ज्वालामुखीच्या राखेचा विमानांना किती धोका? उद्रेकाचा भारतात काय परिणाम होईल?

फोटो स्रोत, Reuters
इथिओपियाच्या अफार भागात असलेल्या हेली गुब्बी ज्वालामुखीचा रविवारी (23 नोव्हेंबर) सकाळी उद्रेक झाला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, यामुळे आजूबाजूच्या गावांवर धुळीचे लोट पसरले आहेत. अनेक ठिकाणी धुळीचे थरही साचले आहेत.
स्मिथसोनियन संस्थेच्या ग्लोबल व्होल्कॅनिझम प्रोग्रामनुसार, गेल्या 12 हजार वर्षांत हेली गुब्बी ज्वालामुखीचा पहिल्यांदाच उद्रेक झाला आहे.
सॅटेलाइट फोटोंमध्ये लाल समुद्राच्या वर राखेचे ढग तरंगताना दिसले आहेत.
स्थानिक माध्यमांनी एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितलं की, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, ही राख स्थानिक पशुपालकांच्या जीवनमानावर परिणाम करू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
ईशान्य इथिओपियातील या ज्वालामुखीचा सुमारे 12 हजार वर्षांनी पहिल्यांदाच उद्रेक झाला आहे. त्यामुळे आकाशात 14 किलोमीटर उंचीपर्यंत धुळीचे लोट पसरले आहेत.
टूलूस वॉल्केनिक अॅश अॅडव्हाजरी सेंटरनुसार, ज्वालामुखीची राख वाऱ्यामुळे येमेन, ओमान, भारत आणि उत्तर पाकिस्तानपर्यंत पोहोचली आहे.
जखमी किंवा विस्थापितांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

भारतावर परिणाम
इंडिया मेट स्काय वेदरने सोमवारी (24 नोव्हेंबर) 'एक्स'वर लिहिलं की, "राखेचे ढग उत्तर भारताकडे सरकू शकतात. हेली गुब्बी ज्वालामुखी क्षेत्रापासून गुजरातपर्यंत मोठा राखेचा पट्टा दिसत आहे."
"ज्वालामुखीचा उद्रेक थांबला असला तरी राख वरच्या वातावरणात पसरली आहे. हे ढग सुमारे 100 ते 120 किमी प्रतितास वेगाने उत्तर भारताच्या दिशेने सरकत आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
इंडिया मेट स्काय वेदर पुढे म्हटले, "हे राखेचे ढग आकाशात साधारण 15 हजार ते 45 हजार फूट उंचीपर्यंत पसरलेले आहेत. यात ज्वालामुखीची राख, सल्फर डायऑक्साइड आणि अतिशय छोटे काचचे-दगडांचे कण आहेत."
"त्यामुळे आकाशात नेहमीपेक्षा जास्त काळोख दिसू शकतो आणि याचा हवाई वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. विमान उड्डाणांना उशीर होऊ शकतो आणि प्रवासही लांबण्याची शक्यता आहे."
"हे राखेचे ढग रात्री 10 वाजेपर्यंत गुजरातच्या पश्चिम भागात पोहोचतील आणि नंतर राजस्थान, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबकडे सरकतील."
"पुढे ते हिमालय आणि इतर भागांवरही परिणाम करू शकतात. आकाश नेहमीपेक्षा जास्त धूसर असेल. त्यामुळे दिल्लीची हवा आणखी खराब होऊ शकते," असंही इंडिया मेट स्काय वेदरनं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
इंग्रजी दैनिक हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या वृत्तानुसार, "राखेचे ढग लाल समुद्र ओलांडून मध्य पूर्व आणि मध्य आशियाकडे गेल्यानंतर, विमान कंपन्यांनी दुपारपासूनची उड्डाणं रद्द करायला सुरुवात केली. इंडिगोला सहा उड्डाणं रद्द करावी लागली."
''यातील एक उड्डाण मुंबईहून होतं, तर इतर उड्डाणं दक्षिण भारतातून होणार होते. मुंबई विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, काही उड्डाणांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून वळसा घ्यावा लागत आहे.
परंतु, पाकिस्तानचे आकाश भारतीय विमानांना बंद असल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांवर याचा जास्त परिणाम होऊ शकतो.''
एअर इंडियानेही प्रवाशांच्या सुरक्षेला महत्त्व देत एक निवेदन जाहीर केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "इथिओपियातील ज्वालामुखी उद्रेकानंतर काही भागांत राखेचे ढग दिसत आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि आमच्या ऑपरेशन टीमशी सतत संपर्कात आहोत. सध्या एअर इंडियाच्या उड्डाणांवर कोणताही मोठा परिणाम झालेला नाही."
एअर इंडियानं म्हटलं आहे की, "आमच्या प्रवाशांचे, क्रूचे आणि विमानांच्या पूर्ण सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलू. यालाच आमचं सर्वोच्च प्राधान्य राहील. आमच्या नेटवर्कमधील ग्राउंड टीम्स प्रवाशांना मदत करत राहतील आणि त्यांच्या उड्डाणांबाबत सतत माहिती देत राहतील."
इंजिन बिघाड होण्याचा धोका
राखेचे ढग विमानांसाठी सर्वाधिक धोकादायक असतात, कारण त्यामुळं इंजिनला नुकसान पोहोचू शकतं.
ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा अतिशय बारीक राख आणि कण आकाशात उधळले जातात. हे कण सिलिकेट नावाच्या अतिशय कठीण पदार्थापासून बनलेले असतात.
हे कण जेट इंजिनमध्ये प्रवेश करतात तेव्हा आतील तीव्र तापमानामुळं ते वितळतात. पण इंजिनच्या थंड भागांपर्यंत पोहोचताच ते पुन्हा गोठतात आणि काचेसारखा थर तयार करतात.

फोटो स्रोत, Getty Images
हा काचेसारखा थर हवेचा प्रवाह रोखतो त्यामुळं इंजिन पूर्णपणे बंद पडू शकतं किंवा बिघाड होऊ शकतो.
पण, इंजिन बंद केलं तर ते लवकर थंड होते. बऱ्याचदा, वितळलेली राख चुरा होऊन बाजुला होते आणि इंजिन पुन्हा सुरू करता येते.
पण, ही परिस्थिती टेक-ऑफ किंवा लँडिंग दरम्यान उद्भवली तर इंजिन पुन्हा सुरू करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि अपघाताची शक्यता लक्षणीयरीत्या वाढेल.
सेन्सर्समध्ये झीज होण्याचा धोका
ज्वालामुखीतून निघणारी राख केवळ विमानाच्या इंजिनवरच परिणाम करत नाही, तर विमानाच्या बाहेरील आवरण आणि नेव्हिगेशन सिस्टमलाही नुकसान पोहोचवू शकते.
राखेचे कठीण आणि तीक्ष्ण कण विमानाच्या खिडक्या आणि बाहेरील पृष्ठभागावर आदळत राहतात, त्यामुळं हा भाग हळूहळू जीर्ण होत जातो.
राखेचे कण सँडपेपरसारखे घासून विंडस्क्रीन खराब करतात, त्यामुळं पायलटची दृश्यमानता कमी होते.

फोटो स्रोत, Getty Images
ही झीज झाल्यामुळं लगेच मोठा धोका निर्माण होत नसला तरी, ती विमानासाठी हानिकारक आहे आणि भविष्यात त्याच्या दुरुस्तीची आवश्यकता असू शकते.
ही राख जहाजाच्या सेन्सर्सनाही नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळं स्पीड सेन्सर्स चुकीचे रीडिंग देतात आणि नेव्हिगेशन कठीण होतं.
याशिवाय केबिनमधली हवेची गुणवत्ताही बिघडू शकते. कधीकधी राखेचे अतिशय बारीक कण वायुवीजन प्रणालींमध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळं प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळं ऑक्सिजन मास्क वापरण्याची आवश्यकता निर्माण होते.
वैमानिक काय करू शकतात?
राखेचे ढग ओळखणे खूप कठीण असते, कारण ते उंचावर सामान्य ढगांसारखे दिसत नाहीत.
ते ओळखण्याचा सर्वात विश्वसनीय मार्ग म्हणजे सेंट एल्मोचा प्रकाश. म्हणजे राखेच्या कणांमुळे विमानाच्याभोवती एक मंद वलय दिसतं. ते पायलटला विमान राखेच्या ढगात प्रवेश करत असल्याचा इशारा देतं.
अशा परिस्थितीत, पायलटचा पहिला प्रयत्न विमान वळवून त्या भागातून बाहेर काढण्याचा असतो.

फोटो स्रोत, Getty Images
पायलट इंजिनचा जोरही कमी करू शकतात. त्यामुळं इंजिनचं तापमान कमी होतं आणि बिघाड होण्याचा धोका कमी होतो.
खरं तर, अशा परिस्थितीत वैमानिक अडकू नये हेच सर्वात उत्तम आहे. त्यासाठी जगाच्या विविध भागात नऊ ज्वालामुखी राख सल्लागार केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत.
ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हवेतून पसरणाऱ्या राखेची दिशा आणि धोका यांचा मागोवा घेणे हे त्यांचं काम आहे. ही माहिती विमान कंपन्यांसोबत शेअर केली जाते.
विमान उड्डाणांवर परिणाम
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इथिओपियातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी डीजीसीएने सोमवारी विमान कंपन्या आणि विमानतळांना निर्देश जारी केले आहेत.
पीटीआयनुसार, अकासा एअर, इंडिगो आणि केएलएम या कंपन्यांनी राखेच्या ढगांमुळे सोमवारी काही उड्डाणं रद्द केली.
"पुढील काही तासांत याचा परिणाम गुजरात आणि दिल्ली-एनसीआरच्या काही भागांत दिसू लागेल. हे ढग आधीच गुजरातजवळ आले आहेत आणि काही तासांत त्याचा प्रभाव दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतात दिसेल. याचा मुख्य परिणाम विमानसेवांवर होणार आहे," असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी हिंदुस्तान टाइम्सला सोमवारी सांगितलं.
"जमिनीच्या जवळ याचा काही विशेष परिणाम जाणवणार नाही. आकाश थोडंसं धूसर आणि ढगाळ वातावरण दिसेल. हा परिणाम काही तासच राहील, कारण हे ढग हळूहळू पूर्वेकडे सरकत आहेत," असंही मोहपात्रा यांनी सांगितलं.
12 हजार वर्षांनी जागृत झाला हेली गुबी
हेली गुबी हा ज्वालामुखी हजारो वर्षांनी जागृत झाला आहे. स्मिथसोनियन इंस्टिट्यूशनच्या ग्लोबल व्होल्कॅनिझम प्रोग्रॅमनुसार गेल्या 12 हजार वर्षांत या ज्वालामुखीत उद्रेकाची कोणतीह नोंद नाही. पण 23 नोव्हेंबर 2025 रोजी इथे अचानक उद्रेक झाला आणि राख आकाशात 9 मैल म्हणजे साधारण साडेचौदा किलोमीटरपर्यंत फेकली गेली.
राखेचे ढग तांबड्या समुद्राकडे पसरले. त्यामुळे या समुद्रापलीकडे येमेन आणि शेजारच्या देशांसोबतच भारतातील हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला. काही विमानांची उड्डाणं रद्द झाली.
राखेचे ढग उत्तर भारताकडे प्रवास करत असल्याचा अंदाज टूलूज व्होल्कॅनिक अश अडव्हायजरी सेंटरनं मांडला.
त्यानंतर डीजीसीएनं या परिसरात वाहतूक करणाऱ्या विमानांसाठी खबरदारीची सूचना दिली आहे. एयर इंडियासह इंडिगो, अकासा, स्पाईसजेट अशा विमानसेवांनीही पत्रकं जारी केली असून या राखेच्या ढगांवर आपण लक्ष ठेवून असल्याचं म्हटलं आहे. तसंच ज्वालामुखीत उद्रेक झाला, त्यावेळी या परिसरात असलेल्या काही विमानांची सुरक्षा तपासणी केली जात असल्याचं एयर इंडियानं म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











