काँग्रेस-आप युती न झाल्यानं दिल्लीत 'या' 14 जागांवर भाजप जिंकली, कुणाला किती मतं पडली?

दिल्ली निवडणुकीत 'आप' आणि काँग्रेसची युती झाली असती तर निकाल वेगळा लागला असता असं म्हटलं जातंय.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, दिल्ली निवडणुकीत 'आप' आणि काँग्रेसची युती झाली असती तर निकाल वेगळा लागला असता असं म्हटलं जातं आहे.
    • Author, मानसी दाश
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत दिले असून आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एकेकाळी दिल्लीतील सत्तेत वर्चस्व असलेल्या काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

परंतु, काँग्रेसच्या मतदानाच्या टक्क्यात झालेली वाढ पाहता दिल्लीतील अनेक मतदारसंघात काँग्रेसला पडलेली मतं 'आप'च्या पराभवाला कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 मतदारसंघात 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं आणि 8 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागला.

यात जनतेने 48 जागांवर भाजपला कौल दिला असून तब्बल 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपची सत्ता आली आहे. तर, गेल्या निवडणुकीत 62 जागा जिंकणाऱ्या 'आप'ला या निवडणुकीत 22 जागांवर समाधान मानावं लागलं.

'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक बडे नेते पराभूत झाले आणि 'आप'ला 11 वर्षानंतर दिल्लीच्या सत्तेतून पायउतार व्हावं लागलं.

त्याचप्रमाणे दिल्लीत 1998 ते 2013 या कार्ळकाळात सत्तेवर असलेल्या काँग्रेसला 2015, 2020 आणि 2025 च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील एकाही जागेवर खातं उघडता आलं नाही.

तरीही काँग्रेस पक्षाला जवळपास 7 टक्के मतं मिळाली आहेत. 2020 च्या निवडणुकीमध्ये ही मतं 5 टक्केही नव्हती.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

समन्वयाचं समीकरण बिघडलं

दिल्ली निवडणुकीत भाजपशी दोन हात करण्यासाठी विरोधी पक्ष आघाडीच्या रुपात एकत्र येऊन लढतील अशी अपेक्षा केली जात होती, पण प्रत्यक्षात वेगळंच चित्र दिसून आलं.

लोकसभा निवडणुकीपूर्वी तयार झालेल्या विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत काँग्रेस आणि आप एकत्र लढले होते. दिल्लीतल्या 7 जागांपैकी 'आप'ने 5, तर काँग्रेसने 2 जागा लढवल्या होत्या. मात्र, सातही जागा भाजपने जिंकल्या.

असं असलं तरी विधानसभेसाठी दोन्ही पक्षांमध्ये मतभेद पाहायला मिळाले. 'आप'नं दिल्लीत आमची सत्ता आहे, काँग्रेसची आज एकही जागा नाही, मग आम्ही त्यांच्यासोबत जागावाटप का करावं अशाप्रकारची भूमिका घेतल्याचं चित्र दिसून आलं.

त्यात, काँग्रेसनंही दिल्लीच्या सर्व 70 जागांवर उमेदवार दिले. त्यामुळे अनेक ठिकाणी मतविभाजन पाहायला मिळालं. याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला मिळाल्याचं दिसून येतं.

अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, Mohd Zakir/Hindustan Times via Getty Images

उदाहरणार्थ, नवी दिल्लीची जागा अरविंद केजरीवाल भाजपकडून जितक्या मतांनी हरले, त्यापेक्षा जास्त मतं काँग्रेसच्या संदीप दीक्षितांना मिळाली आहेत.

जंगपुरामधून जितक्या फरकानं मनीष सिसोदिया पडले, त्यापेक्षा 10 पट जास्त मतं काँग्रेसला पडली आहेत. अशा आणखीही बऱ्याच जागा आहेत.

म्हणजे जर समन्वय साधला असता, तर कदाचित आपला किंवा दुसरीकडे काँग्रेसलाही आणखी जागा मिळवता आल्या असत्या.

या जागांवर 'आप'ला बसला फटका

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात 'आप'ला मोठा फटका बसला आहे. आप आणि काँग्रेसनं आपले स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने त्यांच्या मतांच विभाजन झालं असून याचा फायदा भाजपला झाला.

बऱ्याच मतदारसंघात काठांच्या फरकानं 'आप' पिछाडीवर गेल्याचं दिसून आलं. यात काँग्रेसला जरी एकही जागा जिंकला आली नसली तरी काँग्रेसला पडलेल्या मतांची टक्केवारी पाहता 'आप'चं गणित कोलमडल्याचं चित्र होतं.

दिल्लीतील नवी दिल्ली, ग्रेटर कैलाश, जंगपुरा, राजेंद्र नगर, मादीपूर, मालवीय नगर, बादली, छत्तरपूर, कस्तूरबा नगर, महरौली, नांगलोई जाट, संगम विहार, तिमारपूर, त्रिलोकपुरी आदी जागांवर मोठ्या प्रमाणात आपचे मतविभाजन पाहायला मिळालं.

GFX

नवी दिल्ली मतदारसंघातून 'आप'प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत होते. या मतदारसंघाकडे सर्वांच लक्ष लागून होतं.

केजरीवाल यांच्याविरोधात भाजपनं प्रवेश वर्मांना उमेदवारी दिली होती. तर, काँग्रेसकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांचे पुत्र संदीप दिक्षित उभे होते.

या मतदारसंघात भाजपच्या प्रवेश वर्मांकडून केजरीवाल 4089 मतांनी पराभूत झाले आहेत. तर, काँग्रेसच्या संदीप दिक्षित यांना 4568 मतं पडली आहेत.

GFX

जंगपुरा मतदारसंघात 'आप'कडून दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया निवडणूक लढवत होते. त्यांच्याविरोधात भाजप उमेदवार तरविंदर सिंह मारवाह यांनी 38 हजार 859 मतं मिळवली. तर, सिसोदिया यांना 38 हजार 184 मत पडली आहेत.

महत्वाचं म्हणजे सिसोदिया यांना अगदी काठावर 675 मतांनी पराभूत व्हावं लागलं. तर, काँग्रेसला 7 हजार 350 मतं मिळाली.

मनीष सिसोदिया 2013 पासून सलग तीन वेळा पटपरगंज मतदारसंघातून आमदार होते. मात्र, या निवडणुकीत त्यांनी जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवली.

गेल्या तीन टर्मपासून 'आप'ला या मतदारसंघात विजय मिळवता आला. 'आप'कडून 2013 साली मनिन्दर सिंह धीर आणि त्यानंतर 2015 आणि 2020 साली प्रवीण कुमार जिंकून आले होते.

GFX

ग्रेटर कैलाश मतदारसंघात भाजपच्या शिखा रॉय यांना 49 हजार 594 मतं मिळाली. त्यांनी 'आप'चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांना 3188 मतांनी पराभूत केलं आहे.

भारद्वाज यांना 46,406 मतं पडली तर काँग्रेस उमेदवार गर्वित सिंह 6,711 मतांसह तिसऱ्या स्थानी राहिले.

GFX

मालवीय नगर मतदारसंघात'आप'चे नेते सोमनाथ भारती भाजप उमेदवार सतीश उपाध्यायकडून 2 हजार 131 मतांनी पराभूत झाले आहेत. काँग्रेस उमेदवार जितेंद्र कुमार कोचर यांना 6 हजार 770 मतं मिळाली आहेत.

सतीश उपाध्याय हे 2014 आणि 2016 साली दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते.

भाजपला येथे 39 हजार 564 मतं पडली तर 'आप'ला 37 हजार 433 मतं मिळाली आहेत.

GFX

मादीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कैलाश गंगवाल यांनी 10 हजार 899 मतांनी विजय मिळवला. त्यांनी 'आप'च्या राखी बिरला यांचा पराभव केला. तर काँग्रेसचे जेपी पनवार यांना 17 हजार 958 मतं मिळाली.

हा मतदारसंघ 1998, 2003 आणि 2008 पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता. पण 2013 साली 'आप'नं येथे खातं उघडलं. त्यांनतर मागील तीन टर्म 'आप'चे गिरीश सोनी येथे जिंकत आले.

मात्र, यावेळेस 'आप'नं उमेदवार बदलत राखी बिरला यांना तिकीट दिलं आणि त्याचा फटका पक्षाला बसला.

GFX

छत्तरपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार 6 हजार 239 मतांनी विजयी झाले.

इथं कर्तार सिंह तंवर यांना 80 हजार 469 मतं मिळाली. तर, 'आप'चे ब्रह्मसिंग तंवर यांना 74 हजार 230 मतं मिळाली.

काँग्रेसचे राजेंद्र सिंह तंवर यांना 6 हजार 601 मतं मिळाली.

GFX

बादली मतदारसंघातभाजप उमेदवार अहिर दीपक चौधरी यांनी 'आप' उमेदवार अजेश यादव यांचा पराभव केला.

या निकालात येथून उमेदवार असलेले दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांची मोठी भूमिका होती. ते तिसऱ्या स्थानावर राहिले.

GFX

त्रिलोकपुरी मतदारसंघात भाजपचे रवी कांत यांनी आम आदमी पक्षाच्या अंजना परचा यांचा 392 मतांनी पराभव केला. या जागेवर काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरली. काँग्रेस उमेदवार अमरदीप यांना 6 हजार 147 मतं मिळाली.

2020 च्या विधानसभा निवडणुकीत 'आप'चे रोहित कुमार मेहरौलिया यांनी या मतदारसंघात भाजपच्या किरण वैद्य यांचा पराभव केला होता.

परंतु, यावेळी तिकीट न मिळाल्यामुळं निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी 'आप'ला राजीनामा दिला होता.

GFX

कस्तूरबा नगर मतदारसंघात भाजपनं 11 हजार 48 मतांनी विजयी मिळवला. इथं भाजपला 38 हजार 67 मतं पडली.

काँग्रेस 27 हजार 19 मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले तर, 'आप' 18 हजार 617 मतांसह तिसऱ्या स्थानी राहिले.

GFX

पश्चिम दिल्ली मतदारसंघातून भाजपचे मनोज कुमार शौकीन 26,251 मतांनी विजयी झाले. आम आदमी पक्षाच्या रघुविन्दर शौकीन यांचा त्यांनी पराभव केला.

तर या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रोहित चौधरी यांना 32,028 मतं मिळाली. त्यामुळं हे मतविभाजन इथल्या भाजपच्या विजयाच्या कारणांपैकी एक ठरलं.

गेल्या दोन वेळी याठिकाणी आम आदमी पार्टीचे रघुविन्दर शौकीन आमदार होते. तर वहीं मनोज शौकीन 2013 ते 2014 पर्यंत आमदार होते.

GFX

दक्षिण दिल्लीच्या महरौली मतदारसंघातूनभाजपच्या गजेन्द्र सिंह यादव यांनी अवघ्या 1,782 मतांच्या फरकानं विजय मिळवलं. त्यांनी आम आदमी पार्टीच्या महेंद्र चौधरी यांना पराभूत करत विजय मिळवला.

या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार पुष्पा सिंह आणि अपक्ष उमेदवार बालयोगी बाबा बालकनाथ यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

बालकनाथ यांना 9,731 मतं मिळाली. तर चौथ्या क्रमांकावरील पुष्पा सिंह यांना 9,338 मतं मिळाली.

या मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे नरेश यादव दोन वेळा आमदार बनले होते. पण यावेळी निवडणुकीच्या तोंडावर 31 जानेवारी 2025 ला त्यांनी पक्षातून राजीनामा दिला होता.

GFX

तिमारपूर या मतदारसंघात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. भाजपला इथं अवघ्या 1,168 मतांनी विजय मिळाला.

भाजपचे सूर्य प्रकाश खत्री यांना एकूण 55,941 मतं मिळाली. त्यांनी आम आदमी पार्टीच्या सुरिंदर पाल यांना पराभूत केलं.

काँग्रेसचे उमेदवार लोकेन्द्र कल्याण सिंह यांना इथं एकूण 8,361 मत मिळाली.

2020 मध्ये ही जागा आम आदमी पार्टीच्या दिलीप पांडेय यांनी जिंकली होती. त्यावेळी त्यांनी भाजपकडून लढलेल्या सुरिन्दर पाल सिंह यांचा पराभव केला होता.

यावेळी निवडणुकीपूर्वी सुरिन्दर पाल बाजप सोडून आम आदमी पार्टीत आले होते. दिलीप पांडेय यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर त्यांना इथून तिकिट देण्यात आलं होतं.

GFX

राजेंद्र नगर मतदारसंघातही विजयातील फरक फक्त 1,231 मतांचा आहे.

याठिकाणी दिल्ली महानगर पालिकेचे नगरसेवक राहिलेले भाजपचे उमंग बजाज यांनी आम आदमी पार्टीचे विद्यमान आमदार दुर्गेश पाठक यांचा पराभव केला.

काँग्रेसकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या विनीत यादव यांनी इथून 4,015 मतं मिळवली.

2020 मध्ये याठिकाणी राघव चड्ढा विजयी झाले होते. 2022 मध्ये पक्षानं त्यांना राज्यसभेवर पाठवलं. त्यानंतर ही जागा रिक्त होती.

याठिकाणी पोटनिवडणुकीत दुर्गेश पाठक विजयी झाले होते. आपनं ही जागा राखण्यात तेव्हा यश मिळवलं होतं.

GFX

संगम विहार या मतदारसंघातली लढाई रंजक झाली. याठिकाणी विजयातील फरक सर्वात कमी म्हणजे फक्त 344 होता.

भाजपचे चंदन कुमार चौधरी यांना एकूण 54,049 मतं मिळाली. तर त्यांच्यापेक्षा 344 मतांनी मागं राहिले आम आदमी पार्टीचे विद्यमान खासदार दिनेश मोहनिया.

दिनेश यांनी तीन वेळा इथून विजय मिळवला होता. पण यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

या ठिकाणी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका राहिली. काँग्रेसच्या हर्ष चौधरी यांनी 15,863 मतं घेतली. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.