'वडील तिच्यासाठी सगळं करायचे, मग ती आय हेट यू, पपा असं लिहून आत्महत्या का करेल?'

“आमची मुलगी चिडली होती. ती तिच्या वडिलांसमोर तिला जसं हवं तसं वागू शकत होती. त्यामुळेच तिने असं पाऊल उचललं याचा आम्हाला धक्काच बसला आहे.”

“आमच्या मुलीचं हस्ताक्षर खूप वाईट होतं. माझ्या भावावर आरोप करण्यापूर्वी तिनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित चिठ्ठीतलं हस्ताक्षर तिच्या लिखाणासोबत पडताळून पाहिलं का?"

अजय दोडिया बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगत होते. अजय यांच्या पुतणीने आत्महत्या केली आहे. गुजरातच्या राजकोटमधील हे प्रकरण चर्चेचा विषय ठरलंय. याचं कारण म्हणजे या मुलीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी.

बीबीसी गुजरातीसोबत बोलताना अजय दोडिया यांनी त्यांच्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या. “माझा धाकटा भाऊ त्याच्या मुलीला एका खाजगी विद्यालयात विज्ञान शाखेचं शिक्षण देत होता. तिच्या शिक्षणावर लाखो रुपये खर्च करत होता. जर तिच्यावर प्रेम नव्हतं, तर तिच्यासाठी एवढं काही केलं असतं का? माझा भाऊ बीएसएफमध्ये काम करतो. सध्या त्याचं पोस्टिंग उत्तराखंडला आहे. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण, चांगलं आयुष्य मिळावं म्हणून तो कुटुंबापासूनही लांब राहतोय.

आत्महत्या ही शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या आहे.

जर तुम्हाला मानसिक ताण जाणवत असेल तर मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी. भारत सरकारची ‘जीवनसाथी’ नावाची हेल्पलाईन आहे. 1800 233 3330 हा या हेल्पलाईनचा क्रमांक आहे.

तुम्ही तुमच्या मित्रांशी नातेवाईकांशी संवाद साधा.

विद्यार्थिनीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आणि...

दिव्या राजकोटमधल्या रॉयल स्कूल ऑफ दोराजीमध्ये शिकत होती. 11 वी सायन्सला असलेली दिव्या 12 मार्चला रात्री दहा वाजता तिच्या हॉस्टेलमध्येच होती. तो तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता.

पोलिसांना तपासात तिने लिहिलेली चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत तिने वडिलांना दोष देत लिहिलं होतं की, ‘आय हेट यू पापा’

पण दिव्याच्या काकांनी या चिठ्ठीवरच आक्षेप घेतले आहेत. या चिठ्ठीची कोणतीही पडताळणी न करता आपल्या भावाला आरोपी ठरवलं जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्यांनी याबद्दल संतापही व्यक्त केला.

मृत विद्यार्थिनीचे काका अजय दोडिया म्हणतात, “आमच्या मुलीसोबत नेमकं काय झालं? आम्हाला त्याबद्दल काहीच माहीत नाहीये. आम्हाला कोणावर आरोपही करता येत नाहीयेत. शवविच्छेदन अहवाल आल्यावरच आम्हाला नक्की काय झालंय ते कळेल.

“तिने काही मागण्याआधीच तिचे वडील तिला हव्या असलेल्या गोष्टी घेऊन द्यायचे. तिनं रागाच्या भरात असं पाऊल उचललं याचा आम्हालाच धक्का बसलाय.”

ते पुढे म्हणतात, “आमच्या मुलीने लिहिलेली चिठ्ठी सापडली. पण तिचं हस्ताक्षर तर खूप वाईट आहे. या कथित चिठ्ठीतलं हस्ताक्षर तिच्या अक्षराशी जुळणारं नाहीये. माझ्या भावावर आरोप करण्यापूर्वी हे पडताळून पाहिलं गेलं का?”

त्यांनी सांगितलं, “माझ्या भावाला चार मुलं... दोन मुली आणि दोन मुलं. हे टोकाचं पाऊल उचलणारी मुलगी सगळ्या भावंडांमध्ये थोरली. तिची धाकटी भावंडं त्यांच्या गावीच एका खाजगी शिक्षण संस्थेत शिकताहेत. ज्यादिवशी ही दुर्दैवी घटना घडली त्याच रात्री साधारण आठ वाजण्याच्या सुमारास तिने घरी फोन केला होता. ती तिच्या वडिलांशी, भावंडांशी आणि आजीशी बोलली होती.”

“तिला थोडंसं बरं वाटत नव्हतं. त्यामुळे माझ्या भावानं तिला न्यायला येऊ का असं विचारलं. पण तिनं सांगितलं की, तिचे 12 वीचे अभ्यासवर्ग सुरू झालेत. त्यामुळे तिला घरी यायला जमणार नाही. आणि थोड्याच वेळात ती बातमी आली, ज्यावर आमचा कोणाचाही विश्वास बसणं कठीण होतं.”

“माझ्या भावाच्या कामामुळे तिची आजीच बऱ्याचदा तिला भेटायला जायची. कधीकधी मी पण तिला डबा द्यायला किंवा सोडायला जायचो. माझा भाऊ स्वभावानं खूप शांत आहे. माझ्या स्वतःच्या मुलांनाही काही हवं असेल, तर ते आधा त्याला जाऊन सांगतात. तो त्यांनाही कधी नाही म्हणत नाही.”

‘ती स्वभावाने थोडी हट्टी होती’

रॉयल स्कूल ऑफ दोराजीमध्ये 11 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्याने तिच्या हॉस्टेलच्या खोलीत आत्महत्या केली. इतर विद्यार्थिनींनी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार हॉस्टेल प्रशासनाला कळवला.

या मुलीचं कुटुंब कुटियाना इथे राहतं. या मुलीचे वडील रमेशभाई हे बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल आहेत. सध्या त्यांचं पोस्टिंग उत्तराखंडमध्ये आहे. आठवड्याभरापूर्वीच ते सुटीसाठी घरी आले होते.

या घटनेनंतर कुटुंबाला कळविण्यात आलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पण जेव्हा या चिठ्ठीचा मुद्दा समोर आला, तेव्हा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली.

दोराजी रॉयल स्कूलचे विश्वस्त रमेशभाई पेठानी यांनी बीबीसी गुजरातीसोबत बोलताना म्हटलं की, “मृत विद्यार्थिनी अभ्यासात फार हुशार नव्हती. तिचा स्वभाव थोडा हट्टी होता. जर एखाद्या कारणामुळे तिचे पालक आले नाहीत किंवा उशीरा आले, तर ती चिडायची. ही मुलगी 8 वी ते 10 वी आमच्याच शाळेत होती. त्यानंतर अकरावीचं एक सेमिस्टर तिने बाहेरून केलं आणि मग पुन्हा दुसऱ्या सेमिस्टरसाठी पुन्हा आमच्या शाळेत आली.”

“तिच्या पालकांना मी गेल्या चार-पाच वर्षांपासून ओळखतोय. तिने तिच्या चिठ्ठीत पालकांबद्दल जे लिहिलं आहे, तसे ते अजिबातच नव्हते. तिचे वडील स्वभावाने चांगले होते, मुलीसाठी काहीही करण्याची तिची तयारी होती. एखाद्या मुलीच्या मनात जे विचार येतात ते तिनं लिहिले आहेत, पण त्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा का?”

त्यांनी पुढे सांगितलं, “तिच्या रुम पार्टनरने सांगितलं की, ती मुलगी त्यादिवशी आजारी होती. तिला व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे ती सकाळीच औषधं घेऊन आली होती. त्यादिवशी बाकी विद्यार्थिनी रीडिंग रूममध्ये वाचत बसल्या होत्या. तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती रुममध्येच होती. रात्री दहाच्या सुमारास तिच्या रुम पार्टनर खोलीवर पोहोचल्या, तेव्हा तिने आत्महत्या केल्याचं त्यांच्या लक्षात आलं.”

‘आय हेट यू पपा’ लिहिलेली चिठ्ठी

त्या मुलीच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली.

या चिठ्ठीत लिहिलं होतं की, “पपा, माझ्या आत्महत्येचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे तुम्ही. मी तुमचा खूप तिरस्कार करते. कारण तुम्ही मला कधीच तुमची मुलगी मानलं नाही. तुम्हाल केवळ आदेश सोडायचे आणि रागावायचंच माहीत आहे.”

“मला आई आणि वडिलांचं प्रेम देणाऱ्या आजीसाठीच मला वाईट वाटतं. सॉरी, आजी. मला माफ कर कारण मी अशा टेन्शनमध्ये जगूच शकत नाही. पण, माझ्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही. माझ्या प्रत्येक अश्रूचा मी बदला घेईन.”

पोलिस काय म्हणतात?

दोरजी पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकाऱ्याने बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, त्यांना हॉस्टेलमधून रात्री दहाच्या आसपास फोन आला. ते तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण तिचा आधीच मृत्यू झाला होता.

प्राथमिकदृष्ट्या तिचा मृत्यू गळफास बसल्याने दिसत आहे, पण शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

त्यांनी पुढे सांगितलं की, या मुलीचे काका तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले होते. त्यांचा प्राथमिक जबाब नोंदविण्यात आला आहे. बाकी कुटुंबियांचे जबाब नोंदविणं बाकी आहे. त्यांनाही प्रचंड धक्का बसला आहे.

दिव्याचे वडील सुटीसाठी घरी आलेले, मात्र ते तिला भेटायला आले नाहीत. त्यामुळे ती चिडली असल्याचं या मुलीच्या रूम पार्टनरच्या जबाबातून समोर आलं आहे.

डॉक्टर काय म्हणतात?

आत्महत्येच्या अशाप्रकारच्या वाढत्या घटनांबबद्दल बोलताना मानसोपचारतज्ज्ञ जयवंत मकवाना यांनी म्हटलं, “वयात येणाऱ्या मुलांमध्ये उतावीळपणे केलेल्या कृतींमुळे आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. अशा कृती बहुतेक वेळा दुःख, अपराधभाव, गोंधळ, प्रचंड राग, असहायता किंवा निराशा अशा भावनांशी जोडलेल्या असतात.”

सोशल प्रेशर, सोशल मीडियावरील फॉलोइंग, पीअर प्रेशर, चुकीचं पालकत्व, यश मिळविण्याचा दबाव, नकार, तीव्र मानसिक धक्का, व्यसन अशा अनेक कारणांमुळे लहान मुलं आणि वयात येणाऱ्या मुलांमध्ये भावनिक उद्रेक पाहायला मिळतात, असं डॉक्टर मकवाना सांगतात.

एखादी व्यक्ती आत्महत्येच्या उंबरठ्यापर्यंत पोहचली आहे का याची काही सूचक लक्षण ते सांगतात.

सवयींमध्ये होणारे बदल, झोपण्याच्या-खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं, चटकन उदास होणं, कुटुंबात, मित्र-मैत्रिणींमध्ये न रमणं, त्यांच्यापासून तुटक राहणं या गोष्टी एखादी व्यक्ती निराश असल्याची किंवा मानसिक संघर्षात असल्याची चिन्ह असू शकतात.

त्याचबरोबर पोटदुखी, डोकेदुखी, थकवा यांसारखी शारीरिक लक्षणंही दिसतात.

दिव्याच्या प्रकरणाबद्दल डॉक्टर मकवाना यांनी म्हटलं, “या विद्यार्थिनीवर तिच्या वडिलांकडून यश मिळविण्यासाठी दबाव येत असेल. ती ते मानसिक दडपण सहन करू शकली नसावी आणि तिला मृत्यू हाच उपाय वाटला असेल.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)