लोकसभा महाराष्ट्र उमेदवार 2024 : महाविकास आघाडी, महायुती आणि वंचितच्या उमेदवारांची यादी

लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे कल हाती येण्यास सुरुवात झालीय. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यातील वंचित बहुजन आघाडीने काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. ते वगळता अनेक ठिकाणी तिरंगी लढती पाहायला मिळत आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यव्यापी निवडणूक होतेय. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या, परिणामी मतदारांच्या मनात काय आहे, हे या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून कळणार आहे.

महाराष्ट्रात कोण किती जागा लढवतायेत?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं राज्य सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर या महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून आलेले अजित पवार सामिल झाले. परिणामी आता महायुतीत भाजपसोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरही महायुतीत आहेत. किंबहुना, परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढत आहेत. त्यांना अजित पवार गटाच्या वाट्याला आलेली जागा तिथं देण्यात आली आहे.

महायुतीच्या जागावाटपाचा चित्र असं आहे :

  • भारतीय जनता पक्ष - 28
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 05
  • शिवसेना (एकनाथ शिंदे गट) - 15

तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हे आहेत.

महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील जागावाटपात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा दिल्या आहेत. मात्र, तरीही सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झालीय. तिथं शिवसेनेचे चंद्रहार पाटील अधिकृत उमेदवार असतानाही काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलीय.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा चित्र असं आहे :

  • काँग्रेस - 17
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 10
  • शिवसेना (उद्धव ठाकरे गट) - 21

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या या संघर्षात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीही रणांगणात आहे. वंचित बहुजन आघाडी या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 35 जागा लढतेय.

तर बारामती, कोल्हापूर, नागपूर या तीन ठिकाणी वंचितने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय, तर अमरावतीत आनंदराज आंबेडकरांना, भिवंडीत अपक्ष उमेदवार निलेश सांबरेंना, तर यवतमाळ-वाशिममध्ये समाजवादी जनता पार्टीचे डॉ. अनिल राठोड यांना पाठिंबा दिलाय.

सांगलीत महाविकास आघाडीतून बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलाय, तर सोलापुरातील वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेतली.

मुंबईतील लोकसभा उमेदवार

मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघांचा समावेश होतो.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे उत्तर मुंबईतून भाजपतर्फे लोकसभेच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीत मुंबईतील जास्तीत जास्त जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवार

सोलापूर, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा, शिरूर, बारामती, पुणे आणि मावळ असे 10 मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रात येतात. भौगोलिकदृष्ट्या मावळ मतदारसंघातील बराचसा भाग हा रायगड जिल्ह्यातही येतो.

उमेदवारांच्या दृष्टीनेही पश्चिम महाराष्ट्र हाय प्रोफाईल विभाग आहे. डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, शाहू महाराज छत्रपती यांच्यासारखे दिग्गज रणांगणांत आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवार

उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, नाशिक, शिर्डी, अहमदनगर आणि दिंडोरी असे आठ मतदारसंघ येतात.

रावेरमधून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपतर्फे लढतायेत, तर दिंडोरीतून केंद्रीय मंत्री भारती पवार रिंगणात आहेत.

मराठवाड्यातील लोकसभा उमेदवार

मराठवाड्यात 8 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना आणि औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) या मतदारसंघांचा समावेश होतो.

पंकजा मुंडे, महादेव जानकर, रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, ओमराजे निंबाळकर असे दिग्गज मराठवाड्यातून मैदानात आहेत.

विदर्भातील लोकसभा उमेदवार

नागपूर, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा-गोंदिया आणि बुलडाणा असे 10 लोकसभा मतदारसंघ विदर्भात येतात.

नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर असे अनेक दिग्गज या विभागातून लोकसभेच्या रिंगणात आहेत.

ठाणे-पालघर, कोकणातील लोकसभा उमेदवार

रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग असे कोकणातील दोन, तर पालघर, ठाणे, भिवंडी आणि कल्याण असे चार ठाणे विभागातील मतदारसंघ यात येतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून, रायगडमधून माजी मंत्री सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते असे उमेदवार रिंगणात आहेत.