दिल्लीत रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री करुन भाजपानं वर्मांचा 'प्रवेश' का रोखला? धक्कातंत्र की रा. स्व. संघामुळे 'दक्ष'?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रजनीश कुमार,
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भाजपनं रेखा गुप्ता यांना दिल्लीचं मुख्यमंत्रिपद दिलं आहे. गुप्ता आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये दोन गोष्टी समान आहेत. दोघेही हरियाणातील असून बनिया समुदायातील आहेत.
अरविंद केजरीवाल, सुषमा स्वराज यांच्यानंतर रेखा गुप्ता या हरयाणातून आलेल्या दिल्लीच्या तिसऱ्या मुख्यमंत्री आहेत. पण, रेखा गुप्ता यांच्यापेक्षा मुख्यमंत्रिपदासाठी प्रवेश वर्मा यांच्या नावाची जोरदार चर्चा होती.
वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. त्यामुळे ते मुख्यमंत्रिदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. पण, त्यांच्याऐवजी रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री कशा बनल्या? भाजपचं यामागचं नेमकं राजकारण काय? पाहुयात.
देशात सध्या असलेल्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री
दिल्लीआधी भाजपचं 13 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात सरकार होतं. पण, तिथं एकही महिला मुख्यमंत्री नव्हती. आता दिल्लीतील विजयानंतर देशात 13 राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशात भाजपचं सरकार आहे.
याआधी राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सिंधिया या भाजपच्या महिला मुख्यमंत्री होत्या. पण, गेल्या निवडणुकीत ही जागाही रिक्त झाली. आता रेखा गुप्ता यांनी भाजपच्या महिला मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
आतापर्यंत देशातील 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशात ममता बॅनर्जी एकमेव महिला मुख्यमंत्र्या होत्या.
आता भाजपनं दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची संधी महिलेला दिल्यानंतर रेखा गुप्ता या सध्या देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत.


गेल्या एका दशकापासून आपल्या देशात महिलांकडे महत्त्वपूर्ण व्होट बँक म्हणून पाहिलं जातंय. जात आणि धार्मिक अस्मितेचा विचार न करता महिलांना राजकीयदृष्ट्या एकत्र आणलं जाऊ शकतं असं बोललं जातंय.
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या निमित्तानं आपल्यासाठी महिला किती महत्त्वाच्या आहेत हा संदेश भाजपला द्यायचा असल्याचं सांगितलं जातंय.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात महिलांना केंद्रस्थानी ठेवलं होतं.
आम्ही निवडणूक जिंकलो तर दर महिन्याला 2500 रुपये देण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं. त्यातच आता रेखा गुप्ता यांना दिल्लीचं मुख्यमंत्रिपद देणं हे भाजपच्या या महिलांबद्दलच्या रणनीतीचा भाग असल्याचं बोललं जातंय.
'संघामधून' आलेल्या रेखा गुप्ता
आरएसएस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आलेले लोक भाजपमध्ये मोठ्या पदावर जाऊ शकतात असं मानलं जातं. आतापर्यंतच्या भाजपच्या बड्या नेत्यांची पार्श्वभूमी बघितली तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल.
अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी असू द्या किंवा मोदी, अमित शाह, अरुण जेटली किंवा नितीन गडकरी. हे सगळे नेते आरएसएसच्या मुशीतून घडलेले आहेत.
रेखा गुप्ता आरएसएस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा दोन्हीमध्ये सक्रिय राहिलेल्या आहेत.
सुषमा स्वराज निर्णय घेऊ शकतील इतक्या मोठ्या नेत्या बनू शकल्या असत्या. पण, त्यांना ना आरएसएस, ना एबीव्हीपीची पार्श्वभूमी होती. स्वराज यांना जनता पार्टीची राजकीय पार्श्वभूमी होती.

फोटो स्रोत, Getty Images
रेखा गुप्ता या पहिल्यांदा आमदार झाल्या असल्या तरी दिल्लीतल्या राजकारणात नवीन नाहीत. त्या दिल्ली महापालिकेच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत. तसेच गेली दोन टर्म त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली. पण, त्यांचा पराभव झाला होता.
2025 च्या निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग इथून आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा 29,595 मतांनी पराभव केला. दिल्लीत इतक्या मोठ्या मताधिक्क्यानं निवडणूक जिंकणं म्हणजे मोठा विजय मानला जातो.
प्रवेश वर्मा यांना मुख्यमंत्रिपद का मिळालं नाही?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस उलटले. भाजपला विजय मिळाला. तरीही मुख्यमंत्री कोण होणार हे दहा दिवस ठरलेलं नव्हतं. अखेर भाजपनं आता मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली.
पण, त्याआधी मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावांची चर्चा झाली. यामध्ये प्रवेश वर्मा यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. वर्मा यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता.
त्यांनी 4089 मतांनी केजरीवालांचा पराभव केला. त्यांना एकूण 30,088 मतं मिळाली, तर अरविंद केजरीवाल यांना 25,999 मतं मिळाली. याच मतदारसंघातून काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना 4568 मतं मिळाली. त्यामुळे त्यांनाच दिल्लीचं मुख्यमंत्रिपद दिलं जाईल अशी चर्चा होती. पण, रेखा गुप्ता या वर्मा यांच्यापेक्षा वरचढ ठरल्या.
आता वर्मा यांना दिल्लीचं उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशा चर्चा सुरू आहेत. वर्मा यांचे वडील साहिब सिंह वर्मा 26 फेब्रुवारी 1996 ते 12 ऑक्टोबर 1998 पर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री होते.
आता त्यांच्याच मुलाला दिल्लीचं मुख्यमंत्रिपद दिलं असतं तर भाजपवर टीका होण्याची शक्यता होती. कारण, भाजपनं आतापर्यंत काँग्रेससह इतर पक्षांवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. वर्मा यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भाजपवरही घराणेशाहीचा आरोप झाला असता.

फोटो स्रोत, Getty Images
फक्त दिल्लीतच नाहीतर याआधीही भाजपनं मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मुख्यमंत्रिपद देणं टाळलं आहे. हिमाचल प्रदेशात प्रेमकुमार धमुल यांचा मुलगा अनुराग ठाकूर हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. पण, भाजपनं जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्रिपद दिलं होतं.
शेतकरी आंदोलनामुळे जाट समाज भाजपवर नाराज आहे. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी भाजप वर्मा यांना मुख्यमंत्रिपद देऊ शकते अशी चर्चा दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी होती.
पण, भाजपची एक अशीही रणनीती आहे की एखादी जात प्रभावी असेल तर त्या जातीचा मुख्यमंत्री न देता दुसऱ्या जातीला प्राधान्य दिलं जातं. याआधी हरयाणामध्येही भाजपनं हीच रणनिती वापरली. इथं जाट समाजाचा प्रभाव आहे. पण, भाजपनं गेल्या 11 वर्षांत या जातीचा एकही मुख्यमंत्री बनवला नाही.
महाराष्ट्रात मराठा समाजाचा राजकारणावर प्रभाव आहे. पण, भाजपनं त्यांना बहुमत मिळालं तेव्हा 2014 आणि 2024 ला ब्राम्हण समाजातून येणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. झारखंडमध्ये आदिवासी मतदार सर्वाधिक आहेत. पण, इथं तेली समाजातील रघुबर दास यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली.
वर्मा यांना त्यांची वादग्रस्त वक्तव्यं नडली?
प्रवेश वर्मा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. ऑक्टोबर 2022 मध्ये ते खासदार असताना दिल्लीत विश्व हिंदू परिषदेचा एक कार्यक्रम झाला होता. यावेळी एका विशिष्ट समाजावर बहिष्कार टाका असं वक्तव्य वर्मा यांनी केलं होतं.
"यांचं डोकं ठिकाण्यावर आणायचं असेल, यांची तब्येत ठीक करायची असेल तर एकच उपाय आहे तो म्हणजे यांच्यावर बहिष्कार टाका" असं वर्मा म्हणाले होते.
यानंतर लोकसभा निवडणुकीत महरौली मतदारसंघातून त्यांचा पत्ता कट झाला होता. अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपनं त्यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवल्याची चर्चा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे रेखा गुप्ता यांचे जुने ट्विट सुद्धा व्हायरल होत आहेत. यामध्ये त्यांनी राजकीय मर्यादेच्या पलीकडे जात ट्विट केले आहेत.
यावेळी रेखा गुप्ता कुठल्याही राजकीय पदावर नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे इतकं लक्षही दिलं जात नव्हतं. पण, वर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलीत यावेळी ते खासदार होते. तसेच ते दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र होते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका झाली होती.
रेखा गुप्ता कोण आहेत?
रेखा गुप्ता दिल्लीच्या राजकारणात गेल्या 30 वर्षांपासून सक्रीय आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या दौलत राम महाविद्यालयातून बीकॉम पूर्ण केलं. यावेळीच त्या राजकारणात सक्रीय झाल्या होत्या. 1992 मध्ये रेखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्य झाल्या.
त्या 1995 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी युनियनच्या सचिवही होत्या. त्यानंतर त्यांना अध्यक्षपद मिळालं.
गुप्ता 2000 साली भाजपात आल्या आणि त्यांना संघटनेत महत्वाची पदं मिळाली. दिल्ली भाजपच्या महासचिव, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष, उत्तर प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष ही पदं त्यांना मिळाली. याशिवाय गुप्ता भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारीही होत्या.
त्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमार यांनी त्यांचा पराभव केला होता.
रेखा गुप्ता स्टुडंट युनियनच्या सदस्य होत्या त्यावेळी काँग्रेसकडून अल्का लांबा अध्यक्ष होत्या. आता रेखा गुप्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर अल्का लांबा यांनी दिल्ली विद्यापीठातील एक फोटो शेअर करत म्हटलंय, "1995 चा हा फोटो अविस्मरणीय आहे. यावेळी रेखा गुप्ता आणि मी सोबत शपथ घेतली होती. मी एनएसयूआयमधून दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती आणि रेखा यांनी एबीव्हीपीच्या सरचिटणीसपद जिंकलं होतं. रेखा गुप्ता यांना शुभेच्छा. दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आता यमुना नदी स्वच्छ होईल आणि आमच्या महिला, मुली सुरक्षित राहतील अशी दिल्लीकरांना आशा आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











