कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, बीबीसीच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

बीबीसी मराठीच्या राष्ट्र-महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष मुलाखत झाली.

कॉमेडियन कुणाल कामरा याच्या व्हीडिओमध्ये त्याने केलेल्या कवितेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या खार येथे असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली.

या तोडफोड प्रकरणानंतर राज्यातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या विषयावर प्रतिक्रिया दिलेली नव्हती. अखेर एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावरील मौन सोडलं आहे.

एकनाथ शिंदे कुणाल कामराबाबत काय म्हणाले?

कुणाल कामरा प्रकरणाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "खरं म्हणजे आरोपांवर मी प्रतिक्रिया देतच नाही. अडीच वर्षे सातत्याने पहिल्या दिवसापासून सरकार स्थापन झाल्यापासून आरोपांच्या फैरी लोकं झाडत होते.

आम्ही पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला वगैरे आरोप करुनही जनतेनं जर आम्हाला मँडेट दिला असेल, तर तुम्ही गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे समजून जा."

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे ठिक आहे, पण त्याचा गैरफायदा घेऊन बोलणार असाल तर हा एकप्रकारचा व्यभिचार, स्वैराचार आणि एकप्रकारे सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे.

याच माणसाने सरन्यायाधीशांबद्दल, पंतप्रधानांबद्दल, निर्मला सीतारमण यांच्याबद्दल, उद्योगपतींबद्दल काय बोलला आहे ते पाहा."

हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये. कुणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यासारखं आहे. मी यावर दिवसभर बोललो नाहीये आणि बोलणारच नाहीये, असंही शिंदे म्हणाले.

"तोडफोडीचं समर्थन मी कधीच करत नाही. मात्र, समोरच्यानं आरोप करताना कुठल्या लेव्हलला आरोप करायचं ते तरी पाहिलं पाहिजे.

माझी सहन करण्याची ताकद खूप आहे. पण यांची आहे का? मी कधीही कुणावरही रिऍक्ट होत नाही. कामावर फोकस करणं आणि लोकांना न्याय देणं, या माझ्या भूमिकेमुळे देदिप्यमान असं यश आम्हाला मिळालं आहे."

औरंगजेबाच्या कबरीबाबत काय म्हणाले शिंदे ?

बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत औरंगजेबाच्या कबरीबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "आमचं एवढंच म्हणणं आहे की, जो औरंगजेब महाराष्ट्राचा घास घ्यायला आला, ज्याने अत्याचार-अन्याय केला.

ज्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार केला, त्याचं उदात्तीकरण करू नये. उदात्तीकरण होता कामा नये, ही भूमिका सगळ्या शिवभक्ताची आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाची आहे."

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "सच्चे देशभक्त असलेले मुसलमान पण औरंगजेबाचं उदात्तीकरण करणार नाहीत. बाळासाहेब सच्च्या आणि राष्ट्रभक्त मुस्लीमांच्या विरोधात नव्हते. जे पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडतात, ते मुसलमान देशाचे शत्रू आहेत.

आम्ही विकासाला महत्त्व देतो. आमच्या योजनेत मुसलमान फायदा घेत नाहीत का? लाडक्या बहिणी फायदा घेत नाहीयेत का? आम्ही कुठे फरक केला आहे? देशाच्या विरोधात काम करणारा कोणीही असो, तो देशाचा दुष्मन आहे. मग कोणत्याही धर्माचा असो."

पुन्हा मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का?

पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "मला पदाचा मोह नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी तडजोड केली, तेव्हा आम्ही सत्ता सोडली.

मी मंत्री होतो, माझ्यासोबत आठ मंत्री सोबत आले. त्यानंतर मी झालो मुख्यमंत्री. आमचं भांडण खुर्चीसाठी नाही. आमचा संघर्ष हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, त्याच्या समस्या सोडवणं यासाठी आहे."

एकनाथ शिंदे म्हणाले, "मी ज्या रोलमध्ये त्या रोलमध्ये काम करतो आहे. राजकारणात 'जर-तर'ला काही स्थान नसतं. काम करणाऱ्याला पदाचा काहीही फरक पडत नाही," असं शिंदे म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.