गावचे उपसरपंच ते खासदार, पत्नीच्या जागी लढून रामटेकचा गड खेचून आणणारे श्यामकुमार बर्वे कोण आहेत?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

देशाला पंतप्रधान देणारा महाराष्ट्रातला मतदारसंघ म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघ. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारामुळे हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आला.

उमेदवाराची घोषणा झाली, नामांकन अर्ज दाखल होताच घडामोडींना वेग आला आणि रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्जच बाद ठरला.

डमी उमेदवार म्हणून त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनी अर्ज भरला आणि तेच आता तब्बल 77 हजारांच्या मताधिक्क्यानं निवडून आले.

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या श्यामकुमार बर्वेंनी दोन टर्म महायुतीच्या ताब्यात असलेला रामटेकचा गड काँग्रेसला परत मिळवून दिला. पण, श्यामकुमार बर्वे नेमके कोण आहेत? त्यांना हा विजय कसा शक्य झाला? हे पाहूयात.

रामटेकचा गड आपल्याकडे यावा यासाठी भाजपचे नेते इच्छुक होते. पण, शेवटपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या मतदारसंघावरील दावा सोडला नाही.

'अखेर उमेदवार आमचा आणि पक्ष तुमचा', अशी खेळी करत भाजप आणि शिंदेंमध्ये एकमत झालं. काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना पक्षात घेऊन शिंदेंनी त्यांना रामटेकमधून लोकसभेच्या मैदानात उतरवलं.

दुसरीकडे 2019 ला काँग्रेसनं उमेदवारी दिलेले माजी आयएएस अधिकारी किशोर गजभिये यांनी बंडखोरी केली. वंचित बहुजन आघाडीनेही या मतदारसंघात उमेदवार दिला होता.

रामटेक लोकसभा मतदारसंघात निवडणूक नेमकी कशी झाली?

रामटेकच्या गडासाठी भाजप सुरुवातीपासून आग्रह होता. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी इच्छाही बोलून दाखवली. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटपर्यंत त्यांच्या जागेवरील दावा सोडला नाही.

शेवटी भाजपच्या आग्रहास्तव त्यांनी दोन टर्म खासदार राहिलेल्या कृपाल तुमानेंचं तिकीट कापलं आणि काँग्रेसमधून उमेदवार आयात केला.

लोकसभेची उमेदवारी मिळताना पाहून उमरेड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन राजू पारवेंनी शिवसेनेत प्रवेश केला आणि रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढले. पण, हीच बाब इथल्या जनतेला पटली नाही.

आधीच पक्ष फोडाफोडीचा मुद्दा या निवडणुकीत प्रभावी ठरत होता. त्यात फक्त पदासाठी पक्ष बदललल्यामुळे राजू पारवेंबद्दल मतदारसंघात रोष होताच. तसेच राजू पारवे यांचं उमरेड विधानसभा मतदारसंघ वगळता इतर विधानसभा मतदारसंघात नेटवर्क नव्हतं.

भाजपच्या ताकदीवर ते निवडणुकीत उभे होते. पण, हा मतदारसंघ भाजपला मागूनही सुटला नाही त्याबद्दल नेत्यांमध्ये नसली तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसली.

मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रावरील काही कार्यकर्त्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली होती. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी देखील राजू पारवेंसाठी सभा घेतली. इतकंच नाहीतर एकनाथ शिंदेंनी सतत तीन दिवस या मतदारसंघात प्रचार केला.

तरीही राजू पारवेंचा पराभव झाला. महत्वाचं म्हणजे त्यांच्याच उमरेड विधानसभा मतदारसंघात त्यांना कमी मतं मिळाली. श्यामकुमार बर्वे यांनी त्यांना हिंगणा वगळता सगळ्या विधानसभा मतदारसंघात धोबीपछाड दिलं.

उपसरपंच ते खासदार, कोण आहेत श्यामकुमार बर्वे?

श्यामकुमार बर्वे हे मूळचे नागपूरजवळील कन्हान कांद्रीचे आहेत. ते 15 वर्ष कांद्री ग्रामपंचायतीचे सदस्य होते. त्यानंतर 2020 ला ते उपसरपंच झाले.

पुढे कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक पदावर निवडून गेले. इतकीच काय ती त्यांची स्वतःची राजकीय ओळख आहे. पण, त्यांच्या पत्नी रश्मी बर्वे या सुनील केदारांच्या कट्टकर समर्थक आहेत. त्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यांची वक्तृत्व शैली देखील चांगली आहे. त्या जिल्हा परिषद निवडणुकीतही निवडूनही आल्या होत्या.

त्यानंतर त्या नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष देखील झाल्या होत्या.

श्यामकुमार बर्वे यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी रश्मी राजकारणात जास्त सक्रीय होत्या. त्यामुळे सुनील केदार यांची लोकसभा निवडणुकीसाठी रश्मी बर्वे यांना पहिली पसंती होती. त्यांनी काँग्रेस हायकमांडकडून रश्मी बर्वेंसाठी तिकीट खेचून आणलं. उमेदवारी अर्ज भरला. पण, त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा निघाला आणि ऐन वेळी जात प्रमाणपत्र रद्द झालं.

त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज देखील बाद ठरला. शेवटी श्यामकुमार बर्वे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली.

ते राजकारणात इतके सक्रीय नसताना त्यांना निवडून आणण्याचं आव्हान सुनील केदारांसमोर होतं. पण, त्यांनी ते आव्हान स्विकारलं आणि श्यामकुमार बर्वे यांना चांगल्या लीडनं निवडून आणलं. अशारितीनं श्यामकुमार बर्वे कांद्री गावचे उपसरपंच ते आता लोकसभेचे खासदार झाले.

सुनील केदार यांनी विजय कसा खेचून आणला?

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि श्यामकुमार बर्वे यांच्या विजयामागे महत्वाचं नाव म्हणजे सुनील केदार.

त्यांनीच ही निवडणूक अंगावर घेतली होती. काँग्रेस हायकमांडनं केदारांच्या मर्जीतला उमेदवार दिल्यानं त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं.

तसेच रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानं त्यांच्यावर टीकाही झाली. पण, हा मुद्दा त्यांच्या जिव्हारी लागला होता.

अमरावतीत नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्राच्या बाबतीत एक न्याय आणि रामटेकमध्ये रश्मी बर्वे यांना एक न्याय का? एका अनुसूचित जातीच्या महिलेला निवडणूक लढण्यापासून वंचित ठेवलं असा प्रचार काँग्रेसकडून करण्यात आला.

सुनील केदार यांनी प्रचाराची मायक्रोप्लॅनिंग केली होती. ते जवळपास दोन दिवसांत प्रचार करणाऱ्या टीममध्ये बसायचे आणि प्लॅनिंग करायचे असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

शिवाय रामटेक हा नागपूर जिल्ह्यातला ग्रामीण लोकसभा मतदारसंघ आहे. नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात गेली 10 वर्ष महायुतीचं सरकार आहे. पण, विकासाच्या दृष्टीनं रामटेक नागपूरपेक्षा कितीतरी पटीनं मागे आहे. याबद्दल जनतेचा रोष होताच. त्यामुळे रामटकेच्या जनतेनं नवीन चेहऱ्याला आणि पक्षाला संधी दिली आहे.

रामटेक मतदारसंघाचा इतिहास कसा राहिला आहे?

हा मतदारसंघ 1957 च्या निवडणुकीपासूनच काँग्रेसचा गड होता.

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव रामटेक लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून गेले. 1984 ला रामटेकमधून ते पहिल्यांदा लोकसभेत गेले. त्यानंतर 1989 ला देखील रामटकेच्या जनतेनं राव यांना पुन्हा खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं.

आतापर्यंत महाराष्ट्रातून एकही मराठी नेत्याला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नसली तरी रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून जाणारे नरसिंह राव पुढे 1991 साली पंतप्रधान झाले. 1991 साली ते आंध्रप्रदेशातील नांदयाल मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी होऊन लोकसभेत गेले होते.

नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी चित्रलेखा, पी. व्ही. नरसिंह राव, दत्ता मेघे, मुकुल वासनिक या काँग्रेसच्या नेत्यांना रामटेकच्या जनतेनं संधी दिली.

1998 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. पण, बाळासाहेबांची सभा झाली आणि वातावरण बदलू लागलं. 1999 च्या निवडणुकीत बाळासाहेबांनी सुबोध मोहितेंना उमेदवारी दिली आणि काँग्रेसच्या गडावर शिवसेनेचा भगवा फडकला.

2004 ला सुबोध मोहिते दुसऱ्यांदा निवडून गेले. पण, खासदारकीची टर्म पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीतही शिवसेनेचाच भगवा फडकला. पण, 2009 ला मुकुल वासनिक यांनी रामटेकचा गड परत काँग्रेसकडे खेचून आणला.

2014 ला मुकुल वासनिक यांनी गड राखला. पण, 2014 च्या मोदी लाटेपासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे.

दोन्हीवेळा कृपाल तुमाने या मतदारसंघातून विजयी झाले. पण, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने तुमानेंचं तिकीट कापलं.

विधानसभेचं पक्षीय बलाबल

रामटेक लोकसभा मतदारसंघ नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विखुरलेला आहे. या मतदारसंघात रामटेक, काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

यापैकी काटोलमध्ये राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, सावनेरमध्ये काँग्रेसचे सुनील केदार आमदार आहेत. उमरेडमध्ये राजू पारवे काँग्रेसचे आमदार होते. पण, आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून ते लोकसभेचे उमेदवार आहेत.

हिंगण्यातून समीर मेघे आणि कामठीतून टेकचंद सावरकर हे दोन भाजपचे आमदार आहेत. रामटेकमध्ये आशिष जयस्वाल हे अपक्ष आमदार असून त्यांचा पाठिंबा एकनाथ शिंदे गटाला आहे.

ऐनवेळी काँग्रेसच्या उमेदवार कशा ठरल्या बाद?

काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं. त्यांच्या पाठीमागे सुनील केदार यांची भक्कम ताकद होती. पण, बर्वे यांच्याविरोधात जात पडताळणी समितीपासून तर माहिती आयुक्त, राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडे तक्रारी गेल्या.

माहिती आयुक्तांनी दिलेले चौकशीचे आदेश मागे घेतल्यानं त्यांना या प्रकरणात दिलासा मिळाला. पण, राज्य सरकारनं आदेश दिल्यानंतर जात पडताळणी समितीनं त्यांच्या प्रमाणपत्राची फेरतपासणी केली.

ऐन निवडणूक अर्ज छाननीच्या दिवशी बर्वेंचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा निवडणूक अर्जही बाद झाला.

काँग्रेसनं एकाच एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकाला रश्मी यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचं नाव लिहिलं होतं. त्यामुळे त्यांचा अर्ज ग्राह्य धरून श्यामकुमार बर्वे यांना रामटेकमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवारी देण्यात आली. सध्या रश्मी बर्वे यांनी जात पडताळणी समितीच्या विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

मतदारसंघात काँग्रेसची कशी झाली कोंडी?

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीवरून नितीन राऊत आणि सुनील केदार यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. नितीन राऊत त्यांचा मुलगा कुणाल राऊत यांना तिकीट मिळावं यासाठी आग्रही होते. पण, हायकमांडने सुनील केदार यांच्या मर्जीतला उमेदवार दिला.

रश्मी बर्वेंना उमेदवारी मिळाली. पण, जातवैधता प्रमाणपत्रामुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली आणि काँग्रेसला पहिला धक्का बसला.

दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद होती. पण, ऐन निवडणुकीत उमरेडचे आमदार राजू पारवेंनी साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला इथंही धक्का बसला.

सुनील केदारांनी बर्वे कुटुंबाला जवळ करताच केदारांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कुंभारेंनी काँग्रेसची साथ सोडल्याने ऐन निवडणुकीत केदारांसह काँग्रेसला तिसरा धक्का बसला. याशिवाय माजी आयएएस अधिकारी किशोर गजभिये यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली. ते या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढत आहेत.

एकूणच चारही बाजूने काँग्रेसची कोंडी झाली. यात आता श्यामकुमार बर्वे कशी लढत देतात? हे बघणं महत्वाचं आहे.

शिंदेंना काँग्रेसच्या आमदाराला का आयात करावं लागलं?

रामटेक लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच भाजपचा डोळा होता. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघासाठी देवेंद्र फडणवीसांकडे आग्रह धरला होता.

शेवटपर्यंत भाजप आणि शिंदेंमध्ये या मतदारसंघाबद्दल चर्चा सुरूच होती. दोन टर्म खासदार राहिलेले कृपाल तुमाने यांच्या कामाचा आलेख घसरल्याचं भाजपचं म्हणणं होतं. त्यामुळे तुमानेंना उमेदवारी नको अशी भाजपची भूमिका होता.

राजू पारवेंना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची भाजपची रणनिती होती. अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवसांपूर्वी आम्ही रामटेकच्या जागेसाठी अजूनही आग्रही आहोत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पण, शिंदेंनी शेवटपर्यंत ही जागा भाजपला सोडायला तयार नव्हते.

अखेर तुमानेंना बदली करून राजू पारवेंना उमेदवारी देण्याचा भाजपनं ठेवलेला प्रस्ताव शिंदेंनी मान्य केला.

या मतदारसंघात तुमानेंशिवाय दुसरा तुल्यबळ उमेदवार सापडत नसल्यानं शेवटी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना आयात करून उमेदवारी द्यावी लागली.

राजू पारवे कोण आहेत?

राजू पारवे हे मूळचे भिवापूरचे रहिवासी आहेत. आधी ते युवक काँग्रेसमध्ये सक्रीय होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

2014 ला त्यांचे भाऊ सुधीर पारवे उमरेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. यावेळी राजू यांनी भावाविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. पण, यात त्यांचा पराभव झाला.

शेवटी राजेंद्र मुळक यांचा हात पकडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2019 ला आमदारकीचं तिकीटही मिळवलं. मुळक यांच्या पाठिंब्यानं राजू पारवे विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले.

राजेंद्र मुळक यांची उमेरड विधानसभा मतदारसंघावर पकड आहे. त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात, असं आजवरचं चित्र होतं.

राजू पारवे आमदार असतानाही कार्यकर्ते मात्र मुळक यांच्या पाठीशी होते. यातूनच राजू पारवे आणि राजेंद्र मुळक यांच्यामध्ये धुसफूस सुरू होती, अशी चर्चा उमरेडच्या गोटात आहे. आता याच राजू पारवेंनी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.