चीनचे माजी सैनिक जे आता ना भारतात थांबू शकत, ना परत जाऊ शकत; काय आहे वांग छी यांचा वेदनादायक प्रवास?

वांग छी मध्य प्रदेशातील बालाघाट येथे राहतात
फोटो कॅप्शन, वांग छी मध्य प्रदेशातील बालाघाट येथे राहतात
    • Author, विष्णुकांत तिवारी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

वांग छी हे 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर भारतात वाट चुकलेले चिनी सैनिक. 60 वर्षांहून अधिक काळ भारतात राहूनही आजही ते त्यांच्या भवितव्यासाठी लढत आहेत.

ते न भारतात कायम राहू शकतात, न परत चीनमध्ये जाण्याची परवानगी, अशा या अनिश्चिततेच्या जंजाळात त्यांचं जीवन गुंतलं आहे.

आठ वर्षांपूर्वी बीबीसीनं चिनी सैनिक वांग छी यांची कहाणी जगासमोर आणली होती. 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर वांग छी हे भारतात अडकले होते.

या वृत्तानंतर ते आपल्या मुलासोबत चीनला गेले होते आणि 55 वर्षांनंतर आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.

असं वाटलं की, आता आयुष्यानं एक चांगलं वळण घेतलं आहे. पण जवळजवळ सहा दशके भारतात घालवल्यानंतर, 85 वर्षीय वांग छी यांना व्हिसा वादामुळे भारत सोडण्याची नोटीस मिळाली.

व्हिसाच्या समस्येत अडकलेले आणि भारतातून हद्दपार होण्याच्या भीतीने त्रस्त असलेल्या वांग छी आणि त्यांच्या कुटुंबाची बीबीसीच्या टीमनं भेट घेतली.

"आता मला भारतातूनही हाकलून दिलं जाईल का?", असा प्रश्न त्यांनी विचारला.

85 वर्षीय वांग छी गेल्या सुमारे सहा दशकांपासून मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यातील तिरोडी गावात वास्तव्यास आहेत.

तिरोडी गावातील त्यांच्या घराच्या ओट्यावर आंब्याच्या झाडाखाली बसलेले, थरथरत्या आवाजात आणि थकलेल्या नजरेनं ते विचारतात, "मी 60 वर्षांपासून भारतात आहे. आता मला इथूनही हाकललं जाणार का?"

"मी चीनमध्ये नाही, मी माझ्या आयुष्यातील 60 वर्षे भारतात घालवली, इथं माझी मुलं आहेत, माझं कुटुंब आहे. मला भारतात राहण्याचा हक्क नाही का?" असा प्रश्न ते विचारतात.

त्यांची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते.

"वडिलांचा व्हिसा संपला आहे, अशी नोटीस 6 मे रोजी आम्हाला मिळाली. एकतर आता व्हिसा नूतनीकरण करावा लागेल किंवा वडिलांना भारत सोडावा लागेल," असं त्यांचा मुलगा विष्णु यांनी सांगितलं.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. विष्णु, हे खासगी नोकरी करतात, ते म्हणतात, "10-15 हजार वेतनात वडिलांच्या औषधांवर, मुलांच्या शिक्षणावर आणि कायदेशीर खर्च भागवणं फार कठीण आहे."

सुमारे सहा दशकं भारतात व्यतीत केल्यानंतर वांग छी यांना भारत सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे.
फोटो कॅप्शन, सुमारे सहा दशकं भारतात व्यतीत केल्यानंतर वांग छी यांना भारत सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"व्हिसा नूतनीकरण न केल्यास विदेशी अधिनियमानुसार कारवाई होऊ शकते," असं बालाघाटचे पोलीस अधीक्षक नागेंद्र सिंग यांनी सांगितलं.

व्हिसा शिवाय वांग छींच्या कुटुंबाला इतर प्रशासकीय अडचणींचाही सामना करावा लागत आहे. त्यांचा मुलगा विष्णु वांग यांनी सांगितलं की, मुलांसाठी जातीचा दाखला बनवणं त्यांच्यासाठी मोठी समस्या बनली आहे.

विष्णु म्हणतात, "आमच्या जातीच्या दाखल्यासाठी विचारलं जातं की, तुमचे वडील कुठल्या ठिकाणचे रहिवासी आहेत आणि त्यांची जात कोणती आहे? वडील चीनचे नागरिक आहेत, असं आम्ही त्यांना सांगितलं की चीनमधून तुमच्या वडिलांची जात काय आहे, हे लिहून आणा, असं सांगण्यात आलं. आता चीनमधून ते कसं लिहून आणणार?"

या प्रकरणाबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं, "कायदेशीर अडचणींमुळे जातीचा दाखला देता येणार नाही, पण कुटुंबाला इतर आवश्यक ती मदत केली जाईल."

गेल्या सहा दशकांत वांग छी यांनी भारतात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं जीवन कधीही पूर्णपणे स्थिर झालं नाही.

चिनी सैनिक ते तिरोडी गावचे 'राजबहादूर' होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला आहे.

'चिनी सैनिक वांग छी अखेर भारतात कसे पोहोचले?'

वांग छी यांच्या म्हणण्यानुसार, 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान ते रस्ता चुकल्याने भारतीय सीमेत आले. वांग छी म्हणाले की, त्यांनी रेड क्रॉसच्या गाडीला मदत मागितली, पण त्यांनी त्यांना भारतीय लष्कराच्या ताब्यात दिलं. त्यानुसार, त्यांना सहा वर्षे भारतातील विविध कारागृहांमध्ये ठेवण्यात आलं होतं.

1969 मध्ये चंदीगड उच्च न्यायालयानं त्यांना तुरुंगातून सोडण्याचा आदेश दिला, पण चीनला परत जाण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर त्यांना मध्य प्रदेशमधील तिरोडी गावात पाठवण्यात आलं.

वांग छी हे 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान रस्ता चुकल्याने भारतीय सीमेत आले होते.
फोटो कॅप्शन, वांग छी हे 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान रस्ता चुकल्याने भारतीय सीमेत आले होते.

आपल्या घराबाहेर पाहत वांग छी म्हणतात, "कधी कधी वाटतं, की एका चुकीनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं."

ते आठवून सांगतात, "मी आधी दिल्लीच्या तुरुंगात होतो. तिथे एक-दोन महिने राहिल्यावर मला राजस्थानच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. नंतर तिथून मला पंजाबच्या तुरुंगात ठेवण्यात आलं."

वांग छींच्या मते, 1969 मध्ये चंदीगड न्यायालयानं त्यांना तुरुंगातून मुक्त केलं, पण चीनला जाण्यावर बंदी असल्यामुळे त्यांना चंदीगडहून सुमारे 1000 किलोमीटर दूर भोपाळ आणि तिथून पुढे सुमारे 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या बालाघाट जिल्ह्यातील तिरोडी गावात पाठवण्यात आलं.

इथूनच सुरू झाला वांग छी यांचा 'राजबहादूर' होण्याचा प्रवास.

'चीनमधील कुटुंबीयांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू'

वांग यांच्या आयुष्यात 1969 पर्यंत खूप काही बदल झाला होता. जिथे एकीकडे वांग हे नवीन देश म्हणजेच भारतात आपलं नवीन आयुष्य वसवण्याचा प्रयत्न करत होते, तिथेच दुसरीकडे चीनमध्ये मागे राहिलेलं त्यांचं कुटुंब आणि आई यांना एकदा तरी भेटण्याचा त्यांचा प्रयत्नही सुरू होता.

हळूहळू तिरोडीतील लोकांनी वांग छी यांना स्वीकारलं. सुरुवातीला त्यांना एका पिठाच्या गिरणीत नोकरी मिळाली, नंतर त्यांनी स्वतःचं किराणा दुकानही सुरू केलं.

ज्या पिठाच्या गिरणीत ते काम करत होते, त्या दुकानाच्या मालकानं त्यांना 'राजबहादूर' हे नाव दिलं होतं.

वांग छी यांचं भारतात कुटुंब आहे.
फोटो कॅप्शन, वांग छी यांचं भारतात कुटुंब आहे.

वांग म्हणतात, "भारतामध्ये हळूहळू स्थिर होत होतो, तेव्हा तिरोडीतील मित्रांनी लग्न करण्याचा माझ्यावर दबाव आणला. मला साथ देणारी कोणीतरी जोडीदार हवी, अशी त्यांची इच्छा होती."

मित्रांच्या दबावाखाली आणि भारतात आपली स्थिती सुधारण्यासाठी वांग यांनी 1974 मध्ये तिरोडीच्या स्थानिक रहिवासी सुशीला यांच्याशी लग्न केलं.

वांग हेही हळूहळू आपलं जीवन रुळावर आणण्याचा प्रयत्न करू लागले.

त्यांचे शेजारी म्हणतात, "चीनमधून एखादा माणूस तिरोडी गावात येणं त्या काळात एक आश्चर्यच होतं. चीनमधून आलेला माणूस कसा दिसतो, हे पाहायला आम्ही लोक जायचो…"

त्याच वेळी दुसऱ्या बाजूला वांग चीनमध्ये परतण्याचा आणि आईला भेटण्याचा सतत प्रयत्न करत राहिले.

त्यांचा हा प्रयत्न पहिल्यांदा 2013 मध्ये यशस्वी ठरला. त्याच वर्षी चीनने वांग छी यांना आपला नागरिक मानत त्यांना पासपोर्ट जारी केला.

'आईला भेटण्याची लढाई अखेर आईच्या समाधीपाशी थांबली'

पासपोर्ट मिळाल्यानंतरही वांग आपल्या आईला भेटायला जाऊ शकत नव्हते.

चार वर्षांनंतर, 2017 मध्ये जेव्हा बीबीसीनं त्यांची कहाणी जगासमोर आणली, तेव्हा वांग छी यांना चीनला जाण्याची संधी मिळाली.

तेथे त्यांनी आपल्या कुटुंबाची भेट घेतली, पण त्यांच्या आईचं निधन झालं होतं.

आईची आठवण काढताच त्यांचा गळा दाटून येतो. ते म्हणतात, "मी शेवटच्या क्षणी आईला भेटू शकलो नाही. जेव्हा मी चीनमध्ये पोहोचलो तेव्हा गावकऱ्यांनी सांगितलं की, माझी आई आयुष्यभर माझ्या परतीची वाट बघत होती. शेवटच्या क्षणी मला आठवत रडत होती आणि तिचं निधन झालं."

"आईला भेटता न आल्याचं दुःख अजूनही वडिलांच्या मनात आहे," असं विष्णु वांग सांगतात.
फोटो कॅप्शन, "आईला भेटता न आल्याचं दुःख अजूनही वडिलांच्या मनात आहे," असं विष्णु वांग सांगतात.

"आईला भेटता न आल्याचं दु:ख आजही वडिलांच्या मनात आहे. आजही आठवण काढून ते रडतात," असं विष्णु सांगतात.

बीबीसीच्या 2017 मधील वृत्तानंतर वांग छींबाबत दोन्ही देश कमालीचे सक्रिय झाले.

वांग 50 वर्षांनंतर पहिल्यांदाच चीनला गेले, कुटुंबीयांना भेटले, पण ही आनंदाची आणि सुखाची वेळ त्यांच्या आयुष्यात जास्त काळ टिकू शकली नाही.

वांग छी चीनमध्ये आपल्या कुटुंबाला भेटून परतल्यावर काही महिन्यांतच त्यांच्या पत्नीचं निधन झालं.

'ना चीनला जाऊ शकतात, ना भारतात राहू शकतात'

चीनला परतण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं, पण आठ वर्षांनंतर ते आणि भारतातील त्यांचं कुटुंब पुन्हा अडचणीत सापडलं.

आता वांग छी ना भारतात कायमस्वरूपी राहू शकतात, ना चीनला परत जाऊ शकतात.

वांग छी यांच्यासाठी कायमस्वरूपी चीनला परत जाणंही शक्य नाही. त्यांनी सांगितलं की, तिथल्या त्यांच्या सैन्यातील नोकरी संदर्भात एक अंतर्गत चौकशी सुरू आहे.

दुसरीकडे, आपल्या मुलांना आणि नातवंडांना भारतात मागे सोडून जाणं त्यांच्यासाठी शक्य नाही.

चीनहून परतल्यानंतर आज आठ वर्षांनी वांग छींचं आयुष्य पुन्हा संकटात सापडलं आहे.
फोटो कॅप्शन, चीनहून परतल्यानंतर आज आठ वर्षांनी वांग छींचं आयुष्य पुन्हा संकटात सापडलं आहे.

त्यांच्या 85 वर्षांच्या वयामुळे आणि कुटुंबाच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे परिस्थिती आणखी कठीण झाली आहे.

वांग छी पुन्हा तोच प्रश्न विचारतात, "मी चीनमध्ये नाही, भारतातूनही हाकललं जाऊ शकतं, तर मग मी कोणत्या देशाचा नागरिक आहे? आता मी कुठं जायचं?"

विष्णु वांग म्हणतात, "वडिलांना चीनमधील कुटुंबही मिळालं आणि आम्ही इथं भारतात आहोत. पण ते अनेकदा म्हणतात, 'माझं घर भारतात आहे की चीनमध्ये?' दोन एवढ्या मोठ्या देशांचे सरकारही त्यांना त्यांचं घर देऊ शकलेलं नाही."

वांग छी दोन देशांच्या दरम्यान आपलं अस्तित्व आणि घर शोधत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)