'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला अशोक चव्हाण, विखे पाटील असे भाजप नेते विरोध का करत आहेत?

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

विधानसभा निवडणुकीत आता अवघ्या तीन दिवसांचा प्रचार सुरुय. प्रचाराच्या या रणधुमाळीत सगळेच पक्ष अत्यंत त्वेषानं मैदानात उतरल्याचं दिसत आहे. याच प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपची एक घोषणा सध्या वादात आहे, ती म्हणजे 'बटेंगे तो कटेंगे'!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात काही ठिकाणी सभा झाल्या. त्यात त्यांनी 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा दिली. तसेच या घोषणेसह त्यांचे मोठमोठे बॅनरदेखील राज्यात पाहायला मिळाले.

दुसरीकडं पंतप्रधान मोदींनी 'एक हैं तो सेफ हैं'चा नारा दिला. एकीकडे हिंदूत्व आणि दुसरीकडे विकास असे दोन्ही मुद्दे समांतरपणे घेऊन भाजप विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना दिसत आहे.

पण कोअर हिंदूत्वाचा अजेंडा मांडणाऱ्या काही नेत्यांच्या विशेष सभा भाजपकडून आयोजित केल्या जात आहेत.

'बटेंगे तो कटेंगे'ची घोषणा देऊन महाराष्ट्रात योगींचं ब्रँडींग करणं, कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांना महाराष्ट्राच्या प्रचारात सामील करून घेणं, हेही भाजपच्या रणनितीत दिसत आहे.

दुसरीकडे, याच घोषणेला भाजपचे काही नेते असहमती का दर्शवत आहेत? अभ्यासकांच्या विश्लेषणाच्या आधारे याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करुया.

कट्टर चेहरे आणि योगींचे ब्रँडींग का?

विधानसभा निवडणुकीत भाजपकडून माधवी लता यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी महिला नेत्यांना प्रचारात उतरवण्यात आलं.

विश्व हिंदू परिषदेद्वारे त्यांच्या लहान-लहान सभा आयोजित करण्यात आल्या. हिंदू स्वाभिमान मेळावा, लोकजागर अभियानासारखे कार्यक्रम घेऊन त्यात हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जात आहे.

यात माधवी लता यांनीही हिंदूंना एकत्र येण्याचं आवाहन केलं. दुसरीकडे सोलापुरात धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संत संमेलन झालं. त्यातही त्यांनी हिंदूंना एक होण्याचं आवाहन निवडणुकीच्या तोंडावर केलं.

या बातम्याही वाचा:

निवडणूक प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या आधी मुंबई, ठाणे परिसरात योगी आदित्यनाथ यांचे मोठमोठे बॅनर्स लागले होते. त्यावर 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा लिहिण्यात आला होता.

एकीकडे राज्यातले भाजप नेते विकासाच्या मुद्दे, जाहिराती, योजनांवर प्रचार करताना दिसतात, तर त्याच समांतर रेषेत हिंदुत्वाचा मुद्दाही प्रखरतेनं राबवला जात आहे.

पण, भाजपला या निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांचं इतकं ब्रँडींग का करावं लागत आहे? हिंदुत्वाची इतकी कट्टर भूमिका महाराष्ट्रात यशस्वी होईल का? हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात.

भाजप धर्माच्या नावाखाली सगळ्या जातींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे, असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना वाटतं.

बीबीसी मराठीसोबत बोलताना ते म्हणाले, “भाजप पक्ष निवडणुकीत सगळे फंडे वापरण्याचा प्रयत्न करतो. भाजपला हे माहिती आहे की आपल्याला मुस्लीम मतं मिळणार नाहीत. कट्टर हिंदुत्वाची लाईन पकडली तर त्याचा फायदा होतो का हे भाजप तपासून पाहत आहे.

जातीय अस्मिता बाजूला ठेवून भाजपच्या छत्राखाली धर्मासाठी एकत्र या, जातीवर धर्माला मात करू द्या, असा भाजपचा अजेंडा आहे. त्यामधून धर्माच्या नावाखाली सगळ्या जाती एकत्र करून त्यातून काही राजकीय फायदा मिळतोय का? असा भाजपचा प्रयत्न आहे.

योजना, विकास कामांच्या जाहिराती याचा फायदा होत नसेल तर हिंदुत्वाचा फायदा होतो का? हा शेवटचा प्रयत्न भाजप करू पाहत असल्याचं हेमंत देसाई यांना वाटतं.

पण, महाराष्ट्रात हे इतकं कट्टर हिंदुत्व चालणार नाही. महाराष्ट्रातले मुस्लीम आपआपसात मिसळलेले आहेत. महाराष्ट्रात हिंदू-मुस्लीम संबंध चांगले आहेत. महाराष्ट्रातलं जनमानस उत्तर प्रदेशासारखं नाही. त्यामुळे भाजपला इतक्या कट्टर हिंदूत्वाचा महाराष्ट्रात फायदा होईल, असं वाटत नाही, असंही ते सांगतात.

राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे यांच्या मते, “मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यामध्ये योगी आदित्यनाथ यांची क्रेझ आहे. गेल्या निवडणुकीतही मुंबई आणि नालासोपाऱ्यात योगींच्या सभा झाल्या होत्या. तिथं मतदारांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचा चेहरा फायद्याचा ठरतो.

दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातही कट्टर हिंदुत्ववाद पसरवण्याचा भाजपचा स्ट्रॅटेजिकली प्रयत्न दिसतोय. कट्टर हिंदुत्वाची लाईन पकडून इथला तरुण वर्ग भाजपकडे आणण्याचा प्रयत्न आहे.

या तरुणांना आक्रमकपणे हिंदुत्व मांडणारे योगीसारखे लोक अपील करू शकतात. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांचं ब्रँडींग होत असावं", असं साठे यांना वाटतं.

ते पुढं म्हणाले की, “विकासाच्या योजना, हिंदुत्व, शेतकऱ्यांसाठीच्या योजना हे सगळं आम्ही करतोय. पण, तुम्ही हिंदू म्हणून एकत्र राहिला तर आम्ही या गोष्टी करू शकतो, असं मतदारांना पटवून देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

पण, भाजपची ही रणनिती संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी होणं कठीण आहे. काही ठिकाणी नवीन तरुणाई त्यांच्याकडे जाऊ शकते. भाजपची ही लाँग टर्म स्ट्रॅटेजी असून ते पुढच्या निवडणुकांसाठी मतदार तयार करतात.

आता फायदा झाला नाही तरी पुढील काळात तो कसा होईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतात," असंही ते सांगतात.

पण 'बटेंगे तो कटेंगे' हे भाजपची अधिकृत घोषणा नाही आहे. भाजपच्या अधिकृत नेत्यांनी असं काहीही बोललेलं नाही.

'बटेंगे तो कटेंगे' शी भाजपचेच काही नेते असहमत का?

भाजप 'बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं' अशा घोषणा देत प्रचार करत आहे. पण, भाजपच्या काही नेत्यांना या गोष्टी खटकताना दिसत आहेत. यात पहिलं नाव म्हणजे पंकजा मुंडे.

त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, "मी भाजपची आहे म्हणून या घोषणेचं समर्थन करणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे असं मला वाटतं. महाराष्ट्रात कोणताही विषय आणण्याची गरज नाही."

त्यानंतर मी असं बोलले नव्हते असा खुलासाही पंकजा मुंडेंनी केला. "प्रिंट मीडियाच्या पत्रकारांनी मला विचारलं की, तुमचे नेते 'बटेंगे तो कटेंगे' असं बोलतात. त्यावर मी म्हटलं की मी त्यांच्याशी सहमत असायचं कारण नाही. पण, मी माझ्या भाजप पक्षाशी सहमत नाही असं बोलले नाही," असं पंकजा म्हणाल्या.

भाजपच्या या घोषणेशी असहमती दर्शवणारे दुसरे नेते म्हणजे काही महिन्यांपूर्वी भाजपवासी झालेले अशोक चव्हाण.

त्यांनी या घोषणेला थेट विरोध दर्शवला. ते माध्यमांसोबत बोलताना म्हणाले, " 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा पूर्णपणे अप्रासंगिक आहे. ही घोषणा महाराष्ट्रातल्या जनतेला आवडणार नाही. या घोषणेचा महाराष्ट्रासोबत काहीही संबंध नाही.

ही एक विशिष्ट घोषणा चांगली नाही आणि ती लोकांना आवडेल असं मला वाटत नाही. यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, याचा विचार करावा लागेल. 'बटेंगे तो कटेंगे' ही भाजपची अधिकृत घोषणा नाही", असंही अशोक चव्हाण म्हणाले.

“आपण सार्वजनिक काम करतो, ती कामं महत्वाची आहेत. पक्षाची विचारधारा मान्य आहे. 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेचं मी समर्थन करू शकणार नाही. महाराष्ट्रातलं वास्तव वेगळं आहे.

योगींनी काय विचार करून हे वक्तव्य केलं माहिती नाही. महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे, असं वाटत नाही” असं राधाकृष्ण विखे पाटलांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

पण, भाजपसोबत असणारी ही नेतेमंडळी त्यांच्याच घोषणेसोबत असहमती का दर्शवत असतील? तर याबद्दल या दोन्ही नेत्यांची नाळ काँग्रेससोबत जुळलेली होती, असं राजेंद्र साठे यांना वाटतं.

ते म्हणतात, “अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसी परंपरेत घडलेले नेते आहेत. आता त्यांच्यामध्ये ती विचारधारा किती उरली आहे माहिती नाही. पण, त्यांच्यासोबत आधीपासून असणारा मतदारांना 'बटेंगे तो कटेंगे' हे आवडणारं नाही.

आपण या घोषणेचं समर्थन केलं तर आपला मतदार गमावू अशी भीती त्यांना आहे. अहमदनगरमध्येही विखे पाटलांचा मतदार काही प्रमाणात मुस्लीम आहे, तर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा काही मतदार हा मुस्लीम आहे.

आपला नेता जर अशा घोषणांबद्दल भूमिका घेत नसेल तर मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. त्यामुळे अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील थेट विरोध करताना दिसतात.”

याच ठिकाणी राजेंद्र साठे आणखी एक प्रश्न उपस्थित करतात. ते म्हणतात, “योगींची भाजपमधली प्रतिमा 2019 सारखी राहिलेली नाही. मधल्या काळात त्यांना हटवण्यासाठी प्रयत्नही सुरू होते.

त्यामुळे अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील हे बोलू शकले. 2019 ची योगींचं वजन आता असतं तर या दोन नेते त्यांच्या घोषणेला किती विरोध करू शकले असते?”

अशोक चव्हाण आणि विखे पाटील काँग्रेसमधून आलेले असल्यानं त्यांनी विरोध केला असावा असं हेमंत देसाई यांना सुद्धा वाटतं.

ते पंकजा मुंडेंबद्दल बोलताना म्हणतात, “गोपीनाथ मुंडेंनी कधी धर्माचं राजकारण केलं नाही. त्यांनी ओबीसींच्या जातीचं राजकारण केलं. पंकजा त्यांच्या छत्रछायेत घडलेल्या आहेत.

पंकजा मुंडेंचं राजकारण वेगळ्या प्रकारचं आहे. मराठवाड्यात जातीनिष्ठ राजकारण चालतं. त्यामुळे अशा धर्माच्या राजकारणापासून दूर राहणं यातच पंकजांचा फायदा आहे.”

एकूण अशा प्रकारच्या रणनितीला मतदार कसा प्रतिसाद देतात हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)