विशाल पाटलांनी 'सांगली' जिंकली, ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांचं डिपॉझिट जप्त

लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला आहे.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं हट्टानं मागून घेतलेल्या या मतदारसंघात त्यांचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचं डिपॉझिट जप्त झालंय.

विशाल पाटील यांना 5 लाख 71 हजार 666 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या संजय काका पाटील यांना 4 लाख 71 हजार 613 मतं मिळाली.

चंद्रहार पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 60 हजार 860 मतं मिळाली.

या मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बरीच रस्सीखेच झाली होती. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लढवत असल्याचा शिवसेनेचा दावा होता. तर वाटाघाटीत असं ठरलं नसल्याचं म्हणत काँग्रेस नेत्यांकडून वारंवार सांगण्यात आलं.

काँग्रेसनं अखेरपर्यंत शिवसेनेकडून हा मतदारसंघ मिळवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेनेनं ऐकलं नाही त्यामुळं अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती.

आणीबाणीनंतर देशभरात काँग्रेसने आपल्या जागा गमावल्या, मात्र अशा अटीतटीच्या परिस्थितीतही गणपतराव गोटखिंडे या काँग्रेसच्या उमेदवाराने आपला मतदारसंघ राखला होता. हा मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ.

देशात कोणाचीही सत्ता येऊ दे, पण सांगलीमधून नेहमीच काँग्रेसचाच उमेदवार निवडून यायचा.

1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याची वाटचाल कृषी-औद्योगिक अशी एकत्रितरित्या झाली पाहिजे म्हणून पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तसाच रोडमॅप आखला.

त्यांचा हा दृष्टिकोन ओळखणाऱ्या राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या फळीतील वसंतदादा पाटलांनी सांगली जिल्ह्यात सहकाराचा पाया घातला.

त्यांनी सांगलीत सहकाराचं जाळं विणून जिल्हा कायम काँग्रेसच्या ताब्यात ठेवला होता. म्हणूनच सांगली लोकसभा मतदारसंघावर वसंतदादादांचा वरचष्मा राहिला.

अगदी आणीबाणीनंतरच्या जनता लाटेतही वसंतदादांचा उमेदवारच काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आला.

दादांच्यानंतर त्यांचे सुपुत्र प्रकाशबापू पाटील, पुतणे मदन पाटील, नातू प्रतीक पाटील यांनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले.

मात्र, या काँग्रेसच्या मजबूत किल्ल्याला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने खिंडार पाडलं.

2014 मध्ये मोदी लाटेचा परिणाम; काँग्रेसचा बालेकिल्ला प्रथमच ढासळला

1962 ते 2014 पर्यंत या मतदारसंघातून नेहमी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता.

वसंतदादाचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा नेतृत्व केलं. त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील 2006ला झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 2009ला प्रतीक यांनी पुन्हा विजय मिळवला.

पण 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयकाका पाटील यांनी ऐन लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

2014 च्या मोदी लाटेत संजयकाका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला.

त्यानंतर काँग्रेस – राष्ट्रवादीने सांगलीमध्ये जिल्हापरिषद, महापालिका, पंचायत समित्या, नगरपरिषदा, महापालिका अशी सत्ताकेंद्रे एकापाठोपाठ एक गमावली.

त्या पाच वर्षांत भाजपच्या सत्तेचा वारू जिल्ह्यात चौफेर उधळला. भाजपने संपूर्ण मतदारसंघात संपर्क वाढवला.

त्यांनी मतदारसंघातील पूर्वाश्रमीचे काँग्रेस - राष्ट्रवादीतील कार्यकर्ते भाजपच्या गाळाला लावले. या कार्यकर्त्यांना बळ देत त्यांनी भाजपचा पाया विस्तारला. त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत उमेदवारीला फारसे आव्हान उभे राहिले नाही. त्यामुळे 2019 ची उमेदवारीही त्यांना सहजपणे मिळाली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काय घडलं?

सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेते आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि मदन पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जिल्ह्यातलं छत्रच हरपलं.

2019 च्या निवडणुकीच्या आधी प्रतीक पाटील यांनीही पक्षाचा राजीनामा दिला.

"मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे. काँग्रेस पक्षाशी माझं नातं संपलं आहे," अशी घोषणा प्रतीक पाटील यांनी सांगलीतील एका मेळाव्यात बोलताना केली होती.

निवडणुकीच्या अगदी दोन महिने आधी काँग्रेसमध्ये लढायलाच कोणी नव्हते अशी स्थिती होती. कदम आणि पाटील घराण्याबाहेरच्या उमेदवाराचा विचारही काँग्रेसने केला नव्हता.

शेवटी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली. यावेळी स्वाभिमानीने काँग्रेसमधल्याच विशाल पाटलांना आयात करत त्यांना उमेदवारी दिली. विशाल पाटील म्हणजे वसंत दादांचे नातू. त्यांची जिल्ह्यात तशी चांगलीच ताकद आहे.

त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला रंग चढलाच होता, मात्र निवडणूक ऐन रंगात आली ती गोपीचंद पडळकर यांच्या एन्ट्रीने. पडळकर सुरवातीला काँग्रेस - स्वाभिमानीकडून रिंगणात उतरणार होते. मात्र, ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळवली आणि जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उठवला.

आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी घेतलेल्या सांगलीतील सभेत मिळालेला प्रतिसाद पाहता पडळकरांना चांगली मतं मिळणार असा कयास बांधला जात होता.

मात्र, पडळकरांना तिसर्‍या क्रमांकाची मतं मिळाली आणि याचा फटका बसला आघाडीच्या उमेदवाराला. परिणामी भाजपने हा अटीतटीचा सामना संजय काका पाटलांच्या रूपाने जिंकला.

यंदा नेमके काय घडले?

यावेळी जिल्ह्यातील राजकीय स्थिती बदलली आहे. राज्यात सत्ताकारणाची समीकरणं बदलल्याचा परिणाम म्हणून महायुतीतील घटक पक्षांची ताकद भाजपच्या उमेदवाराला मिळेल असं दिसत होतं, पण परिस्थिती तशी नव्हती.

सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये जत, तासगाव - कवठेमहांकाळ, खानापूर - आटपाडी, पलूस - कडेगाव, मिरज आणि सांगलीचा समावेश आहे. सध्या पलूस-कडेगाव आणि जत काँग्रेसकडे, तासगाव राष्ट्रवादीकडे, खानापूर-आटपाडी शिवसेना शिंदे गटाकडे, सांगली व मिरज भाजपकडे आहे.

मात्र यापैकी बर्‍याच ठिकाणी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात पक्षाअंतर्गत गटबाजी दिसून आली. मागच्या साडेनऊ वर्षांत खासदारांकडून पक्षासाठी कोणतंही योगदान मिळत नसल्याचा आरोप पक्षातील नेत्यांनीच केला होता.

काँग्रेस या मतदारसंघासाठी इतकी आग्रही का झाली , याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांनी म्हटलं होतं की, “सांगली आणि नंदुरबार हे असे जिल्हे आहेत जिथे काँग्रेस उमेदवार लोकसभेला हमखास निवडून येतो असे महाराष्ट्रभर बोलले जायचे. सातारा जिल्ह्यातून वेगळा होऊन सांगली जिल्हा तयार झाला तरी 1952 पासून इथे काँग्रेसचे वर्चस्व होते.

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत दादा कुटुंबातील सदस्य येथून पराभूत होत आहेत आणि दहा वर्षानंतर आता भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात अँटी इन्कबन्सी फॅक्टर काम करेल असे त्यांना वाटत असल्याने गमावलेले महत्व पुन्हा प्राप्त करण्यासाठी त्यांना या जागेचे आणि उमेदवारीचे महत्व वाटत आहे.”

शिवसेना या मतदारसंघासाठी आग्रही का झाली आहे? पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये शिवसेना तुलनेने अधिक प्रभावी आहे, मात्र इथले दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. शिवाय आघाडीमधील वाटाघाटीत कोल्हापूर काँग्रेसकडे गेल्याने, पक्षातील फुटीनंतर पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी सेनेला हक्काच्या मतदारसंघाची आवश्यकता होती.

याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार शिवाजी मोहिते यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, “शिवसेना सांगली लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत आग्रही आहे याचे मुख्य कारण विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना भाजपामधून होत असलेला विरोध.

"मूळ काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघांमध्ये आता भाजप विरोधातला उमेदवार निवडून येऊ शकतो याची खात्री ठाकरे सेनेला होती, त्यामुळंच कोल्हापूरची जागा सोडल्यानंतर सांगलीच्या जागेवर त्यांनी दावा सांगितला. भाजपाविरोधी मतांचे एकत्रीकरण होईल अशी अपेक्षा ठाकरे गटाला होती,” असं मोहिते म्हणाले.

पण विशाल पाटील यांनी अर्ज भरल्याने या मतदारसंघातील लढत रंजक झाली. विशाल पाटील आघाडीवरही आहेत. त्यामुळं निकाल नेमका काय लागणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.