You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रणवीर अलाहाबादियाला अटकेपासून संरक्षण; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
'इंडियाज् गॉट लेटंट' या शोमध्ये केलेल्या वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहबादियाविरोधात अनेक एफआयआर दाखल झालेले आहेत.
याविरोधात रणवीर अलाहबादियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
त्यानंतर सुप्रीम कोर्टानं आता रणवीर अलाहाबादियाच्या अटकेला स्थगितीचा निर्णय दिला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच रणवीर अलाहाबादियाने सुप्रीम कोर्टात धाव घेत तातडीने सुनावणीची मागणी केली होती.
सर्वोच्च न्यायालयात रणवीर अलाहाबादियातर्फे वकील डॉ. अभिनव चंद्रचूड यांनी बाजू मांडली.
दरम्यान, सुरुवातीला रणवीर अलाहबादियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती केली होती. परंतु, त्यावेळी सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले होते की, या प्रकरणावर वेळ घेऊन योग्यवेळी सुनावणी होईल. त्यानंतर त्यांनी सुनावणीसाठी तारीख दिली होती.
रणवीर अलाहाबादियाच्या विरुद्ध महाराष्ट्र आणि आसाममध्ये अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
काय आहे हे प्रकरण?
युट्युबर आणि कॉमेडियन समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटंट' हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय ठरला होता. मात्र, लोकप्रियतेसोबतच अनेक वादविवादांनी या कार्यक्रमाला सध्या घेरलं आहे.
या शोच्या एका भागात, युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या एका वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. हे वक्तव्य करताना त्याने वापरलेली भाषा अत्यंत अश्लील असल्याचा आक्षेप घेतला जात आहे.
या शोमध्ये युट्यूबर्स आशिष चंचलानी आणि अपूर्वा माखिजा देखील दिसले. या शोमध्ये सहभागी झालेल्या एका सादरकर्त्याला रणवीरने त्याच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारला.
केंद्र सरकारच्या आदेशानंतर, समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटंट' या शोचा 'तो' एपिसोड ब्लॉक करण्यात आला आहे. ज्या एपिसोडमध्ये रणवीर अलाहाबादियाने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, तोच युट्युबवरून काढून टाकण्यात आला आहे.
हा वाद आणखी वाढत गेल्यावर समय रैना याने आज 12 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियामध्ये पोस्ट लिहिली आहे, "या बाबतीत जे घडत आहे ते हाताळणं मला कठीण जातंय असं दिसतंय. मी इंडियाज गॉट लॅटेंटचे सर्व व्हीडिओ माझ्या चॅनलवरुन काढले आहेत. लोकांना हसवणं, त्यांचं मनोरंजन करणं हा माझा एकमेव उद्देश होता. निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मी सर्व तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार आहे."
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली आहे. कांचन गुप्ता म्हणाल्या की, भारत सरकारच्या आदेशानुसार हे करण्यात आले आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनीही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक खारच्या हॅबिटॅट नावाच्या स्टुडिओमध्ये पोहोचलं. या कार्यक्रमाचं चित्रीकरण इथे झालं होतं.
आता रणवीर अलाहाबादियाने या प्रकरणात माफी मागितली आहे.
रणवीरने केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, "माझी टिप्पणी बरोबर नव्हती आणि ती मजेदारही नव्हती."
"विनोद हे माझं क्षेत्र नाही. मी याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देणार नाही. मला फक्त सर्वांची माफी मागायची आहे. जे घडले ते योग्य नव्हतं. मी कुणाच्याही कुटुंबाचा अपमान करणार नाही. मी आयोजकांना वादग्रस्त टिप्पणी काढून टाकण्यास सांगितलं आहे," रणवीर सांगतो.
"मी चूक केली आहे. एक माणूस म्हणून, कदाचित तुम्ही मला माफ कराल. मी या व्यासपीठाचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करायला हवा होता. हा माझ्यासाठी एक धडा आहे आणि मी चांगले होण्याचा प्रयत्न करेन," असं अलाहबादिया म्हणाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, "मलाही याबद्दल माहिती मिळाली आहे पण मी तो व्हीडिओ अजून बघितलेला नाही. काही गोष्टी अतिशय चुकीच्या आणि अश्लाघ्य भाषेत बोलण्यात आल्या आहेत मलाही हे कळले आहे. जे बोललं गेलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपले स्वातंत्र्य संपते."
फडणवीस म्हणाले, "हे बरोबर नाही. आपल्या समाजात काही नियम घालून दिले आहेत. जर कोणी ते ओलांडले तर ते खूप चुकीचे आहे. जर असे काही घडले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल."
ज्येष्ठ पत्रकार आणि गीतकार नीलेश मिश्रा यांनी रणवीर अलाहाबादियाच्या विधानावर जोरदार टीका केली आहे.
निलेश मिश्रा यांनी एक्सवर लिहिलं, "या व्हीडिओला प्रौढ लोकांसाठीच व्हीडिओ असं देखील म्हटलं गेलं नाही. लहान मुलं देखील अगदी सामान्य पद्धतीने हा व्हीडिओ बघू शकतात. या लोकांना जबाबदारीची जाणीव नाही. डेस्कवरील चार लोक आणि प्रेक्षकांमधील अनेक लोक यावर हसत होते हे पाहून मला अजिबात आश्चर्य वाटले नाही."
"प्रेक्षकांनी या विधानाकडे सामान्य विधान म्हणून बघितलं. आणि अशा लोकांनी ते साजरं केलं. पैसे कमवण्यासाठी लोक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. भारतातील प्रेक्षक आणि प्लॅटफॉर्मकडून याला प्रोत्साहन दिले जात नाही. ते सर्जनशीलतेच्या नावाखाली काहीही बोलत आहेत आणि त्यातून सुटत आहेत."
संसदेच्या स्थायी समितीसमोर विषय मांडण्याचा इशारा
दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) च्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी इशारा दिला आहे की, त्या 'इंडियाज गॉट लेटंट' हा कार्यक्रम आयटी आणि कम्युनिकेशनवरील संसदीय स्थायी समितीकडे घेऊन जातील.
त्यांनी लिहिलंय की, "कॉमेडीच्या नावाखाली ज्या प्रकारच्या अश्लील आणि अपमानास्पद गोष्टी बोलल्या जातात. आपल्याला एक मर्यादा निश्चित करावी लागेल कारण असे शो तरुणांच्या मनावर परिणाम करतात आणि असे शो पूर्णपणे बकवास कंटेंट देतात."
कॉमेडीत अपशब्दांच्या वापरावर जावेद अख्तर काय म्हणाले होते?
कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी स्टँड-अप कॉमेडियन्सच्या शोमध्ये अपशब्द आणि अश्लील भाषेचा वापर करण्याबाबत एक विधान केलं होतं.
सपन वर्मा, बिस्वा कल्याण रथ, श्रीजा चतुर्वेदी यांच्या 'चिल सेष' या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात ते म्हणाले होते की, शिव्या भाषेत एखाद्या तिखटाप्रमाणे असतात.
ते म्हणाले होते, "ओरिसा, बिहार, मेक्सिको किंवा जगात कुठेही जिथे गरिबी आहे. तिथले लोक खूप मिरच्या खातात. तिथल्या जेवणात फार पदार्थ नसतात, म्हणून चव वाढवण्यासाठी ते मिरच्या खातात. शिवीगाळ ही मसालेदार भाषा आहे. जर तुमच्या विनोदात काही अर्थ नसेल तर तुम्ही अपशब्द वापराल. नाहीतर, तुम्हाला या मिरचीची गरज पडणार नाही."
"जेव्हा तुमचे संभाषण कंटाळवाणे असते, तेव्हा त्याला ऊर्जा देण्यासाठी तुम्हाला अपशब्द वापरावे लागतात. जर एखादी व्यक्ती अपशब्द वापरत असेल तर याचा अर्थ असा की त्याला स्वतःच्या भाषेतील शब्द माहित नाहीत. त्याच्याकडे शब्दांची कमतरता आहे," असं अख्तर म्हणाले होते.
शोवरून आधीही वाद
'इंडियाज गॉट लेटंट' हा कार्यक्रम वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे हा कार्यक्रम वादात अडकलेला आहे.
'इंडियाज गॉट लेटंट' या शोमध्ये कॉमेडियन जे. सी. नबामने अरुणाचल प्रदेशातील लोक कुत्र्याचे मांस खातात यावर भाष्य केले होते. यावरून वाद निर्माण झाला होता.
31 जानेवारी 2025 रोजी, अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यातील सेप्पा येथील रहिवासी अरमान राम वेली बखा यांनी इटानगरमध्ये या टिप्पण्यांवर कारवाईची मागणी करत पोलीस तक्रार दाखल केली होती.
याशिवाय, आणखी एका शोमध्ये, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या गरोदरपणाची आणि नैराश्याची खिल्ली उडवण्यात आली होती. त्यानंतर, समय रैनाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.
कोण आहे रणवीर अलाहाबादिया?
रणवीर अलाहाबादिया हा एक युट्यूबर आहे. तो 'बीअरबायसेप्स' नावाने शो करतो. या शोमध्ये त्याने देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत.
मार्च 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला 'नॅशनल क्रिएटर अवार्ड'ने सन्मानित करण्यात आलं होतं. 2022 मध्ये त्याचा 30 वर्षांखालील फोर्ब्सच्या आशिया यादीत समावेश करण्यात आला होता.
रणवीरनं वयाच्या 22 व्या वर्षी त्याचा पहिला युट्यूब चॅनल सुरू केला. आता तो सात युट्यूब चॅनेल चालवतो. त्याचे एक कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.
कोण आहे समय रैना?
समय रैना हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि स्टँड-अप कॉमेडियन आहे. तो युट्यूबवर 'इंडियाज गॉट लेटंट' नावाचा एक शो चालवतो.
मूळचा जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी असलेला समय रैनाचे 70 लाखांहून अधिक युट्यूब फॉलोअर्स आहेत.
समय रैनाची कमाई कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)