सार्वजनिक शौचालय, चेंजिंग रूम किंवा हॉटेलमधील छुप्या कॅमेऱ्यांपासून बचाव कसा कराल?

बंगळूरूमध्ये एका महिलेचा वॉशरूमध्ये छुपा व्हीडिओ बनवल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ही महिला 35 वर्षांची असून ती एका आयटी कंपनीत काम करते.

या महिलेचाच एक सहकारी शेजारच्या क्युबिकलमध्ये उभा राहून मोबाईलनं तिचा व्हीडिओ रेकॉर्ड करत होता, असा आरोप आहे.

महिलेला दरवाजाच्या मागे सावली दिसली. त्यामुळे तिनं कमोडवर चढून पाहिलं आणि आरोपीला रंगेहात पकडलं.

बीबीसीचे सहकारी पत्रकार इमरान कुरैशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र नंतर त्याला जामीन मिळाला. या घटनेनंतर कंपनीनं आरोपीला नोकरीवरून काढून टाकलं.

बाथरुम, चेंजिंग रुम आणि हॉटेलच्या खोल्यांमध्ये हिडन (छुपे) कॅमेरा आढळल्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत.

2015 मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी याचप्रकारची एक तक्रार केली होती. त्यात एका स्टोअरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं तोंड चेंजिंग रुमच्या दिशेनं होतं.

अशा घटनांना घाबरून सार्वजनिक शौचालय, चेंजिंग रूम किंवा हॉटेलमध्ये जाणं बंद तर केलं जाऊ शकत नाही. मात्र सतर्क राहून याप्रकारच्या छुप्या कॅमेरांना बळी पडण्यापासून बचाव केला जाऊ शकतो.

2018 मध्ये बीबीसीनं हा लेख पहिल्यांदा प्रकाशित केला होता. आता आम्ही तो पुन्हा प्रकाशित करीत आहोत.

हिडन कॅमेरा कसा ओळखावा?

सर्वात आधी हे जाणून घ्या की, कॅमेरे कुठे-कुठे लपवले जाऊ शकतात.

हिडन किंवा छुपे कॅमेरे खूपच छोटे असतात. मात्र ते तुमच्या सर्व कृती रेकॉर्ड करू शकतात. तुम्ही बाथरूममध्ये असा की एखाद्या स्टोअरच्या चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत असा की हॉटेलच्या खोलीत तुमच्या जोडीदारासोबत असा, हे कॅमेरे तुमचं रेकॉर्डिंग करू शकतात.

याप्रकारचा कॅमेरा कुठेही सहजपणे लपवला जाऊ शकतो. उदाहरणार्थ-

  • आरशाच्या मागे
  • दरवाजात
  • भिंतीच्या एखाद्या कोपऱ्यात
  • छतावर किंवा सिलिंगवर
  • बल्बमध्ये
  • फोटो फ्रेममध्ये
  • टिश्यू पेपरच्या डब्ब्यात
  • एखाद्या फुलदाणीत
  • स्मोक डिटेक्टरमध्ये

कॅमेरा कुठे हे शोधायचं कसं?

आधी तपासून घ्या: सायबर तज्ज्ञ म्हणतात की, सर्वात आधी तुम्ही सतर्क असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा सार्वजनिक शौचालय, चेंजिंग रुम किंवा हॉटेलच्या खोलीत जाता, तेव्हा चारही बाजूंना नीट पाहून घ्यावं. आसपासचं सामान पाहून घ्यावं. छताच्या किंवा सिलिंगच्या कोपऱ्यांमध्येही पाहावं.

एखादं भोक नसल्याचं तपासून घ्यावं: जर अशावेळी एखादं छोटंसं भोक/छिद्र दिसलं, तर त्याच्या आत तपासून पाहावं. त्यात काही ठेवण्यात तर आलेलं नाही ना याची खातरजमा करून घ्यावी.

कॅमेऱ्याला आरशाच्या मागे, फोटो फ्रेममध्ये किंवा बॅक डोअरसारख्या जागी लावलं जातं. थोडंसं सावध असल्यास ते सापडू शकतात.

एखादी वायर दिसते आहे का: कुठून एखादी जास्तीची वायर दिसते आहे का हे पाहावं. जर अशा प्रकारची वायर दिसली, तर ती कुठपर्यंत जाते आहे हे जाणून घ्यावं.

कदाचित ती वायर तुम्हाला कॅमेऱ्यापर्यंत घेऊन जाईल. अनेक कॅमेऱ्यांमध्ये तर कोणतीही वायर नसते. ते बॅटरीवर चालतात आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे कुठेही चिकटतात.

लाईट बंद करून तपासून घ्यावं: जर तुम्ही चेंजिंग रूम किंवा हॉटेलच्या खोलीत असाल, तर एकदा लाईट बंद करून चारी बाजूंना पाहून घ्यावं. जर कुठे एलईडीचा प्रकाश दिसला, तर कदाचित तो कॅमेरा असू शकतो.

कारण काही ठिकाणी नाईट व्हिजन कॅमेरे असतात. या कॅमेऱ्यात अंधारातील गोष्टींचं देखील रेकॉर्डिंग होऊ शकतं. या कॅमेऱ्यात एलईडी लाईट असतो. त्यामुळे अंधारात ते सापडू शकतात.

मिरर टेस्ट: चेंजिंग रूम, बाथरूम आणि खोलीत अनेक ठिकाणी आरसे लावलेले असतात. त्यांच्यासमोर उभं राहून आपण कपडे बदलतो, टॉयलेटला जातो. हॉटेलच्या खोलीमध्ये देखील मोठा आरसा असतो.

त्यामुळे आरशाच्या पलीकडून कोणीतरी तुम्हाला पाहत असल्याची किंवा त्याच्या मागे एखादा कॅमेरा लावलेला असण्याची आणि तो सर्व रेकॉर्डिंग करत असल्याची शक्यता असते. अशावेळी आरशांची नीट तपासणी करणंदेखील आवश्यक असतं.

त्यासाठी तुमचं बोट आरशावर ठेवावं आणि पाहावं. जर तुमटं बोट आणि आरशावर निर्माण झालेली प्रतिमा किंवा प्रतिबिंब यामध्ये थोडा गॅप किंवा अंतर दिसलं, तर आरसा योग्य आहे. मात्र जर तुमचं बोट आणि प्रतिबिंबामध्ये गॅप दिसत नसला तर त्याचा अर्थ काहीतरी गडबड आहे.

फ्लॅश ऑन करून पाहावं: लाईट बंद करून मोबाईलचा फ्लॅश ऑन करून चारही बाजूंना पाहावं. जर कुठून रिफ्लेक्शन आलं किंवा प्रकाश परावर्तित झाल्यासारखा वाटला, तर ती काच कदाचित कॅमेऱ्याची असू शकते. त्या दिशेनं जाऊन तिथे छुपा कॅमेरा नसल्याचं व्यवस्थित तपासून घ्यावं.

ॲप आणि डिटेक्टर: छुपा कॅमेरा शोधून काढणारे अनेक ॲप उपलब्ध आहेत. मात्र सायबर तज्ज्ञांनुसार, अनेक ॲप फेक किंवा बनावट देखील असू शकतात. हे बनावट ॲप तुम्हाला काहीही माहिती तर देणारच नाहीत, उलट तुमच्या मोबाईल फोनमध्येच एखादा व्हायरस सोडतील.

याशिवाय काही डिटेक्टर उपकरणं देखील बाजारात उपलब्ध आहेत. मात्र ही उपकरणं महागडी असतात, प्रत्येकजण ती विकत घेऊ शकत नाही. अशी उपकरणं पोलिसांकडे असतात.

कॅमेरा सापडला तर काय करावं?

जर तुम्हाला छुपा कॅमेरा सापडला तर घाबरू नका. लगेचच पोलिसांना संपर्क करा.

कॅमेऱ्याला हात लावू नका, कारण त्यावर आरोपीच्या बोटांचे ठसे असतील. पोलीस येईपर्यंत तिथेच थांबा.

या कॅमेऱ्यानं काढलेल्या व्हीडिओचं काय करतात?

विनीत कुमार सायबर तज्ज्ञ आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, "एक तर लोक स्वत:च पाहण्यासाठी याप्रकारे व्हीडिओ रेकॉर्ड करतात. दुसरं म्हणजे याची एक खूप मोठी बाजारपेठ देखील आहे."

"असे व्हीडिओ विकले जातात. मग या व्हीडिओंना वेबसाईट्सवर टाकलं जातं. असे व्हीडिओ अनेकजण पाहतात."

ते म्हणाले होते, "अनेकदा मुली किंवा तरुणी या गोष्टीची तक्रार करत नाहीत. त्यांना वाटतं की, त्यांनी जर याबद्दल कोणाला सांगितलं, तर त्यांची बदनामी होईल. मात्र त्यांनी घाबरता कामा नये. उलट पोलिसांना संपर्क करून मदत घेतली पाहिजे."

सायबरक्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या भारत सरकारच्या वेबसाईटवर देखील अशा प्रकारच्या तक्रारींची नोंद केली जाते. त्याचबरोबर महिला आयोगाची सायबर सेल तसंच महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सायबर सेलमध्ये देखील याची तक्रार करता येते.

छुपा कॅमेरा शोधण्यासाठी सायबर तज्ज्ञांनी अनेक सूचना तर दिल्या. मात्र, ते सर्वाधिक भर सतर्क राहण्यावर देतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)