You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'देवेंद्र फडणवीसांमधील संवेदनशीलता जागवण्यासाठी आम्ही नेमकं काय करावं'? आदित्य ठाकरे यांचा सवाल
'आम्ही एक सशक्त विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत, विधानभवनात, विधान भवन परिसरात रस्त्यावर सातत्याने आम्ही भूमिका मांडत आहोत. राज्याचे प्रश्न मांडत आहोत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवेदनशीलता जागी करण्यासाठी नेमके आम्ही काय करावे?' असा सवाल शिवसेनेचे नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
'आप बैठे हे पाली पर मेरी' ही नुसरत फतेह अली खान यांनी गायलेली एक प्रसिद्ध कव्वाली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये नुसरत फतेह अली खान यांचे चाहते काही कमी नाहीत. नुसरत फतेह अली खान यांच्या गाण्याचे वेड सर्वसामान्यांच नाही तर राजकीय नेत्यांना देखील आहे याचा प्रत्यय आज आला. त्याच कव्वालीतील एक ओळ आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात वापरली.
निमित्त होतं बीबीसी मराठीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे.
महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कलेक्टिव्ह न्यूजरूमने बीबीसी मराठीच्या वतीने राष्ट्र-महाराष्ट्र नावाचा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी विचारले की विरोधी पक्ष म्हणून तुम्ही तुमचं काम कसं करत आहात? त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की गेल्या 100 दिवसात राज्यात ज्या-ज्या गोष्टी घडल्या आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले, "परभणीची घटना असेल किंवा बीडची, किंवा इतरही काही घटना असतील त्या विरोधात एक सशक्त विरोधी पक्ष म्हणून आम्ही विधानभवनातील दोन्ही सभागृहात आवाज उठवला. तेथील पायऱ्यांवर, बाहेर रस्त्यांवर देखील आवाज उठवला पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवेदनशीलता जागी करण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे लक्षात येत नाहीये."
'एक गझल आहे, मैने पिघला दिया पत्थरों को एक तेरा दिल पिघलता नही है', असं आदित्य ठाकरेंनी म्हटल्यावर सभागृहात हशा पिकला.
या मुलाखतीदरम्यान आदित्य ठाकरेंनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
स्टँडअप कामेडियन कुणाल कामरांनी उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काल भाष्य केलं त्यानंतर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी त्या स्टुडिओची तोडफोड केली.
यावर आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, की एकनाथ शिंदेंनी हे त्यांच्यावर का ओढवून घेतलं. ही टीका त्यांचे नाव घेऊन झाली नव्हती. तर त्यांना का मिरची लागली.
अशा प्रकारची जी तोडफोड झाली ती प्रशांत कोरटकर किंवा राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात करणार आहात का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
तोडफोड असेल किंवा राडा संस्कृती असेल याची पाळंमुळे ही शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात आहेत. शिंदे शिवसेनेतून बाहेर पडण्याआधी देखील अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत. पिच खोदण्यात देखील आली होती यावर आदित्य यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आदित्य यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की शिवसेनेनी जी आंदोलनं केली ती राज्याच्या हिताची होती. पण स्वतःवर ओढून घेणं हे अयोग्य आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे. मग आता टीका झाल्यावर अशी प्रतिक्रिया देणं हे कितपत योग्य आहे?
दिशा सलियन प्रकरणावर आदित्य यांची प्रतिक्रिया
सध्या राज्यात दिशा सलियन प्रकरण गाजत आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचे पडसाद अजूनही राज्यात उमटताना दिसतात.
दिशा सलियन प्रकरणावरुन विरोधक टीका करताना दिसतात, तेव्हा तुमची यावर काय भूमिका आहे,तुम्ही दिशा यांना ओळखत होता का, असं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, "विरोधक गेल्या पाच वर्षांपासून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते या मुद्द्यावरुन आजही करतात.
याबाबत आम्ही कोर्टातच बोलू. ज्या विषयाशी दूरदूरपर्यंत आमचा संबंध नाही, त्यावर काय बोलणार? ज्यांना बदनामी करण्याचाच पगार मिळतो, ते त्यावरच बोलत बसतात."
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, "या बदनामीच्या बातम्यांवरच्या कमेंट्स बघा. लोकांना सत्य काय आहे, ते माहिती आहे. असल्या फालतू आरोपांना मी कचऱ्याच्या टोपलीत टाकतो. जे आरोप करणारे लोक आहेत, ते पुढचे पन्नास वर्षे हाच आरोप करत राहतील.
"ते आरोप यासाठीच करतात की, कुठेतरी मी घाबरुन शांत बसेल. ज्यांना कुणाला लपवायचं असतं ते भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये जातात. यांच्या भ्रष्टाचाराचे कपडे मी दररोज फाडतो."
'फडणवीसांना अकार्यक्षम दाखवण्याचा प्रयत्न'
जसं 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे राज्याचा कारभार चालवला. जशी त्यांची त्या काळात पकड दिसली तशी आता दिसत नसल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले. आता सध्या जो संघर्ष दिसत आहे तो विरोधी पक्ष-सत्ताधाऱ्यांमध्ये दिसत नाहीये तर सत्ताधारी आणि त्यांच्या सहकारी पक्षातीलच दिसत आहे.
"फडणवीस आज ज्या परिस्थितीत आहेत, त्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यातले एक काम करतात, दुसरे लावालावीची कामं करतात. मुख्यमंत्र्यांनी हे ओखळलं पाहिजे की त्यांना अकार्यक्षम दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे," असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.