ठाणे लोकसभा: आनंद दिघेंचा वारसा असलेल्या ठाण्याच्या जागेबाबत एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?

- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठीसाठी
मुंबईनंतर शिवसेनेची सर्वाधिक शक्ती असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक अत्यंत रंजक होणार हे स्पष्टच आहे.
फक्त ती शिंदे विरुद्ध ठाकरे गटात होणार की ठाकरे गट विरुद्ध भाजपमध्ये यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अगदी सुरुवातीलाच अपेक्षेप्रमाणे राजन विचारे यांची या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीला उमेदवार ठरवण्यात अद्याप यश आलेलं नाही.
महायुतीमध्ये लोकसभेच्या जागांमध्ये सर्वाधिक तिढा निर्माण झालेल्या मतदारसंघांमध्ये ठाण्याचा प्रामुख्यानं समावेश आहे. त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या या घरच्या मैदानावर भाजपनं अगदीच ठामपणे दावा केला आहे.
कल्याणच्या बाबतीतही एकनाथ शिंदे अशाच प्रकारच्या दबावात असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं कल्याण किंवा ठाणे या दोनमधून एकाची निवड करण्याची एकप्रकारे कठीण परीक्षा भाजपनं एकनाथ शिंदेंसमोर उभी केली आहे.
त्यामुळं एकनाथ शिंदे नेमका काय विचार करणार आणि कोणता निर्णय घेणार? यावरच भविष्यातील महायुतीचं आणि एकनाथ शिंदे यांचं राजकारणही अवलंबून असणार आहे.
राजन विचारेंच्या विरोधात कोण?
खासदार राजन विचारे यांनी पाच वर्षांसाठी राष्ट्रवादीकडं गेलेला मतदारसंघ 2014 मध्ये पुन्हा खेचून आणला होता. त्यानंतर सलग दोन वेळा ते खासदार आहेत. बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहाणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमध्ये विचारे यांचा समावेश होता.
ठाकरे गटासाठी या मतदारसंघातली निवडणूक अस्तित्वाची लढाई असल्यासारखी आहे. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार यामध्ये काहीही शंका नव्हती. पण आता ठाकरे गटाच्या राजन विचारे यांच्या विरोधात कोण असणार? हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे.
भाजपनं या मतदारसंघाची मागणी लावून धरण्यामागचं कारण म्हणजे, मतदारसंघातील 6 पैकी चार विधानसभा मतदारसंघात त्यांचे आमदार आहेत. त्यामुळं मतदारसंघामध्ये आपली शक्ती जास्त असल्याचं कारण भाजप देत आहे.

फोटो स्रोत, Rajan Vichare
भाजपकडून या मतदारसंघातील विद्यमान आमदार संजय केळकर यांच्याबरोबर संजीव नाईक आणि विनय सहस्रबुद्धे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. भाजपनं मतदारसंघात प्रचाराच्या दृष्टीनंही सगळी तयारी करून ठेवल्याचं सांगितलं जात आहे.
पण त्याचवेळी शिंदेंकडूनही हा मतदारसंघ सोडला जाण्याची शक्यता अगदीच कमी आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांचा स्वतःचा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात येतो. शिवाय त्यांचं संपूर्ण राजकारणच ठाण्याभोवती राहिलेलं आहे. त्यामुळं शिंदे गटातही नेते उमेदवारीसाठी सज्ज आहेत.
...तर ठाण्यातून श्रीकांत शिंदें?
शिंदेंचे विश्वासू आणि नीकटवर्तीय नरेश म्हस्के यांचं नाव या चर्चांमध्ये सर्वात आघाडीवर आहे. तसंच आमदार प्रतास सरनाईक आणि रवींद्र फाटक यांच्या नावाचीही चर्चा आहे.
पण शिंदेंना जर ठाणे मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदेंचा कल्याण मतदारसंघ सोडावा लागला तर ते ही सगळी नावं बाजुला ठेवून श्रीकांत शिंदेंना ठाण्यातून लोकसभेच्या रिंगणात उतवरवण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकूण स्थिती आणि श्रीकांत शिंदे यांना इतर पक्षाच्या आणि विशेषतः भाजपच्याही नेत्यांचा तिथं असलेला विरोध पाहता एकनाथ शिंदे असा निर्णय घेण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

फोटो स्रोत, Shrikant Shinde
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या संपूर्ण चित्रात कुठही ठळकपणे दिसत नसला तरी आनंद परांजपे हे या मतदारसंघातून निर्णय घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे. श्रीकांत शिंदेंबरोबरचे त्यांचे राजकीय संबंध पाहता ते काय निर्णय घेतात याकडंच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
ठाणे मतदारसंघाचा इतिहास
सुरुवातीला मतदारांनी या मतदारसंघातून गोविंद वर्तक, सोनूभाऊ बसवंत असे काँग्रेसचे नेते खासदार बनवत लोकसभेवर पाठवले. पण त्यानंतर जनता पार्टी आणि पुढं भाजपनं याठिकाणी वर्चस्व मिळवलं.
1977 आणि 1980 मध्ये जनता पार्टीचे रामभाऊ म्हाळगी यांनी मतदारसंघाचं नेतृत्व केलं. पण 1982 मध्ये इथून भाजपचे जगन्नाथ पाटील विजयी झाले. परत काँग्रेसनं हा मतदारसंघ मिळवला. पण पुन्हा भाजपचे राम कापसे 1989 आणि 1991 अशा दोन वेळा याठिकाणाहून निवडून आले.
हे सर्व सुरू असतानाच मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेचं वजन वाढत होतं. ठाण्यात शिंदेंचे राजकीय गुरू आनंद दिघेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं वर्चस्व निर्माण केलं आणि 1996 मध्ये पहिल्यांदा याठिकाणी शिवसेनेचे आनंद परांजपे खासदार म्हणून विजयी झाले.

त्यानंतर 1998, 1999 आणि 2004 मध्येही प्रकाश परांजपे यांनीच विजय मिळवत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात ठेवला. 2008 मध्ये प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत इथं शिवसेनेचाच भगवा फडकला. खासदार बनले प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद परांजपे.
पण 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांनी शिवसेनेच्या हातून हा बालेकिल्ला हिसकावला. पण 2014 मध्ये राजन विचारे यांनी शिवसेनेसाठी पुन्हा हा मतदारसंघ काबीज केला आणि 2019 मध्येही ही जागा राखली.
2019 आणि त्यानंतरची स्थिती
ठाण्यातील 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेनं राजन विचारे यांना मैदानात उतरवलं होतं. तर त्यांच्या विरोधात होते शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आनंद परांजपे.
या लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांनी आनंद परांजपेंचं आव्हान पेलत 4 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत त्यांचा पराभव केला होता. त्यामुळं याठिकाणी नेते गेल्यानंतरही शिवसेनेचं वर्चस्व असल्याचं पुन्हा पाहायला मिळालं.
त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र परिस्थिती बदलेली पाहायला मिळाली. विधानसभा निवडणुकीनंतरची राजकीय स्थिती आणि नवी समीकरणं यामुळं राज्यात मविआची सत्ता आली.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आणि भाजपला समर्थन असलेले आमदार विजयी झाले. त्यामुळं भाजपनं इथं त्यांची शक्ती अधिक असल्याचा दावा कायम ठेवला आहे.

फोटो स्रोत, Eknath Shinde
पण एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना पक्षच ताब्यात घेतला. त्यानंतर मात्र गेल्या दीड वर्षांमध्ये मतदारसंघामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून वर्चस्वाचे दावे प्रतिदावे पाहायला मिळत आहे.
दोन्ही गटांच्या नेत्यांना इथून कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसतं. त्यामुळं मतदान आणि निकालानंतरच शिवसैनिक खऱ्या अर्थानं कुणाच्या पाठिशी आहेत, याचं चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.
शिवसैनिकांवर मदार
राजन विचारे हे शिवसेनेतील दुफळीनंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजुनं ठामपणे उभे राहिले आहेत. पण ठाण्यातील अनेक नेते आणि महापालिकातील नगरसेवक यांनी शिंदेंना पाठिंबा दर्शवला आहे.
पण ही झाली नेत्यांबाबतची स्थिती. सामान्य शिवसैनिक नेमके कुणाच्या बाजुनं आहेत याचा प्रत्यय या निवडणुकीच्या निकालानंतर नक्कीच सर्वांना आल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळं कितीही दावेप्रतिदावे करण्यात येत असले तरी सामान्य शिवसैनिकांवरच दोन्ही बाजुच्या उमेदवारांची मदार अवलंबून असणार आहे. त्यांचा कौल समोर आल्यानंतरच शिंदेंच्या बंडाचा निर्णय शिवसैनिकांना योग्य वाटला की नाही हेही स्पष्ट होईल.
पण त्याआधी एकनाथ शिंदे यांना सध्याचा त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपबरोबरचा संघर्ष संपवून हा मतदारसंघ मिळवावा लागणार आहे. कारण भाजपनं हा मतदारसंघ मिळवला तर ठाण्यातील मतदार टिकवण्याचं काम त्यांच्यासाठी आणखी कठिण होत जाईल हे जवळपास नक्की आहे.
बदलेली राजकीय समीकरणं, शिवसेना राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळं निर्माण झालेला गुंता यामुळं या मतदारसंघातली यावेळची निवडणूक प्रचंड चुरशीची होणार हे मात्र अगदी स्पष्टच आहे.











