You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मी माफी मागणार नाही, माझ्या विनोदासाठी कार्यक्रम स्थळाला जबाबदार धरणं योग्य नाही' : कुणाल कामरा
कॉमेडियन कुणाल कामराने आपण माफी मागणार नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या विनोदासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणाला जबाबदार धरणे योग्य नसल्याचेही कामराने म्हटले आहे.
कुणाल कामराने त्याच्या नव्या कॉमेडी शोमध्ये एका गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी केली होती. त्यानंतर रविवारी (23 मार्च) रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतल्या खार येथे असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली.
याप्रकरणी शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामरा, संजय राऊत, राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान तोडफोडीच्या घटनेवर कामरानंही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या कॉमेडी काँटेंटसाठी हॅबिटॅटला जबाबदार धरू नये, असं कामरा म्हणाला.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भर देत आपण तो पोलीस आणि न्यायप्रणालीला सहकार्य करण्यास तयार असल्याचं कामरानं म्हटलं. हे सांगतानाच त्यानं असंही स्पष्ट केलं की तो माफी मागणार नाही आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिंदे यांच्याबद्दल अशाच प्रकारच्या टिप्पण्या केल्या होत्या, असंही त्यानं नमूद केलं.
दरम्यान, या तोडफोडीचा व्हीडिओ एएनआय वृत्तसंस्थेने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या हवाल्याने प्रसिद्ध केला आहे.
कुणाल कामरा याने त्याच्या शोमध्ये बॉलिवूडच्या एका गाण्याची वेगळ्या शब्दांमध्ये नक्कल केली. या गाण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील बंडावर भाष्य केलं आहे. यानंतर शिंदे गटानं हॅबिटॅटची तोडफोड केली.
या प्रकरणी शिवसेनेच्या युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल आणि इतर 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल कामरा आणि हॅबिटॅट सेंटरची तोडफोड करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केल्याचं पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितलं आहे.
या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
'द हॅबिटॅट'नेही एक निवेदन जारी करत म्हटलं आहे की "आम्हाला या घटनेमुळे धक्का बसला आहे. आमचं कुठल्याही कलाकाराच्या कलाकृतीवर कुठल्याही प्रकारे नियंत्रण नसतं. मात्र आमच्या मालमत्तेचं असं नुकसान आम्ही सहन करू शकत नाही.
कलाकारांसाठी एक स्वतंत्र आणि खुला मंच आम्ही कसा उभा करू शकतो, याबद्दल आम्ही पुढचा निर्णय घेईस्तोवर आम्ही द हॅबिटॅट बंद करत आहोत."
कुणाल कामरानं जारी केलं निवेदन
सोमवारी (24 मार्च) रात्री उशिरा कुणाल कामराने एक्स प्लॅटफॉर्म तसेच इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक निवेदन जारी केलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रकाशित निवेदनात कामराने हॅबिटॅट क्लबमधील तोडफोडीचा निषेध व्यक्त केला आहे.
कामरा म्हणाला, "मनोरंजन स्थळ हा एक असा मंच आहे, जिथे सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी जागा आहे. हॅबिटॅट (किंवा कोणतेही अन्य स्थळ) माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही. तसेच मी काय म्हणतो किंवा करतो यावर त्याचा कोणताही अधिकार किंवा नियंत्रण नाही. तसेच कोणताही राजकीय पक्ष हे काम करत नाहीये."
कामरा पुढे म्हणाला, एखाद्या कॉमेडियनच्या शब्दांसाठी कोणत्याही कार्यक्रम स्थळावर हल्ला करणे हे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवण्याइतकेच मूर्खपणाचे आहे कारण काय तर तुम्हाला दिलेलं बटर चिकन आवडलं नाही, अशी टीकाही त्याने केली.
मी माफी मागणार नाही – कामरा
कामराने लिहिले की, जे लोक माझा नंबर लीक करण्यात किंवा मला सतत कॉल करण्यात व्यस्त आहेत, त्यांना आता तरी समजले असेल की माझ्याकडे येणारे सर्व अनोळखी कॉल थेट व्हॉइसमेलवर जातात, जिथे तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळेल, जे तुम्हाला आवडत नाही.
कुणाल कामराने आपल्या निवेदनातून स्पष्ट केलं की तो माफी मागणार नाही. आपल्या निवदेनात कामरा म्हणाला, "मी माफी मागणार नाही. मी जे काही बोललो, ते अगदी तेच आहे जे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हणाले होते. मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी माझ्या पलंगाखाली लपून बसून ही घटना शांत होण्याची वाटदेखील पाहणार नाही."
पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार
आपल्याला मिळत असलेल्या धमक्यांबाबत कामरा निवेदनाच्या माध्यमातून म्हणाला की, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची खुशामत करण्यासाठी वापरला जाऊ नये. जरी आजचा मीडिया आपल्याला वेगळं पटवून देण्याचा प्रयत्न करत असला तरी.
एखाद्या प्रभावशाली सार्वजनिक व्यक्तीच्या खर्चावर विनोद सहन करण्यास तुम्ही असमर्थ असल्याने माझ्या अधिकाराचे स्वरुप बदलत नाही.
मला माहिती आहे की आपल्या नेत्यांच्या कृती किंवा राजकीय व्यवस्थेच्या दुर्दशेबाबत विनोदातून व्यक्त होणं म्हणजे कायद्याला विरोध करणं नव्हे. तरीही, माझ्या विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई होत असेल तर मी पोलीस आणि न्यायव्यवस्थेला सहकार्य करण्यास तयार आहे.
बीएमसीच्या कारवाईवर संताप
कामराने पुढे लिहिलं की, पण ज्या लोकांनी विनोदावर नाराज होत तोडफोड केली, त्या लोकांवरही कायदा निष्पक्ष आणि समानपणे लागू होईल का? आणि बीएमसीच्या त्या निवडून न आलेल्या सदस्यांविरुद्ध जे आज कोणतीही पूर्वसूचना न देता हॅबिटॅटमध्ये आले त्या जागेची नासधूस केली, त्यांचं काय? आता मला पुढच्या शोसाठी एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील असं ठिकाण निवडावं लागेल जे लवकर पाडता येईल.
एकनाथ शिंदे कुणाल कामराबाबत काय म्हणाले?
कुणाल कामरा प्रकरणाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "खरं म्हणजे आरोपांवर मी प्रतिक्रिया देतच नाही. अडीच वर्षे सातत्याने पहिल्या दिवसापासून सरकार स्थापन झाल्यापासून आरोपांच्या फैरी लोकं झाडत होते. आम्ही पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला वगैरे आरोप करुनही जनतेनं जर आम्हाला मँडेट दिला असेल, तर तुम्ही गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे समजून जा."
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे, पण त्याचा गैरफायदा घेऊन बोलणार असाल तर हा एकप्रकारचा व्यभिचार, स्वैराचार आणि एकप्रकारे सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे.
याच माणसाने सरन्यायाधीशांबद्दल, पंतप्रधानांबद्दल, निर्मला सीतारमण यांच्याबद्दल, उद्योगपतींबद्दल काय बोलला आहे ते पाहा."
हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये. कुणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यासारखं आहे. मी यावर दिवसभर बोललो नाहीये आणि बोलणारच नाहीये, असंही शिंदे म्हणाले.
"तोडफोडीचं समर्थन मी कधीच करत नाही. मात्र, समोरच्यानं आरोप करताना कुठल्या लेव्हलला आरोप करायचं ते तरी पाहिलं पाहिजे. माझी सहन करण्याची ताकद खूप आहे. पण यांची आहे का? मी कधीही कुणावरही रिऍक्ट होत नाही. कामावर फोकस करणं आणि लोकांना न्याय देणं, या माझ्या भूमिकेमुळे देदिप्यमान असं यश आम्हाला मिळालं आहे," असं शिंदे यांनी म्हटलं.
कामराने माफी मागावी- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामरावर जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले, "स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार नाही. कोण खुद्दार आणि कोण गद्दार आहे हे जनतेने दाखवला आहे. अशाप्रकारे अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. संविधानाने सांगितलं आहे स्वातंत्र्याचा स्वराचार करता येणार नाही. कामरा याने माफी मागितली पाहिजे.माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्याचा काम केलं हे चुकीचं आहे."
"व्यंग करण्याचा अधिकार आहे..जाणून अपमानित केले जात असेल.. बदनामी करत असेल तर त्याला सहन केला जाणार नाही. त्यावर कारवाई केली जाईल. कामरा ने माफी मागितली पाहिजे"
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, "आम्ही कुणाल कामराचं लोकेशन शोधत आहोत. कायदा हाती घेणाऱ्यांवर कारवाई होणार.
संविधानाने जरी बोलण्याचा अधिकार दिला असला तरी संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही. तसेच ठाकरे गटाने कायदा सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये. "
कुणाल कामराच्या गाण्याचे प्रकरण विधानसभेतही अनेक सदस्यांनी उपस्थित केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत मांडलं.
ते म्हणाले. "आपण कोणीही अशाप्रकारच्या विचाराचे नाही की कोणी आपल्या मताची अभिव्यक्ती करेल. किंबहुना हास्य-व्यंग याचा पुरस्कार करणारे आपण लोकं आहोत. एखादं राजकीय व्यंग झालं तरी त्या व्यंगातनं आपण कधीही कुठला दुसरा रंग देण्याचा प्रयत्न केलेला नाही. अभिव्यक्तीला स्वातंत्र्य मानणाऱ्यांपैकी आपण आहोत. पण जर कोणी अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे जर स्वैराचाराकडे जात असेल तर ते काही मान्य होणार नाही.
स्टँडअप कॉमेडियर कुणाल कामरा याचा जर आपण इतिहास बघितला तर लक्षात येईल की देशातल्या उच्च पदस्थ लोकांसंदर्भात मग ते पंतप्रधान असो की मुख्य न्यायाधीश असो किंवा न्यायव्यवस्था असो यांच्यासंदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं, न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशापद्धतीचं बोलणं ही यांची कार्यपद्धती आहे."
"मुळात या व्यक्तीला एकप्रकारे कॉन्ट्रव्हर्सी तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. आणि अशा या हव्यासातून ज्याप्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत अतिशय खालच्या पातळीचा विनोद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या कामराला माहिती असायला हवं की 2024 च्या सार्वजनिक निवडणुकीत जनतेनेच ठरवून दिलंय की कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार. हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का? महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा कोणाकडे आहे, आणि तो वारसा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला. आणि जर अशा व्यक्तीमत्वाबाबत कोणीतरी अतिशय खालच्या दर्जाचं बोलत असेल आणि समोरच्या बाकावरील काही लोक त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात. हे काय कामराशी ठरवून चाललं आहे की कामराला तुम्ही सुपारी दिली आहे? हा प्रश्न उपस्थित होतो. कामराने आज संविधानाच्या छोट्या प्रतीसह फोटो ट्विट केला आहे, त्याने खरंच संविधान वाचलं असतं तर अशाप्रकारे स्वैराचार केला नसता," असं फडणवीस म्हणाले.
संजय राऊत यांनी एक्सवर लिहिले, "कुणाल कामरा एक प्रसिद्ध लेखक आणि स्टँडअप कॉमेडियन आहेत. कामरा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर व्यंग्यात्मक गाणं लिहिलं. ते गाणं शिंदे गटाला आवडलं नाही. त्यामुळे त्यांच्या लोकांनी कामराचा स्टुडिओ तोडून टाकला. देवेंद्रजी, तुम्ही कमकुवत गृहमंत्री आहात."
संजय राऊत यांनी कुणालचा व्हीडिओ पोस्ट करत 'कुणाल का कमाल, जय महाराष्ट्र' असे ट्वीट केले आहे.
शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के प्रतिक्रिया देत म्हणाले, "कुणाल कामरा पैशासाठी आमच्यावर आणि आमच्या नेत्यांवर टिप्पणी करत आहे. कुणाल कामरा आता तू मुंबईच नाही, तर हिंदुस्तानातही फिरू शकणार नाहीस. आमचे शिवसैनिक तुला तुझी जागा दाखवतील."
"संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्यावर टीका करुन दाखवावी", असंही म्हस्के म्हणाले.
शिंदे गटाचे दुसरे नेते संजय निरुपम यांनी "उद्या 11 वाजता कुणाल कामराची धुलाई करू" असे ट्वीट केले आहे.
अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबैर यांनी हॅबिटॅटमध्ये केलेल्या तोडफोडीचे व्हीडिओ प्रसिद्ध केले आहेत.
शिवसेना उबाठा गटाचे नेते अनिल परब म्हणाले, "कुणाल कामरा याने जर वैयक्तिक टीका केली असेल तर योग्य नाही. कोरटकर आणि सोलापूरकर यांनी जो महाराजांचा अवमान केला त्यांच्या घरावर का हल्ला केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान यांना सहन होतो आणि उपमुख्यमंत्री यांचा अवमान सहन होत नाही. आपल्या नेत्यांचा आदर असावा न महाराजांचा देखील आदर केला पाहिजे. नागपुरात ज्यांचे नुकसान झाले त्यांची नुकसान भरपाई देणार असं फडणवीस यांनी सांगितलं, मग कुणाल कामरा यांच्या स्टुडिओची नुकसानभरपाई देणार आहात का? कारवाई सर्वांवर समान करायला हवी."
कुणाल कामरा कोण आहेत?
मूळचे मुंबईचे असलेले कुणाल कामरा यांना आज आपण स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखत असलो, तरी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही अॅड एजन्सीमध्ये प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून झाली.
अॅडव्हर्टायजिंग इंडस्ट्रीमध्ये 11 वर्षे काम केल्यानंतर कुणाल कामरा यांनी स्टँडअप कॉमेडियन म्हणून करिअरला सुरुवात केली. 2013 मध्ये त्यांनी आपला पहिला शो सादर केला.
2017 साली त्यांनी रमित वर्मा यांच्या साथीने 'Shut Up Ya Kunal' हे युट्यूब पॉडकास्ट सुरू केलं. या कार्यक्रमात राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि अन्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींसोबत कुणाल कामरा अनौपचारिक शैलीत गप्पा मारतात.
Shut Up Ya Kunal' च्या पहिल्या सीझनची सुरुवात भाजपच्या युथ विंगचे तत्कालिन उपाध्यक्ष मधुकिश्वर देसाई यांच्या मुलाखतीने झाली होती.
पहिल्या सीझनमध्ये पत्रकार रवीश कुमार, लेखक आणि गीतकार जावेद अख्तर, असदुद्दीन ओवैसी, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, मिलिंद देवरा आणि सचिन पायलट, प्रियांका चतुर्वेदी, कन्हैया कुमार आणि उमर खालिद सहभागी झाले होते.
दुसऱ्या सीझनसाठी संजय राऊत यांना निमंत्रित करण्यापूर्वी कुणाल कामरा यांनी राज ठाकरेंनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं.
"मी बरंच संशोधन केलं. तुम्ही मुंबईतील कीर्ती वडापावचे मोठे चाहते असल्याचं लक्षात आलं. मी तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ लाच म्हणून देतो आहे, जेणेकरुन तुम्ही माझ्या 'शट अप या कुणाल' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्याल," असं कुणाल कामरांनी म्हटलं होतं.
राजकीय भूमिकांमुळे चर्चेत
कामरा हे आपल्या राजकीय भूमिकांमुळेही अनेकदा चर्चेत राहतात. सोशल मीडियावरच्या त्यांच्या काही पोस्टमुळे वादही निर्माण झाले होते.
2018 मध्ये त्यांनी आपलं ट्वीटर अकाउंटच डिलीट केलं होतं. मुस्लीम, शीख आणि मदर तेरेसा यांच्याबद्दलचे काही ट्वीटस व्हायरल झाल्यानंतर कामरा यांनी आपले ट्विटर अकाउंट डिलीट केलं होतं. याच काळात त्यांना मुंबईमधील त्यांचं घरंही सोडावं लागलं होतं.
2019 मध्ये कामरा यांना त्यांचे दोन शो कॅन्सल करावे लागले होते. काही लोकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन कार्यक्रम उधळण्याची धमकी दिली होती.
कुणाल कामरा विरुद्ध अर्णब गोस्वामी वाद
हे प्रकरण जानेवारी 2020 मध्ये घडलं होतं. कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी एकाच विमानातून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कुणाल कामरा यांनी अर्णब गोस्वामींना काही प्रश्न विचारले. मात्र, त्यांनी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत लॅपटॉपमध्ये आपलं काम करत राहिले. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायल झाला.
या व्हीडिओमध्ये कुणाल यांनी अर्णब गोस्वामींना भित्रट पत्रकार म्हणून संबोधलं.
"मी अर्णब गोस्वामींना त्यांच्या पत्रकारितेबद्दल काही प्रश्न विचारत आहे. पण त्यांनी तेच केलं, ज्याची मला अपेक्षा होती. ते माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ इच्छित नाहीत. अर्णब गोस्वामी भित्रे आहेत की राष्ट्रवादी हे आज प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय."
स्वतः कुणाल यांनी ट्विटरवरून हा व्हीडिओ शेअर करत म्हटलं, की हे मी माझ्या हिरोसाठी रोहित वेमुलासाठी केलं.
या व्हीडिओवर सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया आल्या.
या सगळ्या प्रकारानंतर कुणाल कामरा यांच्यावर इंडिगो एअरलाइन्सने सहा महिन्यांची बंदी घातली.
त्यापाठोपाठ सरकारी विमान कंपनी एअर इंडिया तसंच खासगी कंपनी स्पाईसजेटनेही कुणाल यांच्यावर प्रवासबंदी घातली.
शशी थरुरांना दिले कॉमेडीचे धडे
2019 मध्ये कुणाल कामरांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांना स्टँड अप कॉमेडीचे धडे दिले. अॅमेझॉन प्राइम व्हीडिओच्या वन माइक स्टँड कार्यक्रमासाठी स्टँड कॉमेडी करण्यासाठीच्या टिप्स दिल्या होत्या.
या कार्यक्रमात अभिनेत्री तापसी पन्नू आणि रिचा चढ्ढाही सहभागी झाल्या होत्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)