You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'हा प्रवास सुंदर होता' म्हणत अरिजित सिंहचा पार्श्वगायन थांबवण्याचा निर्णय
प्रसिद्ध गायक अरिजित सिंह यांनी यापुढे पार्श्वगायन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही घोषणा केल्यावर सोशल मीडियावर त्याबद्दल भरपूर चर्चा सुरू झाली. अरिजित सिंह यांनी गेल्या काही वर्षात बॉलिवूड सिनेमांमध्ये एकापेक्षा एक सरस अशी हिट गाणी गायली आहेत, त्यामुळे त्यांच्या या निर्णयावर चर्चा सुरू आहे.
या निर्णयाची घोषणा अरिजित यांनी फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर केली.
ते लिहितात, "हॅलो, नववर्षाच्या शुभेच्छा. इतकी वर्षं माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद.
"आता यापुढे पार्श्वगायक म्हणून मी कोणतंही नवं काम घेणार नाही. ते इथंच संपवत आहे. हा एक सुंदर प्रवास होता."
चाहते म्हणतात, 'नका सोडून जाऊ...'
इन्स्टाग्रामवर मंगळवारी साधारण 8.30 वाजता ही घोषणा केल्यावर त्याला वीस मिनिटांच्या आत 92 हजारापेक्षा जास्त लाईक्स आणि 9500 कमेंट्स करण्यात आल्या होत्या.
यातील अनेक लोकांनी अरिजित यांना पार्श्वगायन न सोडण्याचा आग्रह केला आहे.
काही लोकांच्या मते, अरिजित नव्या अवतारात पुन्हा येतील असा कयास बांधला, तर काही फॅन्सनी त्यांच्या गाण्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल त्यांचे आभारही व्यक्त केले.
म्युझिक चॅनल झूम टिव्हीनं या इन्स्टा पोस्टखाली, "अभी ना जाओ छोडकर, की दिल अभी भरा नही..." अशी कमेंट केली आहे.
रॅपर आणि गायक बादशाह यानं या पोस्टखाली, "शेकडो वर्षातून येणारा एखादा दुर्मिळ गायक", अशा शब्दात अरिजित यांचं कौतुक केलं आहे.
फिल्मफेअरनं लिहिलंय, "तुमच्या आवाजाविना या जगाचं माधुर्य कमी होईल".
संगीतकार यशराज मुखाते लिहितो, "मला वाटतं आता आपल्याला काहीतरी विचित्र इंडी संगीत ऐकायला मिळेल."
हिंदी-बंगालीसह अनेक भाषांमध्ये गायली गाणी
अरिजित सिंह यांचा पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे जन्म झाला. त्यांनी हिंदी, बंगालीसह मराठीत आणि इतरही भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
2011 साली आलेल्या मर्डर-2 या सिनेमापासून त्यांच्या बॉलीवूडमधील गायनाचा प्रवास सुरू झाला. 'फिर मोहब्बत करने चला है...' हे गाणं आजही लोकप्रिय आहे.
नुकत्याच आलेल्या बॉर्डर-2 सिनेमात त्यांनी घर कब आओगे या गाण्यासाठी त्यांनी योगदान दिलं आहे. सध्या हे गाणं बहुतांश लोकांच्या ओठांवर आहे.
'द म्युझिक पॉडकास्ट'मध्ये 2023 साली विचारलेल्या एका प्रश्नात त्यांनी आपण आपल्या बाजूने बरोबर आहोत. सगळा व्यवसाय कलाकारांमुळेच होतो असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
ते सांगतात, "व्यावसायिक जितके व्यवहारी असतात तितके कलाकार आपल्या आयुष्यात व्यवहारी नसतात. कलाकार काय करतात यावरच सगळ्या व्यवसायाची भिस्त असते. हे योग्य नाही असं सगळ्यांना वाटतंय म्हणजे नक्कीच त्यात अर्थ असेल."
चित्रपट निर्माते आणि निर्मात्यांबद्दल विचारल्यावर ते म्हणाले होते, "काही गोष्टींबाबत स्पष्ट असलं पाहिजे. एकतर काम करुन घ्या आणि पैसे द्या. किंवा कामच देऊ नका. कारण या उद्योगात अनेक लोकांना जेवढं काम केलंय त्याचे योग्य पैसेही मिळत नाहीत."
आपल्याला एरिक क्लेप्टन किंवा जस्टिन टिंबरलेकबरोबर काम करण्याची इच्छा आहे असंही त्यांनी सांगितलं होतं. तसेच जॉन मेयर आणि हॅन्स जिमर यांचंही त्यांनी नाव घेतलं.
"ही यादी मोठी आहे असं सांगत, कोल्ड प्ले मध्ये भाग घेण्याचं आपलं स्वप्न आहे", असं ते म्हणाले.
"नकाराला मी अगदी साधारणपद्धतीनेच स्वीकारतो. मी इतका काही महत्त्वाचा आहे असं सांगणं मी बंद केलंय", असंही ते म्हणाले होते.
'रेडिओ मिरची'ला दिलेल्या व्हीडिओत तानपुरा हे आपलं सर्वात आवडतं वाद्य असून संगीताच्या इतिहासात तानपुरा सर्वोत्तम असल्याचं ते म्हणाले होते.
याच व्हीडिओत आपण लहानपणी चित्रहार आणि रंगोली पाहायचो तेव्हा मधुबाला यांची गाणी सर्वात जास्त यायची असं सांगून मधुबाला यांचे आपण चाहते आहोत असंही त्यांनी सांगितलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)