'नागपूर ते चायना ओपन' ऑलिंपिक पदकाचं स्वप्न घेऊन बॅडमिंटन खेळणारी मालविका बनसोड कोण आहे?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एकतर अभ्यास नाहीतर खेळ. बहुतांश भारतीय मुलांना यापैकी एकाचीच निवड करावी लागते. भारताची बॅडमिंटनपटू मालविका बनसोड मात्र याला अपवाद आहे.

मालविकानं नुकतंच चायना ओपनमध्ये लक्षवेधक कामगिरी बजावल्यामुळे ती चर्चेत आली आहे.

पण काही महिन्यांपूर्वीच म्हणजे जून 2024 मध्ये मालविकानं काँप्युटर सायन्समध्ये इंजिनियरिंगची पदवीही घेतली होती.

नागपूरची असलेल्या मालविकाच्या आजवरच्या वाटचालीविषयी आम्ही तिची आई तृप्ती बनसोड यांच्याशी फोनवरून बातचीत केली.

“मालविकानं गेली चार वर्ष खूप मेहनत घेतली आहे. आम्हाला आठवतही नाही की कधी आम्ही सुट्टी वगैरे घेतली आहे आणि कुठे गेलो आहोत. कधी कधी ट्रेनमध्ये अभ्यास करत तर कधी स्पर्धेसाठी जाता जाता परीक्षा देत मालविकानं दोन्हीमधला ताळमेळ साधला,” असं सांगताना तृप्ती यांच्या आवाजात लेकीविषयीचा अभिमान जाणवतो.

“सातत्यानं सराव करत, खेळत ती इथवर पोहोचली आहे. इतकी वर्षं ती अभ्यास आणि बॅडमिंटन अशा दोन रुळांवर चालते आहे,” असं तृप्ती नमूद करतात.

मालविकानं असं गाजवलं चायना ओपन

18 सप्टेंबर 2024 रोजी चायना ओपनच्या पहिल्याच सामन्यात मालविकानं पॅरिस ऑलिंपिकमधील कांस्यविजेती मारिस्का तुंजुंगला हरवलं होतं.

विशेष म्हणजे कुठलाही प्रशिक्षक स्पर्धेसाठी सोबत आलेला नसताना मालविकानं हे यश मिळवलं.

जागतिक क्रमवारीत 43 व्या क्रमांकावर असलेल्या मालविकानं 7 व्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या तुंजुंगवर 26-24, 21-19 अशी मात केली होती.

उपांत्यपूर्व फेरीमध्ये मालविकाला दोन वेळची माजी विश्वविजेती अकाने यामागुचीकडून 10-21, 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. पण यानिमित्तानं मालविकानं सुपर 1000 दर्जाच्या एखाद्या स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मालविकाची कामगिरी पाहून तृप्ती बनसोड सांगतात, “दहा-बारा तास प्रवास करून मग खेळायचं म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये नेहमी कठीण जातं, कारण तुमचं शरीर तिथल्या वातावरणाशी जुळवून घेत असतं, तिथल्या कोर्टची तुम्हाला नीट सवय नसते. आणि समोर ऑलिंपिक पदक विजेती किंवा विश्वविजेती.

“अशा परिस्थितीत दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंचा सामना ती करू शकली, याचं आई म्हणून समाधान वाटतं.”

मुलीसाठी आई शिकली स्पोर्ट सायन्स

मालविकाला लहानपणापासूनच खेळाची आवड होती आणि तिच्या पालकांनी, तृप्ती आणि प्रबोध बनसोड यांनीही तिला खेळू दिलं.

खेळाचं प्रशिक्षण, साहित्य ते मानसिक आधार या सर्वच दृष्टीने मालविकाच्या आई-वडिलांची तिला कायम साथ मिळाली.

मालविकाचे आई-वडील डेंटिस्ट आहेत. मुलीला तिच्या क्रीडा करियरमध्ये मदत व्हावी, म्हणून तिच्या आईने स्पोर्ट्स सायन्समध्ये म्हणजे क्रीडावैद्यकशास्त्रात मार्स्टर्सचं शिक्षण घेतलं.

पण कुठलातरी एक खेळ निवड आणि तो गांभीर्याने खेळ, म्हणजे उत्तम फिटनेसही राखता येईल आणि त्यामुळे सर्वांगीण विकासही होईल, असं त्यांचं म्हणणं होतं.

नागपूरमध्ये बॅडमिंटनचं आव्हान

अवघ्या आठ वर्षांची असताना मालविकाने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली.

पण एका यशस्वी व्यावसायिक कुटुंबातून येऊन देखील संसाधनं आणि सुविधा यासाठीचा लढा तिला द्यावाच लागला.

कारण नागपुरात बॅडमिंटनच्या सरावासाठी पुरेसे सिंथेटिक कोर्ट्स नव्हते आणि जे होते तिथे पुरेशी प्रकाशव्यवस्था नव्हती.

शिवाय प्रशिक्षक कमी आणि प्रशिक्षण घेणारे जास्त, यामुळे प्रशिक्षकांकडून पुरेसं लक्ष मिळणं शक्य नव्हतं.

मालविकाने सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर पातळीवर खेळायला सुरुवात केली तेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा खर्च महागडा आहे आणि अशावेळी मुलीसाठी स्पॉन्सर्सशीप मिळवणंही सोपं नाही, याची जाणीव तिच्या पालकांना झाली.

मालविकाच्या बऱ्याचशा सामन्यांत सोबत कोणी वैयक्तिक प्रशिक्षक वगैरे नसायचा तर तिचे वडीलच असायचे.

मालविकाला यश मिळत गेलं, तशी तिच्या खेळाची केंद्राच्या क्रीडा विभागाने आणि इतर क्रीडा संस्थांनी नोंद घेतली.

खेलो इंडिया टॅलेंट डेव्हलपमेंट आणि 2019 साली टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) साठी निवड झाल्यावर मालविकाच्या कारकीर्दीला गती मिळाली.

मात्र नागपुरात आजही सरावाच्या पुरेशा सुविधा नाहीत, हे तिची आई तृप्ती पुन्हा नमूद करतात.

यशाला गवसणी

सीनिअर स्तरावर खेळण्याआधी मालविकाने ज्युनिअर आणि युथ लेव्हलवरही उत्तम कामगिरी बजावली होती.

राज्य पातळीवर अंडर-13 आणि अंडर-17 वयोगटात मानांकनं मिळाल्यानंतर मालविकाने स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई केली होती.

मग एशियन स्कूल बॅडमिंटन चॅम्पियनशीप आणि साऊथ एशियन अंडर-21 रिजनल बॅडमिंट चॅम्पियनशीपमध्येही तिने सुवर्ण पदकांची कमाई केली. 'नागभूषण' पुरस्कारासह क्रीडा क्षेत्रातले अनेक पुरस्कार तिला मिळाले.

2019 साली मालदिव्ज इंटरनॅशनल फ्युचर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतही तिने पदकांची कमाई करत सीनिअर स्तरावर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची दिमाखदार सुरुवात केली.

मालदिव्जमधला विजय केवळ योगायोग नव्हता हे डावखुऱ्या मालविकाने आठवडाभरातच दाखवून दिलं आणि नेपाळ इंटरनॅशनल सीरिजमध्येही पदक पटकावलं. तेव्हा ती जेमतेम 19 वर्षांची होती.

मालविकानं 2021 साली युगांडा इंटरनॅशनल आणि लिथुआनियन इंटरनॅशनल या स्पर्धांमध्ये सुवर्ण, तर 2022 मध्ये इटालियन इंटरनॅशनलमध्ये उपविजेतेपद मिळवलं.

2022 साली इंडिया ओपनच्या निमित्तानं तिला पहिल्यांदाच BWF सुपर 500 दर्जाच्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. त्या स्पर्धेत तिनं सायना नेहवालवर मात केली होती.

त्याच वर्षी भारतातच सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत तिनं फायनलमध्ये धडक मारली पण पीव्ही सिंधूकडून मालविकाचा पराभव झाला.

पण सुपर सीरीजमध्ये खेळण्याचा अनुभव मालविकासाठी महत्त्वाचा ठरला.

आजारपणावर मात करत वाटचाल

2023 मध्येही मालविकानं चांगली सुरुवात केली. त्यावर्षी झालेल्या हांगझू एशियन गेम्ससाठी भारताच्या संघात मालविकाचा समावेश झाला होता.

पण यानंतर मालविकाला डेंग्यू आणि टायफॉईडनं ग्रासलं. यातून बाहेर पडून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणं तिच्यासाठी किती कठीण होतं, याविषयी तृप्ती माहिती देतात.

“तिला पायाला वेदना व्हायच्या, गुडघे दुखायचे, प्रत्येक सांधा दुखायचा. खाली वाकताना वेदना व्हायच्या. एवढा प्रचंड त्रास होत असतानाही तिनं कधीही सराव चुकवला नाही. ती सराव करून आली की आम्ही रिकव्हरीवर भर द्यायचो.”

मालविकाचं हिमोग्लोबिन कमी झालं होतं, आहारावर आणखी बंधनं आली होती. साडेतीन-चार महिने अतिशय अशक्तपणा होता. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती स्पर्धा खेळत राहिली.

“आपण लोकांना कधीच सांगू शकत नाही, की मी आजारी होते. शारिरीक वेदना, मानसिक दबाव या सगळ्याचा सामना करत ती आज इथपर्यंत पोहोचली आहे. एक प्रकारे या सगळ्या परिस्थितीनं तिला मानसिकदृष्ट्या खंबीर केलं,” असं तृप्ती सांगतात.

आई म्हणून क्रीडा वैद्यकशास्त्राचा अनुभव असल्यानं मालविकाला मदत करू शकले, असं त्या नमूद करतात.

ऑलिंपिकचं लक्ष्य

गेल्या वर्षभरात मालविकाची वाटचाल आशा वाढवणारी आहे आणि येत्या काळात तिनं ऑलिंपिक पदकाचं लक्ष्य समोर ठेवलं आहे.

खरंतर मालविकाला टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीमनं घेतलं, तेव्हा ते आठ वर्षांचं प्रोजेक्ट होतं. कुठल्याही खेळाडूला ऑलिंपिकपर्यंत पोहोचेपर्यंत तेवढा वेळ लागतोच.

2024 च्या ऑलिंपिकआधी मालविकाचं रँकिंग 28 एवढं होतं, तेव्हा थोडं पुश केलं असतं तर कदाचित ती पॅरिसमध्ये खेळू शकली असती. पण मालविकाचं लक्ष्य 2028 चं ऑलिंपिक हे असल्याचं तृप्ती सांगतात.

“तिनं या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं आहे. काहीही झालं तरी आपण पुरेपूर प्रयत्न करायचे, सतत सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करायचा, आधीच्या पेक्षा पुढच्या सामन्यात जास्त चांगली कामगिरी बजावायची यावर ती लक्ष देते आहे.”

खेळ आणि अभ्यासाची तारेवरची कसरत

मालविकाला बॅडमिंटनसाठी शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं आणि शिक्षणामुळे खेळाकडे दुर्लक्ष झालेलंही तिला आवडणारं नव्हतं. त्यामुळे या दोन्हीमध्ये समन्वय साधताना तिने बरेच कष्ट घेतले. अखेर त्या कष्टांचं चीज झालं.

दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांमध्ये तिला 90 टक्क्यांच्या वर गुण पडले. इतकंच नाही या दोन्ही वर्षांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्येही ती खेळली आणि पदकही पटकावले.

पण शिक्षण आणि खेळ यांचा समतोल साधताना मालविकाला जी तारेवरची कसरत करावी लागली, त्या अनुभवातून खेळ आणि शिक्षण यांची सांगड घालण्यासाठी बरंच काही करण्याची गरज आहे, असं तिला वाटतं.

देशासाठी पदक जिंकतानाच ज्यांना शिक्षणातही मागे पडायचं नाही, अशा महिला खेळाडूंच्या गरजांविषयी व्यवस्थेने अधिक संवेदनशील असायला हवं आणि तसं झाल्यास यापुढे कुठल्याही मुलीला शिक्षण किंवा खेळ यापैकी एकाचीच निवड करण्याची गरज पडणार नाही, असं मालविकाचं म्हणणं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)