'या' चिमुकल्या बेटावर चीनचा डोळा का आहे? वाद चिघळण्याचा धोका

- Author, जोनाथन हेड
- Role, आग्नेय आशिया प्रतिनिधी
चीनच्या विस्तारवादी धोरणाबद्दल अनेकदा चर्चा होत असते. विशेषकरून दक्षिण चीन समुद्रात चीन ज्या कारवाया करत आहे, तिथल्या सागरी क्षेत्रावर आणि बेटांवर चीन जो दावा करतो आहे, त्याबद्दल या प्रदेशातील देश नेहमीच तक्रार करतात.
यामुळे चीनबरोबर या देशांचा संघर्ष देखील होत असतो. पगासा हे फिलिपिन्समधील बेटदेखील असंच संघर्षमय बेट आहे. चीन या बेटावर दावा सांगतो आहे.
पगासा हे बेट फिलिपिन्सच्या नियंत्रणाखाली असणारं बेट 37 हेक्टरमध्ये विस्तारलेलं आहे. हे बेट राहण्यायोग्य नाही.
तिथे 300 किंवा त्याहून अधिक लोक छोट्या-छोट्या लाकडी घरांमध्ये राहतात. ते मासे पकडतात आणि वाळूदार जमिनीवर ज्या भाजीपाल्याची लागवड केली जाऊ शकते ती करतात.
मात्र या वादग्रस्त जलक्षेत्रात ते एकटेच नाहीत. त्याच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर पश्चिमेला जहाजांचा एक ताफा आहे.
ही सर्व जहाजं चीनची आहेत. त्यात नौदलाची जहाजं आणि तटरक्षक दलाच्या नौकांचा समावेश आहे. या क्षेत्रात प्रभुत्व राखण्यासाठी चीननं मासे पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या जहाजांचा वापर केला आहे. आमचं विमान या बेटाजवळ पोहोचलं तेव्हा आम्हाला किमान 20 जहाजं आढळून आली.
गेल्या दहा वर्षांपासून चीन दक्षिण चिनी समुद्रातील प्रभुत्व वाढवतो आहे. चीन बुडालेल्या कोरल रीफ, प्रवाळ बेटांवर कब्जा करतो आहे. त्यावर तीन मोठ्या विमानतळांची निर्मिती करत आहे.
चीननं तिथे शेकडो जहाजं तैनात केली आहेत. चीनच्या किनारपट्टीवरील निर्यात करणाऱ्या सर्व मोठ्या शहरांकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या जवळपास सर्व सागरी मार्गांवर चीनला भक्कमपणे दावा करता यावा यासाठी असं करण्यात आलं आहे.
आग्नेय आशियातील देशांपैकी काही देश या याच बेटांवर दावा करतात. त्यापैकी फक्त व्हिएतनाम आणि फिलिपिन्स या देशांनीच चीनला प्रत्युत्तर देत कारवाई करण्याची हिंमत दाखवली आहे.
चीनच्या सैन्याच्या तुलनेत या दोन्ही देशांचं सैन्य खूपच छोटं आहे. मात्र त्यांनी काही कोरल रीफ आणि बेटांवर कब्जा केलेला आहे.
या बेटांमध्ये पगासा हे बेट सर्वात मोठं आहे. या बेटाला थिटू आणि इतर नावांनी देखील ओळखलं जातं. इतर देशदेखील या बेटावर दावा करतात.
फिलिपिन्सचा दावा भक्कम का आहे?
या बेटाचं वैशिष्ट्यं म्हणजे या बेटावर असलेली लोकवस्ती. फिलिपिन्सच्या दृष्टीकोनातून पगासा महत्त्वाचं आहे. कारण या बेटावर ठोस स्वरुपातील जमीन आहे. तो काही अंशत: बुडालेला खडक नाही.
पगासा बेटावर फिलिपिन्सचा कायदेशीर दावा भक्कम आहे.

फिलिपिन्स नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे सहाय्यक संचालक जनरल जोनाथन मलाया म्हणतात, "पगासा आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. या बेटावर एक धावपट्टी आहे. त्यामुळे तिथे मानवी वस्तीला मदत मिळू शकते. इथे फिलिपिनो समुदायातील लोक आणि मासेमार राहतात."
ते पुढे म्हणाले, "या बेटाचा आकार असा आहे की ते समुद्रात बुडणार नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या बेटाचं 12 नॉटिकल माइल म्हणजे सागरी मैलाचं स्वत:चं क्षेत्र आहे. त्यामुळे एकप्रकारे हे बेट फिलिपिन्ससाठी महत्त्वाचं आहे."
सर्वकाही बाहेरूनच आणावं लागतं
फिलिपिन्सच्या पलावान बेटापासून पगासा बेटावर पोहोचण्यासाठी बोटीनं दोन ते तीन दिवस लागतात किंवा इथपर्यंत पोहोचण्यासाठी एक तासाचा हवाई प्रवास करावा लागतो. अर्थात दोन्हीही मार्गांना अनेकदा वादळी हवामानाचा तडाखा बसतो.
दोन वर्षांपूर्वीपर्यंत इथली धावपट्टी पूर्ण तयार झालेली नव्हती. तिची लांबी 1300 मीटरपर्यंत वाढवण्यात आली नव्हती. त्यामुळे तोपर्यंत इथे छोटी विमानंच उतरू शकायची.
मात्र आता धावपट्टीची लांबी वाढवल्यामुळे इथे सी-130 सारखी मोठी प्रवासी विमानंदेखील उतरू शकतात. अर्थात यात प्रवास करणं, जसा आम्हीदेखील केला, म्हणजे गर्दी वेळेस बसमधून प्रवास करण्यासारखं आहे.
या बेटावर सर्वकाही बाहेरून आणावं लागतं. त्यामुळेच आमचं विमान पूर्णपणे भरलेलं होतं. यात गाद्या, अंडी, तांदळाची पोती, काही मोटरसायकल आणि इतर बरंचसं सामान होतं. सैनिक किंवा सैन्याच्या कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश जणांना संपूर्ण उड्डाण काळात उभंच राहावं लागलं.

मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये बराच बदल झाला आहे. इथे एक नवीन हँगर तयार झाला आहे. वादळांमध्ये विमानांचं संरक्षण करण्याइतका तो मोठा आहे. हँगर म्हणजे अशी रचना किंवा बांधकाम ज्याखाली विमानं उभी केली जातात.
तिथे एक कंट्रोल टॉवर बनवला जातो आहे. ते मोठ्या बोटी आणण्याची परवानगी देण्यासाठी छोट्या बंदरासाठीचं खोदकाम देखील करत आहेत.
फिलिपिन्सच्या काही नौसैनिकांनी आम्हाला बेटाच्या सर्व बाजूंना फिरवलं. ते लोक तिथेच तैनात आहेत. अर्थात बेटाचा आकार लक्षात घेता आम्हाला बहुधा हेच आवश्यक वाटलं.
चीनच्या उपस्थितीमुळे वाढल्या अडचणी
1971 मध्ये फिलिपिन्सनं तैवाननंतर पगासावर कब्जा केला. त्यावेळेस तैवानी सैन्यानं वादळाच्या काळात हे बेट सोडून दिलं होतं. 1978 मध्ये फिलिपिन्सनं अधिकृतपणे या बेटाचा ताबा घेतला होता.
नंतर सरकारनं लोकांना इथे राहण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली. मात्र तिथे जिवंत राहण्यासाठी लोकांना आवश्यक सामानाची गरज भासते.
तिथे राहणाऱ्या कुटुंबांना दर महिन्याला अन्नधान्य, पाणी आणि आवश्यक साहित्य, सामान मिळतं. आता त्यांच्याकडे वीज आणि मोबाईल फोनची सेवा आहे. मात्र हे फक्त चार वर्षांपूर्वीच आलं आहे.
सरकारी नोकऱ्यांशिवाय मासेमारी करणं हे पोट भरण्याचं एकमेव साधन आहे. मात्र चीनची जहाजं आल्यानंतर ते करणंदेखील कठीण झालं आहे.

फोटो स्रोत, BBC/VIRMA SIMONETTE
लेरी हगो मासेमार आहेत आणि या बेटावर 16 वर्षांपासून राहत आहेत. या क्षेत्रात चीनच्या वाढत्या नियंत्रणाबद्दल ते सांगतात. त्यांनी पगासापासून 32 किलोमीटर अंतरावर सुबी रिफवर सुरुवातीला बांधकाम झाल्याचं पाहिलं. आता तो एक लष्करी तळ झाला आहे.
2021 मध्ये त्यांनी व्हीडिओ रेकॉर्ड केला होता. ज्यात त्यांच्या एक छोट्या लाकडी बोटीला चीनचं तटरक्षक दलाचं जहाज टक्कर मारत असल्याचं दिसतं आहे. या व्हीडिओमुळे ते थोडेफार प्रसिद्ध देखील झाले.
मात्र चीनच्या आक्रमकपणामुळे नाईलाजानं त्यांना घराजवळच्याच एका छोट्या परिसरात मासेमारी करावी लागते आहे.
ते म्हणतात, "आमच्या बोटींच्या तुलनेत त्यांची जहाजं मोठी आहेत. ते आम्हाला धमकावतात. आमच्या जवळ येतात आणि आम्हाला पळवून लावण्यासाठी भोंगे वाजवतात. ते आम्हाला खूपच घाबरवतात."
"त्यामुळे पूर्वी मी दूर अंतरावर जिथे मासेमारीसाठी जात असे तिथे आता जात नाही. आता मला बेटाजवळच मासे पकडावे लागतात. मात्र इथे माशांचं प्रमाण कमी होत चाललं आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे भरपूर मासे मिळणंदेखील कठीण झालं आहे."
लोकांसमोर असलेलं सर्वात मोठं आव्हान कोणतं?
रीलिन लिम्बो गेल्या 10 वर्षांपासून या बेटावर शिक्षिका आहेत. एका झोपडीचं रुपांतर मोठ्या शाळेत होताना त्यांनी पाहिलं आहे. आतापर्यंत त्यांनी इथल्या 100 हून अधिक मुलांना शिकवलं आहे. या मुलांचं वय 3 वर्षांपासून ते 18 वर्षांपर्यंत आहे.
रीलिन लिम्बो म्हणतात, "माझ्यासाठी हे बेट स्वर्गासारखं आहे. आमच्या सर्व मूलभत गरजा पूर्ण केल्या जातात. हे बेट स्वच्छ आहे आणि इथे शांतता आहे. शाळा सुटल्यानंतर मुलं बास्केटबॉल खेळू शकतात किंवा पोहू शकतात. आम्हाला शॉपिंग मॉलची आवश्यकता नाही."
पगासा बेट खूपच शांत आहे. दुपारी प्रचंड उष्णता असताना आम्हाला दिसलं की इथले बहुतांश लोक झोपले होते किंवा त्यांच्या व्हरांड्यात गाणी ऐकत होते.
आम्ही मेलानिया अलोजादो यांना पाहिलं. त्या आरोग्य सेविका आहेत. एका छोट्या मुलाला झोपवण्यासाठी त्या त्याला झोका देत होत्या.
मेलानिया अलोजादो म्हणतात, "आमची मुलं जेव्हा आजारी पडतात, तेव्हा ते आमच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असतं."
"जर आजार गंभीर स्वरुपाचा असला तर त्यांना वाचवण्यासाठी बेटाबाहेर घेऊन जावं लागतं. मी काही नोंदणीकृत नर्स नाही. मी गंभीर स्वरुपाचे वैद्यकीय उपचार करू शकत नाही. विमानं पूर्णवेळ उपलब्ध नसतात. अनेकदा हवामानदेखील प्रवास करण्यायोग्य नसतं. अशावेळी मुलांची काळजी घेण्यासाठी आम्ही जे करू शकतो ते करतो."
त्या पुढे सांगतात, "आम्ही अनेक प्रकारच्या तणावांपासून मुक्त आहोत. आम्हाला अनुदानित अन्न मिळतं. आम्ही स्वत:देखील काही गोष्टींची लागवड करू शकतो. मोठ्या शहरात प्रत्येक गोष्टीसाठी पैशांची आवश्यकता असते."
आम्ही काही नवीन घरं बांधली जात असल्याचं पाहिलं आहे. मात्र प्रत्यक्षात पगासा हे खूप जास्त लोकांनी राहण्यायोग्य बेट नाही. नोकऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोक हे बेट सोडून निघून जातात.

चीनच्या उपस्थितीविरोधातील भावना इथे दिसून येते.
विमानाच्या पायलटनं सांगितलं, "आम्ही जेव्हा पगासा बेटाजवळ पोहोचतो, तेव्हा सुबी रीफ हवाई तळावर उपस्थिती असलेला चीन आम्हाला नेहमीच आव्हान देतो. ते आम्हाला इशारा देतात की आम्ही विना परवानगी चीनी हद्दीत प्रवेश करत आहोत."
त्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न कधी केला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना पायलट म्हणाले, "नाही, हे रोजचंच आहे. आम्ही सांगतो की हा फिलिपिन्सचा प्रदेश आहे. आम्हाला हे प्रत्येक वेळेस करावं लागतं."
जोनाथन मलाया यांचं म्हणणं आहे की त्यांच्या सरकारनं चीनच्या दूतावासाकडे दर आठवड्याला अधिकृतपणे राजनयिक विरोध नोंदवला आहे. कारण पगासाच्या सागरी क्षेत्रात चीनची जहाजं आहेत.
फिलिपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांच्या सरकारच्या हे उलटं आहे. रॉड्रिगो दुतेर्ते यांनी फिलिपिन्समध्ये अधिक गुंतवणूक केली जाईल या आशेनं चीनशी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला होता.
मलाया म्हणाले, "मला वाटतं की जर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहिलो आणि त्यांना (चीन) दाखवून दिलं की हा खेळ आम्हीदेखील खेळू शकतो. तर चीनकडून आम्हाला अधिक सन्मानानं वागवलं जाईल."
ते पुढे म्हणतात, "मात्र फिलिपिन्ससारख्या लोकशाही देशांसमोरील अशी अडचण आहे की नवीन सरकार आल्यानंतर त्यांच्या धोरणात बदल होऊ शकतो. चीनमध्ये ही समस्या नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











