'मला माझ्या मुलांना बघायचंय', वडिलांची हतबलता; परदेशातील नोकरीच्या नावाखाली मानवी तस्करी

    • Author, सैदू बाह
    • Role, बीबीसी आफ्रिका आय, माकेनी

हातात थरथरणारा मोबाईल आणि डोळ्यांतून वाहणारे अश्रू... गिनीमधील फोडे मुसा नावाचे एक हतबल वडील आपल्या मुलाचा 76 सेकंदांचा तो शेवटचा व्हॉइस मेसेज पुन्हा पुन्हा ऐकत बसतात. त्यांचा मुलगा रडत-रडत जिवाच्या आकांतानं मदतीची याचना करताना त्या मेसेजमध्ये ऐकायला येतं.

ही फक्त एका वडिलांची व्यथा नाही, तर पश्चिम आफ्रिकेला विळखा घालणाऱ्या एका भयानक मानवी तस्करीचं जळजळीत वास्तव आहे.

फोडे मुसा हे त्यांच्या मुलाचा शेवटचा व्हॉइस मेसेज ऐकताना पूर्णपणे खचलेले दिसत होते.

"हे ऐकणे खूप कठीण आहे. त्याचा आवाज ऐकून मला खूप वेदना होतात," असे मुसा यांनी 'बीबीसी आफ्रिका आय'ला सांगितलं.

बीबीसीला त्या विशेष पोलीस पथकासोबत काम करण्याची संधी मिळाली होती, जे मुसा यांना त्यांच्या दोन मुलांचा शोध घेण्यास मदत करत होते.

मुसा यांची ही मुले स्कॅमर्सच्या (फसवणूक करणाऱ्यांच्या) जाळ्यात अडकली होती.

फेब्रुवारी 2024 मध्ये मुसा यांचा 22 वर्षांचा मुलगा आणि 18 वर्षांची मुलगी इतर पाच जणांसह गिनीच्या मध्य भागातील 'फाराना' या दुर्गम गावातून भरती झाले होते. परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या एजंट्सनी त्यांना नेले होते.

ती नोकरी तर त्यांना कधीच मिळाली नाही आणि तथाकथित भरती करणारे प्रत्यक्षात मानवी तस्कर निघाले. या गटाला सीमा ओलांडून सिएरा लिओनमध्ये नेले गेले आणि तिथे त्यांना जबरदस्तीने पकडून कोंडून ठेवलं.

"मी पार कोलमडून गेलोय, रडून-रडून माझे डोळे सुजलेत. तुम्ही जर माझ्या डोळ्यांत पाहिलं ना, तर तुम्हाला समजेल की मी किती त्रासात आहे," मुसा बीबीसीला सांगत होते.

त्यांचे हे प्रकरण गिनीमधील 'इंटरपोल' या जागतिक पोलीस संस्थेकडे पोहोचलं, ज्यांनी सिएरा लिओनमधील आपल्या युनिटला मदतीची विनंती केली. त्यामुळे गेल्या ऑगस्टमध्ये मुसा आपल्या मुलांच्या शोधात मध्य सिएरा लिओनमधील 'माकेनी' येथे पोहोचले.

पश्चिम आफ्रिकेतील हजारो लोकांना मानवी तस्करीच्या जाळ्यात ओढले जात आहे, जे सामान्यतः 'क्युनेट' (QNET) म्हणून ओळखले जाते.

हाँगकाँगमध्ये स्थापन झालेली QNET ही मुळात आरोग्य आणि जीवनशैली उत्पादने विकणारी एक कायदेशीर कंपनी आहे. ती लोकांना त्यांची उत्पादने खरेदी करण्यासाठी आणि ऑनलाइन विकण्यासाठी नोंदणी करण्याची सुविधा देते.

या कंपनीच्या कामाच्या पद्धतीवर काही लोकांनी आक्षेप घेतले आहेत. पण पश्चिम आफ्रिकेत तर गुन्हेगारी टोळ्या या कंपनीच्या नावाचा वापर फक्त एक 'मुखवटा' म्हणून करत आहेत, जेणेकरून त्यांचे गैरप्रकार कोणाला कळू नयेत.

हे तस्कर लोकांना अमेरिका, कॅनडा, दुबई आणि युरोपमध्ये नोकरी लावतो, असे खोटे आमिष दाखवतात. पण नोकरी सुरू होण्याआधीच, कागदपत्रांच्या खर्चाच्या बहाण्याने ते लोकांकडून खूप मोठी रक्कम उकळतात.

एकदा का लोकांनी पैसे भरले की, त्यांना चोरट्या मार्गाने शेजारच्या देशात नेले जाते. तिथे त्यांना सांगितलं जातं की, "जोपर्यंत तुम्ही तुमच्या ओळखीच्या दुसऱ्या लोकांना या कामात जोडत नाही, तोपर्यंत तुम्हाला परदेशात जाता येणार नाही."

पण दुःखद गोष्ट अशी की, त्यांनी आपल्या कुटुंबातील माणसांना किंवा मित्रांना या जाळ्यात ओढले, तरीही त्यांना सांगितलेली नोकरी कधीच मिळत नाही.

दुसरीकडे, QNET कंपनीने या भागात जागृती करण्यासाठी जाहिराती आणि मोठे फलक लावले आहेत. त्यावर "QNET फसवणुकीच्या विरोधात आहे" असे घोषवाक्य लिहिले आहे.

मानवी तस्करीशी आमचा कोणताही संबंध नाही, असं सांगून कंपनीने आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

मुसा आणि त्यांच्या नातेवाईकांनी मिळून त्या तस्करांना आतापर्यंत 25 हजार डॉलर्स (म्हणजेच सुमारे 21 लाख रुपये) दिले होते. यामध्ये सुरुवातीला कामासाठी भरलेले पैसे आणि नंतर मुलांना सोडवून घरी आणण्यासाठी दिलेले जास्तीचे पैसे या सर्वांचा समावेश होता. आता स्वतः सिएरा लिओनला जाऊन मुलांना शोधणं, हाच मुसा यांच्यासाठी शेवटचा मार्ग उरला होता.

सिएरा लिओन पोलिसांच्या 'इंटरपोल' तपासाचे प्रमुख महमूद कॉन्टे यांनी सांगितले की, त्यांच्या विभागासाठी ही केस अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी बीबीसीला सांगितले की, "या तस्करांना चोरट्या मार्गांनी आमच्या देशांच्या सीमा ओलांडून ये-जा करणं खूप सोपं जातं.

जेव्हा कॉन्टे यांना बातमी मिळाली की, माकेनीमधील एका ठिकाणी खूप मोठ्या संख्येने तरुणांना डांबून ठेवलंय तेव्हा मुसा सुद्धा पोलिसांच्या त्या छाप्यात सामील झाले. आपल्या मुलांचा पत्ता लागेल अशी त्यांना मोठी आशा होती.

तिथल्या खोल्यांमध्ये कपडे आणि पिशव्या अस्ताव्यस्त विखुरलेल्या होत्या. म्हणजे अंदाजे सुमारे 10 ते 15 लोक एकाच खोलीत झोपायचे.

इंटरपोलच्या पथकाने त्या घरातील सर्वांना एकत्र केले, तेव्हा तिथे अवघ्या 14 वर्षांची मुलं सुद्धा राहत असल्याचं समोर आलं.

कॉन्टे म्हणाले, "यातले बहुतेक लोक गिनी देशातील आहेत. त्यांच्यामध्ये सिएरा लिओनचा फक्त एकच जण आहे, बाकी सर्वजण गिनीहून आलेले आहेत."

त्या गर्दीत मुसा यांची मुले नव्हती, पण तिथे असलेल्या एका तरुणाने सांगितले की, मुसा यांची मुले गेल्या आठवड्यात तिथेच होती. वर्षभरानंतर मुसा यांना आपल्या मुलांबद्दल मिळालेली ही पहिलीच महत्त्वाची माहिती होती.

या सर्व तरुणांना तपासणीसाठी पोलीस स्टेशनला नेण्यात आले आणि त्यानंतर त्यातील 19 जणांना त्यांच्या घरी, म्हणजेच गिनीला सुखरूप पाठवण्यात आलं.

पोलिसांनी सांगितलं की, गेल्या एका वर्षात त्यांनी अशा प्रकारचे 20 हून अधिक छापे टाकले असून मानवी तस्करीला बळी पडलेल्या शेकडो लोकांची सुटका केली आहे.

बऱ्याचदा तस्कर या लोकांना सीमा ओलांडून दुसऱ्या देशात नेतात पण काही वेळा स्वतःच्याच देशात त्यांची तस्करी केली जाते.

23 वर्षांच्या अमिनाताची (नाव बदलले आहे) गोष्ट तशीच आहे.

माकेनीमधील टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर बसून अमिनाताने बीबीसीला सांगितलं की, 2024 च्या मध्यावर तिच्या एका मित्राने तिची ओळख अशा लोकांशी करून दिली, जे आपण 'QNET' चे प्रतिनिधी असल्याचा दावा करत होते.

तिची रीतसर मुलाखत घेण्यात आली आणि त्यात ती यशस्वीही झाली. तिला सांगण्यात आलं की, अमेरिकेला पुढील शिक्षण आणि नोकरीसाठी पाठवण्यापूर्वी तिला एक छोटा कोर्स करावा लागेल.

यात फक्त एकच अडचण होती ती म्हणजे या योजनेत सामील होण्यासाठी तिला 1,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 84,000 रुपये भरायचे होते. ही नोकरी खरी आहे असं वाटल्यामुळे तिच्या कुटुंबाने कॉलेजच्या फीसाठी साठवलेले सर्व पैसे तिला दिले.

"जेव्हा ते तुमची पहिली भरती करतात, तेव्हा ते तुम्हाला चांगलं खाऊ-पिऊ घालतात आणि तुमची काळजी घेतात. पण जसा वेळ जातो, तसं ते हे सगळं बंद करतात," अमिनाताने बीबीसीला सांगितले. तिने पुढे सांगितलं की, त्यानंतर जगण्यासाठी तिला खूप भयानक मार्ग स्वीकारावे लागले.

"स्वतःचा खर्च भागवण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचं शरीर विकावं लागतं आणि पुरुषांसोबत झोपावं लागतं."

अमिनाता म्हणाली की तिला सांगण्यात आलं होतं की, जर तिला परदेशात प्रवासाला जायचं असेल तर तिने या योजनेत इतर नवीन लोकांना ओढून आणलं पाहिजे.

इतरांना या जाळ्यात ओढण्यासाठी तस्कर तिला एक आंतरराष्ट्रीय नंबर द्यायचे. जेव्हा ती आपल्या मित्र-मैत्रिणींशी किंवा नातेवाईकांशी बोलायची, तेव्हा तिला पाहून असं वाटावं की ती आधीच परदेशात पोहोचली आहे.

तीने सांगितले की, "ते तुम्हाला विमानतळावर घेऊन जातात आणि तुम्ही खरोखर प्रवासाला निघाले आहात असे वाटावे म्हणून तुम्हाला चांगले कपडे घालायला लावतात. तुमच्या हातात पासपोर्ट आणि प्रवासाची खोटी कागदपत्र दिली जातात.

त्यानंतर ते तुमचे फोटो काढतात, जेणेकरून तुम्ही ते तुमच्या घरच्यांना आणि मित्रांना पाठवू शकाल."

अमेरिकेतली ती नोकरी कधीतरी नक्की मिळेल, या आशेवर अमिनाताने आपल्या सहा मित्र आणि नातेवाईकांना या योजनेत सामील करून घेतले. पण तिला दिलेले नोकरीचे आश्वासन कधीच पूर्ण झाले नाही.

"मला खूप वाईट वाटत होतं, कारण माझ्यामुळे त्या लोकांचे पैसे वाया गेले आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागला," असं अमिनाता म्हणाली.

अमिनाताला सिएरा लिओनची राजधानी असलेल्या फ्रीटाउनच्या जवळ एका ठिकाणी जवळपास एक वर्ष ठेवण्यात आलं होतं. इतका काळ लोटल्यावर कुठे तिला उमजलं की, ज्या नोकरीची ती वाट पाहत होती, ती तिला कधीच मिळणार नाहीये.

जेव्हा अमिनाताला या योजनेत इतर कोणालाही जोडता आलं नाही, तेव्हा कदाचित त्या तस्करांच्या लेखी तिची किंमत संपली होती आणि म्हणूनच जेव्हा तिने तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिला कोणीही अडवलं नाही.

जे काही घडलं होतं त्यानंतर घरी परतणं खूप कठीण होतं, कारण सर्वांना वाटत होतं की ती परदेशात राहत आहे. मला घरी परत जाण्याची भीती वाटत होती. मी माझ्या मित्र-मैत्रिणींना आणि घरच्यांना सांगितले होते की मी परदेशात गेले आहे. त्या प्रवासासाठी त्यांनी जो पैसा मला दिला होता, त्याचाच विचार माझ्या मनात सतत येत होता."

अशा प्रकारच्या नोकरीच्या घोटाळ्यांना नेमके किती लोक बळी पडले आहेत, याची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.

पण संपूर्ण पश्चिम आफ्रिकेतील मीडियामध्ये अशा बातम्या सतत येत असतात की, परदेशातील नोकरीच्या खोट्या योजनांवर विश्वास ठेवणाऱ्या गरजू लोकांची गुन्हेगारी टोळ्यांकडून फसवणूक केली जात आहे.

'बीबीसी'ने माकेनीमध्ये तीन दिवस पोलिसांसोबत सुमारे 12 छाप्यांमध्ये सहभाग घेतला. तिथे त्यांना बुर्किना फासो, गिनी, आयव्हरी कोस्ट आणि माली यांसारख्या देशांतून तस्करी करून आणलेले शेकडो तरुण भेटले.

पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी या कारवाईत एकूण 12 संशयित तस्करांना अटक केली आहे.

पण वास्तव हे आहे की, अशा प्रकरणांत तस्करांना शिक्षा होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. या भागातील प्रशासनाकडे पुरेशी साधनसामग्री नसल्यामुळे, अशा मोठ्या घोटाळ्यांना आळा घालणे त्यांच्यासाठी एक खूप मोठे आव्हान बनले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या (State Department) आकडेवारीनुसार, सिएरा लिओनमध्ये मानवी तस्करी विरोधी कायदा पास झाल्यापासून (जुलै 2022) ते एप्रिल 2025 पर्यंत, तस्करीच्या गुन्ह्यात केवळ चारच जणांना दोषी ठरवून शिक्षा देण्यात आली आहे.

मुसा यांना त्यांची मुले सापडली नाहीत आणि शेवटी सप्टेंबरच्या शेवटी त्यांना रिकाम्या हाताने गिनीला परतावे लागले.

मात्र, इंटरपोलचे अधिकारी कॉन्टे यांनी नंतर बीबीसीला सांगितले की, तस्करांनी काही काळानंतर मुसा यांच्या मुलांना सोडून दिले आहे. बीबीसीने याला दुजोरा दिला आहे की मुसा यांची मुलगी गिनीमध्ये सुखरूप परतली आहे, पण ती तिच्या गावी परतलेली नाही - आणि तिला या विषयावर कोणाशीही बोलायची इच्छा नाही.

तीने अजूनही तिच्या वडिलांशी संपर्क साधलेला नाही. यावरून असे लक्षात येते की, या फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्यामुळे तिला लाज वाटत असावी, जी या घोटाळ्यातील अनेक बळींना वाटते.

मुसा यांच्या मुलाचा पत्ता मात्र अजूनही लागलेला नाही.

एका वडिलांसाठी ही अजूनही अत्यंत हतबल करणारी परिस्थिती आहे. मुसा म्हणाले, "हे सगळं जे काही घडलं, त्यानंतर मला फक्त हे सगळं संपलेलं पाहायचंय आणि माझ्या मुलांना डोळ्यांसमोर बघायचंय."

"त्यांनी आता गावी परत यावं असं आम्हाला मनापासून वाटतंय त्यांनी माझ्यासोबत इथे असावं हीच माझी इच्छा आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)