You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिंडोरी लोकसभा निकाल : विद्यमान मंत्री भारती पवारांविरोधात भास्कर भगरे यांना मोठी आघाडी
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या विरोधात भास्कर भगरे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
भारती पवार यांनी गेल्यावेळी विजय मिळवल्यानंतर पवार यांना पक्षानं पुन्हा संधी दिली होती. पण त्यांना ही जागा राखण्यात यश आलं नाही.
राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी याठिकाणी चांगली लढत देत त्यांचा पराभव केला.
या मतदारसंघामध्ये आदिवासी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. मतांच्या राजकारणात डाव्या पक्षांचाही याठिकाणी चांगला हातखंडा असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं तोही मुद्दा महत्त्वाचा ठरला.
मतदारसंघाचा इतिहास
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2008 मध्ये करण्यात आली. मालेगाव लोकसभा मतदारसंघातील भागाचा यात समावेश करण्यात आला. त्यात प्रामुख्यानं नांदगाव, चांदवड, कळवण, निफाड, येवला आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश करण्यात आला आहे.
2009 मध्ये याठिकाणी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तीनही टर्ममध्ये याठिकाणी भाजपच्या उमेदवाराचाच विजय झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
पण यात आणखी एक महत्त्वाची बाब जे दोन खासदार इथून निवडून गेले आहेत, ते दोन्हीही मूळचे भाजप नेते नव्हते. त्या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता.
पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजय मिळवला. राष्ट्रवादीत असताना कार्यकर्त्यांमध्ये बसवलेला जम आणि भाजपशिवाय शिवसेनेची साथ याचाही त्यांना फायदा झाला. त्यानंतर 2014 मध्येही त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवत विजय मिळवला.
नंतर डॉ. भारती पवार भाजपकडून मैदानात उतरल्या आणि विजयी झाल्या. एवढंच नाही तर त्यांना 2021 मध्ये नरेंद्र मोदी यांनी आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारीही दिली.
त्यामुळंच निर्मितीपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिल्यानं याला भाजपचा गड असंही म्हटलं जातं. पण याठिकाणी असलेली राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या बळाकडंही दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही.
चव्हाण यांना 2019 मध्ये धक्का
हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरी मतदारसंघातून सलग दोन वेळा खासदार बनले. 2019 मध्येही ते विजयी हॅटट्रिक करणार असं वाटत असतानाच मोदी-शहांच्या धक्कातंत्राचा त्यांना फटका बसला.
भाजपनं हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारीच दिली नाही. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपनं तिकिट दिलं.
विशेष म्हणजे चव्हाण यांनी याच भारती पवार यांना 2014 मध्ये पराभूत केलं होतं. पण भाजपनं त्यांना उमेदवारी देत चव्हाण यांना घरी बसवलं.
डॉ. भारती पवार यांचा या निवडणुकीत सुमारे दोन लाख मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीचे धनराज महाले हे या निवडणुकीत दुसऱ्या स्थानी होते.