You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मला एखाद्या वेश्येसारखी वागणूक दिली गेली', हैदराबादमधील स्पर्धेबाबत 'मिस इंग्लंड' काय म्हणाली?
- Author, बाला सतीश
- Role, बीबीसी तेलुगू
हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेली मिस वर्ल्ड स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेली 'मिस इंग्लंड 2025' ठरलेल्या मिला मॅगीने स्पर्धेच्या आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत.
एका ब्रिटिश नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत मिला म्हणाली की, "त्यांनी मला मी एखादी वेश्या आहे असा विचार करायला भाग पाडलं."
या वक्तव्यानंतर हैदराबादमध्ये गोंधळ उडाला आहे.
मिस इंग्लंड मिला मॅगी 7 मे 2025 रोजी हैदराबाद येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आली होती. मात्र, 16 मे रोजी ती परत निघून गेली.
आता या प्रकरणावर मिस वर्ल्डच्या सीईओ ज्युलिया मोर्ले यांनी बीबीसीकडे प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, हे प्रकरण म्हणजे भारताला (भारतीयांना) दुखावण्याचा एक प्रयत्न आहे. भारताबाबत द्वेष बाळगणारी एखादी व्यक्तीच असं वागू शकते. त्यांनी याबाबत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला असून मिस इंग्लंडकडून करण्यात आलेली टिप्पणी अत्यंत खालच्या पातळीची होती असं म्हटलं. त्यांनी भारताची माफीही मागितली आहे.
मायदेशी परतल्यानंतर मिला मॅगीने 'द सन' या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की, "मी तिथे एक बदल दाखवण्यासाठी गेलेली होते. पण मला एखाद्या कठपुतळीसारखं बसवलं गेलं. माझ्या नैतिकतेने मला तिथे बसण्याची परवानगी दिली नाही. आयोजकांना असं वाटलं की, मी तिथे फक्त मजा करण्यासाठी आलेली आहे. मला एखाद्या वेश्येसारखी वागणूक दिली गेली. श्रीमंत पुरुष प्रयोजकांसमोर आमची परेड घेण्यात आली, त्यानंतर मी तिथून परतण्याचा निर्णय घेतला."
"मिस वर्ल्डचा काळ आता संपला आहे. या स्पर्धेत दिले जाणारे मुकुट आणि पट्टे निरर्थक आहेत, तिथे जग बदलण्याची भाषा आता बोलता येत नाही. तुम्ही सकाळी स्वयंपाकघरात बसावं, मेकअप करावा आणि दिवसभर बॉल गाऊन्स घालून फिरावं एवढीच त्यांची अपेक्षा आहे."
'द सन'ने याबाबत लिहिलेल्या लेखात असं म्हटलं आहे की, मिला मॅगीला तिथे आलेल्या मध्यमवयीन पुरुषांचं सतत मनोरंजन करण्यास सांगितलं गेलं आणि यामुळे ती वैतागली होती.
मिला मॅगी द सनच्या मुलाखतीत म्हणाली, "सहा पाहुण्यांच्या एका टेबलासमोर दोन-दोन मुलींना ठेवण्यात आलं. त्या पाहुण्यांचं पूर्ण संध्याकाळ मनोरंजन करण्याच्या सूचना आम्हाला देण्यात आल्या. मला ते खूप चुकीचं वाटलं. मी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी तिथे गेलेली नव्हते. मिस वर्ल्ड स्पर्धेत काही नैतिकता असली पाहिजे. पण आता या स्पर्धा आधीसारख्या जुन्या पद्धतीनेच होत आहेत. या पद्धती कालबाह्य झाल्या आहेत. तिथे मी एखादी वेश्या असल्यासारखं वाटलं."
"मी तिथे ज्या विषयाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी गेले होते, त्याबाबत बोलायला लागायचे तेव्हा समोरची मंडळी अतिशय गैरलागू आणि कमी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायचे. यामुळे मला माझं म्हणणं मांडण्यात अडचणी आल्या. मला हे अजिबात अपेक्षित नव्हतं. त्यांनी आम्हाला लहान मुलांसारखी वागणूक दिली," असं मिला म्हणाली.
मिला मॅगीने तिच्या आईला फोन करून तिथे तिचं शोषण होत असल्याचं सांगितलं असं 'द सन'ने त्यांच्या लेखात म्हटलं आहे.
तेलंगणातील बीआरएसपक्षाने 'द सन'ने प्रकाशित केलेला लेख शेअर करून या घटनेचा निषेध केला आहे. बीआरएसने म्हटलं आहे की, 'तेलंगणातील नागरिकांचे 250 कोटी खर्च करून काँग्रेस सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलंगणा राज्य आणि हैदराबादला बदनाम केलं आहे. दलाल रेवंत रेड्डी यांच्यामुळे ही नामुष्की ओढवली आहे. मिस इंग्लंड 2024 ठरलेल्या मिला मॅगीने ही स्पर्धा अर्ध्यावर सोडून तिच्या देशात परत जाणं पसंत केलं. तिने म्हटलं आहे की, 'मिस वर्ल्ड 2025'च्या आयोजकांनी मला एखाद्या वेश्येसारखी वागणूक दिली.'
मिस वर्ल्ड स्पर्धेच्या आयोजकांनी मिला मॅगीचे आरोप फेटाळून लावले आहेत.
आयोजकांनी जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, "या महिन्याच्या सुरुवातीला मिस इंग्लंड 2025 ठरलेल्या मिला मॅगी यांनी आमच्याकडे त्यांची आई आजारी असल्यामुळे इंग्लंडला परत जाण्याची विनंती केली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मिस वर्ल्ड संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युलिया मोर्ले यांनी मिला मॅगी यांची इंग्लंडला परत जाण्याची व्यवस्था केली. त्यांच्या जागी शार्लोट ग्रँट यांची निवड करण्यात आली. ग्रँट बुधवारी हैदराबाद येथे आल्या आहेत."
या निवेदनात पुढे असं म्हटलं आहे की, "काही ब्रिटिश माध्यमांनी मिला मॅगी यांच्या भारतातील अनुभवाचं दुर्दैवी वार्तांकन केलं आहे. या बातमीचा आणि स्पर्धेतील मुलींच्या परिस्थितीचा काहीही संबंध नाही. त्यांचा अनुभव संपूर्णपणे वेगळा आहे. आम्ही मिला मॅगी यांचे हैदराबादमध्ये असतानाचे व्हीडिओ प्रसारित करणार आहोत, हे व्हीडिओ कुठेही एडिट करण्यात आलेले नाहीत. यामध्ये ती आयोजकांचे आभार मानताना आणि सगळं काही व्यवस्थित आहे हे सांगताना दिसेल. ती भारतात असताना तिने केलेली वक्तव्य आणि इंग्लंडमध्ये परतल्यानंतर प्रकाशित झालेल्या बातम्या यांचा काहीही संबंध नाही."
मिस वर्ल्ड संस्थेने म्हटलं आहे की, "मिस वर्ल्ड स्पर्धा तिच्या प्रतिष्ठेसाठी आणि मूल्याधारित सौंदर्यासाठीच कटिबद्ध आहे. आम्ही प्रसारमाध्यमांना पत्रकारितेची मूल्यांचं पालन करण्याचं आणि अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रकाशित न करण्याचं आवाहन करतो."
हे पत्रकार मिस वर्ल्ड संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युलिया मोर्ले यांच्या नावे काढण्यात आलेलं आहे. या पत्रकासोबतच मिला मॅगी यांचा एक व्हीडिओ देखील प्रकाशित करण्यात आला, ज्यामध्ये तिथे सर्व काही व्यवस्थित असल्याची ती म्हणत आहे.
आयोजकांनी जारी केलेल्या व्हीडिओमध्ये असा दावा करण्यात आला की, मिला मॅगी या केवळ एका बँक्वेटमध्ये सहभागी झालेल्या होत्या. सरकारने आयोजित केलेल्या चौमोहल्ला पॅलेसमध्येच त्यांनी भाग घेतला होता. या व्हीडिओमध्ये मिला मॅगी यांच्या टेबलच्या दुसऱ्या बाजूला एक महिला दिसत आहे आणि त्या टेबलवर केवळ एक पुरुष बसलेला दिसून येत आहे.
या वादानंतर मिस इंग्लंड स्पर्धेची उपविजेती ठरलेली शार्लोट आता इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)