You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्राचा निकाल काय असेल? जाणून घ्या 'या' 5 राजकीय विश्लेषकांचं मत
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
येत्या 23 तारखेला महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार? हा प्रश्न महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला पडलाच असेल. सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे.
या निवडणुकीत कोणता फॅक्टर चालणार? कोणत्या जातीय समीकरणांचं गणित मांडलं जाणार? मराठवाड्यात काय होणार? विदर्भात कुणाची सरशी होणार? मुंबईच्या लढाईत कोण जिंकणार? अशा अनेक प्रश्नांनी सध्या वर्तमानपत्रं आणि प्रसारमाध्यमं गजबजून गेली आहेत.
अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर विधानसभेतही याच विजयाची पुनरावृत्ती होऊ शकते असा विश्वास अनेक राजकीय निरीक्षकांनी लोकसभेनंतर व्यक्त केला होता.
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यभर विविध योजना आणि महामंडळं लागू करून निवडणुकीत परतण्याचा प्रयत्न केला आहे.
यामुळे आता निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निवडणुकीचं वारं नेमकं कुणाच्या बाजूने आहे हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने महाराष्ट्रातील आघाडीच्या राजकीय विश्लेषक आणि संपादकांशी संवाद साधला.
यामध्ये ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर सुहास पळशीकर, प्रकाश पवार, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि राही भिडे यांचा समावेश आहे.
या तज्ज्ञ मंडळींना विधानसभा निवडणुकीबाबत काय वाटतं? निकाल कुणाच्या बाजूने लागू शकतो? सध्या प्रचारात कुणी आघाडी घेतली आहे? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांचा धांडोळा आम्ही या बातमीमधून घेतला आहे.
कुणाला तरी बहुमत मिळेल का? सुहास पळशीकर म्हणतात
विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर म्हणाले की, "2014 नंतर महाराष्ट्रात भाजप हा एक मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा वर्चस्वशाली पक्ष म्हणून उदयाला येण्याचा प्रयत्न करेल. यात दुसरी शक्यता अशी आहे की, सध्या ज्या पद्धतीने युती आणि आघाडीचं राजकारण आहे, त्याच पद्धतीने हे राजकारण पुढची पाच ते दहा वर्षं चालू शकतं. तिसरा फॅक्टर हा आहे की सध्या राज्यात अनेक छोटे पक्ष उदयास आले आहेत, त्यामुळे निकालानंतर एक मोठा पक्ष आणि असे छोटे पक्ष एकत्र येऊन एक नवीन समीकरण तयार होऊ शकतं."
या निवडणुकीत नेमकं काय होणार? आणि कोणते मुद्दे निर्णायक ठरू शकतील या प्रश्नांची उत्तरं देताना पळशीकर म्हणाले की, "वरकरणी जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की महागाई, बेरोजगारी. पटकन विचारलं की लोक सांगतात हे प्रश्न आहेत. थोडं पुढे जाऊन विचार करू लागलो की आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रातील शेतीचा जो पेचप्रसंग आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा ग्रामीण भागामध्ये आहे. नुसतं ग्रामीण भागामध्येच नाही तर त्याचे शहरी भागात देखील पडसाद उमटतात."
पळशीकर म्हणाले की, "कारण ही जी शहरं आहेत, ती ग्रामीण भागात शेतीमध्ये पोट न भरल्यामुळे येऊन जे लोक राहत आहेत त्यामुळेच वाढू लागली आहेत. महाराष्ट्रातील स्थलांतरात सर्वात जास्त स्थलांतर ज्याला इन-मायग्रेशन म्हणतात ते आहे. म्हणजे राज्यातील राज्यात स्थलांतर होतं आहे. त्यामुळे शेतीच्या ज्या झळा आहेत त्या शहरात देखील जाणवणार."
पुढील मुद्दे सांगताना पळशीकर म्हणाले की, "तिसरा घटक म्हणजे सुप्रसिद्ध मुद्दा. म्हणजेच मराठा समाज काय करणार हा आहे. मग चौथा घटक म्हणजे या चार, पाच, सहा पक्षांच्या आघाड्या कशा होणार. त्यांची समीकरणं आणि ज्याला तांत्रिक भाषेत मतांचं हस्तांतरण म्हणतात, की तुम्ही उमेदवार असाल तर माझ्या पक्षाचे लोक तुम्हाला मतं देतील का? यावर निवडणुकीचे निकाल ठरतील."
डॉ. सुहास पळशीकर पुढे म्हणाले की, "मला असं वाटतं की लोक बोलताना वेगवेगळ्या गोष्टी बोलतात पण शेवटी उपजीविकेचे प्रश्न महत्त्वाचे ठरतात. सध्या लोकांचं आयुष्य सुखी नाही हा जो मुद्दा आहे, तो कुठेतरी लोकांच्या मनात राहणार आहे. कोणताच राजकीय पक्ष आपल्याला हे देत नाही हे जरी खरं असलं. तरी त्याची झळ नेहमी जास्त करून राज्यकर्त्यांना बसते."
पळशीकर पुढे म्हणाले की, "त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना या असमाधानाची झळ बसू शकते. वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांचा जो पाऊस पडलेला आहे, तो पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याचं कारण नेमकं हेच आहे. कारण त्यांनाही हे माहीत आहे की लोक असंतुष्ट आहेत आणि त्याचा आपल्याला फटका बसू शकतो."
या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे सध्या निवडणुकीत कुणाचं पारडं जड दिसतंय? या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. पळशीकर म्हणाले की, "कोणाच्या बाजूनं पारडं झुकलं आहे असं आता आजच्या घडीला वाटत नाही.लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांमध्ये एक टक्क्याचा फरक होता. म्हणजेच साध्या भाषेत बोलायचं झालं तर खरं पाहता, दोघांचीही ताकद सारखीच होती. त्यामुळे बहुसंख्य लढती या अटीतटीच्या होण्याची शक्यता आहे."
निकाल काय लागेल हे कुणीही सांगू शकत नाही - गिरीश कुबेर
विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर म्हणाले की, मला असं वाटतं ही निवडणूक ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीची बनली आहे.
प्रत्येक मतदारसंघात किमान 6-7 प्रभावी उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कुणीच या निवडणुकीचा अंदाज लावू शकतील असं नाही, असं कुबेर यांना वाटतं.
महायुती आणि मविआ यांच्यातल्या अंतर्गत स्पर्धेबाबत बोलताना कुबेर म्हणाले की, "पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःच्या पक्षातील उमेदवारांच्या यशापेक्षा त्यांच्या सहकारी पक्षातील उमेदवारांचे अपयश महत्त्वाचं वाटू लागलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपच्या जागा जास्त निवडून येऊ नयेत असं वाटतंय तर तीच परिस्थिती भाजप आणि अजित पवारांची आहे. त्यामुळे स्वतःच्या पक्षातले उमेदवार निवडून आणण्यापेक्षा सहकारी पक्षातील उमेदवारांना पाडण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत."
निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतील याबाबत बोलताना कुबेर म्हणाले की, "या निवडणुकीत सोयाबीन, ऊस, कापूस आणि कांद्याचे प्रश्न महत्त्वाचे ठरू शकतील. ही पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांचा अडचणी या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात. यासोबतच राज्यभर जो मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला आहे त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो."
गिरीश कुबेर यांनी सांगितलं की, "निडवणुकीची चर्चा करताना आणखी एक महत्त्वाच्या मुद्दा दुर्लक्षिला जातो आणि तो म्हणजे वाढत्या शहरीकरणामध्ये निर्माण होणाऱ्या सन्मानजनक रोजगाराच्या अपुऱ्या संधींचा. महाराष्ट्रात मागच्या काही दशकांमध्ये वस्तूंची निर्मिती करणारे नवीन कारखाने सुरू झालेले नाहीत. महाराष्ट्राचा भर या सेवाक्षेत्रावर राहिलेला आहे आणि यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींचा रोजगार हा कायमस्वरूपी नाही आणि याला सन्मानजनक स्थान देखील नाही. यामुळे यंदाच्या निवडणुकीत असा रोजगार न मिळालेला मतदार काय करणार? यावरही बरच काही अवलंबून असणार आहे."
महिला मतदार आणि लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना गिरीश कुबेर म्हणाले की, "दुर्दैवाने महाराष्ट्रात आणि देशातल्या पुरुषसत्ताक राजकीय व्यवस्थेमध्ये महिलांच्या राजकीय मतांना फारसं महत्त्व मिळत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा एवढा मोठा परिणाम होईल असं सध्यातरी दिसत नाही. यामुळे या 1500 रुपयांमुळे महिला त्यांचं राजकीय मत बनवू शकतील आणि ते निर्णायक ठरेल असं चित्र सध्यातरी दिसत नाही."
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना कुबेर म्हणाले की, "अशा योजनांच्या माध्यमातून पैसे वाटत असताना त्याची दुसरी बाजू देखील बघितली पाहिजे. महिलांच्या हातात पैसे आल्यामुळे शेतमजुरांचे भाव वाढले आहेत. आणखीन एक धारणा सध्या अशी दिसून येत आहे की, "पैसे मिळतायत तोपर्यंत घ्या, पुढचं पुढे बघता येईल.' त्यामुळे पैसे घेणारी महिला मतदान करेलच असं नाही. कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार महाडिक जे काही बोलले त्यावरून त्यांच्या पक्षात असणारा अविश्वास आणि अस्वस्थता दिसून येते."
गिरीश कुबेर म्हणाले की, "महिलांनी हे पैसे घेऊनही महायुतीला नाकारलं तर ती एका अर्थाने चांगली बाब ठरेल. कारण नागरिकांना उपकृत करून त्याबदल्यात मतं मिळवण्याची परंपरा यामुळे खंडित होऊ शकेल. आणि अशा लाभार्थी योजनांना खीळ बसू शकेल. महायुतीला लाडकी बहीण योजनेबाबत जो आत्मविश्वास आहे तो कदाचित यामुळेच चुकीचा ठरू शकतो."
या निवडणुकीत कोणता मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा ठरेल याबाबत बोलताना कुबेर म्हणाले की, "सध्यातरी शरद पवार या एका नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण आणि महायुती व महाविकास आघाडीला मिळणाऱ्या यशापयशाचं गणित अवलंबून असणार आहे. महाविकास आघाडी सत्तेत आली तर लोकांनी शरद पवार फॅक्टर स्वीकारला असं म्हणावं लागेल आणि महायुतीचा विजय झाला तर हा फॅक्टर मतदारांनी नाकारला असं म्हणता येईल. खरंतर सध्या कोणत्याच राजकीय पक्षाला किंवा नेत्याला नेमकं काय होईल याची शाश्वती नाहीये."
ही निवडणूक म्हणजे 'अभूतपूर्व रणधुमाळी' - निखिल वागळे
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे म्हणाले की, "यावेळेला होणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मी दोन शब्द वापरीन आणि ते म्हणजे 'अभूतपूर्व रणधुमाळी.' महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे काही अधःपतन झालेलं आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला या निवडणुकीत दिसतंय. निवडणुकीतील उमेदवारांच्या याद्या बघितल्या तर हे लक्षात येईल. बंडखोरी ही गोष्ट महाराष्ट्राला नवीन नाही. महाराष्ट्रात बंडखोर सतत होतेच, 95 च्या निवडणुकीत पंचेचाळीस अपक्ष निवडून आले आणि मनोहर जोशींचं सरकार आलं होतं. पण यावेळेला बंडखोर जास्त असतील. स्वतःसाठी उभे राहिलेले, दुसऱ्याला विजयी करण्यासाठी उभे राहिलेले अपक्ष खूप असतील."
निवडणुकीत होणाऱ्या गैरप्रकारांबाबत बोलताना वागळे म्हणाले की, "कोट्यवधी रुपये सापडलेत आता. निवडणूक आयोगाच्या तपासणी नाक्यांवर जर शंभर कोटी सापडले असतील तर बाहेर गेलेले असतात किमान पाचशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त. निवडणुकीतले सगळे गैरप्रकार महाराष्ट्राच्या निवडणुकीत झालेले आहेत. महाराष्ट्राला निवडणुकीतल्या गैरव्यवहारांची परंपरा आहे अगदी यशवंतराव चव्हाण यांच्या मतदारसंघातील मतपेट्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनी पळवल्याचे आरोप झाले होते. पण आता ही गैरव्यवहारांची पातळी खूपच खाली गेलेली आहे. मला असं वाटतं की यंदाच्या निवडणुकीत अभूतपूर्व अशी गुंडगिरी होईल."
वागळे म्हणाले की, "या निवडणुकीत गल्लीबोळातले गुंड वापरले जातील. या निवडणुकीत पैशांचा, गुन्हेगारांचा मोठा प्रभाव राहू शकतो. उमेदवारांची यादी बघितली तर त्याला केवळ घराणेशाहीच नाही तर 'नातेवाईकबाजी' असं म्हणता येईल अशी परिस्थिती आहे. अशा पद्धतीने उमेदवाऱ्या देऊन हे राजकीय नेते हाच संदेश देतायत की साध्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर निव्वळ सतरंज्याच उचलल्या पाहिजेत. आता बघा शरद पवारांच्या घरातच किती खासदार? किती आमदार आहेत? मला असं वाटतं की नेत्यांनी आदर्श घालून द्यायचा असतो ना. तुमच्याकडे तरुण कार्यकर्ते आहेत तुम्ही परंपरा मोडून त्यांना संधी द्यायला पाहिजे पण त्यापेक्षा घराण्यांचा प्रभाव वाढलेला आहे."
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होऊ शकते का? या प्रश्नाचं उत्तर देताना निखिल वागळे म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळालं तेवढा एकतर्फी निकाल यावेळी लागणार नाही. याचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात फिरताना मला जे वातावरण दिसलं होतं ते वातावरण आता दिसत नाही. त्यावेळी कोणता पक्ष जिंकणार यापेक्षा ती निवडणूक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या ताब्यात घेतलेली होती. महाविकास आघाडीकडे एक मोमेंटम होता. महाराष्ट्रात सिव्हिल सोसायटीच्या सभांनाही गर्दी होत होती. मला महाराष्ट्रात आता कुठेही ते वातावरण दिसत नाहीये."
निखिल वागळे पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीकडे असणारा मोमेंटम त्यांनी पाच महिन्यांमध्ये गमावला आहे. याचं कारण महाविकास आघाडीचे नेते लोकसभा निवडणुकीनंतर आळशी झाले. पाच महिन्यांमध्ये त्यांनी ते वातावरण टिकवून ठेवण्यासाठी काहीही केलं नाही. हे नेते स्वतःचे अहंकार गोंजारत बसले. त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. त्यामुळे लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये जे ऐक्य होतं ते आता त्यांच्यामध्ये नाही."
महायुतीमध्ये मतभेद नाहीत का? याबाबत बोलताना निखिल वागळे म्हणाले की, "महायुतीमध्ये सुद्धा मतभेद आहेत पण तिथे दंडुका घेऊन अमित शहा बसलेले आहेत. त्यांचा एक धाक आहे, त्यांची एक दहशत आहे त्यामुळे कोण बोलायची हिंमत करत नाही. महाविकासाआघाडीमध्ये कुणाला कोण विचारत नाही. शरद पवारांचा स्वतंत्र तंबू आहे, उद्धव ठाकरेंचा स्वतंत्र तंबू आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध नाना पटोले असं चाललेलं आहे."
"तुम्हाला (मविआ) मुसलमानांनी, दलितांनी मतं दिली. काय केलं तुम्ही त्यांच्यासाठी? मुसलमानांनी आयुष्यात पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला एवढी मतं दिली. मुस्लिम आणि साठ टक्के मराठी मतांमुळे मुंबईतली उद्धव ठाकरेंची ताकद वाढली. मुसलमानांसाठी तुम्ही काय केलंत? विशाळगडावर घरं जाळली तेव्हा तुम्ही तिथेसुद्धा गेले नाहीत. तिथे शाहू महाराज गेले पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही नेता गेला नाही. उद्धव ठाकरेंना फक्त मुलसमानांची मतं हवी आहेत का?"
निखिल वागळे यांनी सांगितलं की, "मविआकडे ते महायुतीपेक्षा कसे वेगळे आहेत हे सिद्ध करण्याची संधी होती. त्यांनी ही संधी गमावली. दुसऱ्या बाजूला महायुतीने लोकसभा निवडणुकीत झालेलं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कल्याणकारी योजना हे त्यांचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे. ज्यामध्ये लाडकी बहीण, काही ठराविक एचपीच्या पंपधारक शेतकऱ्यांना वीजमाफी अशा योजनांचा समावेश होतो. सरकारच्या तिजोरीत पैसे नसताना तब्बल 46,000 कोटी रुपयांची तरतूद त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी या योजनेची प्रसिद्धी उत्तम केली."
शेवटी निखिल वागळे म्हणाले की, "या योजनेच्या प्रसिद्धीमुळे लोकांना वाटलं की महायुती काहीतरी देते आहे. याला उत्तर म्हणून महाविकास आघाडीने काहीही केलेलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदेंची जी गद्दार म्हणून प्रतिमा तयार झाली होती तिला व्हाईट वॉश करण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत. यावेळेला शिंदेंना लोकसभेपेक्षा अधिक यश मिळेल असं मला वाटतं. कारण त्यांच्याविषयी थोडीशी सहानुभूती वाढलेली आहे."
विधानसभेत महायुतीचं मोठं नुकसान होणार आहे - राही भिडे
ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या की, "सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये सुरू असलेल्या सत्तास्पर्धेत कुणालाही कशाचंही भान राहिलेलं नाही. प्रत्येकजण स्वतः मोठा असल्याचा दावा करतोय. महायुतीला वाटतं की लाडकी बहीण योजनेमुळे भरभरून महिलांची मतं मिळतील. पण तशी परिस्थिती नाहीये. माझ्या संपर्कात असलेल्या महिला सांगतात की आम्हाला उद्धव ठाकरेंचं बदलेलं चिन्ह आम्हाला समजतं."
राही भिडे म्हणाल्या की, "लोक सजग झाले आहेत. त्यांना कुणाला मतदान करायचं हे पक्क माहीत असतं. महायुतीने मध्य प्रदेशात जे झालं ते महाराष्ट्रात करता येईल या भ्रमात राहू नये. महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे. महाराष्ट्राकडे स्वतःच्या राज्याबाबतची कल्पना आहे. हे राज्य पुरोगामी राज्य म्हणवलं जातं पण या राज्यात कितीतरी मोठे लढे, दंगली झाल्या पण शेवटी महाराष्ट्राचा मुख्य पोत हा बदललेला नाही."
राही म्हणाल्या की, "देवेंद्र फडणवीसांना सत्ता टिकवण्यासाठी काय काय पराक्रम करावे लागले. सगळे गुवाहाटीला निघून गेले. याआधी देखील बंडखोरी झाली होती. 1999 ला शरद पवारांनी बंडखोरी केली होती."
शरद पवारांबाबत बोलताना राही भिडे म्हणाल्या की, "महायुती सरकार याआधी देखील एका टर्मपेक्षा जास्त टिकलं नाही. त्यांना एकच टर्म मिळाली होती. दुसरी टर्म त्यांना मिळता कामा नये या ईर्ष्येने लोक लढत आहेत. मलातरी असं वाटतं की भाजपचं मोठं नुकसान होणार आहे."
जातीचा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार - डॉ. प्रकाश पवार
राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार म्हणाले की, "महाराष्ट्राच्या निवडणुकीत जात हा घटक सर्वात जास्त परिणाम करणार आहे. महाराष्ट्राला जातीवादाचं रूप नाही परंतु जात ही आरक्षणाच्या आणि प्रदेशाच्या अंगाने खूप महत्त्वाची झालेली आहे. म्हणजे तुम्ही मराठवाड्याचा विचार केला तर तिथे जरांगे पाटील यांचं आरक्षणासाठीचं आंदोलन, त्याच्याविरोधात ओबीसींचा आंदोलन. या रूपामध्ये जातींची गणितं जुळवणं हे राजकीय पक्षांचं पहिलं ध्येय असल्याचं दिसतं."
प्रकाश पवार म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्वाच्या पातळीवर तुल्यबळ असे दोन पक्ष म्हणजे भाजप आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तर या दोन्ही पक्षांनी ओबीसी आणि मराठा यांना एकत्र आणण्याची रचना केली. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक ओबीसी आणि एक मराठा असं तिकीट वितरण करण्यात आलं आहे. शरद पवारांनीसुद्धा पश्चिम महाराष्ट्रात एक ओबीसी आणि एक मराठा अशी रचना केलेली आहे."
"थोडक्यात काय तर भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे थेट एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करतायत आणि यांना मिळणाऱ्या यशावरच महाराष्ट्राच्या निवडणुकीतील यश अपयश ठरणार आहे."
मराठा आरक्षणाबाबत बोलताना डॉ. प्रकाश पवार म्हणाले की, "भाजपने मराठा आरक्षणाच्या मागणीतून नुकसान होऊ नये म्हणून मराठा उमेदवारांना उमेदवारी देण्याची व्युव्हरचना आखली आहे. जेणेकरून हे उमेदवार त्यांची मराठा मतं घेऊन येतील आणि भाजप त्यांच्या पदरात ओबीसी मतं टाकेल आणि तो उमेदवार विजयी होईल."
ओबीसींबाबत बोलताना प्रकाश पवार म्हणाले की, "महाराष्ट्रातला ओबीसी भाजपच्या पाठीमागे एकमुखाने एकवटेल असं मला वाटत नाही. याचं कारण आहे की देवेंद्र फडणवीसांनी मागच्या पाच वर्षांमध्ये मराठा एकीकरणाचा पॅटर्न राबवला होता. उदाहरणार्थ उदयनराजे, राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक ओबीसी त्यावेळी दुखावला गेलाय आणि शरद पवार आणि काँग्रेसने तेव्हापासूनच या नाराज ओबीसींना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे."
शरद पवारांबाबत बोलताना प्रकाश पवार म्हणाले की, "आधीपासूनच शरद पवारांची प्रतिमा ही केवळ मराठावादी नाही तर ओबीसी अधिक मराठा अशी आहे त्यामुळे हरियाणात जे घडलं ते महाराष्ट्रात होईल असं वाटत नाही."
शेवटी प्रकाश पवार म्हणाले की, "लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी प्रचंड पुढे होती. पण सध्या दोन्ही बाजू समसमान चालल्या आहेत. गेल्या एकदिड महिन्यामध्ये वेगवेगळ्या घोषणा करून महायुतीने एक दीड टक्क्यांचा फरक भरून काढलेला आहे. आजच्या घडीला कुठलीच आघाडी विजयाचा दावा करू शकणार नाही. महाराष्ट्राची निवडणूक ही हरियाणाच्या धर्तीची नाही तर महाराष्ट्रालाच स्वतःचा आकार देणारी निवडणूक आहे. यामध्ये भाजपचा विजय झाला तर भाजपने राजकारणाची संपूर्ण कुस बदलून टाकली असं म्हणता येईल. आणि जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर देशपातळीवर देखील काहीही घडू शकतं."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.