‘बकरं फाडल्यावानी माझ्या लेकराला फाडलं,’ बोंढार हवेली गावात नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Amol Langar
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
“कोंबड्यासारखं आतडं बाहेर काढलं, बकरं फाडल्यावानी फाडलं त्यांनी लेकराला माझ्या. अशी मारण्याची पद्धत नसते. दोन मिनिटांत मारलं त्याला,” हे शब्द आहेत 55 वर्षीय वंदना भालेराव यांचे.
आपल्या मुलाची हत्या होत असताना त्या अगदी त्याच्यापासून हाकेच्या अंतरावर होत्या. काही सेकंदात मुलाजवळ पोहचल्या पण त्याला वाचवू शकल्या नाहीत.
आपल्या पोटच्या तरुण पोराला वंदना यांनी हत्या झाल्यानंतर काही सेकंदात पाहिलं, त्याच्या खंजीर खुपसलेल्या पोटातून बाहेर आलेलं आतडं हातात धरून त्या मदतीसाठी गावकऱ्यांची विनवणी करत होत्या, पण दवाखान्यात नेताच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
ही घटना घडली आहे नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात. 1 जून रोजी गावातल्या एका किराणा मालाच्या दुकानासमोर 24 वर्षीय अक्षय भालेरावची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यावेळी वंदना भालेराव घरातच होत्या. त्यांच्या घरापासून अगदी काही पावलांवर असलेल्या दुकानासमोर त्यांच्या मुलाची हत्या झाली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
या गावात यंदा पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यासाठी अक्षयने पुढाकार घेतला होता आणि म्हणूनच द्वेषातून त्याची हत्या केल्याचा आरोप भालेराव कुटुंबियांनी केला आहे.
‘आमच्या गल्लीतून भीम जयंती कशी नेता असं म्हणत मारहाण सुरू केली’
नांदेड शहरापासून 7 किलोमिटर अंतरावर असलेल्या बोंढार हवेली या गावात आम्ही पोहोचलो त्यावेळी गावाला पोलिसांच्या छावणीचं स्वरुप आलं होतं. जागोजागी पोलीस बंदोबस्त होता.
गाव सुरू होताच महामार्गालगत भालेराव कुटुंबियांचं घर आहे. कच्च्या विटांचं एक छोटं घर आणि बाहेर चार पत्र्यांचं उभं केलेलं शौचालय. तिथेच बाजूला अंगणात एका खुर्चीवर हार घातलेला अक्षय भालेरावचा फोटो ठेवला होता.
अक्षयचे वडील श्रावण भालेराव आणि आई वंदना भालेराव आम्हाला तिथेच भेटले. घरात काही नातेवाईक आणि बाहेर राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, संघटनांचे कार्यकर्ते यांची वर्दळ सुरू होती.
अक्षयची आई वंदना भालेराव काही महिलांसोबत तिथेच बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, “अक्षयला मारत होते त्यावेळी मी घरीच होते. मला जोरजोरात आवाज ऐकू आल्यावर मी धावत गेले. महार उल्लेख करत तू कशाला आलास दुकानावर म्हणत त्याला खाली पाडलं. आधी त्याला काठ्यांनी मारलं. लाथ मारली. आडवं पाडलं.
"दोघांनी हात धरले. एकानं खंजीर खुपसला. मी मोठ्या मुलाला विचारलं काय झालं? तो म्हणाला, आई महार म्हणालेत. मी वाचवण्यासाठी आलो माझ्याही हातावर खंजीर मारला. तिकडून उलट आमच्यावरही दगडफेक सुरू होती. माझ्या पायाला लागलं.”

फोटो स्रोत, amol langar
अस्वस्थ चेहऱ्याने त्या म्हणाल्या, “माझ्या लेकराला वाचवा…वाचवा…म्हणून मी सगळ्यांना विनवण्या करत होते. त्याच्या पोटावर वार केले होते, त्याचं आतडं बाहेर आलं होतं. मी स्वत: माझ्या हाताने आतडं धरून ठेवलं आणि मदतीसाठी सगळ्यांना विचारत होते. रिक्षाने दवाखान्यात गेले तर तिथे तुमचा मुलगा गेला असं मला सांगितलं.”
“अशी मारण्याची कुठे पद्धत असते? कट रचून मारलं माझ्या पोराला. कोंबड्यासारखं आतडं बाहेर आलं, बकरं फाडल्यावानी माझ्या लेकराला फाडलं,” असं बोलता बोलता त्या भावनिक झाल्या.
“माझ्या मुलाला जसं तडफडवून मारलं तशीच शिक्षा त्याच्या मारेकऱ्यांना झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

फोटो स्रोत, amol langar
अक्षय भालेराव हा तीन भावंडांमध्ये सगळ्यांत लहान होता. त्याचं शिक्षण बारावीपर्यंत झालं होतं. रस्त्याच्या बांधकामात मजुरीचं काम करायचा. तसंच तो वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखेचा पदाधिकारी होता.
बोंढार हवेली गावात यापूर्वी कधीही भीम जयंतीची मिरवणूक निघाली नव्हती. यंदा पहिल्यांदाच अक्षय भालेराव आणि त्याच्यासह ग्रामस्थांनी मिरवणुकीसाठी जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे परवानगी मागितली होती.
मिरवणुकीपूर्वी गावात पोलिसांनी एक बैठकही घेतली आणि ठरल्याप्रमाणे 29 एप्रिल रोजी गावात भीम जयंतीची मिरवणूक निघाली.
मिरवणुकीला महिना उलटला
1 जून रोजी गावात एका लग्नाची वरात सुरू असताना हा प्रकार घडला. अक्षयचा मोठा भाऊ आकाश भालेराव त्यावेळी त्याच्यासोबत होता. दोघंही घराजवळच्या किराणा मालाच्या दुकानात गेले होते आणि त्याचवेळी तिथून लग्नाची वरात निघत होती.
आकाश भालेराव सांगतात, “संध्याकाळी सात वाजता आम्ही दुकानात गेलो होतो. आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली. एकाच्या हातात खंजीर आणि दुसऱ्याच्या हातात तलवार होती. त्याने माझ्या भावावर वार केले. मी वाचवायला गेलो तर माझ्या हातावर वार केला. मग आई वाचवायला आली. तिलाही लाथा-बुक्क्या मारल्या.”

फोटो स्रोत, amol langar
“आमच्या गल्लीतून भीम जयंती कसं काय नेता? असं बोलून त्यांनी मारामारीच केली. त्यांच्या हातात आधीपासूनच शस्त्र होतं. मारल्यानंतर त्यांनी दुकानाजवळची लाईट बंद केली आणि दगडफेक केली. आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलो पण त्यांनी सांगितलं तो गेला,”
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी गावातील 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 8 जणांना पोलिसांना अटक केली आहे तर 1 आरोपी फरार आहे. हत्या करणे, शस्त्र बाळगणे आणि अट्रोसिटीअंतर्गत पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे.
हत्येचं कारण मात्र पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
‘गावात कायमच आम्हाला अशी वागणूक दिली जाते’
56 वर्षीय श्रावण भालेराव आजही आपल्या मुलाच्या हत्येच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. “मुलगा मरावा आणि पैसा मिळावा असं कोणत्या बापाला वाटेल मला सांगा,” असं सांगत असताना त्यांना रडू कोसळलं.
“पूर्वीच्या वादांमुळेच, जयंती काढल्याचा खून्नस होता. अक्षयने पुढाकार घेतला होता. आम्ही परवानगी घेण्यासाठी गेलो तर पंधरादिवस ढकलाढकला केली. परवानगी दिली तर म्हणाले डिजे लावायचा नाही. जास्त वेळ नाचायचं नाही. गावात ढकलत ढकलत मिरवणूक काढावी लागली. अर्ध्या तासाच्या आत संपवायला लावली,” असा आरोपही त्यांनी केला आहे.
खरंतर ही पहिलीच वेळ नाही जेव्हा बोंढार हवेली गावात अशा पद्धतीने तीव्र जातीय तणाव निर्माण झालाय. यापूर्वी 2017 मध्ये गावातील बुद्ध विहारावर दगडफेक झाली होती. त्यावेळी 14 हून अधिक जणांवर अट्रोसिटीअंतर्ग गुन्हा दाखल झाला होता.

फोटो स्रोत, amol langar
या गावात प्रचंड जातीयवाद असून आम्हाला हीण वागणूक दिली जाते, असाही आरोप भालेराव कुटुंबियांनी केला आहे.
श्रावण भालेराव सांगतात, “आमच्याशी कायम असेच वागतात. आम्हाला शेतात जाऊ देत नाहीत. अडवणूक करतात. शेत पेरलं की ढोरं चारायची नाही म्हणतात. अनेक खोड्या करतात इथे असं आहे. गावात दोनच समाज राहतात. बुद्ध आणि मराठा. कोणत्याही पंगतीला आम्हाला बोलवत नाहीत. ग्रामपंचायतीची बैठक शेतात नाहीतर आखाड्यात घेतात. गावात होत नाही. आम्ही एकदा विचारलं तेव्हा गावातल्या मंदिरात घेतली. त्यांचे लोक वर बसले आणि आमच्या लोकांना खाली बसवलं.”
आता पोलिसांनी किमान तपास करून मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून द्यावी आणि त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे पण जातीय वळण चुकीचं’
भालेराव कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आम्ही सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांना भेटण्यासाठी गावात गेलो. दोन्ही समाजाच्या वस्त्यांभोवती पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते.
जवळपास 1200 लोकसंख्या असलेल्या बोंढार हवेली गावात 60 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता. गावातील ग्रामपंचायतीचं कार्यालय, शाळा आणि बुद्ध विहाराबाहेर पोलीस तैनात होते.
आम्ही गावात गेलो त्यावेळी बहुतांश ग्रामस्थ घरात होते. काही घरांबाहेर घरकामं सुरू होती. कोणी खिडकीतून बाहेर डोकावत होतं तर कोणी गच्चीवरून बाहेर पाहत होतं.
गावातील मारूती मंदिराजवळ असलेल्या घराजवळ आमची भेट गावातील उप-सरपंच सरस्वती तिडके पाटील यांच्याशी झाली. गावात घडलेली घटना अत्यंत वाईट असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. परंतु त्याला दिलं जाणारं जातीय वळण चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
त्या म्हणाल्या, “झालेली घटना दु:खद आहे. असं व्हायला नको होतं. ही पोरं दारू पिऊन, वेगळं वागून ही घटना झाली आहे. गावातील प्रत्येक कार्यक्रमात असे वाद होत असतात. या दोन-तीन वर्षांत या मुलामुलांनी ही सुरुवात केली आहे. त्यापूर्वी चांगलं होतं सगळं.”

फोटो स्रोत, amol langar
आंबेडकर जयंतीच्या वादातून ही घटना घडल्याचा आरोप आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या,
“शिवजयंती असो वा आंबेडकर जयंती आम्ही आमच्या पद्धतीने साजरी करायचो. शिवजयंती मंदिरात आणि आंबेडकर जयंती शाळेमध्ये करायचो. जयंती कधी केलीच नाही असं नाहीय. मिरवणूक कधी निघाली नव्हती. मिरवणूक बंद केली असं नाही यापूर्वी कधी कोणी काढलीच नव्हती. यंदा त्यांनी काढली. पण त्यातून घडलंय असं नाहीय.”
जयंतीवरूनच ही घटना घडली आहे हे कशावरून ते म्हणतात असाही प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, “याला कारण वेगळं आहे आणि वळण देतायत वेगळं. अतिशय दु:खद घटना आहे. परंतु आरोपांमुळे गाव अतिशय खालच्या पातळीवर गेलं आहे.”
गावात सातत्याने जातीय वाद होतो आणि एका समाजाला कमी लेखलं जातं किंवा त्यांना त्यांचे अधिकार दिले जात नाहीत, सन्मानपूर्वक वागवलं जात नाही या आरोपांवर तुम्ही काय सांगाल? या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांनी हे आरोप फेटाळले. गावात असं काही वातावरण नसल्याचा त्यांचा दावा आहे.
“आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा राग का करू? आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल, आम्ही लहानपणापासून शिकत आलोय. शिवाजी महाराजांचा आदर जितका आहे तितकाच त्यांचा सुद्धा आदर आहे,”असं त्या पुढे म्हणाल्या.

फोटो स्रोत, amol langar
मग आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीसाठी निवेदनावर तुम्ही सही का दिली नाही? तुम्ही सहभागी झाला होता का? या प्रश्नांची उत्तरं देताना त्या म्हणाल्या,
“काही कारणांमुळे आम्ही सही दिली नाही. कारण ऋषी महाराजांचा सप्ताह होता त्यावेळी गावात असाच धिंगाणा झाला आणि देवीच्या मिरवणुकीतही बायका खूप घाबरल्या होत्या. मिरवणुकीत त्याने (अक्षय) चाकू भीरकवला होता. आम्ही याची तक्रारही केली होती. गावातलं वातावरण चिघळलेलं होतं, वातावरण खराब आहे. मुलं दारू पितील, काही होईल म्हणून सही केली नव्हती. सही केली नाही म्हणून मला बोलवणंही आलं नव्हतं. मी बाहेर गेले होते म्हणून सहभागी झाले नाही. पण आमचे बाकीचे लोक गेले होते.”
दरम्यान, अक्षय भालेराव याच्यावर गावातल्याच अशा काही प्रकरणांमध्ये पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत, असंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ज्याला पोलीससुद्धा दुजोरा देतात.
गावतल्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांनी सुद्धा हीच भूमिका मांडली. गोविंद तिडके यांना भेटल्यानंतर त्यांनी हा जातीयवाद नसल्याचा दावा केला.
ते म्हणाले, “खुर्चीवर फोटो ठेऊन जयंती साजरी होत होती. पहिल्यांदाच मिरवणुकीची परवानगी मागितली. त्याला आम्ही रोकटोक केली नाही. उलट आम्ही फुलांसाठी आर्थिक मदत केली. पोलिसांनी बैठका घेतल्या. आता आरोप होतोय, त्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न होतोय.”
हत्येला राजकीय रंग?
गेल्या काही दिवसांत विरोधी पक्षांनी या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घटनेचा निषेध नोंदवत सखोल चौकशीची मागणी केली.
“ही घटना निंदनीय असून सरकारने प्रकरणाच्या खोलात जाऊन गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवावी,” या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.
काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही भालेराव कुटुंबियांची भेट घेतली. आरोपींना पाठिशी घालणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडे करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही दोन दिवसांपूर्वी बोंढार गावात जाऊन भालेराव कुटुंबियांची भेट घेतली.
यावेळी ते म्हणाले की, "अक्षयच्या कुटुंबाला मुख्यमंत्री निधीतून अधिकाधिक मदत मिळायला हवी. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसंच पडद्यामागे आणखी लोक असतील तर त्याचाही तपास व्हायला हवा."

फोटो स्रोत, amol langar
तर दुसऱ्याबाजूला युवा पॅथर संघटनेचे प्रमुख राहुल प्रधान यांनी पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केलाय.
ते म्हणाले, “आम्ही पोलिसांकडे त्यांच्या सीडीआर चौकशीची मागणी केली आहे. ज्या ज्या वेळेला गावात अट्रोसिटीच्या घटना घडतात पोलीस कुठलीही खबरदारी घेत नाहीत. घटना झाल्यानंतर प्रत्येकवेळी मी पोलिसांना माहिती दिली आहे. त्यामुळे पोलीस गावातल्या राजकीय दबावाखाली कदाचित काम करत असावेत असा माझा आरोप आहे.”
नांदेड पोलिसांचं म्हणणं काय आहे?
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. काही प्रत्यक्षदर्शींचे जबाब न्यायालयातही नोंदवले आहेत.
पोलिसांनी आरोप फेटाळले असून या प्रकरणात अनेक जण कुठल्याही ठोस पुराव्यांशिवाय आपआपल्या थिअरी मांडत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, amol langar
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनाही आम्ही भेटलो. पोलिसांना सखोल तपासासाठी वेळ द्यायला हवा असं ते म्हणाले.
“पोलीस तपास करत आहेत. यामागे कट रचला होता का यादृष्टीनेही तपास सुरू आहे. कुठेही असुरक्षिततेची भावना किंवा समाजाला धोका असल्याची भावना नाही. आम्ही सुरक्षा पुरवली आहे. गावातही बंदोबस्त आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, कोणीही या घटनेच्यासंबंधी सोशल मीडियावर दोन समाजात द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचा मजकूर,फोटो पोस्ट करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








