टॉयलेट सीटमुळे आजार पसरतात, यात किती तथ्य आहे? तज्ज्ञ काय सांगतात?

    • Author, सोफिया क्वाग्लिया

दररोज शेकडो लोक वापरत असलेल्या टॉयलेट सीटवर बसताना तुमच्या मनात प्रश्न येत असेल की, या बाथरूममध्ये जंतू किती वेळ जिवंत राहत असतील?

सार्वजनिक शौचालयात पाऊल टाकताच तुमच्या मनात एकदम 'किळस' येते. सीटवर किंवा जमिनीवरील लघवीचं शिंतोडे, कुणाच्या तरी शरीरातून आलेला तीव्र वास, हे सगळं पाहून त्रास होतो.

मग बरेच लोक हाताऐवजी कोपरानं दार उघडतात, पायानं फ्लश करतात, सीटवर पेपर टाकतात किंवा सरळ बसायचं टाळून वरूनच बसतात.

पण खरंच फक्त सीटवर बसल्यानं आजार होतात का? की लोक जे टॉयलेट सीटला हात लावावा लागू नये यासाठी ज्या कल्पना लढवतात त्या सगळ्या उगाचच आहेत? या बाबतीत मायक्रोबायोलॉजिस्ट (सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ) काय सांगतात ते पाहूया.

हे आजार तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत

"तत्त्वतः हो, टॉयलेट सीटवरून आजार होऊ शकतो, परंतु त्याची शक्यता फारच कमी आहे," असं साऊथ फ्लोरिडा विद्यापीठातील पब्लिक हेल्थ आणि मायक्रोबायोलॉजीच्या प्राध्यापक जिल रॉबर्ट्स सांगतात.

जरा लैंगिक संबंधातून पसरणारे आजार (एसटीडी) पाहा. गोनोरिया ते क्लॅमिडिया असे जे आजार होतात, त्यामागचे बॅक्टेरिया आणि विषाणू शरीराच्या बाहेर जास्त वेळ टिकू शकत नाहीत. मग थंड आणि कडक टॉयलेट सीटवर तर अजिबात नाही.

म्हणूनच बहुतेक लैंगिक आजार फक्त थेट लैंगिक संपर्कातून किंवा शरीरातील द्रवांची देवाणघेवाण झाल्यावरच पसरतात. कुणाच्या शरीरातील ताजे द्रव टॉयलेट सीटवर लागलेले असतील आणि ते लगेच हाताने किंवा टिश्यू पेपरने जननेंद्रियांपर्यंत पोहोचले, तरच धोका असतो, असं रॉबर्ट्स सांगतात.

त्यामुळे थोडी काळजी घेणं आणि स्वच्छता पाळणं चांगलं, जसं की खूपच अस्वच्छ दिसणारे टॉयलेट टाळणं, पण यासाठी फार भीती बाळगण्याची गरज नाही.

"जर टॉयलेट सीटवरून एसटीडी सहज पसरले असते, तर असे आजार सर्व वयोगटांमध्ये आणि ज्यांचा लैंगिक संबंधांचा काहीही इतिहास किंवा संबंध नाही अशा लोकांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसले असते," असं रॉबर्ट्स सांगतात.

त्याचप्रमाणे, टॉयलेट सीटवरून रक्ताद्वारे पसरणारे आजार होण्याची शक्यता जवळजवळ नसतेच, असं रॉबर्ट्स सांगतात. कारण, जर सीटवर कुणाचं रक्त असलं, तर ते लगेच दिसेल आणि आपण तिथे बसणंच टाळू. शिवाय, लैंगिक संबंध किंवा दूषित सुई वापरण्याशिवाय अशा आजारांचा प्रसार होणं खूपच कठीण आहे, असं त्या म्हणतात.

टॉयलेट सीटवरून दुसऱ्या व्यक्तीचा युरिनरी इन्फेक्शन (यूटीआय) होण्याची शक्यता खूपच कमी आहे, असं रॉबर्ट्स सांगतात. त्यासाठी सीटवरून मलमूत्र थेट लघवीच्या मार्गात पोहोचायला हवं, आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात मल किंवा विष्ठा लागणं गरजेचं आहे. पण प्रत्यक्षात यूटीआय होण्याची अधिक शक्यता ही स्वतःच पुसताना मल जननेंद्रियांच्या खूप जवळ गेल्याने असते," असं त्या पुढे सांगतात.

कशाची काळजी घ्यायला हवी

काही लैंगिक आजार मात्र जरा जास्त काळ टिकू शकतात. जसं की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही), ज्यामुळे जननेंद्रियांवर गाठी किंवा मस्स (वार्ट्स) येतात. हा व्हायरस पृष्ठभागावर तब्बल एक आठवडाभर जिवंत राहू शकतो, पण ते अनेक गोष्टींवर अवलंबून असतं.

'हे व्हायरस खूप छोटे असतात आणि त्यांच्या भोवती मजबूत प्रोटीनचं कवच असतं, त्यामुळे ते वातावरणात जास्त काळ टिकू शकतात,' असं नेवाडातील टोरो युनिव्हर्सिटीच्या मायक्रोबायोलॉजी व इम्युनॉलॉजीच्या प्राध्यापक करेन ड्यूस सांगतात.

एचपीव्ही हा व्हायरस हात स्वच्छ करणाऱ्या सॅनिटायझरने सहज मरत नाही. त्याच्या भोवतीचं मजबूत कवच नष्ट करायला तब्बल 10 टक्के ब्लीच लागतं, असं ड्यूस सांगतात.

तरीसुद्धा हा व्हायरस शरीरात फक्त तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा टॉयलेट सीटवर बसताना जननेंद्रियाच्या त्वचेला जखम किंवा खरुज असेल. त्यामुळे एचपीव्ही बहुतेक वेळा थेट लैंगिक संपर्कातूनच, जसं की ओरल (तोंडावाटे), गुदद्वार.

त्याचप्रमाणे, एखाद्याला जननेंद्रियांचा हर्पिस (नागीण) असेल आणि तो तीव्र अवस्थेत असेल, तर त्याचा व्हायरस टॉयलेट सीटवर पडू शकतो. मग नंतर बसणाऱ्या व्यक्तीला जर त्वचेवर जखम असेल किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, तर त्याला धोका होऊ शकतो, असं अमेरिकेतील ट्रीटेड.कॉम या आरोग्यसेवा संस्थेचे क्लिनिकल लीड डॅनियल अ‍ॅटकिन्सन सांगतात. पण प्रत्यक्षात अशी शक्यता फारच कमी आहे, असंही ते स्पष्ट करतात.

टॉयलेट सीटला हात न लागता वापरणं खरंच गरजेचं आहे का?

सार्वजनिक शौचालय वापरताना सीटवर पेपर टाकून बसणं किंवा खास सीट कव्हर वापरणं हेच सगळ्यात स्वच्छ उपाय आहेत असं अनेकांना वाटू शकतं.

2023 मध्ये यूगव्ह या रिसर्च ग्रूपने केलेल्या सर्व्हेनुसार, अमेरिकेतील साधारण 63 टक्के लोक सार्वजनिक शौचालय वापरताना सीटवर बसतात. पण त्यापैकी निम्मे लोक आधी सीटवर टॉयलेट पेपर अंथरतात. त्याच सर्व्हेमध्ये सुमारे 20 टक्के लोक सीटला स्पर्श न करता बसतात असंही आढळलं.

परंतु, टॉयलेट सीटवर टिश्यू पेपर किंवा कव्हर टाकून बसल्यानं खरं तर फारसा उपयोग होत नाही. कारण हे सगळं छिद्रयुक्त असतं, त्यामुळे जंतू आत शिरून जननेंद्रियांपर्यंत पोहोचू शकतात. आणि त्याच्यावर बसणंही (स्क्वॅटिंग) नेहमी फायद्याचं नसून, कधी कधी त्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतं, असं ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटरमधील पेल्विक हेल्थ तज्ज्ञ स्टेफनी बॉबिंगर सांगतात.

जेव्हा स्त्रिया टॉयलेट सीटवर न बसता वर बसून (स्क्वॅटिंग) लघवी करतात, तेव्हा त्यांच्या पेल्विक फ्लोअर आणि पेल्विक गिर्डलच्या स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे मूत्राशयातून लघवी सहज बाहेर पडत नाही, जोर लावावा लागतो आणि पेल्विसवर अनावश्यक ताण येतो. यामुळे संपूर्ण मूत्राशय रिकामं होत नाही, आणि कधी कधी त्यामुळे युरिनरी इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं.

खरी समस्या कुठं आहे?

खरं पाहिलं तर बाथरूममध्ये आजार होण्याचा धोका हा टॉयलेट सीटला जननेंद्रिय लागण्यामुळे होत नसतो.

प्रत्यक्षात धोका हा टॉयलेट सीटला लागलेल्या हातांमुळे असतो. सीटवर तुमचं किंवा इतरांच्या शरीरातील थेंब किंवा लहान कण लागलेले असू शकतात आणि ते हाताला लागून बॅक्टेरिया किंवा व्हायरस शरीरात जाऊ शकतात.

मग तेच हात आपण चेहऱ्याला किंवा तोंडाला लावतो आणि संसर्ग होतो, असं रॉबर्ट्स सांगतात. त्यांच्या मते, धोका मागच्या भागाला नसून हातातून तोंडाला आहे.

सुरुवातीला, टॉयलेट सीटवर दिसणारे मलाचे डाग अनेक जंतू घेऊन येऊ शकतात, जसं की एस्चेरिचिया कोली, साल्मोनेला, शिगेला, स्टॅफिलोकोकस किंवा स्ट्रेप्टोकोकस. हे जंतू तोंडावाटे शरीरात गेले, तर पोट बिघडणं, मळमळ, उलट्या आणि जुलाब असे त्रास होऊ शकतात.

मलामध्ये नोरोव्हायरसचे अंशही असू शकतात. हा खूप पटकन पसरत जाणारा विषाणू आहे. तो दूषित पृष्ठभाग, अन्न-पाणी किंवा आजारी व्यक्तीच्या थेट संपर्कातून सहज पसरतो.

तो खूपच टिकाऊ आहे. काही पृष्ठभागांवर तो तब्बल दोन महिने जिवंत राहू शकतो. आणि आजार पसरवायला त्याचे थोडेसे कणसुद्धा पुरेसे असतात. फक्त 10 ते 100 व्हायरस पार्टिकल्समुळे एखादा माणूस आजारी पडू शकतो.

एका अभ्यासात आढळलं की, बाथरूममधल्या दूषित पृष्ठभागांना हात लावल्यानं लोकांना नोरोव्हायरसची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक असते. कोविड-19 किंवा अ‍ॅडेनोव्हायरसपेक्षा (जो साधारण सर्दी-खोकल्यासारखी लक्षणं देतो, पण वृद्ध किंवा कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांत गंभीर आजार होऊ शकतो) नोरोव्हायरसचा धोका जास्त मानला गेला.

तरीही अशा पद्धतीने आजारी पडण्याचा धोका खूप कमी असतो. 'बाथरूम म्हणजे एखाद्या जुन्या काळापासून न साफ केलेली जागा नाही. ती नियमित स्वच्छ केली जाते,' असं रॉबर्ट्स सांगतात.

त्या पुढं म्हणतात की, त्यांच्या मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या जागांच्या पृष्ठभागांवरून जंतू गोळा करून तपासले, तेव्हा संगणक प्रयोगशाळेत जितके जंतू सापडले ते टॉयलेटपेक्षा कितीतरी जास्त होते.

अमेरिकेत घरातील बाथरूम्स हे आम्ही विद्यापीठात अभ्यासलेल्या सार्वजनिक शौचालयांपेक्षा खूप जास्त जंतूयुक्त असतात," असं अ‍ॅरिझोना विद्यापीठातील व्हायरॉलॉजीचे प्राध्यापक चार्ल्स गेरबा सांगतात.

"म्हणूनच, बहुतेक ठिकाणी सार्वजनिक टॉयलेट वापरणं हे घरच्या टॉयलेटपेक्षा अधिक सुरक्षित असतं.

गेरबा यांच्या सर्व्हेनुसार, सार्वजनिक शौचालयं साफसफाई करणारे कर्मचारी दिवसातून अनेक वेळा पुसतात, धुतात. पण बहुतेक घरांमध्ये बाथरूम आठवड्यातून फक्त एकदाच साफ केलं जातं. गेरबा यांच्या प्रयोगशाळेच्या मते, घरातील बाथरूम साधारण दर तीन दिवसांनी स्वच्छ केलं पाहिजे.

फ्लशनंतर हवेत पसरणारे जंतू

बहुतेक लोक बाथरूममधील सीटची काळजी घेत नाहीत. आणि आपण विचार करतो त्यापेक्षा कमी वेळा लोक हात धुतात. पण टॉयलेट वापरल्यानंतर थेट हात तोंडात घालण्याचे प्रकार सहसा होत नाहीत. मात्र, आजार पसरायचा आणखी एक मार्ग बाथरूममध्येच असतो.

यालाच 'टॉयलेट प्ल्यूम' म्हणतात. म्हणजे काय तर, फ्लश केल्यावर कमोडमधील जंतू हवेत उडतात आणि बाथरूमच्या सगळ्या जागेवर पसरतात. त्यात तुम्ही आत असाल तर ते तुमच्यावरही येतात.

गणिती अंदाजानुसार कमोडमध्ये असलेले 40 ते 60 टक्के सूक्ष्मकण हवेत उडू शकतात. गेरबा यांच्या म्हणण्यानुसार यालाच काही लोक 'टॉयलेट स्निझ' म्हणतात.

सगळ्यात जास्त जंतू जमिनीवर म्हणजेच फरशीवर असतात.

शोधातून असं आढळून आलं आहे की, टॉयलेट फ्लश केल्यानंतर क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल नावाचा जीवाणू हवेत पसरतो. हा जंतू रुग्णालयांमध्ये जास्त दिसतो आणि वातावरणातून पूर्णपणे नष्ट करणे कठीण असतं. तो स्पोर्सद्वारे हवेत पसरतो आणि श्वासाद्वारे शरीरात जाऊ शकतो.

धोका फक्त टॉयलेट सीटमुळे नाही, तर टॉयलेटचं झाकण, दरवाज्याचे हँडल, फ्लश, वॉशबेसिनची नळी, टॉवेल डिस्पेंसर यांसारख्या गोष्टींमुळेही असतो. कारण आपण या वस्तूंना हात लावतो. गेरबा यांच्या मते, सर्वात जास्त जंतू जमिनीवर असतात.

टॉयलेटमध्ये फक्त लघवी किंवा विष्ठेमुळेच नाही, तर शिंक-खोकल्यामुळेही जंतू पसरतात. म्हणूनच बाथरूमच्या पृष्ठभागावर कधी कधी फ्लूचे विषाणूही आढळतात.

टॉयलेटमध्ये असताना आजारांपासून कसं वाचायचं?

टॉयलेटमध्ये (घरचं असो वा सार्वजनिक) आजार होऊ नयेत यासाठी काही सोपे उपाय करता येतात. लॉफबरो विद्यापीठातील वॉटर हायजीन इंजिनिअर एलिझाबेथ पॅडी यांच्या मते, टॉयलेटमधील वस्तूंना शक्य तितका कमी स्पर्श करावा.

त्यांचं म्हणणं आहे की, टॉयलेट कंपन्यांनी टच-फ्री फ्लश, साबण डिस्पेंसर, हँड ड्रायर वगैरे सुविधा दिल्या तर बाथरूम अधिक सुरक्षित होऊ शकतात.

टॉयलेट फ्लश करताना झाकण बंद करणं हे जबाबदारीचं वाटतं, पण 'झाकण बंद करून फ्लश केल्याने फार फरक पडत नाही,' असं गेरबा सांगतात. त्यांच्या 2024 च्या अभ्यासानुसार, फ्लशमुळे उडणारे विषाणू बाजूला पसरू शकतात, जरी झाकण बंद असलं तरी. कारण झाकण बहुतेक वेळा सीटला व्यवस्थित बसत नाहीत आणि सार्वजनिक टॉयलेटमध्ये पाण्याची बचत करण्यासाठी फ्लश अधिक दाबाने येतो.

खरंतर, पॅडी यांच्या मते, बाथरूम बनवणाऱ्या कंपन्यांनी टॉयलेटमधून झाकणच काढून टाकावं. कारण लोक झाकणाला हात लावतात आणि नंतर चुकून सीटला हात लावतात. 'झाकण हा योग्य उपाय नाही,' असं त्या म्हणतात.

पॅडी यांच्या मते, यापेक्षा अधिक प्रभावी उपाय आहेत. जसं टॉयलेट बाउलमध्ये असे शील्ड बसवणे जे सीट आणि बाउलच्या मधोमध येतात. सध्या हे मुख्यतः रुग्णालयात वापरले जाते, जेणेकरून नर्स आणि डॉक्टरांना पेशंटच्या फ्लशमुळे येणाऱ्या जंतूंपासून संरक्षण मिळू शकेल.

तसेच, बाथरूममधील हवा आणि पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी एअर स्प्रे वापरले जातात, जे टॉयलेट 'स्निझ'मुळे पसरणाऱ्या जंतूंचा धोका कमी करतात.

आणखी एक उपाय म्हणजे फ्लश केल्यावर लगेच बाहेर पळून जाणं. 'मी सहसा फ्लश करून लगेच निघते,' असं गेरबा सांगतात. तसेच, सार्वजनिक टॉयलेटमध्ये कोणीतरी आधी वापरल्यानंतर 10 मिनिटे थांबून जायची ते शिफारस करतात, पण प्रत्यक्षात हे करणं सोपं नाही.

म्हणून मोबाइल फोन ही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. रॉबर्ट्सच्या मते, टॉयलेटमध्ये फोन वापरणं टाळावं. कारण फोन आधीच खूप घाणेरडा असतो. तो तुम्ही सर्वत्र घेऊन जाता, कुठेही ठेवता आणि सतत हात लावत असता.

टॉयलेटमध्ये फोन नेल्यास, फ्लशमुळे पसरलेल्या जंतूंना फोनवर लागण्याचा धोका असतो, आणि हात धुतल्यावरही तुम्ही हे जंतू इतरत्र नेऊ शकता.

सर्वात सोपा उपाय म्हणजे टॉयलेट वापरल्यानंतर लगेच हात धुणे. गेरबा सांगतात की, टुसॉन, अ‍ॅरिझोनातील सरासरी माणूस फक्त 11 सेकंद हात धुतो, तर अमेरिकेच्या सीडीसीने (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) 20 सेकंद धुण्याचा सल्ला दिला आहे. 'फक्त पाच पैकी एकच माणूस हात योग्य पद्धतीने धुतो,' असं गेरबा म्हणतात.

म्हणूनच सार्वजनिक शौचालयात आजार होऊ नये म्हणून, हात धुवा. आणखी चांगलं म्हणजे, हात धुतल्यानंतर हँड सॅनिटायझर वापरा.

कारण दोन्ही एकत्र केल्याने फक्त हात धुतल्यापेक्षा जास्त सुरक्षितता मिळते. आणि टॉयलेटमध्ये जंतू आहेत या भीतीने घाबरून जाऊ नका. तुमचा धोका बहुधा जितका तुम्हाला वाटतो तितका नाही.

(महत्त्वाची सूचना: या लेखातील माहिती फक्त सामान्य माहितीसाठी दिली आहे. तुमच्या डॉक्टर किंवा इतर कोणत्याही आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला याची जागा घेऊ शकत नाही. या साइटवरील माहितीवर आधारित कोणताही निर्णय घेण्याची जबाबदारी वापरणाऱ्याची स्वतःची आहे. बीबीसी बाहेरील वेबसाईट्सची जबाबदारी घेत नाही आणि त्यातील कोणत्याही उत्पादनाची किंवा सेवांची शिफारस करत नाही. आरोग्याबाबत काहीही चिंता असल्यास, नेहमी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)