डेव्हिड बेन गुरियनः योगासनं करणाऱ्या, अनेक भाषा बोलणाऱ्या या नेत्यानं इस्रायलचा पाया कसा रचला?

14 मे 1948 साली किंवा ज्यू कॅलेंडरनुसार अय्यर 5708 मधील 5 तारखेला, तेल अवीव संग्रहालयात त्यांनी इस्रायलच्या स्वातंत्र्याची घोषणा वाचून दाखवली.

त्या दिवशी पॅलेस्टाईनवरील ब्रिटिश राजवटीचा हक्क कायदेशीररीत्या संपला. पण अजून ब्रिटीश फौजा तिथून बाहेर पडल्या नव्हत्या. घोषणा उशीरा करावी यासाठी अमेरिकेने त्यांच्यावर दबाव आणला.

पण बेन-गुरियन यांनी इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या घोषणापत्रात असं म्हटलं होतं की, "ज्यू लोकांना त्यांच्या सार्वभौम मातृभूमीत राहण्याचा नैसर्गिक अधिकार आहे."

त्यांनी दोन आठवड्यांत दस्तऐवजाचा पहिला मसुदा तयार केला होता. पुढे धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष व्यक्तींकडून सूचना मिळाल्यानंतर त्याला अंतिम रूप देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

त्यांनी एक सत्ताधारी परिषद देखील स्थापन केली होती, जिने सुरुवातीला इस्रायलचं अस्तित्व घोषित केलं होतं. त्या परिषदेत राष्ट्रीय मुक्ती चळवळीचे प्रतिनिधी होते. त्यांनी आपली नावं बदलून हिब्रूत ठेवावीत असं सांगितलं. (गोल्डा मेयरसन गोल्डा मेयर बनल्या).

देशाच्या उभारणीच्या प्रत्येक पावलावर त्यांचं योगदान आहे. त्यांनी केवळ देशाची निर्मितीच केली नाही तर पुढे पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री म्हणून देशाची सूत्रं देखील हाती घेतली.

म्हणूनच इस्रायलमध्ये त्यांना 'राष्ट्रपिता' मानलं जातं.

गुरेन नाव बदलून बेन गुरियन झाले

डेव्हिड यांचा जन्म 1886 मध्ये झारिस्ट पोलंडमध्ये झाला. वयाची चोविशी गाठल्यानंतर त्यांनी आपलं नाव बदलून बेन-गुरियन असं ठेवलं.

युरोपमध्ये अति सेमिटिझमच्या वातावरणात वाढलेले बेन झिओनिस्ट चळवळीकडे ओढले गेले. या चळवळीनेच ज्यूंसाठी मातृभूमी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वडील या चळवळीचे नेते होते.

1906 मध्ये ते ऑट्टोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या पॅलाटिनेट भागात गेले. तिथे त्यांनी शेतमजूर म्हणून काम केलं. पुढची चार दशकं झिओनिस्टांना प्रेरणा देणारं तत्वज्ञान त्यांनी आत्मसात केलं.

शतकानुशतके अंगमेहनतीचं काम करणाऱ्या ज्यूपेक्षा नवा शेतकरी ज्यू तयार व्हावा यावर त्यांनी भर दिला. त्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. पण, त्यांना लवकरच समजलं की ते शेतीसाठी नव्हे तर राजकारणासाठी जन्माला आलेत.

1907 च्या बोलेह झिऑन सोशालिस्ट पार्टीच्या जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे त्यांनी देशातील ज्यूंना राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्याचा विडाच उचलला होता.

त्यांच्या राजकीय जबाबदाऱ्यांच्या तयारीसाठी त्यांनी तुर्कीमध्ये कायद्याचा अभ्यास सुरू केला. भविष्यात त्याची इस्रायलला मदत होईल असा त्यांना विश्वास होता. पण जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू झालं तेव्हा त्यांना ऑट्टोमन साम्राज्यातून हद्दपार करण्यात आलं.

पुढे ते न्यूयॉर्कला गेले. तिथे त्यांनी पॉलीन मुनविसेशी लग्न केलं. इथे राहूनही ते झिओनिस्ट चळवळीला प्रोत्साहन देत राहिले. 1917 मध्ये ब्रिटीश सरकारने बाल्फोर करार जाहीर केला. त्यात ज्यूंना त्यांच्या घरासाठी जमीन देण्याचं वचन देण्यात आलं.

काही काळानंतर ते ब्रिटिश सैन्याच्या ज्यू कॉर्प्समध्ये सामील झाले. पॅलेस्टाईनला ऑट्टोमन राजवटीपासून मुक्त करण्यासाठी युद्धात सामील होण्यासाठी ते मध्य पूर्वेला गेले.

पुढे इंग्रजांनी ऑट्टोमन साम्राज्याचा पराभव केला. आणि त्यांच्या राजवटीत ज्यूंसाठी राष्ट्र निर्माण करण्याचं काम सुरू झालं.

बेन गुरियन यांनी केलेलं काम

कामगार हा ज्यू राष्ट्राचा पाया आहे असं मानणाऱ्या डेव्हिड बेन-गुरियन यांनी 1920 मध्ये हिस्टाड्रट या इस्रायली कामगार संघटनेची स्थापना केली. बँकिंग, आरोग्य योजना, संस्कृती, कृषी, क्रीडा, शिक्षण, विमा, वाहतूक, रोजगार, गट आणि सहकारी संस्था अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केलं.

इस्रायलच्या निर्मितीमध्ये कामगार संघटना केवळ महत्त्वाच्याच ठरल्या नाही तर 1980 च्या दशकात समाजवादी अर्थव्यवस्थेपासून दूर जाईपर्यंत त्या देशाच्या मुख्य आधार स्तंभांपैकी एक होत्या..

बेन-गुरियन यांनी पॅलेस्टाईनमध्ये रेजिमेंट तयार करण्यास प्रोत्साहन दिले.

दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा त्यांनी ज्यूंना मित्र राष्ट्रांसोबत लढण्यासाठी प्रोत्साहित केलं. नाझींच्या नरसंहारातून पळून जाणाऱ्या ज्यूंच्या सुटकेसाठीही त्यांनी गुप्त व्यवस्था केली.

युद्धानंतर ज्यू गट ब्रिटिशांविरुद्ध हिंसक झाले. बेन-गुरियन यांनी सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वाचं समर्थन केलं असलं तरी अत्यंत क्रूर आणि हिंसक अशा उजव्या विचारसरणीचा निषेध केला.

स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व सशस्त्र गट विसर्जित करून इस्रायल संरक्षण दलाचा भाग बनले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. हे उभं राहिलेलं नवं सैन्य लवकरच इस्रायल राष्ट्रावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार्‍या अरब राष्ट्रांच्या सैन्याशी लढण्यास सज्ज झालं.

जेरुसलेमवरील हल्ला

14 मे 1948 रोजी जेरुसलेमला ट्रान्सजॉर्डनच्या अरब सैन्याने वेढा घातला आणि उत्तरेकडील ज्यू वस्त्यांवर सीरियन आणि इराकी सैन्याने हल्ला चढवला. तर इजिप्शियन लोकांनी दक्षिणेकडून आक्रमण केले.

लष्कराची कमान हाती असलेले पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री बेन त्यावेळी 62 वर्षांचे होते. त्यांच्यासाठी करो या मरो अशी परिस्थिती होती.

त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर शंका उपस्थित झाली असली तरी अखेरीस त्यांनी ते युद्ध जिंकलं. 2,000 वर्षांपूर्वी जुडास मॅकाबियसच्या युद्धानंतरचं हे पहिलं ज्यू युद्ध होतं.

आपल्या शत्रूंना विविध आघाड्यांवर पराभूत करून आपल्या देशाचं अस्तित्व राखणारे बेन देशवासीयांसाठी आता राष्ट्रपिता बनले होते.

पण ज्यू लोकांसाठी हे वरदान होतं, पॅलेस्टिनींसाठी नाही.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संयुक्त राष्ट्रांनी ज्या भूभागाचं विभाजन केलं होतं ते अरब पॅलेस्टिनींनी नाकारलं.

1948 च्या युद्धापूर्वी 14 चौदा लाख पॅलेस्टिनी ब्रिटिश पॅलेस्टाईनमध्ये राहत होते. त्यापैकी नऊ लाख तर नव्याने तयार झालेल्या इस्रायलच्या प्रदेशात राहत होते. त्यातील 700,000 ते 750,000 लोकसंख्या जबरदस्तीने बाहेर काढली गेली. यातले काही लोक सीरिया, लेबनॉन, इजिप्त, ट्रान्सजॉर्डन किंवा गाझा या भागात निर्वासित झाले.

काही मोजके सोडले तर त्यांना त्यांच्या घरांवर आणि जमिनींवर परत येऊ दिलं नाही. युद्धकाळात इस्त्रायलने पॅलेस्टिनींसाठी धोरण तयार केलं. या धोरणामागे बेन-गुरियन होते.

युद्धानंतर बेन-गुरियन यांनी अरबांच्या आक्रमणाचा झटपट आणि कठोर बदला घेतला. त्यांनी अनेकदा संयुक्त राष्ट्राला डिवचलं. इस्रायलला त्याच्या शेजाऱ्यांकडून सातत्याने विरोध झाला.

मार्च 1949 मध्ये ते इस्रायलचे पहिले पंतप्रधान झाले. तेव्हापासून 1960 च्या दशकापर्यंत अनेक राजकीय विरोधक असूनही, त्यांनी इस्रायलच्या राजकीय जीवनावर जवळजवळ संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं होतं.

त्यांना देशातील सर्वच लोकांकडून आदर मिळत होता. त्यामुळे संरक्षणविषयक आणि परराष्ट्र व्यवहारातही निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकार मान्य करण्यात आला.

जेव्हा त्यांना युती करणं अशक्य वाटलं तेव्हा ते राजीनामा देऊन किबुट्झ स्ने बोकर इथे राहायला गेले.

1953 मध्ये, ते थकले असल्याचं कारण देऊन त्यांना निवृत्त करण्यात आलं. पुढे परत त्यांना संरक्षण मंत्री म्हणून बोलावण्यात आलं. त्यानंतर नोव्हेंबर 1955 मध्ये ते पुन्हा पंतप्रधानपदावर आले. तेव्हाच इस्रायलने दुसरं युद्ध घडवून आणण्याचं धोरण स्वीकारलं. बेन-गुरियन यांच्या आयुष्यातील हा सर्वात वाईट क्षण होता.

यश आणि अपयश

बेन-गुरियन यांना असं वाटायचं की, इस्रायलला सर्वात मोठा धोका हा इजिप्तपासून आहे. सोव्हिएत संघाकडून शस्त्रास्त्रं मिळविलेल्या इजिप्तवर फ्रान्स आणि ब्रिटन मिळून हल्ला करतील असा त्यांचा अंदाज होता. म्हणून त्यांनी इजिप्शियन सैन्याविरुद्ध "संरक्षणात्मक युद्ध" सुरू केलं.

फ्रेंच आणि ब्रिटीश सैन्याला सुएझ कालवा काबीज करायचा होता. यात सुरुवातीला त्यांना यश मिळालं. मात्र या हल्ल्यावर अमेरिकेने कडक कारवाई केली. सर्व आक्रमणकर्त्यांनी इजिप्त सोडावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केलं. त्यांच्या या आवाहनाला अमेरिकेने पाठिंबा दिला.

याव्यतिरिक्त, सोव्हिएत संघ हस्तक्षेप करेल या धोक्यामुळे संपूर्ण योजना फसली.

बेन-गुरियन यांनी करार करण्यासाठी दबाव आणला, परंतु पराभव मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता.

पुढच्या चार वर्षात त्यांनी दुसऱ्या महायुद्धात लाखो ज्यूंना मृत्यूच्या छावण्यांमध्ये पाठवणाऱ्या गेस्टापो कर्नल अॅडॉल्फ आयचमनची चौकशी करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्यावर पुन्हा आंतरराष्ट्रीय टीका झाली.

अर्जेंटिनामधून त्यांनी या माझी नेत्याचं अपहरण केलं होतं, या अपहरणावर टीका झाली. इस्रायलमध्ये त्याच्यावर खटला चालवण्याच्या कल्पनेने चिंता वाढली. आयचमनची निष्पक्ष चौकशी केवळ जर्मन किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात होऊ शकते यावर त्यांचा आक्षेप होता.

बेन-गुरियन यांच्यावर भोंदूगिरीचा आरोप करण्यात आला. पण त्यांनी असं घोषित केलं की इस्रायल हे एकमेव ठिकाण आहे जिथे "नैतिक दृष्टिकोनातून" चौकशी केली जाऊ शकते.

1961 मध्ये हा खटला वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाला. न्यायाधीशांनी योग्य काम केल्याचं जगाने पाहिलं. शिवाय आयचमनचे जर्मन वकील रॉबर्ट सर्वॅटीयस म्हणाले की, हा खटला पश्चिम जर्मनीमध्ये जितका निष्पक्ष पार पडला असता त्यापेक्षा कैक पटीने जास्त इथे पार पडला.

यामुळे जगभरात बेन-गुरियन यांची वाहवा झाली. त्यांची कारकीर्द कितीही वादग्रस्त असली तरी ती कधीही न संपणारी दिसत होती.

पण दीर्घकाळ पदावर राहणाऱ्या राजकारण्यांना कधीतरी कटू सामना करावाच लागतो. भूतकाळात झालेल्या चुका त्यांना त्रास देतात.

शेवटी 1963 मध्ये त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

आपल्या पंतप्रधानपदाच्या शेवटच्या कार्यकाळात त्यांनी सर्व शेजारील देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केले.

मध्यपूर्वेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अरब नेत्यांशी गुप्त चर्चा सुरू केल्या. परंतु यातून काहीही निष्पन्न झालं नाही.

1970 मध्ये वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली.

बेन-गुरियन यांना इस्रायलमधील अंतर्गत तणाव जाणवत होता.

1967 च्या युद्धानंतर त्यांनी जेरुसलेमच्या बाहेर अरब क्षेत्र राखून ठेवण्यास विरोध केला.

1973 मध्ये इजिप्शियन आणि सीरियन सैन्याने दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर हल्ला केला. या युद्धासाठी इस्रायल तयार नव्हतं. बेन-गुरियन यांच्या मते, योम किप्पूरच्या युद्धात पश्चाताप व्यक्त करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच उरलं नाही.

युद्धानंतर दोन महिन्यांनी वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

इस्रायली लेखक आमोस ओझ म्हणतात, त्यांच्याकडे शेवटपर्यंत अफाट शारीरिक आणि बौद्धिक क्षमता होती.

त्यांना रशियन, यिद्दीश, तुर्की, फ्रेंच आणि जर्मन भाषा बोलता यायच्या. त्यांनी अरबी भाषेचा अभ्यास केला. स्पॅनिश शिकले. वयाच्या 56 व्या वर्षी ते सेप्टुआजिंट ही जुन्या कराराची ग्रीक आवृत्ती वाचण्यासाठी ग्रीक शिकले. वयाच्या 68 व्या वर्षी बुद्धांचे संवाद वाचण्यासाठी संस्कृत शिकले.

त्यांनी भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावर योग अभ्यास केलं.

कालांतराने बेन-गुरियन यांच्यावर होणारी टीका थांबली. त्यांना जे ध्येय साध्य करायचं होतं ते त्यांनी केलं.

इस्रायलच्या निर्मितीमध्ये त्यांनी स्वतःला इतकं वाहून घेतलं होतं की, ते त्यांच्याच लोकांसाठी प्रिय आणि तितकेच अप्रिय होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)