You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चेक पोस्टवरचा हवालदार ते कोट्यधीश, सौरभ शर्मा भ्रष्टाचार प्रकरण नेमकं काय आहे?
- Author, विष्णुकांत तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गुरुवार 20 डिसेंबरपासून मध्यप्रदेशात लोकायुक्त आणि आयकर विभागाने छापे मारणं सुरू केलं. त्यात आतापर्यंत 52 किलो सोनं, 230 किलो चांदी और 17 कोटी रुपये रोख रक्कम जप्त केली गेली.
अशातच मध्यप्रदेशातले सौरभ शर्मा आणि चेतन सिंह गौर या दोन हवालदारांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलं.
सध्या आयकर विभागाकडून चेतन सिंह यांची चौकशी केली जातेय. तर दुसरीकडे, सौरभ शर्मा यांचा शोध सुरू आहे.
2016 मध्ये परिवहन विभागात सौरभ शर्मा यांची अनुकंपा तत्त्वावर नेमणूक झाली होती. एखादा कर्मचारी कामावर रुजू असताना त्याचा अकस्मात मृत्यू झाला तर त्या जागी त्याच्या वारसाची नेमणूक केली जाते. त्याला अनुकंपा नियुक्ती म्हणतात.
अशी नियुक्ती झाल्यानंतर आठ वर्षांतच सौरभ शर्मा यांनी कोट्यवधीची संपत्ती जमवली. तपासणी नाक्यावरचे हवालदार ते करोडपती असा प्रवास केलेल्या सौरभ शर्मा यांची गोष्ट वरवर एखाद्या सिनेमाच्या कथेसारखीच वाटते.
मध्य प्रदेश लोकायुक्त प्रमुख जयदीप प्रसाद बीबीसीशी बोलताना सांगत होते की 18 डिसेंबरला सौरभ शर्मा यांच्या विरोधात मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर छापेमारी सुरू झाली.
तशातच मध्य प्रदेशची राजधानी भोपाळजवळच्या मेंडोरी-कुशालपूर भागातल्या जंगलात गुरूवारी 20 डिसेंबरला एक बेवारस चारचाकी गाडी सापडली. त्याबद्दल आयकर विभागाला कळवलं गेलं.
या गाडीत 52 किलो सोनं आणि 10 कोटी रुपये होते.
गाडीच्या नंबर प्लेटवरून ती चेतन सिंह गौर यांच्या मालकीची असल्याचं समजलं आणि मग एक एक करत अनेक गोष्टी पुढे आल्या.
अशी मिळाली हवालदाराची नोकरी
गाडीत सोनं आणि पैसे मिळाल्यानंतर पुढे सौरभ आणि त्यांचे सहकारी चेतन यांच्याकडून लोकायुक्ताच्या पथकानं 230 किलोंपेक्षा जास्त चांदी आणि कोट्यवधी रुपये जप्त केले.
"आमच्याकडे सौरभ शर्मा यांच्या विरोधातल्या तक्रारी येत होत्या. त्या तक्रारींचा पाठपुरावा केला आणि न्यायालयाकडून तपास वॉरंट घेऊन सौरभ शर्माच्या घरी आणि त्यांच्या ऑफिसवर छापे मारले. त्यांच्या ऑफिसवरच चेतन सिंह राहत होते," जयदीप प्रसाद सांगत होते.
"ही कारवाई सुरू असतानाच दोघांनी घाबरून सोनं आणि पैसे लपवण्याचा प्रयत्न केला असावा, असा आमचा अंदाज आहे. तेच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले," ते पुढे म्हणाले.
सध्या शर्मा फरार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात सौरभ शर्मा यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील डॉक्टर आर. के. शर्मा आरोग्य विभागात काम करत होते.
त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ऑक्टोबर 2016 मध्ये सौरभ यांना अनुकंपा तत्त्वावर तिथंच नोकरी मिळणं अपेक्षित होतं. पण तिथं जागा मोकळी नसल्याने परिवहन विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली.
सात वर्षांत सौरभ शर्मा यांनी दोन डझन तपासणी नाक्यांवर ठेकेदारीचं काम केलं आणि त्यातून अमाप पैसा मिळावला, असं ग्वाल्हेरच्या परिवहन विभागातले एक अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगत होते.
चेकपोस्टवरून कोट्यवधींची कमाई
मध्यप्रदेश सरकारने या वर्षी जुलै महिन्यातच सगळे तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत राज्यात एकूण 47 तपासणी नाके होते. त्यातल्या अर्ध्या तपासणी नाक्यांची ठेकेदारी सौरभ शर्मा यांच्याकडेच असल्याचं अनेक लोक सांगतात.
"सुरूवातीला ग्वाल्हेरच्या परिवहन कार्यालयातच सौरभ यांना कामावर रुजू केलं गेलं होतं. वर्षभरातच त्यांनी तिथंही चांगली पकड मिळवली. मग तपासणी नाका विभागात त्यांची बदली झाली. तिथून अनेक तपासणी नाक्यावर वर्चस्व प्रस्थापित करणं त्यांना शक्य झालं. त्यातून फार कमी वेळात त्यांनी भरपूर पैसा कमवला," एक अधिकारी सांगत होते.
लोकायुक्तांनी सांगितल्याप्रमाणे, छापेमारीत विभागाला 7.98 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती मिळाली. त्यात हिरे, 200 किलो चांदी, अनेक महागड्या अलिशान गाड्या आणि रोख रकमेच्या नोटा होत्या. ही सगळी संपत्ती शर्मा यांच्या घरातून आणि ऑफिसमधून जप्त केली गेली.
लोकायुक्तमध्ये काम करणाऱ्या एका दुसऱ्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शर्मा यांनी 2023 मध्ये
स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर रिअल इस्टेट आणि हॉटेलच्या व्यवसायात त्यांनी प्रवेश केला होता..
सौरभ आणि चेतन हे फार घट्ट मित्र असल्याचंही अधिकारी सांगत होते.
ते दोघे चंबल अंचल इथं राहत. चेतनला कामाची गरज होती आणि सौरभने त्याची मदत केली असं आत्तापर्यंत पुढे झालेल्या चौकशीत पुढे आलंय. सौरभ यांच्याकडे तो कर्मचारी म्हणून काम करत होता असं चेतनचं म्हणणं आहे.
ज्या गाडीत 52 किलो सोनं मिळालं ती गाडी चेतनच्या नावावर असली तरी त्याचा वापर सौरभच करत असे, असंही अधिकारी सांगत होते. चौकशीत पुढे आणखी माहिती मिळेल असं ते म्हणाले.
ग्वाल्हेरच्या परिवहन विभागाच्या कार्यालयातले लोक याबद्दल बोलणं टाळत होते.
पण ग्वाल्हेरच्या रहिवासी भागातही सौरभ यांची भरपूर मालमत्ता असल्याचं एक अधिकारी सांगत होते. तीही त्यांनी गेल्या काही वर्षांतच जमवली आहे.
सौरभ शर्मा यांच्या कुटुंबात त्यांची आई, पत्नी आणि भाऊ आहेत.
त्याचे भाऊ छत्तीसगढ मध्ये सरकारी अधिकारी आहेत. "तो मुंबईत असल्याचं सौरभचे कुटुंबीय सांगत आहेत," लोकायुक्त अधिकारी सांगत होते.
त्यांच्या ग्वाल्हेरमधल्या घराला टाळं लावलंय.
प्रवर्तन निर्देशालय (ईडी) ने सौरभ शर्मा आणि त्याचे सहकारी चेतन सिंह गौर यांच्याविरोधात मनी लाँडरींग प्रतिबंधक कायद्यातंर्गत तक्रार दाखल केली गेली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.