You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोशे दायान: अरब देशांना हरवणारे इस्रायलचे संरक्षणमंत्री गुप्तपणे भारतात का आले होते?
- Author, रेहान फजल,
- Role, बीबीसी प्रतिनिधी.
जगातील मोठ्यातला मोठा इशारासुद्धा लोकांना हवाई हल्ल्यांना सामोरं जाण्यासाठी तयार करू शकत नाही. जेव्हा हवाई हल्ल्याचा सायरन वाजतो तेव्हा लोक त्यावर विश्वास ठेवण्यासाठी सहसा तयार होत नाहीत.
5 जून 1967 च्या सकाळी जेव्हा इस्रायली विमानांनी कैरोवर हल्ला चढवला तेव्हा तिथल्या बाजारांमध्ये गर्दी होती. त्या दरम्यान इस्रायल विरुद्धच्या लढाईत इराक इजिप्त आणि जॉर्डनच्या युतीमध्ये सामील झाला होता. इराकच्या सहभागाचं स्वागत करताना इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष नासर म्हणाले की, 'इस्रायलला स्वप्नातून जागं करण्यासाठी आम्ही लढायला उत्सुक आहोत.'
दुसरीकडे, इस्रायलमधील सर्वात मोठं शहर तेल अवीवमधील लोकांची ही तीच प्रतिक्रिया होती. तेव्हा अगदी तीन दिवसांतचं 'सायनाई हिरो' असलेल्या मोशे दयानल यांना इस्रायलचे संरक्षण मंत्री बनवण्यात आलं. त्यांनी पदभार स्वीकारताच ते म्हणाले होते की, 'अरब देशांवर हल्ले करण्याची ही योग्य वेळ नाहीये.'
जेव्हा विमानं हल्ल्यासाठी सुसज्ज झाली तेव्हा तेल अवीवमधल्या लोकांना वाटलं की, विमानांचा युद्धाभ्यास सुरू असेल. पण हा युद्धाभ्यास नव्हता. सकाळी सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात इस्रायलच्या हवाई दलाने अरब देशांच्या संपूर्ण हवाई दलाला उद्ध्वस्त केलं. खुल्या वाळवंटात वायूसेनेच्या मदतीविना फिरणारे इजिप्शियन रणगाडे आणि तोफखाना उडवणे म्हणजे इस्त्रायली विमानांसाठी एक प्रकारचा 'युद्ध सराव' ठरला.
एका दिवसात संपूर्ण इजिप्शियन हवाई दल नष्ट झालं
या हल्ल्यात रशियन बनावटीची 21 मिग 200 विमान उड्डाण करण्यापूर्वीच धावपट्टीवर नष्ट झाली. त्याच सुमारास इस्त्रायली विमानांनी जॉर्डन, सीरिया आणि इराकमधील हवाई तळांवर बॉम्बहल्ले केले.
एका दिवसात एकट्या इजिप्तने 300 विमानं गमावली. यासोबतच सीरियाची 60, जॉर्डनची 35 आणि इराकची 16 विमानंही नष्ट करण्यात आली. तर इस्रायलच्या हवाई दलातील 400 विमानांपैकी फक्त 19 विमानं नष्ट झाली. ही सर्व जमीनीवरुन मारा करणाऱ्या तोफांच्या गोळ्यांना बळी पडली होती.
इस्रायलच्या या संपूर्ण विजयाचे श्रेय नवे संरक्षण मंत्री बनलेल्या मोशे दायान यांना देण्यात आलं. विरोधी पक्षनेते मेनाखिम बेगिन यांनी पंतप्रधान एश्कोल यांना सांगितलंच होतं की, 'जर तुम्ही मोशे दायान यांना संरक्षण मंत्री केलंत तर अर्ध्या तासात संपूर्ण देश तुमच्या मागे उभा राहील.'
एश्कोल यांना दायान आवडत नव्हते पण तरीही त्यांनी, बेगिन यांचा सल्ला मानला आणि 1 जून 1967 रोजी त्यांनी दायान यांना मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त केलं.
शिस्त आणि वक्तशीरपणा
मोशे दायान यांच्या चरित्रात शबताई टेवेथ लिहितात, 'लष्करी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी त्यांनी संध्याकाळी 7 ची वेळ निश्चित केली होती. मात्र काही लष्करी अधिकारी त्यावेळात बैठकीसाठी पोहोचू शकले नाहीत.
अजून काही लोक पोहोचले नसल्याने बैठकीला थोडा वेळ लागेल, असं सांगितल्यावर मोशे दायान म्हणाले, तुम्ही मला 7 वाजता यायला सांगितलं होतं. त्यामुळे बैठक आत्ताच सुरू होईल. पण मला तुमच्या योजना आधी बघायच्या आहेत. तुमच्याकडे असतील तर त्या दाखवा. त्यानंतर मी तुम्हाला माझी योजना सांगेन.'
त्यांच्या सैन्याने त्यांच्या आदेशाचच पालन करावं अशी त्यांची अपेक्षा असायची. एकदा त्यांच्या आदेशाविरुद्ध सैनिकांची एक तुकडी पूर्वेकडे जॉर्डन नदीपर्यंत गेली तेव्हा त्यांना माघार घेण्याचा आदेश देण्यात आला. सैन्याने जॉर्डनमध्ये प्रवेश करू नये याची खात्री करण्यासाठी त्यांनी नदीवरील पूल उडविण्याचा आदेश दिला.
सहा दिवसांच्या युद्धाच्या समाप्तीनंतर मोशे दायान पुढील सहा वर्ष इस्रायलच्या बादशाहासारखे वावरले. इस्रायलच्या लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. ते एक दिवस इस्रायलचे पंतप्रधान होतील असा विश्वास लोकांना होता.
डोळ्याला गोळी लागली
20 मे 1915 रोजी जन्मलेल्या मोशे दायान यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात भूमिगत ज्यू चळवळीतील 'हॅगाना' सदस्य म्हणून केली. नंतर ते विची फ्रेंच विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वतीने सीरियात लढले.
8 जून 1941 रोजी सकाळी 7 वाजता, मोशे टेरेसवर मारल्या गेलेल्या फ्रेंच सैनिकाच्या दुर्बिणीतून समोरचा भाग पाहत होते. तेवढ्यात दुरून गोळी झाडण्यात आली. ती गोळी मोशे यांच्या डाव्या डोळ्याला लागली. दुर्बीण आणि लोखंडाचे तुकडे त्यांच्या डोळ्यात घुसले. त्याचा साथीदार मार्ट याने त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्यांना ट्रकमध्ये बसवून हॉस्पिटलमध्ये नेले.
शबताई टेवेश त्यांच्या 'मोशे दायान: द सोल्जर, द मॅन, द लिजंड' या पुस्तकात लिहितात, 'गोळी लागल्यावर मोशे दायान यांनी साधा उसासाही टाकला नाही, ते रडले ओरडले नाहीत, का त्यांनी ऊं का चू केलं नाही. दवाखान्यात पोहोचताच त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. मात्र त्यांना झालेली दुखापत इतकी गंभीर होती की डॉक्टर काहीही करू शकत नव्हते. त्यांच्या डोळ्यांतील सर्व काचेचे आणि लोखंडाचे तुकडे काढून टाकणे आणि डोळ्याची रिकामी झडप बंद करणे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर उरला होता.
1957 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील प्लास्टिक सर्जन डॉ. जॅक पेन यांनी त्यांच्या बंद डोळ्याच्या ठिकाणी काचेचा डोळा लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. तेव्हापासून, मोशे दायान यांनी आपली डाव्या डोळ्यावर काळा पॅच घालण्यास सुरुवात केली, जो आयुष्यभरासाठी त्यांचा ट्रेडमार्क राहिला.
त्यांच्याबद्दल नेहमीच एक कॉम्प्लेक्स असायचा. याविषयी जेव्हा जेव्हा त्यांना विचारलं जायचं तेव्हा ते अस्वस्थ व्हायचे. त्याच्या मृत्यूनंतर 24 वर्षांनी म्हणजेचं 2005 मध्ये त्यांच्या डोळ्याच्या पॅचचा 75,000 हजार डॉलरमध्ये लिलाव झाला.
कृषी आणि संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी
डोळ्याला दुखापत झाल्यानंतर काही वर्षांनी मोशे दायान परतले आणि 1948 मध्ये हॅगाना कमांडचे प्रमुख बनले. त्याच वर्षी अरबांविरुद्धच्या लढाईत त्यांना जेरुसलेम आघाडीवर कमांडर बनवण्यात आलं. 1953 मध्ये ते इस्रायली सैन्याचे प्रमुख बनले. 1956 मध्ये त्यांनी इस्रायलला अरब देशांविरुद्ध विजय मिळवून दिला.
एका वर्षानंतर त्यांनी सैन्यातून निवृत्ती घेतली आणि राजकारणात प्रवेश केला. बेन गुरीयान यांच्या मंत्रिमंडळात ते कृषी मंत्री झाले. रणांगणावर जेवढी प्रसिद्धी त्यांनी मिळवली तितकीच प्रसिद्धी त्यांना कृषी क्षेत्रात सुद्धा मिळाली.
'टाइम' या मासिकाने 16 जून 1967 च्या अंकात लिहिलंय की, 'जेव्हा मोशे दायान संरक्षण मंत्री झाले, तेव्हा त्यांची एकच तक्रार होती की, सैनिकांसोबत न राहता त्यांना त्यांचा बहुतेक वेळ टेबलवर घालवावा लागतो.'
मोशे दायान यांचं संपूर्ण आयुष्य विरोधाभासांनी भरलेलं होतं. मायकेल हॅडो, यांनी दायान यांची अनेकदा मुलाखत घेतली होती. ते लिहितात, 'फक्त युक्तिवादासाठी कल्पना नष्ट करण्यात त्यांना आनंद मिळायचा. अनेकदा ते अशा विचारावर टीका करताना दिसायचे, ज्याची त्यांनी आदल्या दिवशीच प्रशंसा केलेली असायची. इस्रायली असूनही त्यांना अरबांप्रति खूप आदर होता. यात असे ही लोक होते ज्यांनी 1930 च्या दशकात मोशेंच्या नहलाल या गावावर हल्ला केला होता आणि त्यांना बेदम मारहाण केली होती.'
मोशे यांना अरबी भाषा अस्खलित बोलता यायची. आणि इजिप्शियन नेत्यांशी ते अरबीमध्येच बोलायचे.
मनस्वी माणूस
मायकल बी ओरेन त्यांच्या 'सिक्स डेज ऑफ वॉर: जून 1967 अँड द मेकिंग ऑफ द मॉडर्न मिडल ईस्ट' पुस्तकात लिहितात, 'कवी आणि लहान मुलांच्या कथा लिहिणरे मोशे दायान यांनी जाहीरपणे कबूल केलं होतं की त्यांना मुलं जन्माला घातल्याचं दुःख आहे. ते त्यांच्या बेईमानीसाठी संपूर्ण इस्रायलमध्ये कुप्रसिद्ध होते. ते एकदा म्हणाले होते की जर त्यांना एखादं आयुष्य आणखी मिळालं असतं तर त्यांना अविवाहित राहायला आवडलं असतं.'
1971 मध्ये, मोशेंच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांची पहिली पत्नी, रुथ दायान यांनी त्यांना घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर दोन वर्षांनी त्यांनी घटस्फोटित असलेल्या रशेल करेम यांच्याशी लग्न केलं. मोशेच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीची मुलं आणि करेम यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीपासून झालेली मुलं या लग्नाला उपस्थित नव्हते.
विरोधाभासी व्यक्तिमत्व
लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल वेगवेगळी प्रतिमा होती. त्यांच्या प्रशंसकांपैकी एक असलेले मीर अमित त्यांचं वर्णन "अस्सल, शूर, मूळ आणि केंद्रित सेनापती, ज्यांच्या नसांनसात आत्मविश्वास होता." असं करतात तर गिडॉन राफेल सारखे समीक्षक त्यांना वेगळ्या रूपात पाहतात.
त्यांच्या मते, 'नाव वल्हवणे त्यांचा आवडता छंद होता. ते एवढ्या जोरात नाव वल्हवायचे की, नाव बुडायची नाही मात्र काही लोक नक्कीच त्यातून खाली पडायचे. '
इस्रायलचे पंतप्रधान लेवाई एश्कोल यांची पत्नी मिरियम एश्कोल यांनी मोशेंची तुलना अबू जिल्दी या अरब लुटारूशी केली होती. या लुटारूला डोळे नव्हते.
वयाच्या 38 व्या वर्षी दायान इस्रायलचे लष्करप्रमुख बनले. त्यांनी सूडाचे धोरण स्वीकारले. यातून त्यांना जगभरातून विरोध झाला पण त्यामुळे ते त्यांच्या देशात खूप लोकप्रिय झाले.
गिडॉन राफेल त्यांच्या 'डेस्टिनेशन पीस: थ्री डिकेड्स ऑफ इस्रायली फॉरेन पॉलिसी' पुस्तकात लिहितात, 'मोशे दायान यांचा एकल कामगिरीवर विश्वास होता. काही लोक त्यांचा आदर करत होते, पण त्यांच्या कथित राजकीय स्टंटबाजीमुळे काही लोक त्यांना घाबरतं होते.'
दुसरीकडे, इस्रायलच्या पॅराट्रूप बटालियनचे डेप्युटी कमांडर गडालिया गाल यांचा विश्वास होता, "दायान यांची नियुक्ती ताज्या हवेच्या श्वासासारखी होती. ते परिवर्तनाचे प्रतीक होते."
योम किप्पूरच्या लढाईत मोशे खलनायक ठरले
मोशे दायान यांना लोकांची, विशेषतः राजकारण्यांची संगत आवडायची नाही. शबताई टेवेथ लिहितात, 'दायान यांच्या साथीदारांना माहित होतं की ते फक्त 15 ते 20 मिनिटेच त्यांची कंपनी सहन करू शकतात. जर ते त्यांच्या खुर्चीत बसून हसायला लागले तर याचा अर्थ त्यांची बैठक संपली आहे. जर कोणी ही चिन्हे समजण्यात अयशस्वी झाला तर काही मिनिटांनंतर, दायान स्वतः उभे राहून त्याला निरोप द्यायचे. आपल्याला पंतप्रधान होण्यात अजिबात स्वारस्य नाही, असं सांगून ते आपल्या या कृतीचं समर्थन करायचे.
मोशे दायान इस्रायलमधील सर्वोच्च पदावर न बसण्याचं कारण म्हणजे टीमचा एक भाग म्हणून काम न करण्याची त्यांची अनिच्छा किंवा असमर्थता. यात 1973 च्या योम किप्पूरच्या लढाईत इस्रायली सैनिकांच्या कमकुवत तयारीचा दोषही त्यांच्या माथी मारला गेला. त्यांनी अरब देशांवर प्रथम हल्ला न करण्याचं कारण म्हणजे जगाने आपल्या देशाला हल्लेखोर म्हणावं अशी त्यांची इच्छा नव्हती. युद्धानंतर लगेचच त्यांनी इस्रायली लोकांच्या मोठ्या वर्गाचा विश्वास गमावला.
मोरारजी देसाई यांच्याशी दिल्लीत गुप्त भेट
पण असं असतानाही ते मेनाखिम बेगिन यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री झाले. इजिप्तबरोबर शांतता कराराच्या वाटाघाटी करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती. मात्र त्यानंतर पश्चिमेकडील पॅलेस्टिनी अरबांच्या वसाहतीच्या मुद्द्यावर बेगिन यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
1977 मध्ये परराष्ट्र मंत्री असताना मोशे यांनी गुप्तपणे भारताला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी पंतप्रधान मोरारजी देसाई आणि परराष्ट्र मंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी तासभर बैठक केली. मोरारजी देसाई यांचे सरकार इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास उत्सुक होते, मात्र त्याचवेळी त्यांना अरब देशांना नाराज ही करायचं नव्हतं.
मोशे दायान यांनी भारतासोबत राजकीय संबंध प्रस्थापित करण्याची इच्छाही दर्शवली. पण यासाठी इस्रायल व्याप्त अरब प्रदेश सोडून देण्याची आणि पॅलेस्टिनी लोकांचं पुनर्वसन करण्याच्या इस्रायली धोरणात बदल करण्याची अट मोरारजी देसाई यांनी घातली. इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण यामुळे धोका निर्माण होऊ शकतो असं म्हणत ही अट दायान यांनी नाकारली.
शेवटी मोरारजी देसाई यांनीही राजकीय संबंध प्रस्थापित करण्याची आणि इस्रायलला जाण्याची ऑफर नाकारली. नंतर विकिलिक्सने प्रसिद्ध केलेल्या अमेरिकन दूतावासाच्या केबलमध्ये म्हटलं आहे की इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात यांनी मोरारजी देसाई यांना मध्यपूर्व शांतता प्रक्रियेत भारताचा प्रभाव वापरण्याची विनंती केली होती.
याच घटनेत मोरारजी देसाई यांनी मोशे दायान भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण चर्चेची प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही आणि दोन वर्षांत मोरारजी देसाई यांचं सरकार पडलं. दुसरीकडे, मोशे दायान यांनीही परराष्ट्र मंत्री पदाचा राजीनामा दिला.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
जून 1979 मध्ये मोशे दायान यांन कर्करोग झाल्याचं निदान झालं. काही लोकांनी तर त्यांच्या दुसऱ्या डोळ्याची दृष्टीही कमी होत असल्याच्या नोंदीही केल्यात. दायान यांनी आयुष्यभर गंभीर आजारांशी झुंज दिली. त्यांची घशाची आणि हर्नियाचीही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना कमी ऐकू यायचं.
16 ऑक्टोबर 1981 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी मोशे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मोशे आयुष्यभर इस्रायली जनतेचे 'हिरो' असले तरी पण राजकीय जीवनात ते एकाकी होते.
प्रसिद्ध इस्रायली लेखक अमोस ऍलनच्या नजरेत ते 'दुःखी, एकाकी आणि प्रतिभावान व्यक्ती' होते. तेच दुसरीकडे ते खूप हुशार, महत्वाकांक्षी आणि ग्लॅमरसदेखील होते. एकीकडे लोकांना ते आवडायचे तर दुसरीकडे लोक त्यांचा तिरस्कार देखील करायचे. मोशे दायान नेहमीच 100 नव्या कल्पना घेऊन यायचे. पण त्यापैकी 98 कल्पना अतिशय धोकादायक असायच्या. पण दोन कल्पना अशा असायच्या की ज्याला काही तोड नसायची.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)