लंडनमध्ये सापडला कंबोडियातील 700 वर्षांपूर्वीच्या मौल्यवान दागिन्यांचा साठा

गेल्या वर्षी लंडनमध्ये काही प्राचीन दागिन्यांचा साठा सापडला होता. हे दागिने कंबोडियातील 700 वर्षे जुन्या अंगकोर वाट कालीन विष्णु मंदिरातील असल्याची माहिती समोर आली आहे.

चोरीचे हे दागिने ब्रिटनमधील प्राचीन वस्तूंचे तस्कर डग्लस लॅचफोर्ड यांच्याकडे होते.

तज्ज्ञांच्या मते, इतके प्राचीन दागिने त्यांनी आजवर कधीच पाहिले नव्हते. हे दागिने पाहून ते आश्चर्यचकित झाले आहेत.

सदर दागिन्यांचा संग्रह गुप्तपणे कंबोडियाला पाठवून देण्यात येणार आहे.

त्यानंतर हे दागिने कंबोडियातील राष्ट्रीय संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील, अशी माहिती मिळाली आहे.

डग्लस लॅचफोर्ड यांचा 2020 मध्ये मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्यावर अमेरिकेत खटला सुरू होता.

डग्लस यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाने चोरलेला संग्रह कंबोडियाला परत करण्याचे आश्वासन दिलं होतं.

मात्र प्रत्यक्षात काय आणि कसं मिळेल याची अधिकाऱ्यांना कल्पना नव्हती.

कंबोडियाच्या तपास पथकाचे प्रमुख ब्रॅड गॉर्डन यांनी सर्वप्रथम हे दागिने पाहिले.

गेल्या वर्षी ते लंडनला गेल्यानंतर त्यांना लॅचफोर्ड कुटुंबाने दागिने पाहण्यासाठी नेलं होतं.

याविषयी माहिती देताना गॉर्डन यांनी बीबीसीला सांगितलं, “लॅचफोर्ड कुटुंबाने मला एका अज्ञात ठिकाणी नेलं. कार पार्कमध्ये उभ्या असलेल्या वाहनात 4 बॉक्स ठेवण्यात आले होते."

ते पुढे म्हणतात, "हे दागिने पाहता क्षणी मी भावनिक झालो, असं ते म्हणाले.

अंगकोरवाट मंदिराची लूट

ते बॉक्स उघडल्यानंतर गॉर्डन यांना त्यामध्ये 77 सोन्याचे दागिने आढळून आले. यामध्ये मुकूट, बेल्ट आणि कानातल्या दागिन्यांचा समावेश होता. या संग्रहात सापडलेली एक मोठी वाटी किंवा वाडगे कदाचित 11 व्या शतकातील असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या वाडग्याचा उपयोग अंगकोरच्या राजघराण्याला भात देण्यासाठी केला जात असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

तज्ज्ञांच्या मते, “सापडलेल्या मुकूटांपैकी एक अंगकोर काळापूर्वीचा आहे. तो कदाचित 7व्या शतकात बनवण्यात आलेला असावा.

इतर दागिन्यांमध्ये कोरीव फुलांची एक कलाकृती देखील सापडली आहे. या दागिन्यांचा आकार आणि आकार अंगकोर वाट मंदिराच्या आतील दगडी कोरीव कामांसारखाच आहे.

मात्र, हे दागिने कधी आणि कसे चोरी झाले आणि लंडनपर्यंत पोहोचले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

विशेष म्हणजे, अंगकोर वाटला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे.

हे जगातील सर्वात मोठं धार्मिक स्थळ मानलं जातं.

यांची बांधणी 1122 मध्ये झाली होती. भगवान विष्णूला समर्पित असं हे मंदिर आहे.

फ्रेंच राजवटीच्या काळात अंगकोर वाटची लूट झाली.

तथापि, कंबोडियातील उर्वरित मंदिरे 1970 च्या दशकात खमेर रूजच्या राजवटीत लुटली गेली, असा इतिहास आहे.

त्यानंतर काही वर्षे येथील वातावरण अशांतच होतं.

दागिने विकण्यासाठी पुस्तक लिहिलं

पुरातत्वशास्त्रज्ञ सोनेत्रा सेंग यांनी अंगकोर वाटच्या दागिन्यांचा आणि कोरीव कामांचा वर्षानुवर्षे सखोल अभ्यास केला आहे.

त्या म्हणतात, "या दागिन्यांमुळे हे सिद्ध होते की, कोरीव कामांबाबत अफवा आहेत, असं म्हटलं जायचं पण प्रत्यक्षात ते सत्य होतं. भूतकाळात कंबोडिया खूप श्रीमंत होता.”

यातील काही दागिने यापूर्वीही समोर आले आहेत. 2008 मध्ये, डग्लस लॅचफोर्ड यांनी त्यांची सहकारी एम्मा बंकर यांच्यासमवेत खमेर गोल्ड नावाचे पुस्तक लिहिलं होतं. त्यामध्ये या संग्रहातील काही दागिन्यांचा समावेश होता.

खमेर कालीन वस्तूंचे तज्ज्ञ अॅशले थॉम्पसन यांनी त्या पुस्तकासह इतर दोन पुस्तके म्हणजे सेल्स ब्रोचर असल्याचं वर्णन केलं आहे.

विकण्यासाठी आमच्याकडे काय उपलब्ध आहे, याची माहिती खाजगी संग्राहकांना देण्यासाठीच ही पुस्तके लिहिण्यात आली होती.

अॅशले थॉम्पसन म्हणतात, "या दागिन्यांच्या तुकड्यांबात माहिती देणं, इतर तज्ज्ञांना त्याची खात्री पटवण्यासाठी आमंत्रित करणं, असाही त्याचा हेतू होता.”

“हे दागिने एकत्रित करण्यासाठी तज्ञांना वेळ लागेल,” असं SOAS युनिव्हर्सिटी लंडनमधील साउथ ईस्ट एशियन आर्टचे प्रोफेसर थॉम्पसन यांना वाटतं.

ब्रिटिश संग्रहालयात अनेक दागिने

कंबोडियन अधिकार्‍यांच्या मते, अंगकोर राजघराण्यातील अनेक दागिने अद्याप सापडलेले नाहीत.

लॅचफोर्ड यांनी 2019 मध्ये काही दागिने विकण्यासाठी गुप्त प्रयत्न केले होते. त्यांनी ईमेलद्वारे ग्राहकांशी संवाद साधला होता. या पत्राचा पुरावा कंबोडियन प्रशासनाकडे उपलब्ध आहे.

आम्ही लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांना विचारलं की लॅचफोर्डच्या साथीदारांची देखील चौकशी केली जात आहे का, परंतु त्यांनी याविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.

पोलीस म्हणाले, “फौजदारी प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी आणि तपासादरम्यान कोणाचीही ओळख उघड करता येत नाही.”

गेल्या वर्षी बीबीसीने कंबोडियाला जाऊन काही लोकांची मुलाखत घेतली होती.

जे नंतर सरकारी साक्षीदार बनले. त्यांनी प्राचीन दागिन्यांची ओळख पटवली होती.

त्यांनी सांगितलं की, “आम्ही या वस्तू मंदिरातून चोरल्या आणि नंतर त्या लॅचफोर्ड यांना विकल्या होत्या.”

ब्रिटिश म्युझियम आणि V&A सारख्या संस्थांमध्‍ये कार्यरत असलेल्या संशोधकांनी या दागिन्यांचे तुकडे मिलानमधील दागिन्यांशीही जुळवून पाहिल्या.”

आता दागिन्यांचा हा संग्रह देशाचे शासक हुन सेन स्वत: स्वीकारणार आहेत.

अनेक दशकांपासून धुळीने माखलेल्या बॉक्समध्ये बंद केलेले हे दागिने आता कंबोडियातील सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा दाखवले जातील. यामुळे या दागिन्यांची झळाळी पुन्हा सर्वत्र पसरणार हे नक्की.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)