये भक्तांबद्दल असा तिरस्कार आणि हिंसा पाहून माझं मन व्यथित झालं आहे. या जिहादींना वाटत असेल की मंदिरं आणि मूर्ती जाळून, नष्ट करून ते त्यांच्या देवाला खूष करतील. मात्र त्यातून इतकंच दिसतं की प्रत्यक्षात ते देवापासून किती दूर आहेत."

"आता वेळ आली आहे की बांगलादेशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकारनं तिथल्या हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्धांसह इतर अल्पसंख्यांकांचं द्वेषयुक्त जिहादी शक्तींपासून रक्षण करावं."

याआधी तुलसी यांनी अमेरिकेच्या संसदेत बांगलादेश आणि पाकिस्तानातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेशी संबंधित प्रस्ताव मांडला होता.

हा प्रस्ताव सादर करताना त्यांनी 1971 मध्ये बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाल्याचं सांगत त्यासाठी पाकिस्तानी सैन्याला जबाबदार ठरवलं होतं.

2017 मध्ये तुलसी गबार्ड यांची सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्यासोबतची भेट चर्चेचा विषय बनली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2017 मध्ये तुलसी गबार्ड यांची सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्यासोबतची भेट चर्चेचा विषय बनली होती.

5 ऑगस्ट 2019 ला नरेंद्र मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरला लागू असलेलं कलम 370 रद्द करून त्याचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर राज्याचं विभाजन जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलं होतं.

सप्टेंबर 2019 मध्ये तुलसी गबार्ड यांना काश्मीरबाबत प्रश्न विचारला गेला होता. त्याचं उत्तर देताना तुलसी म्हणाल्या होत्या, "काश्मीरचा मुद्दा गुंतागुंतीचा आहे. तिथे भूतकाळात जे काही घडलं त्यामुळे अनेक कुटुंबांना त्यांचं घर सोडून पलायन करावं लागलं होतं आणि ती कुटुंब अजूनही तिथे परतलेली नाहीत."

त्या कलम 370 चा उल्लेख न करता म्हणाल्या होत्या, "मागील सरकारमध्ये जे कायदे होते, जी धोरणं होतं, त्यानुसार इथे समलैंगिकता बेकायदेशीर होती. या धोरणांमुळे महिलांचा आवाज दाबला जात होता."

"मी काही दिवसांपूर्वी एका अशा महिलेला भेटली ज्यांनी सांगितलं की काश्मीर महिलांना संपत्तीचा मालकी हक्क नाही. कोणत्याही सार्वभौम देशाच्या सरकारला सर्व गोष्टी लक्षात घेऊन काम करावं लागतं."

बशर अल असद यांची भेट घेतल्यावर झाली टीका

तुलसी गबार्ड यांनी 2017 मध्ये सीरियाचा दौरा केला होता. त्यावेळेस त्या सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना देखील भेटल्या होत्या. त्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये देखील बरीच चर्चा झाली होती. या भेटीमुळे त्यांना टीकेला देखील तोंड द्यावं लागलं होतं.

तसं तर अमेरिकन संसदेचे सदस्य म्हणजे खासदार परदेशातील नेत्यांना भेटत आले आहेत. मात्र बशर अल असद यांच्या सरकारवर त्यांच्याच देशातील लोकांवर अत्याचार करण्याचा आणि त्यांचा छळ केल्याचा आरोप होत आला होता.

अशा पार्श्वभूमीवर तुलसी गबार्ड यांनी बशर अल असद यांची भेट घेतल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं होतं.

2019 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पार्टीकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. मात्र तेव्हा देखील त्यांना या भेटीसंदर्भात अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागलं होतं.

वॉशिंग्टन पोस्टमधील एका वृत्तानुसार, त्यावेळेस जेव्हा तुलसी यांना असद हे 'शत्रू' असण्याबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, "ते अमेरिकेचे शत्रू नाहीत. कारण अमेरिकेला सीरियाकडून थेट धोका नाही."

2019 मध्ये तुलसी यांनी उघडपणे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचप तैयप्प अर्दोगान यांच्यावर टीका केली होती.

त्या म्हणाल्या होत्या, "तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष अर्दोगान यांच्याबद्दल तुम्हाला माहितच आहे की ते सीरियावर हल्ले करत आहेत. या हल्ल्यांसाठी ते आयएसआयएस आणि अल कायदाच्या 'माजी दहशतवाद्यां'ची मदत घेत आहेत. मी अनेक वर्षांपासून याबद्दल बोलते आहे."

तुलसी यांनी त्यावेळेस अर्दोगान हे एक कट्टरतावादी इस्लामी असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर इस्लामिक राजवट स्थापन करून त्याचे खलिफा होण्याची त्यांची इच्छा असल्याचं म्हटलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)