कुणाल कामरा : एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी फोडलेला 'हॅबिटॅट स्टुडिओ' कसा सुरू झाला आणि का बंद झाला?

    • Author, यश वाडेकर
    • Role, बीबीसी मराठी

'ठाणे की रिक्षा' या कुणाल कामराच्या व्यंगात्मक गाण्याची महाराष्ट्रासह देशात चर्चा झाली.

'नया भारत' या स्टँडअप शोमुळे शिवसैनिकांनी हा शो चित्रित झाला, त्या 'इंडी हॅबिटॅट स्टुडिओ'ची तोडफोड केली.

तोडफोड करत कायदा हाती घेणं योग्य आहे का, हा प्रश्न आहेच. मात्र, त्याचसोबत अनेकांना 'हॅबिटॅट म्हणजे नेमका काय प्रकार आहे' यासह अनेक प्रश्न पडले आहेत.

'हॅबिटॅट'सारखे मंच नवोदित कलाकारांना आपले गुण दाखवण्यासाठी संधी उपलब्ध करून देत असताना, ते तोडफोडीसारख्या कृत्यांचे बळी ठरणार असतील, तर त्याचे कलाविश्वावर काय परिणाम होतील?

स्टँडअप कॉमेडी ही केवळ हसवण्याचे साधन नाही, तर समाज आणि राजकारणावर टीका करण्यासाठी या कलाप्रकाराचा प्रभावी वापर झाल्याचे इतिहासात डोक्यावल्यास दिसून येतं.

आजवर अनेकदा स्टँडअप कॉमेडी हा कलाप्रकाराचा वापर करुन अनेक विनोदवीरांनी सरकारविरोधात आवाज उठवला.

अमेरिकन स्टँडअप कॉमेडीयन लेनी ब्रूस यांनी या माध्यामातून सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य केलं होतं, तर रिचर्ड प्रायर यांनी वर्णावरून केल्या जाणाऱ्या भेदभावावर स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून आवाज उठवला.

या सगळ्या स्टँडअप कॉमेडी कलाकारांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे छोटेखानी कॅफे किंवा रंगमंच.

स्टँडअप कॉमेडी हा कलाप्रकार एक परफॉर्मन्स आर्ट आहे. त्यामुळे मंच आणि प्रेक्षक हे या कलाप्रकाराचा अविभाज्य भाग आहेत.

इंग्लड आणि अमेरिकेत उदयास आलेल्या हा मॉर्डन स्टँडअप कॉमेडी कलाप्रकार अशा कॉमेडी क्लबमधूनच सुरू झाला आहे.

भारताच्या अनुषंगाने चर्चा करायची झाल्यास स्टँडअप कॉमेडी किंवा एकपात्री विनोदी सादरीकरण याची परंपरा मोठी आहे. अगदी पारंपारिक भारुड ते तमाशा यामध्ये या कलाप्रकाराचा समावेश दिसून येतो.

पु. ल. देशपांडे, राम नगरकर, जॉनी लिव्हर हे काही या कलाप्रकारातील मोठी नावं आहेत.

अमेरिकेत या कलाप्रकाराभोवती वाढती प्रसिद्धी पाहता काही टीव्ही मालिकाही सुरू झाल्या. याच धर्तीवर भारतातही असे प्रयोग पाहायला मिळाले.

कॉमेडी सर्कस, लाफ्टर क्लब ऑफ इंडिया या सारख्या टीव्ही मालिकेतून स्टँडअप कॉमेडी हा कलाप्रकार भारतातील घराघरामध्ये पोहोचला.

सध्याच्या काळात महत्त्वाच्या विनोदवीरांच्या यादीत असणारा कपिल शर्माही याच कलाप्रकारातून पुढे आला आहे. पण सोशल मीडियाच्या वाढत्या वापराने ही कला फक्त स्टुडिओ आणि मोठ्या व्यासपीठापर्यंतच मर्यादित राहिली नाहीय.

छोटे छोटे कॉमेडी क्लब आणि कॅफेमध्ये भरवण्यात येणाऱ्या ओपन माईकमुळे भारतात स्टँडअप कॉमेडी कलाप्रकाराचा आणि सोबतच या क्षेत्राचा विस्तार झाला, असं म्हणता येईल. या सर्व प्रक्रियेत हॅबिटॅट हे नाव महत्त्वाचं आहे.

आता आपण हे 'हॅबिटॅट' नेमकं काय आहे आणि ते कसं काम करतं, हे जाणून घेऊ.

'द हॅबिटॅट' कसं सुरू झालं?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबईमधून पदवी घेतल्यानंतर बलराज सिंग घई यांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायात सामील होत 2016 साली 'द हॅबिटॅट'ची स्थापना केली.

येथे सुरुवातीला 65 सीट्सचे रेस्टॉरंट आणि परफॉर्मन्स वेन्यू होतं. वाढती प्रसिद्धी पाहता द हॅबिटॅटची क्षमता एका वर्षांतच 65 सीट्सवरून 165 सीट्स झाली.

व्यवसायात होणारी वाटचाल पाहता 'द हॅबिटॅट'ने कलाकरांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

क्रिएटिव्ह डिझाईन आणि पोस्टर तयार करणं, ऑनलाईन तिकीट व्यवस्थापन, गेट आणि बॉक्स ऑफिस व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, स्टेज आणि बसण्याच्या व्यवस्थेनुसार आयोजन यासारख्या सेवांमुळे द हॅबिटॅट ही जागा स्टँड अप कॉमेडियन्ससाठी उत्तम पर्याय म्हणून ओळखली जाऊ लागली.

द हॅबिटॅटची सोशल मिडिया मार्केटींग प्रभावी असल्याने कलाकारांनाही याचा फायदा झाला.

कलाकारांसाठी ऑडिओ आणि लायटिंगसाठी आवश्यक तांत्रिक उपकरणे, तंत्रज्ञ, स्टेज मॅनेजर्स आणि सूत्रसंचालक द हॅबिटॅट उपलब्ध करून देत होतं.

याशिवाय, उच्च दर्जाचे लाइव्ह रेकॉर्डिंग पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये स्टुडिओ क्वालिटी ऑडिओ मिक्सिंग, मास्टरिंग आणि एडिटिंग यासारख्या सुविधांमुळे द हॅबिटॅट हा ब्रँड म्हणून उदयास आला.

ओपन माईक प्रकाराच्या माध्यमातून अगदी कोणीही त्यांची कला सादर करू शकतं, ही येथील सर्वात जमेची बाजू ठरली. हॅबिटॅटच्या मंचावर सध्या सर्वत्र ओळखले जाणारे स्टँड अप कॉमेडीयन जाकीर खान, अभिषेक उपमन्यू, उरोज यांनीही आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळात हाच मंच गाजवला आहे.

हॅबिटॅट काय आहे आणि कसं काम करतंय?

जर तुम्ही स्टँडअप कॉमेडीचे व्हीडिओ पाहिले असतील, तर तुम्ही या मोठ्या 'H' इंग्रजी अक्षराशी परिचित असाल. हा भलामोठा लोगो इंडी हॅबिटॅट या कॉमेडी क्लबचा आहे.

इंडी हॅबिटॅट हा एक असा मंच आहे, जिथे तुम्हाला स्टँडअप कॉमेडी असेल किंवा कवितांचं सादरीकरण असेल, हे करण्यासाठी एक सार्वजनिक मंच उपलब्ध करुन देतात.

हॅबिटॅटमध्ये शो रेकॉर्ड करण्यासाठी असलेली अत्याधुनिक व्यवस्थेमुळे स्टँडअप कॉमेडी करणाऱ्या कलाकारांसाठी ही आवडीची जागा बनली.

ओपन माईक प्रकाराच्या माध्यमातून अगदी कोणीही त्यांची कला सादर करू शकतं. हॅबिटॅटच्या मंचावर सध्या सर्वत्र ओळखले जाणारे स्टँडअप कॉमेडीयन जाकीर खान, अभिषेक उपमन्यू, उरोज यांनी ही आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळात हाच मंच गाजवला आहे.

हॅबिटॅट बंद का करण्यात आलं?

तोडफोडीनंतर इंडी हॅबिटॅट स्टुडिओकडून जारी करण्यात आलेल्या मराठी पत्रकात म्हटलं आहे की, "नुकत्याच आमच्यावर झालेल्या तोडफोडीच्या कृत्यांमुळे आम्हाला धक्का बसला आहे आणि खूप दु:ख झाले आहे. कलाकार त्यांच्या विचारांसाठी आणि रचानात्मक निवडीसाठी पूर्णपणे जबाबदार असतात, कोणत्याही कलाकाराने सादर केलेल्या कंटेटमध्ये आम्ही कधीही सहभागी झालो नाही.

"परंतु, अलीकडील घटनांमुळे आम्हाला पुन्हा विचार करायाला लावले की, कसे जेव्हा जेव्हा कलाकार मर्यादा ओलांडतो, तेव्हा आम्हाला कसे दोषी ठरवले जाते आणि लक्ष्य केले जाते.

"फक्त एक स्टेज प्रदान केल्याने त्यांची सर्जनशीलता शोधण्यात, त्यांची प्रतिभा निर्माण करण्यात आणि काहीवेळा नवीन करिअर शोधण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मदत करतो.

"रंगमंच एखाद्या कलाकारच्या मालकीचा असतो तेव्हा तो त्या रंगमंचावर असतो. कलाकार स्वत:ची कला सादर करतात, त्यांचे शब्द आणि विचार त्यांचे स्वत:चे असतात."

"आम्ही मतभेद सोडवण्यासाठी रचनात्मक संभाषणाला प्रोत्सहान देतो, हानीला नाही. आम्ही द्वेष किंवा कोणत्याही प्रकारच्या हानीला समर्थन देत नाही. कला आणि संवादाच्या आत्म्याला हिंसाचार आणि विध्वंस कमजोर करतात.

मात्र, हॅबिटॅटसारखे मंचाची जर तोडफोड करण्यात येत असेल तर याचा परिणाम नवोदित कलाकारांवर कसा होऊ शकतो, याबाबत आम्ही 'मराठी कपिल' नावाने स्टँडअप कॉमेडीचा शो भरवणाऱ्या आणि सादरीकरण करणाऱ्या कलाकाराशी बोललो असता, त्यांनी सांगितलं, "सध्या युट्युबवर शिव्या देणारे इन्फ्लूएन्सर आहेत, डबल मिनिंग बोलणारे व्हीडिओ मराठीतही मोठ्या संख्येने तयार केले जातात. पण हेच जर एखादा स्टँडअप कॉमेडीयन करत असेल, तर तो मुद्दा उचलला जातो आणि त्यांच्यावर टीका केली जाते. कदाचित आम्हाला टार्गेट करणं सोप्प आहे."

"सध्या भारतात स्टँडअप कॉमेडी कल्चर खूपच नवीन आहे, मराठीमध्ये तर मागच्या तीन वर्षांमध्ये या कलाप्रकार मोठा होत आहे. कोणत्याही कलाप्रकाराचा जेव्हा प्रेक्षकवर्ग वाढतो, तसंच त्या प्रेरणेने नवे कलाकारही वाढत जातात. आपण हे करिअर निवडावं यासाठी कलाकार पुढे येतात. पण अशा गोष्टी घडल्यास प्रश्न पडतो की खरंच अभिव्यक्ती स्वातंत्र आहे का? हॅबिटॅटचंच उदाहारण घ्या, असं झाल्यास तुम्ही कायदा आधार घ्या, पण मारहाण करणं तोडफोड करणं हे योग्य नाही. अशा घटनांमुळे या क्षेत्रात येऊ पाहणारे नवीन कलाकार मागे सरकतात. आज महाराष्ट्रात छोट्या छोट्या शहरांमध्ये असे कॉमेडी कॅफे सुरु झाले आहेत. या घटनेमुळे नक्कीच त्यांच्यावर ही परिणाम होऊ शकतो."

या घटनेनंतर एक प्रश्न उपस्थित केला जात आहे तो म्हणजे, कुणाल कामराच्या शोमुळे असा मंच उद्ध्वस्त करणं योग्य आहे का? यामुळे नाट्यगृह किंवा असा रंगमंच चालवणाऱ्या व्यवसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे का?

याबाबत आम्ही पुण्यात 'द बॉक्स' या नावाने स्टुडिओ चालवणारे प्रदीप वैद्य यांच्याशी बोललो ते म्हणाले, "मुळात अशा रंगमंचावर हल्ला करणं यामध्ये काहीच अर्थ नाही. रंगमंच हा काय फक्त कुणाल कामरासाठी नव्हता अनेक जणांचं टॅलेन्ट त्या माध्यमातून समोर येत होतं. तुमचा आक्षेप आहे असे शंभरातले दोन कलाकार आहेत. त्या दोन लोकांसाठी तुम्ही 98 लोकांचं आयुष्य धोक्यात घालतात. असं मला वाटतं, तिथे एखादा मराठवाड्यातला मुलगा कविता सादर करतोय, तर त्याला अशा ठिकाणीच संधी मिळते ना? त्याला कोणतं नाटक पटकन मिळत नाही. स्व:तला काहीतरी व्यक्त व्हायचं आहे. पण संधी मिळत नाही ही जी कोंडी आहे. म्हणजे एखाद्या माणसाला व्यक्त होण्यासाठी निर्माण झालेली ही व्यवस्था आहे. ज्याला बोलावं वाटतं त्याला बोलू द्यायचं नाही. म्हणजे मला या झाडावर बसणारे पक्षी आवडत नाहीत म्हणून झाडंच तोडायचं याला काही अर्थ नाही."

ते पुढे म्हणतात, "आम्ही फक्त जागा देतो, रंगमंचावर असणाऱ्या कलाकाराला आम्ही कसं सांगणार त्यांना काय बोलावं? एवढं तटस्थ आम्हाला राहावंचं लागतं. तिथे तुम्हाला पटणाऱ्या कलाकराचा जर कार्यक्रम झाला तर तो ही होऊ शकतो ना, त्यासाठीच मंच असतो."

व्यासपीठांवर हल्ले होऊ नये आणि अशा मंचाला संरक्षण मिळावं, यासाठी सरकारने पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

"सरकारने ही ओळखण्याची गोष्ट आहे. सांस्कृतिक धोरण छापण्यात आलं, पण ते फक्त कागदावरच आहे. सरकारकडून अशा ठिकाणांना संरक्षण मिळावं किंवा अशा घटना घडल्यास नुकसान भरपाई देण्याची सोय करायला हवी."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)