प्रवेश वर्मा कोण आहेत, ज्यांनी अरविंद केजरीवालांना पराभूत केलंय?

फोटो स्रोत, Facebook/Parvesh Verma
आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभूत केल्यानंतर भाजपचे नेते प्रवेश वर्मा सध्या चर्चेत आले आहेत.
तब्बल तीनवेळा दिल्लीचं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या अरविंद केजरीवाल यांना 4089 मतांनी पराभूत करण्यात त्यांना यश मिळालं आहे.
ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून दिल्ली विधानसभेमध्ये प्रवेश करणार आहेत. याआधी दोनवेळा ते लोकसभेचे सदस्यही राहिले आहेत.
केजरीवाल यांचा पराभव केल्यामुळे त्यांच्याकडेच दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिलं जात आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले प्रवेश वर्मा नक्की कोण आहेत आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, ते पाहूयात.
प्रवेश वर्मा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
प्रवेश वर्मा हे दिल्लीतील पंजाबी आणि जाट समुदायाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात. ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत.
त्यांचे काका आझाद सिंगदेखील राजकारणातच होते. ते उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे महापौर राहिले आहेत. त्यांनी भाजपच्या तिकिटावर मुडका मतदारसंघातून 2013 ची विधानसभा निवडणूक लढवली होती.
प्रवेश वर्मा यांनी 'फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंट'मधून एमबीए केलं आहे. त्यांनी आपलं संपूर्ण शिक्षण दिल्लीतून पूर्ण केलं असून दिल्ली विद्यापीठाच्या करोरी मॉल कॉलेजमधून बीएची पदवी घेतली आहे.
त्यांच्या पत्नी स्वाती सिंग या मध्य प्रदेशमधील भाजपचे वरिष्ठ नेते विक्रम वर्मा यांच्या कन्या आहेत. प्रवेश वर्मा यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.
प्रवेश वर्मा 'राष्ट्रीय स्वयम्' नावाची एक सामाजिक संस्थाही चालवतात.


प्रवेश वर्मा यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
आपल्या महाविद्यालयीन काळापासूनच प्रवेश वर्मा यांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला होता. मात्र, 2013 च्या विधानसभा निवडणुकीत ते खऱ्या अर्थाने राजकीय आखाड्यात उतरले. याच निवडणुकीत ते पहिल्यांदा मेहरौली मतदारसंघातून आमदार झाले.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवेश वर्मा यांनी पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते पुन्हा एकदा विजयी झाले होते. त्यांचा 5 लाख 78 हजार मतांनी विजय झाला होता.
आपल्या लोकसभा सदस्यत्वाच्या कारकिर्दीमध्ये प्रवेश वर्मा हे संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते यासंदर्भातील संयुक्त संसदीय समितीचे सदस्य होते तसेच ते अर्बन डेव्हलपमेंट विषयाच्या स्थायी समितीमध्येही होते.

फोटो स्रोत, Getty Images
वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत
प्रवेश वर्मा हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकवेळा अशी विधाने केल्यामुळे ते सातत्याने चर्चेत राहिलेले आहेत.
2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये, प्रवेश वर्मा यांनी आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांना 'दहशतवादी' म्हटलं होतं.
त्यांच्या या वादग्रस्त विधानाची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांना त्यापुढील 24 तासांसाठी प्रचार करण्यावर बंदी घातली होती.

फोटो स्रोत, Getty Images
सध्याच्या या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही प्रचारादरम्यान त्यांनी केलेलं एक वक्तव्य असंच वादग्रस्त ठरलं होतं.
वर्मा यांनी म्हटलं होतं की, "पंजाबमध्ये नोंदणीकृत असलेली हजारो वाहने दिल्लीत फिरताना दिसतात. ती वाहनं कोण चालवतंय? 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) निमित्ताने इथे जय्यत तयारी सुरू आहे."
अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या विधानाचा चांगलाच समाचार घेतला होता.
हा पंजाबी लोकांचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. प्रवेश वर्मा यांनी पंजाबी लोकांची माफी मागायला हवी, अशी मागणीही 'आप'ने केली होती.
2025 च्या या विधानसभा निवडणुकीदरम्यान, निवडणूक आयोगाने प्रवेश वर्मा यांच्यावर महिला मतदारांना शूज वाटल्याचा आरोप करत त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.

फोटो स्रोत, Getty Images
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वकील रजनीश भास्कर यांनी प्रवेश वर्माचे दोन व्हिडिओ निवडणूक आयोगाला पाठवले होते. त्यानंतर त्यावर कारवाई करत निवडणूक आयोगाने हा गुन्हा नोंदवला.
प्रवेश वर्मा याप्रकारे अनेक वादांमध्ये आजवर अडकले आहेत. मात्र, तरीही ते दिल्लीच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून सुपरिचित आहेत.
ते निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या आक्रमक वक्तृत्वासाठी तसेच स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











