You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अळणी' ; 'असा' होता त्यांचा रोखठोकपणा
- Author, प्रविण सिंधू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण हे बेचव आणि अळणी होईल. त्यांचं व्यक्तिमत्त्व दिलखुलास-रोखठोक होतं. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरची पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील."
ही प्रतिक्रिया आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची. ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया असून अनेकांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अजित पवार त्यांच्या सडेतोड आणि रोखठोक विधानांसाठी नेहमीच चर्चेत राहिले. यातील काही विधानांमुळे ते वादातही सापडले. मात्र, त्यानंतरही त्यांचा रोखठोकपणा कायम राहिला.
हा रोखठोकपणा कधी प्रशासकीय कामात दिसला, कधी बांधकामांची गुणवत्ता तपासताना दिसला, तर कधी नागरी प्रश्नांवर भूमिका मांडताना समोर आला.
अजित पवारांचा हाच रोखठोकपणा राज्यातील तीन राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या नजरेतून समजून घेऊयात.
अजित पवारांच्या रोखठोकपणावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक पद्मभूषण देशपांडे म्हणाले, "त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पोटात आहे ते त्यांच्या ओठावर यायला वेळ लागायचा नाही. त्यामुळे सचिवांबरोबरील, अधिकाऱ्यांबरोबरील बैठकांमध्ये ते फटकन इथं काम नीट झालेलं नाही असं बोलून टाकायचे. बांधकाम असेल तर त्याविषयी अगदी बारीकबारीक गोष्टी, कंत्राटदाराने न केलेली कामं त्यांच्या पटकन लक्षात यायची आणि ते त्यावर बोलायचे."
"मी मंत्री झालो नसतो, तर उत्तम आर्किटेक्ट, इंजिनियर झालो असतो आणि तुमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या घातल्या असत्या, असं ते अनेकदा बोलून दाखवायचे," असंही निरीक्षण त्यांनी नोंदवलं.
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अद्वैत मेहता यांनी अजित पवार यांच्या रोखठोकपणावर बोलताना त्यांनी शरद पवारांचीही हयगय केली नसल्याचं निरिक्षण नोंदवलं.
ते म्हणाले, "अजित पवारांचा पब्लिक कनेक्ट खूप होता, लोकांची नस त्यांना माहीत होती. त्यांच्या भाषणात ग्रामीण बाज, लोकांची भाषा दिसायची. लोकांमध्ये राहणं, लोकांशी जोडून राहायचं आणि वक्तशीरपणा त्यांनी शरद पवारांकडून घेतला. मात्र, अजित पवारांमध्ये प्रचंड धारधारपणा होता. तिथं त्यांनी शरद पवारांचीही हयगय केली नाही."
"'मी तुमच्या पोटी जन्माला आलो नाही, ही माझी चूक आहे का?' 'तुम्ही आता आशीर्वाद द्या, तुम्ही कुठंतरी थांबलं पाहिजे', असं अजित पवार थेट शरद पवारांना म्हणाले. ते पवारांच्या छायेत वाढले, पण त्यांनी त्यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली," असंही मेहता यांनी नमूद केलं.
'तो अजित पवारांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडाडीचा निर्णय'
विजय चोरमारे यांनी अजित पवारांच्या रोखठोक स्वभावावर बोलताना पुण्यातील लालमहालातील दादोजी कोंडदेव पुतळ्याचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, "अजित पवारांनी अनेक प्रसंगात रोखठोक भूमिका घेतली. कोणताही मुलाहिजा बाळगला नाही. ते पुण्याचे पालकमंत्री असताना लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढून टाकण्याचा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडाडीचा निर्णय होता."
"महाराष्ट्रात प्रचंड मोठा संघर्ष उभा राहिला होता. त्याला इतिहासाची जोड होती. दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू आहेत की नाहीत हा वाद रंगलेला असताना महाराष्ट्र सरकारने इतिहास संशोधकांची समिती नेमली होती. त्या समितीने दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते हे जाहीर केलं. महाराष्ट्र सरकारने दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा क्रीडा पुरस्कार रद्द केला होता. या पार्श्वभूमीवर लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढून टाकण्याचा निर्णय घेतला."
"जेम्स लेन प्रकरणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, जिजाऊंचे चारित्र्यहनन सुरू असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेराव घेतला होता. त्यानंतर मध्यरात्री दादोजी कोंडदेव यांचा पुतळा रात्रीतून कापून काढण्यात आला आणि हलवण्यात आला. अजित पवार पालकमंत्री असताना त्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय झाला. त्यामुळे फार मोठा समाज अजित पवार यांच्याविरोधात गेला. नंतरही त्यांना उपद्रव करत राहिला. मात्र, अजित पवारांनी त्याची परवा केली नाही, ठाम निर्णय घेतला," असं मत चोरमारे यांनी व्यक्त केलं.
'अजित पवारांना कामातील वायफळ खर्च आवडायचा नाही'
अजित पवार यांच्या प्रशासकीय कामाच्या पद्धतीवर पद्मभूषण देशपांडे सांगतात, "त्यांच्याकडे अर्थखातं असल्यानं बहुतांश फाईल अजित पवारांकडे यायच्या. त्या फाईल बघताना त्या फाईलमध्ये कुठे गडबड होऊ शकते हे त्यांना माहीत असायचं. ते फाईल घेऊन येणाऱ्या सचिवांना बारकाईने गोष्टी सांगायचे."
"कामात झालेला वायफळ खर्च त्यांना आवडायचा नाही. त्यामुळे अनेक मंत्री त्यांच्याविषयी नाराज असायचे. लवकर फाईल क्लियर होत नाही, बजेटमध्ये कपात होते, अशी त्यांची तक्रार असायची. मात्र, अजित पवारांचे म्हणणे असायचे की, लोकांचा पैसा योग्य पद्धतीने खर्च व्हावा, हवी-तशी उधळपट्टी होता कामा नये," असं देशपांडे नमूद करतात.
'लोक जमीन देत नसतील तर कुडप धरण रद्द'
विजय चोरमारे यांनी अजित पवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने निर्णय घेतल्याचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, "प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नातही त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने निर्णय घेतले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील कुडप धरणाचं उदाहरण आहे. तिथं पुनर्वसनासाठी पर्यायी जमीन मिळाल्याशिवाय धरणाचं काम सुरू करता येणार नाही असा निर्णय झाला होता आणि लाभ क्षेत्रातील लोकांना जमिनीला पाणी हवं होतं, पण ते जमीन द्यायला तयार नव्हते."
"लाभक्षेत्रातील लोक जमीन द्यायला तयार नाही म्हणून अजित पवारांनी मंत्रालयात बैठक घेतली. यानंतर त्यांनी तडक हेलिकॉप्टर काढलं आणि कुडप धरणाच्या तिथं जाऊन सभा घेतली. तसेच येथील लोक जमीन देत नसतील, तर कुडप धरण रद्द, अशी घोषणा केली. इतका तातडीने कधीही कुणी निर्णय घेत नाही," असंही चोरमारे नमूद करतात.
'सचिवांनाही माहीत नाहीत, अशा त्रुटी सांगायचे'
अजित पवारांचा महाराष्ट्रातील प्रश्नांतील प्रश्नांचा अभ्यास यावर बोलताना पद्मभूषण देशपांडे म्हणाले, "अजित पवारांचा 20 वर्षांचा राजकीय अनुभव मोठा होता. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक विकास कामाविषयी, प्रकल्पाविषयी, प्रश्नांविषयी त्यांना बारीक माहिती असायची. प्रत्येक गावात काय मागण्या आहेत हेही त्यांना माहिती असायचं."
"नेमकी काय अडचण आहे, ते काम कुठे अडकलं आहे याची त्यांना बारीक माहिती असायची. ते जेव्हा अधिकारी किंवा सचिवांबरोबर बैठकीला बसायचे तेव्हा त्यांना सचिवांनाही माहीत नाही अशा त्रुटी सांगायचे. तसेच असं करता आलं तर बघा, तरच तो प्रश्न सुटेल अशा पद्धतीने ते बोलायचे," असं देशपांडे सांगतात.
ते पुढे सांगतात, "एकूण महाराष्ट्राविषयी त्यांना प्रचंड जिव्हाळा होता. समाजकल्याण विभाग, आदिवासी विभाग याच्या योजना आणि तरतुदींच्या योग्य अंमलबजावणीसाठी ते फार आग्रही होते. त्याविषयी त्यांचे खूप आक्षेपही होते. याबाबत संबंधित मंत्र्यांशी ते बऱ्याचदा बोलायचे. त्यावरून वादही व्हायचे. या दोन विभागाच्या योजनेंचा लाभ संबंधितांपर्यंत कसा परिणामकारकपणे पोहचेल याविषयी ते आग्रही असायचे."
"अल्पसंख्याकांविषयीच्या योजनांचा निधी खर्च झाला पाहिजे याविषयी ते आग्रही असायचे हे मी जवळून बघितले आहे," असंही ते नमूद करतात.
'अजित पवारांनी भाजपला अंगावर घेतलं'
अजित पवार यांचा रोखठोकपणा आणि स्पष्टवक्तेपणा नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही बघायला मिळाला. पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी स्थानिक भाजप नेत्यांना थेट लक्ष्य केलं.
हाच मुद्दा अधोरेखित करत विजय चोरमारे म्हणाले, "त्यांनी शेवटच्या महापालिका निवडणुकीत स्पष्टपणे सांगितलं की, भाजपने माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. ते आरोप कुठे गेले. मी आज त्यांच्यासोबत सत्तेत आहे. मला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले, पण मी स्वच्छ आहे हे ते आग्रहाने सांगत राहिले. भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र, त्यांनी त्याची काळजी केली नाही."
"आधी वाटायचं की, पिंपरी चिंचवडची निवडणूक नुराकुस्ती आहे. मात्र, अजित पवारांनी ज्या पद्धतीने भाजपला अंगावर घेतलं, भाजपच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले, पुणे-पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या भ्रष्टाचारावर जाहीर भूमिका घेतली. त्यामुळे भाजपच्या लोकांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली होती," असं मत विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं.
'महायुतीत राहूनही भाजपशी कसं लढायचं हे अजित पवारांनी दाखवून दिलं'
अद्वैत मेहता यांनी देखील महायुतीत राहूनही अजित पवारांनी भाजपशी कसं लढायचं हे दाखवून दिल्याचा मुद्दा अधोरेखित केला.
ते म्हणाले, "अजित पवार यांनी महायुतीत राहूनही भाजपशी कसं लढता येतं हे दाखवून दिलं. महापालिका निवडणुकीत एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीत आहोत, मैत्रीपूर्ण लढत आहे असं सांगत होते. तेव्हा अजित पवारांनी रोखठोकपणे ही मैत्रीपूर्ण लढत नाही, तर थेट लढत आहे, असं सांगितलं. लढाई लढाई आहे, दोन हात केले पाहिजे, असं मत व्यक्त केलं. तसेच मोहोळ, लांडगे यांनी काहीच काम केले नाही, असंही म्हटलं. हा त्यांचा रोखठोकपणा होता."
"अजित पवारांनी त्यांच्या आक्रमकपणामुळे भाजपला रणनीती बदलायला भाग पाडलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शेवटी सभा घ्यावी लागली होती. त्यांना डॅमेज कंट्रोल करावं लागलं. कशा पद्धतीने लढता येतं हे अजित पवारांनी दाखवून दिलं," असंही त्यांनी सांगितलं.
'दिवस सकाळी 6 वाजल्यापासून सुरू व्हायचा'
अजित पवार त्यांच्या रोखठोकपणाशिवाय वेळेबाबत दक्ष असण्यासाठीही अनेकदा चर्चेत राहिलेत. यावर बोलताना पद्मभूषण देशपांडे म्हणाले, "अजित पवार यांचा दिवस सकाळी 6 वाजल्यापासून सुरू व्हायचा. लोकांनी त्यांना भेटण्याची पहिली अपॉईंटमेंट सकाळी 8 वाजताची असायची. भेटीची वेळ 8 म्हणजे 8 वाजताच असायची."
"8 वाजताच्या भेटीसाठी संबंधित व्यक्ती वेळेवर उपस्थित रहावी म्हणून त्यांचे स्वीय सहायक दबावात असायचे. ते 7 वाजल्यापासूनच कुठपर्यंत आलात म्हणून मागे लागायचे. वेळेबाबत ते अत्यंत दक्ष असायचे. भेटीगाठींमध्ये 9 ची मीटिंग असेल तर ते बरोबर 9 च्या मीटिंगला उपस्थित असायचे."
"सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत त्यांचा दिवस ठरलेला असायचा. कुणाला किती वेळ द्यायचा याचं नियोजन असायचं. त्यांच्यावर एक आक्षेपही घेतला जायचा की, ते अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत जितका वेळ देतात तेवढा ते कार्यकर्त्यांना देत नाहीत, तेवढं राजकीय काम करत नाहीत. मात्र, प्रशासनाविषयी त्यांना खूप आस्था होती. त्यांना प्रशासनाच्या व्यवस्थापनातील बारकाव्यांविषयी खूप आस्था होती," असंही ते नमूद करतात.
"दिलेल्या वेळेला पक्का आणि कामाचा माणूस अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली होती. त्याचा अनुभव यायचा. त्याचा अनेक अधिकाऱ्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना फटकाही बसला. ते वेळेआधी जाऊन पोहचायचे. पत्रकारांचीही कधीकधी धावपळ व्हायची. त्यांची प्रशासनावर पकड होती. ते फिल्डवरचा माणूस होते. ते सकाळीच कामाला लागायचे. त्यात त्यांना कळकळही होती," असं मत अद्वैत मेहता व्यक्त करतात.
'मंत्र्यांच्या ताफ्यासाठी लोकांना थांबवं लागू नये यासाठी प्रयत्न'
अजित पवार यांच्या दिवसाची सुरुवात सकाळी 6 वाजल्यापासून होण्यामागे जनजीवन विस्कळीत होऊ नये, असा उद्देश असल्याचं अद्वैत मेहता सांगतात. ते म्हणतात, "जनजीवन सुरू झाल्यावर मंत्र्यांच्या ताफ्यांमुळे त्यांना थांबावं लागतं हे मला पटत नाही. सगळं सुरू व्हायच्या आधी आम्ही गेलो की, लोकांना अडचण होत नाही, असं ते सांगायचे. लोकांचा विचार करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती."
"जनता दरबारात त्यांच्याकडे अनेक लोक यायचे. साध्या घरगुती भांडणांपासून वैयक्तिक फसवणूक, स्थानिक पातळीवर पोलीस सहकार्य करत नाहीत अशा तक्रारी लोक घेऊन यायचे. आलेल्या प्रत्येक माणसाला ते भेटायचे, प्रश्न समजून घ्यायचे आणि त्याक्षणी संबंधित अधिकाऱ्याला फोन लावायचे, निर्णय द्यायचे. त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून माणसं कुठं नाही तर अजित पवारांकडे जाता येईल म्हणून यायचे. शेवटचा आधार म्हणून ते यायचे. त्यांच्याकडे आपला प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांना वाटायचं. आमक्या पक्षाचा आहे म्हणून ते काम करायचे नाही," असं निरिक्षण विजय चोरमारे नोंदवतात.
'वाचाळपणाचा फटका बसलाय याची कबुलीही द्यायचे'
अजित पवार यांच्यावरील राजकीय संस्कृतीचा प्रभाव आणि सद्यस्थितीतील राजकीय संस्कृती यावर बोलताना पद्मभूषण देशपांडे म्हणाले, "नव्या राजकीय संस्कृतीविषयी ते अनेकदा व्यथित असायचे. त्यांना वाटायचं की, राज्य करणं म्हणजे काय याची जाण नसलेले लोक नव्या राजकीय संस्कृतीत आले होते याविषयी ते व्यथित असायचे."
"या लोकांना किती संयतपणे राज्यकारभार करावा लागतो हे माहीत नाही. महाराष्ट्राचं खूप नुकसान होतंय, असं ते म्हणायचे. ते ज्या राजकीय संस्कृतीत वाढले त्याचे त्यांच्यावर संस्कार होते. ते शेवटपर्यंत होते, त्यांनी ते ठेवले. राजकीय युती-आघाडी ही वेगळी गोष्ट आहे. मात्र, वैचारिक संस्कार, ज्या वैचारिक माहितीतून घडलो याबाबत त्यांनी स्वतःला हलू दिलं नाही," असं मत त्यांनी व्यक्त केलं.
असं असलं तरी अजित पवार अनेकदा त्यांच्या वक्तव्यांनी वादातही सापडले. त्यावर बोलताना अद्वैत मेहता म्हणतात, "रोखठोकपणा आणि फटकळपणा यातील सीमारेषा धुसर असते. त्यामुळे ते कधीकधी फटकळपणानेही बोलायचे. ते कठोर वाटायचे, त्यांचा धाक वाटायचा, पण ते मिश्किलही होते. स्वतःवर विनोद करण्याची वृत्ती त्यांच्यात होती. ते अनेकदा मला वाचाळपणाचा कसा फटका बसला आहे याचं उदाहरण द्यायचे. तसेच असं करू नका सांगायचे आणि हसायचे."
अजित पवार यांच्या रोखठोकपणाच्या वैशिष्ट्यावर बोलताना राजेंद्र साठे म्हणाले, "अजित पवारांनी शरद पवारांकडून राजकारणाचा वारसा घेतला. त्या राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणजे व्यवहार्य गोष्टी करणं. मुख्य म्हणजे नियमाच्या बाहेर न जाणं. वेगळ्या गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी नियम बदलायला पाहिजे किंवा कायदा बदलायला पाहिजे, अशा मार्गाने जाणे. मात्र, परस्पर नियम न मोडणे आणि नियमात गोष्टी बसवणे, नियमाच्या बाहेर न जाणे. यातून तो रोखठोकपणा आलेला होता."
"अशा नियमाच्या बाहेर जाऊन कुणी बदली करायला सांगत असेल, निधी द्यायला सांगत असतील तर ते त्याला सरळ नाही म्हणून सांगायचे. त्यांच्या रोखठोकपणाविषयी सांगायचं तर ते अनेक वर्षे अर्थमंत्री होते. त्यांना राज्याची आर्थिक स्थिती चांगली माहिती होती. आपण एका मर्यादेच्या पलिकडे आश्वासनं देऊ शकत नाही आणि अशा आश्वासनांचा काही उपयोग नाही हे त्यांना माहीत होतं," असंही ते नमूद करतात.
अजित पवार यांची बोलण्याची शैली थेट होती. त्याचा त्यांना फटका देखील बसला आहे. 2013 साली एका भाषणात त्यांनी धरणाबाबत विधान केले होते. त्यावरुन त्यांच्यावर टीका देखील झाली होती. अजित पवारांनी नंतर दिलगिरी देखील व्यक्त केली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)