You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बुलढाणा लोकसभा : ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकरांना उमेदवारी जाहीर, कशी होईल लढत?
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीचे बुलढाण्याचे उमेदवार म्हणून नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 22 फेब्रुवारी 2024 रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
यादरम्यान त्यांनी चिखली, मोताळा, जळगाव जामोद येथे जनसंवाद मेळाव्याला संबोधित केलं आणि मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती.
या माध्यमातून ठाकरे गटानं बुलढाणा लोकसभेसाठीचं रणशिंग फुंकल्याचं दिसून आलं.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही बुलढाण्यात सभा घेऊन ते या जागेसाठी आग्रही असल्याचं दाखवून दिलं आहे.
जिल्ह्यातून शिवसेना वगळता कोणत्याच पक्षानं उमेदवाराचं नाव अधिकृतपणे जाहीर केलं नसलं तरी सगळ्याच पक्षातले नेते आपापल्या परीनं प्रचाराला लागले आहेत.
त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणं काय असतील?सध्या जिल्ह्यात काय हालचाली सुरू आहेत? आणि निवडणुकीत कोणता फॅक्टर निर्णायक ठरू शकतो? याचा घेतलेला हा आढावा.
बुलढाणा मतदारसंघाचा इतिहास
बुलढाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. 1996 पासून ते 2019 पर्यंत 1998 चा अपवाद वगळता येथून शिवसेना विजयी होत आली आहे.
बुलढाणा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असताना आनंदराव अडसूळ तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते.
2009 पासून या मतदारसंघात खुल्या प्रवर्गातून प्रतापराव जाधव सलग तीनदा विजयी झाले आहेत.
2019 मध्ये काय झालं?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून राजेंद्र शिंगणे यांनी निवडणूक लढवली, तर युतीकडून प्रतापराव जाधव रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम शिरस्कार मैदानात होते.
या निवडणुकीत जिल्ह्यातील सिंचन, कर्जमाफी, पीक विम्याचे न मिळालेलं पैसे, रोजगार, रखडलेला जालना -खामगाव रेल्वेमार्ग हे मुद्दे गाजले.
पण, नरेंद्र मोदी हेच एनडीएप्रणित आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्यामुळे त्याचा लाभ प्रतापराव जाधव यांना झाला आणि ते विजयी झाले.
मतांची आकडेवारी पाहिली तर डॉ. राजेंद्र शिंगणे यांना 3 लाख 88 हजार 690 मतं मिळाली आणि प्रतापराव जाधव यांना 5 लाख 21 हजार 977 मतं मिळाली.
बुलडाणा लोकसभेच्या 2019 च्या या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर निर्णायक ठरला.
या निवडणुकीत वंचितचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांना 1 लाख 72 हजार मतं मिळाली. आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे जेवढ्या मतांनी पराभूत झाले त्यापेक्षा वंचितला मिळालेलं मतदान जवळपास 38 हजारांनी जास्त होतं.
त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार का, हे पाहणं जिल्हावासीयांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
2024 साठी रिंगणात कोण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं समजत आहे. कारण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बाहेर पडत बंड केलं, तेव्हा त्यांना प्रतापरावांनी साथ दिली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे ही जागा सहजासहजी सोडणार नसल्याचं चित्र आहे.
दुसरीकडे, यंदाची निवडणूक प्रतापरावांना जड जाईल, असं भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भाजपही बुलडाण्यात आपला उमेदवार उभा करण्यासाठी चाचपणी करत आहे.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पाचवेळा बुलढाण्याचा दौरा केला आहे. या दौऱ्यात भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले त्यांच्यासोबत दिसल्या आहेत.
बुलढाणा हा जिजाऊंचा जिल्हा असल्यामुळे इथून महिला खासदार पाहिजे, अशीही चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे. श्वेता महाले यांच्याशिवाय भाजपकडून लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजयराज शिंदे यांच्या नावाचीही चर्चा आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं त्याचप्रमाणे त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे
त्यांनी संकटकाळात उद्धव ठाकरेंना साथ दिली आहे. त्याप्रमाणे नरेंद्र खेडेकर प्रचार करताना दिसले आणि त्यांना त्यांच्या निष्ठेचे फळ मिळाल्याचं म्हटलं जात आहे.
महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता फारच कमी होती तरीसुद्धा उमेदवारीसाठी पक्षाकडे काही जणांनी मागणी करुन पाहिली. यामध्ये जयश्री शेळके, श्याम उमाळकर, हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश होता.
याशिवाय जिल्ह्यात ज्या दोन नावांची चर्चा आहे त्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि संदीप शेळके हे दोघे आहेत.
रविकांत तुपकर हे सातत्यानं शेतकरी प्रश्नांवर लढत आहेत. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनं केली आहेत. पण, त्यांच्यासाठी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणं सोपं नक्कीच असणार नाहीये. तुपकरांना शेतकऱ्यांची सहानुभूती असली तरी ती मतांमध्ये परावर्तित होईल का हा प्रश्न कायम आहे.
संदीप शेळके हे राजर्षी शाहू सहकारी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी ‘वन बुलढाणा मिशन’ या मोहिमेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी काही ठिकाणी रोजगार मेळावे, महिला आयोजित केले आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसत आहे.
एखादा प्रस्थापित पक्ष आपल्याला तिकीट देईल अशी त्यांना आशा आहे. पण, पक्षातल्या लोकांना डावलून दुसऱ्याला तिकीट देणं हे कोणत्याही पक्षासाठी सोपं काम नसतं, असं मत राजकीय निरीक्षक व्यक्त करतात.
यंदा कोणते मुद्दे गाजणार?
बुलढाणा जिल्ह्यात सिंचन आणि शेतकरी आत्महत्या हे ज्वलंत विषय आहेत. याशिवाय, बेरोजगारीचा मुद्दाही मोठा आहे. 2019 च्या आणि त्याआधीच्या निवडणुकीतही हे मुद्दे होतेच.
पण, जिल्ह्यातील लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत देशपातळीवरचा आणि विधानसभेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचा विचार केलेला असल्याचं आजपर्यंतच्या निकालांत स्पष्टपणे दिसून येतं.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही स्थानिक उमेदवारापेक्षा मोदींकडे पाहून मतदान करायचं, हा प्रघात कायम राहतो का, ते पाहणं महत्त्वाचं ठरेलं.
धार्मिक बाबींचा पगडा सामान्यांवर असतो, यात दुमत नाही. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्याचाही निवडणुकीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं जिल्ह्यातील विश्लेषक सांगतात.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या परिणामाविषयी विचारल्यावर देशोन्नती वृत्तपत्राचे बुलाढाणा जिल्ह्याचे संपादक राजेंद्र काळे सांगतात, "मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मात्र जिल्ह्यात राजकीय परिणाम जाणवणार नाही. कारण बुलढाणा जिल्हा विदर्भात येतो आणि इथल्या बहुतेक सगळ्याचं मराठ्यांनी कुणबी दाखले काढून घेतले आहेत. जिल्ह्यातील मराठ्यांना मराठवाड्यातील मराठ्यांप्रती सहानुभूती असली तरी त्याचा जिल्ह्यातील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे."
दरम्यान, बुलढाणा लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळते आणि येणाऱ्या काळात कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक गाजते, यावर बरीच समीकरणं अवलंबून असणार आहेत.