'त्यानं एक हात गमावला अन् तिनं डोळे', एकमेकांना भेटल्यानंतर अशी फुलली Love Story

फोटो स्रोत, instagram/rachit.kulshrestha
- Author, रेणुका कल्पना
- Role, बीबीसी मराठीसाठी
"मी तुझ्याकडेच बघतेय हा," हे ऐकताक्षणी टेबलच्या दुसऱ्या बाजुला बसलेल्या रचितनं तिच्याकडं पहिल्यांदा निरखून पाहिलं होतं.
खरं तर ट्यूमरमुळं ऐन तारुण्यात ऐश्वर्याची दृष्टी गेली. त्यामुळं ती काहीच पाहू शकत नव्हती. तरीही खोलीत असलेल्या एका व्यक्तीला ती गमतीत तसं म्हणाली होती.
दोघांची नजरानजर वगैरे होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळं लव्ह ॲट फर्स्ट साईट नाही, तर लव्ह ॲट फर्स्ट लाफ झालं.
रचितलाही हा विनोद आवडला. वयाच्या सहाव्या वर्षी त्यानंही कॅन्सरमुळं डावा हात गमवला होता. 'काय झालं?' असं कुणी विचारतं तेव्हा तोही, 'जंगलात वाघाने खाल्ला' असं विनोदानं म्हणत असतो.
जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या अपंगत्वाचा जेव्हा मनापासून आणि मोकळेपणानं स्वीकार केला जातो, तेव्हाच स्वतःवर असा विनोद करता येतो.
ऐश्वर्याकडे डोळे नसले तरी जगासमोर अपंगत्व एका नव्या पद्धतीनं मांडण्याची दृष्टी आहे, हे रचितला कळालं. तेव्हा आपसुकच तिच्याबद्दल त्याची ओढ वाढू लागली.
पहिली भेट ठरली नवी सुरुवात
ते भेटले त्या कार्यक्रमात रचित कुलश्रेष्ठ आणि टी. वी. ऐश्वर्या या दोन नावांची वक्ता म्हणून नोंद होती.
पुण्यात राहणारा 38-वर्षांचा रचित दोन वेळा कॅन्सरला हरवणारा ट्रेकर, सायकलिस्ट म्हणून खूप प्रसिद्ध आहे.
त्याची मनाली ते हिमालयातल्या खारदुंगला घाटापर्यंत एका हाताने केलेली सायकल यात्रा अनेकांना प्रेरणा देते. तो मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून व्याख्यानं देत असतो.
तर 35 वर्षांच्या ऐश्वर्याला निसर्ग वेगळ्या पद्धतीनं खुणावतो. तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या तिच्या थ्री डी पेंटिग्समधून तो डोकावत राहतो.
डोळे नसणाऱ्या तिच्यासारख्याच इतांना स्पर्शाने अनुभवता येतील अशा या थ्री डी पेंटिग्स असतात.

हैदराबादच्या एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूटमध्ये पुनर्वसन समुपदेशक म्हणून काम करणारी ऐश्वर्या गेलमेकर इनोव्हेशन्स नावाची कंपनीही चालवते.
त्यांच्या या प्रेरणादायी कामाची गोष्ट सांगायला त्या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित केलं होतं. आधीच्या रात्री जेवणाचा बेत होता. योगायोगानं दोघं एकाच टेबलावर बसले होते.
सगळ्यांसोबत जेवणं उरकल्यावर रचितनं तिला शतपावलीला येतेस का म्हणून विचारलं. तेव्हाच 2023 च्या जुलै महिन्यात चेन्नईच्या दमट पावसाळी रात्री एकमेकांशी बोलताना आपण असंच आयुष्यभर सोबत चालू शकतो हे त्यांना उमगलं होतं.


सारखेपणामुळं मनं जुळत गेली
या पहिल्या भेटीतच आपल्याला ही मुलगी आवडली आहे आणि आयुष्याची जोडीदार म्हणून हिचा विचार करता येऊ शकतो याची रचितला खात्री पटली होती.
"खरंतर टेबलावर तिचा जोक ऐकून मला फक्त तिला माणूस म्हणून समजून घ्यायचं होतं. पण तिच्याशी झालेल्या पहिल्याच बोलण्यात आम्ही किती सारखे आहोत हे कळालं. जगण्याकडे बघण्याचा आमचा विचार, आमचा दृष्टीकोन अगदी 99 टक्के जुळतो हे समजलं," असं तो म्हणाला.
पण ऐश्वर्याला मात्र ती खात्री येत नव्हती. तिच्या स्वभावानुसार लोकांवर विश्वास ठेवायला, माणूस समजून घ्यायला तिला जरा वेळ हवा होता.
कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी दोघांना परत आपापल्या शहरात जायचं होतं.
"परत येऊन मी माझ्या कामात गुंतून गेले. मला वाटलं आता आम्ही परत बोलणार वगैरे नाही. पण थोड्याच वेळात फोनवर त्याचा मेसेज आला.
'नो सनशाईन व्हेन शी गोज अवे' (ती जाते तेव्हा सूर्यप्रकाश हरवतो) हे इंग्रजी गाणं त्यानं पाठवलं होतं," असं ऐश्वर्या सांगते. आज रचितविषयी बोलताना ती त्याला स्वतःचं 'मेल व्हर्जन' म्हणते.
एकमेकांना भेटण्याआधी आपल्याला मनासारखा जोडीदार कधीही मिळणार नाही, असं दोघांनाही वाटत होतं. परत कधीही कोणावरही प्रेम करायचं नाही, असं दोघांंनीही ठरवलेलं.
त्याआधी दोघंही अनेकदा प्रेमात पडलेले. ज्यांना कोणतंही शारीरिक अपंगत्व नाही अशाही माणसांना दोघांनी 'डेट' केलं होतं.
"पण कॅन्सरमुळेच अपंगत्व आल्यानं ऐश्वर्या मला जितकं समजून घेऊ शकते तितकं दुसरं कुणीही नाही," असं रचितला वाटतं.
असे त्यांचे कितीतरी अनुभव सारखेच असल्यामुळे त्यांची मनं जुळत गेल्याचं तो सांगतो.
तेव्हाची परिस्थिती सांगण्यासाठी "थोडासा प्यार हुआ है, थोडा है बाकी" हे त्याला गुणगुणावसं वाटतं. पण फक्त ओळख झाली, मनं जुळली म्हणून परिकथेसारखी कहाणी सुफळ संपूर्ण कुठे होते?

फोटो स्रोत, Instagram/RachitKulshrestha
रचित आणि ऐश्वर्या दोघांचंही भावनाविश्व वेगळं होतं. लहानपणापासून आलेले अनुभव निराळे होते. मुख्य म्हणजे, दोघांच्याही अपंगत्वाचा प्रकार वेगळा होता. हे सारं समजून घेत एकमेकांची जोडीदार म्हणून निवड करायची होती.
"वडील पुण्यात स्थलांतरित होण्याआधी आम्ही इंदोरला राहत होते. एक हात नसला तरी इतर लोकांप्रमाणेच नेहमीसारखं आयुष्य जगता यावं असं मला वाटायचं. पण आजूबाजूचे लोकच अपंगत्वाची जास्त आठवण करून द्यायचे," असं रचित सांगतो.
इंदोरसारख्या लहान शहरात त्याकाळी कॅन्सरबद्दल इतके गैरसमज होते की, त्याला हात लावल्यानंही कॅन्सर पसरेल असं त्याच्या वर्गातल्या मुलांना वाटे. शाळेत कोणत्याही खेळात भाग घ्यायचीही त्याला परवानगी नव्हती.
"पुण्यात आल्यावर सगळं एकदम उलट. सहानुभूती आणि दयेनं लोक मला एकदम हरभऱ्याच्या झाडावर चढवत. पण मला तेही नको होतं," असं रचित सांगतो.
त्याच्यासाठी प्रेम म्हणजे तो जो आहे त्याचा बिनशर्त स्वीकार. "मी आहे तसा मला समावून घेणं म्हणजे प्रेम," असं तो म्हणतो.
"एकदा वयात येताना एका मुलीबद्दल वाटणारं आकर्षण बोलून दाखवलं. त्यावर 'तू खूप मस्त आहेस. पण तुझा हात नाही' असं ती म्हणाली होती. अर्थातच तेव्हा खूप जास्त वाईट वाटलेलं."
या सगळ्या अनुभवांसोबत मोठं होत असताना रचितच्या आत्मविश्वासाच्या चिंधड्या उडत होत्या. स्वतःच स्वतःवर प्रेम करता येत नव्हतं. मग दुसरं कुणी त्याच्यावर कसं करणार?
पण हळूहळू हे अपंगत्व स्वीकारता आलं. त्याला असे अनुभव आले असले तरी त्याच्या अनेक अपंग मित्र मैत्रिणींना कोणतंही शारीरिक अपंगत्व नसलेले जोडीदार मिळाल्याचं आणि त्यांचे संसार सुखाने सुरू असल्याचंही त्यांनं पाहिलं.
"या सगळ्या अनुभवातून आज मला त्या मुलीची आणि मला वेगळं वागवणाऱ्या इतर सगळ्यांचीही बाजू आता नीट समजून घेता येते," असं रचित सांगतो.
आजही स्वतःबद्दलचा आत्मविश्वास अनेकदा ढासाळतो. पण ऐश्वर्या समुपदेशकच्या भुमिकेत त्याच्यामागे ठामपणे उभी असते. तिच्यासोबत जगण्याचे वेगवेगळे पैलू कळतात, मनातल्या कोलाहालाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळतो.

फोटो स्रोत, Instagram/RachitKulshrestha
ऐश्वर्या 18-19 वर्षांची असताना तिला ब्रेन ट्यूमरमुळे झाला. त्यामुळे, तिची पाहण्याची, चव आणि वास घेण्याची, ऐकण्याची क्षमताही कमी झाली होती. काही दिवस शरीर पॅरेलाईज्डही झालं होतं. पण औषधांनी आजार आटोक्यात आल्यानंतर दृष्टी सोडता सगळं पूर्ववत झालं.
त्यामुळे ऐश्वर्याच्या बालपणात अपंगत्व नसलं तरी दहाव्या वर्षी आई आणि पंधराव्या वर्षी वडील दोघंही कॅन्सरमुळे गेल्यावर मनावर प्रचंड आघात तिने सोसले होते. ते गेल्यानंतर सावत्र आईच्या प्रेमात आणि शिस्तीत ती मोठी झाली.
पण मनात इतकी भिती बसली होती की पहिली मासिक पाळी आली तेव्हा घाबरून आपल्याला कॅन्सरच झाला असल्याचं तिला वाटलं.
या सगळ्यात प्रेम, आकर्षण, मैत्री अशा गोष्टी किशोरवयात मनाला कधी शिवल्याच नसल्याचं ऐश्वर्या सांगते.
"मी खूप अभ्यासू होते. आणि बऱ्यापैकी टॉमबॉईश. दृष्टी गेली त्यानंतर खरंतर एखादा समजून घेणारा जोडीदार आयुष्यात असण्याची गरज वाटू लागली," असं ती म्हणते.
दिसत होतं तेव्हाही कधी ती कशी दिसते आणि लोक तिच्याकडे कसं पाहतात याचा फरक तिला पडत नव्हता. दृष्टी गेल्यावर तिलाही लोकांना त्यांच्या कपड्यांवरून, दिसण्यावरून पारखणं तिलाही सोडून देता आलं.
त्यामुळे संवाद हाच तिच्यासाठी कोणतंही नवं नातं तयार करण्याची पूर्वअट होती. त्या संवादाच्या जोरावरच त्यांचं नातं बहरलं.
संवादाच्या माध्यमातून दोघांनी एकमेकांना आंतरबाह्य समजून घेता आलं.
दीड वर्षात एकही भांडण नाही
बॉलिवूडपासून ते केमिस्ट्री, कॉसमॉस ते युनिव्हर्सपर्यंत सगळे विषय त्यांच्या बोलण्यात असत. या सूर्याच्या खाली आणि त्यापलीकडेही जे जे येतं ते सगळं. कोणताच विषय त्यांना वर्जित नव्हता.
त्यातून एकमेकांचं भावनाविश्व उलगडलं. एकमेकांच्या मनाचे नाजूक कोपरे कळाले. काहीही बोलताना, विशेषतः मतभेद व्यक्त करताना या कोपऱ्यांना स्पर्श न करता कसं बोलायचं हे कळालं.
म्हणूनच गेल्या दीड वर्षांत त्यांच्यात एकदाही भांडण न झाल्याचं रचित सांगतो. "आमच्या नात्यात शिकण्याला खूप महत्त्व आहे. एकदा झालेल्या चुकीतून आम्ही खूप शिकतो. खटकणाऱ्या गोष्टी शांतपणे एकमेकांना सांगतो. समोरच्याने सांगितलेलं तसंच ऐकूनही घेतो," तो पुढे सांगत होता.

कटकट न करता, दोषारोप न करता गोष्टींवर साधक-बाधक चर्चा होते. त्यातून एका सुर्वणमध्यावर पोहोचलं जातं.
"ऐश्वर्या खूप चांगला स्वयंपाक करते यावर कित्येक दिवस माझा विश्वासच बसत नव्हता. शिवाय, स्वयंपाक करताना काही अपघात झाला, कापलं, चिरलं, भाजलं तर ऐश्वर्या एकटी कसं सांभाळणार म्हणून तिची काळजीही वाटायची."
एकदा ती पुण्याला रचितकडे आली होती तेव्हा काही मित्रमैत्रिणी भेटायला आलेले. बाहेरून बिर्याणी मागवलेली. घरी फक्त कोशिंबीर करायची होती. त्यात ऐश्वर्याकडून मीठ जास्त किंवा कमीच पडणार असं त्याला वाटत होतं.
त्याच्या सुचनांना कंटाळून ऐश्वर्यानं त्याला स्वयंपाकघराच्या बाहेरच काढलं.
"तिच्यावर विश्वास ठेवायला आणि तिच्या काळजीतून स्वतःला बाहेर काढायला मला खूप वेळ लागला. ऐश्वर्यानंही कटकट न करता, राग न मानता तो वेळ मला घेऊ दिला," असं रचित सांगतो.
रचितच्या बोलण्या, वागण्यातून त्याची ही काळजी इतरवेळीही दिसून येेते हे ऐश्वर्याला समजतं.
"कामात मग्न असताना मी काही खाल्लं आहे की नाही, पुरेसं पाणी पिलं आहे की नाही याची रचित सतत विचारपूस करतो. ताणात असताना त्यानं खांद्यावर ठेवलेला हात खूप आधार देणारा असतो. असाच त्याचा डोक्यावर हात ठेवल्यावर, केसांतून हात फिरवल्यावर होणारा स्पर्श खूप सुखद असतो," ऐश्वर्या सांगते.
दृष्टी गेल्यावर एकदा कधीतरी भाजीवाल्यानं केलेल्या घाणेरड्या स्पर्शानं मनावर झालेले आघात भरून काढण्याची ताकद रचितच्या स्पर्शात असते. त्यांच्या संवाद असा वेगवेगळ्या माध्यमातून होत राहतो.
"तो माझे डोळे असतो. एखाद्यावेळी हॉटेलमध्ये गेल्यावर आसपास काय चाललं आहे, पडद्याचे रंग कोणते आहेत, भिंतीवर एखादं पेंटिग लावलं असेल तर त्यात काय आहे असं सगळं तो मला सांगत राहतो," ऐश्वर्या म्हणते. तशीच तीही रचितचा हात बनते.
तो तिचे डोळे, अन् ती त्याचा हात होते
सामान उचलायचं असेल किंवा बॉटल उघडण्यासारखं दोन्ही हातांनी करायचं काम असेल तर रचितला ऐश्वर्याची मदत मागताना कधी कमीपणा वाटत नाही.
पुरूष म्हणून जगताना आपल्या स्त्री जोडीदाराचं संरक्षण करण्याइतकी क्षमता आपल्यात नाही याची खंत त्याला जरूर वाटते.
"माझ्या घराच्या मागेच एक छोटी टेकडी आहे. पण मी तिला तिथे घेऊन कधीही जात नाही. काही झालंच तर बॉलिवूडच्या सिनेमासारखं मी मारामारी करू शकत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. मी सूपरमॅन नाही हे मी स्वीकारलंय. म्हणूनच जिथं सुरक्षित वाटत नाही तिथं जाणंच टाळतो," तो म्हणतो.
पण एकमेकांना सार्वजनिक ठिकाणी भेटणं हाही त्यांच्यासाठी नेहमीच सुखदायक अनुभव नसतो.
ऐश्वर्याला समजत नसलं तरी लोक त्यांच्याकडे एकटक पाहतायत हे रचितला दिसतं. त्यातून फार अवघडलेपणही येतं.
"कोणाकडे असं टक लावून पाहणं हा एक उद्धटपणाच असतो हे आपल्या भारतीय संस्कृतीत दुर्दैवानं शिकवलं जात नाही. तुम्हाला न ओळखणारा माणूस अचानक समोर येऊन सर्वांसमोर हाताला काय झालं असं विचारून मनाच्या नाजूक भागाला स्पर्श करतो," रचित सांगतो.
युरोपिय देशांत असं कुणी कुणाकडे एकटक बघत नाही.
"लहानपणी मला असं कुणी विचारलं तर मी अक्षरशः विस्कटून जात असे. एखादा कप कुणीतरी वरून सोडून दिलाय आणि खाली पडल्यावर त्याचे अनेक तुकडे झालेत, तसंच काहीसं मनाचं व्हायचं."
पण आता अपंगत्वाचा स्वीकार केल्यावर कोणाच्याही नजरांचं काही वाटत नाही. सगळे डोळे आपल्यावरच रोखले गेले असतानाही त्यांना एकमेकांसोबत सुंदर क्षण जगता येतात.
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळचे एकदा असेच ते फिरत होते. समुद्रकिनाऱ्यावर तशी तुरळक गर्दी होती. एकमेकांची मस्करी करत असताना पळण्याची शर्यत लावायचं ठरलं. मला दिसत नाही तर शर्यतीत रचितनेही त्याचे डोळे बंद केले पाहिजेत, असं ऐश्वर्याचं म्हणणं होतं.
रचित मुळातला खेळाडू. स्पर्धा करायची तर दोघंही सम पातळीवर हवेत म्हणून तोही तयार झाला. डोळे बंद करूनही आपण ही शर्यत जिंकून दाखवायचीच, असं त्यानं ठरवलं.
'गेट…सेट.. गो…' म्हणताच शर्यत सुरू झाली. रचित सुसाट पळत पुढे गेला तर ऐश्वर्या चार पावलं पळून जागीच थांबली आणि जोरजोरात हसू लागली. आपला पुन्हा विनोद झाल्याचं रचितच्या लक्षात आलं.
त्यांच्याकडे इतका वेळ गंभीरपणे पाहणारे आसपासचे सारे लोक आता त्यांच्या हसण्यात सामील झाले होते.
सोबत असताना ते असेच सतत फिदीफिदी हसत असतात.
त्यामुळेच एकमेकांना भेटल्यापासून प्रेमावरचा विश्वास दृढ झाला असल्याचं ऐश्वर्या आणि रचित म्हणतात. प्रेमाबद्दल बोलताना एखाद्या कोऱ्या कॅन्व्हासवर गडद रंग सांडावेत तसं त्यांना वाटत राहतं.
म्हणूनच जात, धर्माच्या, भाषा प्रांताच्या वेडचळ सीमा त्यांनी स्वतः भोवती लावून घेतलेल्या नाहीत. ऐश्वर्या ख्रिश्चन असली तरी रचितच्या घरच्यांनी तिचा मनापासून स्वीकार केलेला आहे.

सगळं एवढं आलबेल असूनही त्यांना लगीनघाई नाही. लग्न हा अतिशय विचारपूर्वक, महत्त्वाचा निर्णय असल्यानं एकमेकांना ओळखण्यासाठी आणखी एक वर्ष देण्याचं त्यांनी ठरवलं आहे.
"मूल नको हा आमच्या दोघांनीही घेतलेला निर्णय आहे. समाजानं चौकट घालून दिलेलं आयुष्य जगायचं नाही ही त्यामागची उर्मी आहेच. शिवाय, अपंगत्व आणि वयामुळे त्याची जबाबदारी आम्हाला झेपणारी नाही हेही आम्ही स्वीकालंय," असं रचित सांगतो.
वयाच्या या टप्प्यावर आणि अपंगत्वासोबत जगतानाही मिळेल त्याच्याशी पटकन लग्न उरकून टाकण्याचा दबाव त्यांनी स्वतःवर टाकलेला नाही. सन्मानानं एकमेकांची निवड ते करत आहेत.
"मी एखाद्या डोंगरासारखा खंबीर आहे असं मला वाटतं," रचित म्हणतो. तर ऐश्वर्याला स्वतःला पाण्याची उपमा द्यावीशी वाटते.
वेळ आली तर इतरवेळी जीवन देणारं पाणी सगळं उद्ध्वस्त करू शकतं. असं असलं तरी डोंगराचा मृदूपणा आणि पाण्याची शांतता त्यांच्यामध्ये आहे असं दोघं स्वतःविषयी बोलताना म्हणतात.
त्यांचं प्रेम पाहताना आपणही तसेच शांत आणि मृदू होत जातो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











