भोपाळ गॅस गळती : 'त्या लहानग्याला पाहिल्यावर मनात काहूर उठलं, त्याला का दफन करताहेत असं वाटलं'

भोपाळ दुर्घटना

फोटो स्रोत, JUDAH PASSOW

एखादी जखम भरून येण्यासाठी 40-41 वर्षं पुरेशी असतात का? भोपाळ वायू दुर्घटनेबाबत या प्रश्नाचं उत्तर 'हो' असं येणार नाही.

3 डिसेंबर 1984 च्या रात्री घडलेल्या त्या दुर्घटनेच्या आठवणी आणि जखमा अजूनही ताज्याच आहेत.

जगाच्या औद्योगिक इतिहासातली ही सर्वात मोठी दुर्घटना होती. मध्य प्रदेशातील भोपाळ मधल्या युनियन कार्बाईड फॅक्टरीमधून 3 डिसेंबर 1984 च्या पहाटे झालेल्या विषारी वायूच्या गळतीने त्या दिवसापासून आतापर्यंत हजारोंचा जीव घेतलाय.

भोपाळमधल्या युनियन कार्बाईडच्या प्लांट - सीमध्ये पहाटेच्या सुमारास गॅस गळती सुरू झाली. वाहत्या वाऱ्यासोबत हा गॅस शहरात पसरला आणि गाढ झोपेतले बेसावध लोक श्वास घ्यायला तडफडू लागले.

सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेनंतर काही तासांमध्येच जवळपास 3,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

पण बिगर-सरकारी स्रोतांनुसार ही संख्या यापेक्षा जवळपास तिप्पट होती. मृत्यूचं हे सत्रं पुढचं अनेक वर्षं सुरू होतं. या दुर्घटनेत आजवर हजारोंचा बळी गेल्याचं म्हटलं जातं. युनियन कार्बाईडच्या फॅक्टरीतून त्या रात्री सुमारे 40 टन वायूची गळती झाली होती.

त्या रात्री काय घडलं?

युनियन कार्बाईड फॅक्टरीतल्या टँक नंबर 610 मधील विषारी मिथाईल आयसोसायनाइट वायूचा पाण्याशी संपर्क आल्यानं हे घडलं. रासायनिक प्रक्रियेमुळे टँकमध्ये दाब निर्माण झाला आणि ही टाकी उघडली. त्यातून वायू गळती झाली. कारखान्याच्या जवळ असणाऱ्या झोपडपट्टीला याचा सगळ्यात जास्त फटका बसला.

कामाच्या शोधात दूरवरच्या गावातून येऊन या झोपडपट्टीत राहिलेल्या कामगारांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव, या वायू गळतीमुळे गुदमरला. या झोपडपट्टीतल्या बहुतेकांचा झोपेतच जीव गेला. केवळ तीन मिनिटांमध्ये या विषारी वायूने या लोकांचा बळी घेतला.

भोपाळ गॅस दुर्घटना

फोटो स्रोत, Getty Images

धोक्याची सूचना देण्यासाठी कंपनीत असलेला भोंगाही अनेक तास वाजलाच नाही. खरंतर हा भोंगा ताबडतोब वाजणं अपेक्षित होतं. चुरचुरणाऱ्या डोळ्यांनी धापा टाकत जे लोक हॉस्पिटलमध्ये पोचले, त्यांच्यावर नेमके कोणते उपचार करायचे, याची कल्पना डॉक्टर्सना नव्हती.

शिवाय भोपाळमधल्या दोन हॉस्पिटल्समध्ये लोकांची इतकी गर्दी झाली होती, की रुग्णांसाठी जागाच नव्हती. हॉस्पिटल्समध्ये आलेल्या काहींना अंशतः अंधत्त्व आलेलं होतं, काहींना गरगरत होतं आणि सगळ्यांनाच श्वास घ्यायला त्रास होत होता.

एका अंदाजानुसार पहिल्या दोन दिवसांत सुमारे 50 हजार लोकांवर उपचार करण्यात आलं. मिथाईल आयसोसायनाइट गॅसचा दुष्परिणाम झालेल्या लोकांवर नेमके काय उपचार करायचे हे सुरुवातीला डॉक्टर्सना माहित नव्हतं. कारण यापूर्वी असं कधीच घडलेलं नव्हतं.

त्या रात्रीचं वार्तांकन

भोपाळच्या ज्या भागामध्ये ही वायू गळती झाली त्याच भागात त्या रात्री ज्येष्ठ पत्रकार अनीस चिश्तीही होते. त्यांच्यासोबत अजून 3 पत्रकार होते.

फ्रीप्रेस जर्नलचे सुरेश मेहरोत्रा, नवभारत टाईम्सचे विजय तिवारी आणि हिंदुस्तान समाचारचे पत्रकार पुष्पराज पुरोहित.

भोपाळ गॅस दुर्घटना

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गॅस गळती झाल्यानंतर दोन तासातच युनियन कार्बाईडच्या त्या प्लांटपर्यंत जाण्याची जोखीम या पत्रकारांनी पत्करली होती. याविषयी न्यूजटाईम आणि ईनाडूसाठी अनीस चिश्ती यांनी बातम्या लिहिल्या. त्यांच्या 'डेटलाईन भोपाळ' या पुस्तकातला हा काही अंश-

" भोपाळ 3 डिसेंबर : ही घटना एखाद्या भयकथेसारखी आहे. गाढ झोपेत असणाऱ्या भोपाळचं रूपांतर मध्यरात्र उलटून गेल्यावर 8-10 किलोमीटर मोठ्या गॅस चेंबरमध्ये झालं. कासावीस झालेले लोक बिछाना सोडून धावायला लागले. कोणीतरी चहुबाजूंना गॅस फवारला आहे आणि लोक त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहेत, असं वाटत होतं. म्हातारेकोतारे काठ्या टेकत चालले होते. महिला बुरखे आणि साड्या सांभाळत सैरावैरा पळत होत्या. लहान मुलं आयांना बिलगलेली होती. शहरातल्या जुन्या तळ्याजवळून एखाजादा जनसागरच पुढे जात असल्याचं वाटतंय. पळ काढणाऱ्या या लोकांपैकी जवळपास लाखभर लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचलेले आहेत, पण यापैकी बहुतेक खोकत आहेत. त्यांना श्वास घ्यायला जड जातंय. काहींना रक्ताच्या उलट्या होत आहेत. या विषारी वायूमुळे काहींचा मृत्यू झालाय. हॉस्पिटलमधली गर्दी वाढत चाललीये. शहराच्या उत्तरेकडे असणाऱ्या युनियन कार्बाईड फॅक्टरीमधून गळती झालेल्या मिथाईल आयसोसायनाइट वायूमुळे लोकांची ही अवस्था झालेली आहे. छोला, जयप्रकाश नगर, टीला जमालपुरा, पी अॅण्ट टी कॉलनी, सिंधी कॉलनी, इब्राहिमपुरा, शांतीनगर, पीर गेट, करोध गाव आणि पाश कॉलनी ग्रीन पार्क हे भाग सर्वात जास्त प्रभावित झालेले आहेत."

सरकारचं म्हणणं काय होतं?

सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेमध्ये 15,000 लोक मारले गेले आणि पाच लाखांहून अधिक जखमी झाले. म्हणजे या लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या आजारांना आणि व्याधींना सामोरं जावं लागलं. सुप्रीम कोर्टाच्या मध्यस्थीने भारत सरकारने युनियन कार्बाईडकरून 713 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून घेतल्याचं स्वयंसेवी संस्थांचं म्हणणं आहे.

पण हा निधी 3,000 मृतं आणि 1 लाख जखमींचा आकडा आधार मानून ठरवण्यात आला आणि त्यानंतर हा निधी यापेक्षा पाचपट जास्त लोकांमध्ये वाटण्यात आला. नुकसान भरपाईची ही रक्कम पीडितांना दुर्घटनेच्या सात-आठ वर्षांनंतर मिळाल्याचं सेवाभावी संस्था म्हणतात.

वॉरन अॅण्डरसन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वॉरन अॅण्डरसन

शिवाय नुकसान भरपाईची रक्कम घेताना एक तडजोड कऱण्यात आली. या नुकसान भरपाईच्या बदल्यात युनियन कार्बाईडविरोधातली सगळी प्रकरणं बंद करण्याचं मान्य करण्यात आलं. परिणामी अमेरिकेतली युनियन कार्बाईड कॉर्पोरेश, युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड, युनियन कार्बाईड ईस्टर्न हाँगकाँग आणि कंपनीचे अध्यक्ष वॉरन अॅण्डरसन यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या सगळ्या केसेस सीबीआयने बंद केल्या.

राजकुमार केसवानींसारख्या भोपाळमधल्या नागरिकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी याविरोधात कोर्टात आवाज उठवल्यानंतर 1992मध्ये हे खटले पुन्हा सुरू कऱण्यात आले.

2000 साली युनियन कार्बाईड कंपनी ही डाऊ केमिकल्स या अमेरिकन कंपनीनेच विकत घेतल्याने त्यांच्या विरोधात प्रकरण दाखल करण्यात यावं असाही वाद झाला. पण भोपाळ वायू दुर्घटनेचं हे प्रकरण आता इतकं गुंतागुंतीचं झालेलं आहे, की यामध्ये आता काही होण्याची फार शक्यता नसल्याचं काहींना वाटतं.

9 ऑगस्ट 2012 ला सुप्रीम कोर्टाने याविषयी एक निर्णय सुनावला होता. वायुगळती दुर्घटनाग्रस्तांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने भारत सरकारला दिले होते.

भोपाळमधली 'ती' जागा

गॅस गळतीच्या साधारण 8 तासांनंतर भोपाळला विषारी वायूमुक्त जाहीर करण्यात आलं. पण युनियन कार्बाईडच्या ज्या प्लांटमधून ही वायू गळती झाली, तो अजूनही त्याच जागेवर उभा आहे. गेल्या 35 वर्षांमध्ये इथे काहीही करण्यात आलेलं नाही.

कीटकनाशकं तयार करणाऱ्या या कारखान्याचा सांगाडा अजूनही भोपाळमध्ये उभा आहे. या जागेची साफसफाई करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची? यावरून वाद सुरू आहे.

या प्लांटच्या साफसफाईचा खर्च कंपनीच्या मालकांनी उचलावा, असं भारत सरकारचं म्हणणं आहे. दुर्घटना घडली तेव्हा हा प्रकल्प युनियन कार्बाईडच्या मालकीचा होता. पण त्यानंतर डाऊ केमिकल्सने ही कंपनी विकत घेतली. या साफसफाईचा खर्च कोणी उचलावा यासंबंधीचं प्रकरण कोर्टात आहे, पण यावर तोडगा निघालेला नाही. यासोबतच अधिकच्या नुकसान भरपाईची मागणीही करण्यात आलेली आहे.

भोपाळ गॅस दुर्घटना

फोटो स्रोत, Getty Images

पण या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या परीघात असणाऱ्या परिसरातलं पाणी अजूनही इथल्या विषारी द्रव्यांनी दूषित होत असल्याचं विविध चाचण्या आणि अभ्यासांमधून उघडकीला आलेलं आहे. हा त्या रात्री झालेल्या वायुगळतीचा परिणाम आहेच पण कारखान्याच्या सांगाड्यातून जमिनीत पसरणाऱ्या विषारी द्रव्यांचा आणि पदार्थांचाही हा परिणाम आहे.

हे दूषित पाणी प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं समाजसेवकांचं म्हणणं आहे. या दुर्घटनेनंतर भोपाळमध्ये जन्मलेल्या पुढच्या अनेक पिढ्यांवर या दुर्घटनेचे परिणाम पहायला मिळाले आहेत. दुर्घटनेनंतर भोपाळमध्ये जन्मलेल्या अनेक बाळांमध्ये जन्मतःच व्यंग होतं.

भारत आणि अमेरिकेमध्ये 'पोल्यूटर पेज प्रिन्सिपल' (Polluter Pays Principle) म्हणजेच ज्याच्यामुळे प्रदूषण झालंय, त्याने नुकसान भरपाई द्यावी,हे तत्वं पाळण्यात येतं. यानुसार जमीन आणि पाणी प्रदूषण मुक्त करण्याची जबाबदारी युनियन कार्बाईडची असल्याचं यासाठी लढा देणाऱ्यां आंदोलक आणि संस्थांचं म्हणणं आहे.

दुर्घटनेचं द्योतक ठरलेला 'तो' फोटो

प्रसिद्ध फोटोग्राफर रघु राय यांनी या दुर्घटनेदरम्यान क्लिक केलेला एक फोटो या संपूर्ण दुर्घटनेचा 'मानवी चेहरा' ठरला. भोपाळ गॅस दुर्घटनेचा उल्लेख केला, की आजही हाच फोटो आठवून सारं जग शहारतं.

रघू राय यांनी टिपलेला हा फोटो पुढे भोपाळ दुर्घटनेचा प्रतिक बनला.

फोटो स्रोत, Green Peace/Raghu Rai

फोटो कॅप्शन, रघू राय यांनी टिपलेला हा फोटो पुढे भोपाळ दुर्घटनेचा प्रतिक बनला.

या फोटोविषयी रघु राय यांनी म्हटलं होतं, "वायू दुर्घटनेतल्या जखमी आणि मृतांचे फोटो 3 डिसेंबरला हमीदिया हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर आम्ही स्मशान आणि दफनभूमीतली परिस्थती पहायला गेलो. तिथे एका लहानग्याचं दफन करण्यात येत होतं. निरागस चेहरा आणि अजूनही उघडे असणारे डोळे...मी फोटो काढला. पण लोक त्यावर माती सारायला लागल्यावर मनात काहूर उठलं. का त्याच्यावर माती ढकलत आहेत ? का त्याला दफन केलं जातंय? नंतर हाच फोटो भोपाळ वायू दुर्घटनेचं प्रतीक बनला."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)